किशोर वयाच्या सवयी
नेटफ्लिक्सवर चार भागाची लघुसीरियल चाललीय. ‘ॲडलसन्स’. पौगंडावस्था. किशोर वय.
ही मालिका मार्चच्या शेवटल्या आठवड्यात पडद्यावर आली. कायच्या काय गाजतेय. ब्रिटीश खासदारांनी ती पाहिली. लोकसभेनंही ती जवळजवळ पाहिली. मंत्र्यांनी पाहिली आणि प्रधान मंत्र्याना आग्रह केला की ती पहावी. प्रधान मंत्री सध्या युक्रेनमधे गुंतलेत. ट्रंपनी नेटोमधून लक्ष काढलंय आणि युरोपीय देशांना वाऱ्यावर सोडलंय, तुमचं तुम्ही पहा अमेरिका तुम्हाला पैसे देणार नाही असं सांगितलंय. युरोपीय देशांची तंतरलीय. अशा गडबडीतही प्रधान मंत्री स्टार्मरनी ती पाहिलीय.
असं काय आहे त्या मालिकेत?
जेमी मिलर या १३ वर्षाच्या मुलानं केटी या त्याच्या वर्गमैत्रिणीचा खून केला. मारहाण कॅमेरात नोंदली होती. जेमीनं माध्यमांत लिहिलेल्या गोष्टीही पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. ज्या सुऱ्यानं खून झाला तो पोलिसांना सापडत नव्हता. जेमी आरोप नाकारत होता.
सव्वा वर्षं पोलीस तपास करतात, जेमीच्या वर्तणुकीचा अभ्यास मानसजाणकारांकरवी करतात. त्या तपासाची कहाणी या मालिकेत आहे.
चार भागात थरारक प्रसंग अगदीच नसल्यागत आहेत. मालिकाभर जेमीची मुलाखत चालते, जेमीचे आईवडील आणि बहीण बोलतात, जेमीच्या शाळेतल्या लोकांशी पोलीस बोलतात. मुलाखती, चर्चा हाच मालिकेचा आधार आहे. तासन तास जेमी बोलत असतो. तरीही प्रेक्षक खिळून रहातो.
प्रेक्षक अस्वस्थ होतात ते कथेत गुंतलेल्या सामाजिक वास्तवामुळं.
शाळेतली पोरं. सतत सेलफोनवर असतात, कंप्यूटरवर असतात. त्यांचं ज्ञान सेलफोवरून येतं. सेलफोनवर ज्ञान कुठून येतं? अनंत क्लिप्स असतात, ॲप्स असतात. निरंतर सेलफोवर चित्रं ओतली जात असतात. त्यात मित्रमैत्रिणींच्या ज्ञानाची भर पडते. पोरं क्लिप्स पाहून मतं तयार करतात. पोरं मतं आपसात चर्चतात. नंतर त्यातून त्यांची काही एक समजूत तयार होते. त्या समजुतीनुसार पोरं वागू लागतात.
यामधे आईबाप आणि मास्तर कुठंच येत नाहीत. आईबाप आपापल्या व्यापात व्यग्र असतात, त्यांना मुलांकडं पहायला वेळ नसतो. मुलाच्या एका हातात मॅगीपिझ्झा कोंबतात, दुसऱ्या हातात सेलफोन किवा टीव्हीचा रिमोट. बस.पालक आपापल्या कामाला रवाना. नंतरची जबाबदारी मास्तरांची असते. मास्तरही सोशल मिडियातलेच असतात. ते आपलं डोकं चालवत नाहीत, चॅटजीपीटी वापरूनच माहिती गोळा करतात आणि पोरांकडं सरकवतात. शिकवण्यात शिकणंही असतं हे आता मास्तरांना माहित नाही. तीन चार वर्षाच्या मुलांनाही कानात स्पीकर घालतात, स्पीकवर त्यांना गाणी ऐकवली जातात, गोष्टी सांगितल्या जातात. मास्तर किवा आईबाप गोष्ट सांगत नाहीत. यथावकाश मुलं डोकं चालवेनाशी होतात, नेटवरून मिळणारं, व्हॉट्सॅपवरून मिळणारं ज्ञान हेच त्यांचं ज्ञान असतं.
जेमी आणि त्याच्या वयाच्या मुलांना सेलफोनवर स्त्रिया दिसतात. स्त्रिया म्हणजे सेक्सची प्रतिकं असतात. त्यांची छाती केवढी आहे आणि जांघ केवढी आहे यावर मुलं चर्चा करू लागतात. स्त्री ही एक सेक्स भोगण्याची वस्तू किंवा प्राणी आहे अशी त्यांची समजूत होते. वस्तू किवा प्राणी म्हटल्यावर त्यांचा गैरवापर करायला परवानगी मिळते.
जेमी आणि त्याचे वर्गमित्र त्यांच्या मैत्रिणी सेक्सी आहेत की नाहीत, कोणाची छाती केवढी आहे असल्या चर्चा करत असतात. मैत्रिणीही आपलं उघडं अंग पोस्ट करतात. ते पाहून मित्र त्या मुलींना मैत्रिण करायचं की नाही ते ठरवतात. जेमीन जिला मारलय त्या केटीची छाती सपाट असते, त्यामुळं मित्रांचा तिच्यावर राग असतो.
शिक्षक आणि आईबापांनी जेमीला वाऱ्यावर सोडलंय. कपडे मिळतील, मागशील ते खायला मिळेल, महाग शाळेची फी भरली जाईल…वगैरे वगैरे..बाकीचं तुझं तू बघ. त्यानं खून केल्यानंतर त्याचे पालक जागे झाले. समाज जागा झाला. बसलेत काथ्याकूट करत.
घराघरात सर्व जगात हेच चाललंय.
जगण्याचा मतलबच बदललाय. पैसे पैसे, उपभोग उपभोग…वस्तू वस्तू…
मालिका प्रेक्षकाला खिळवून ठेवते यात चित्रपटाच्या विषयाचा भाग जितका आहे तितकाच चित्रपट तंत्राचाही आहे.
संथ दृश्य आहेत. कॅमेरा शांतपणे ३६० अंशात फिरत रहातो. एकच खोली, दोनच माणसं. एकच खोली तीन चार माणसं. ती काय करतात, ती काय बोलतात ते कॅमेरा दाखवतो. कॅमेरा आणि माणसं यांच्यामधे तिसरं काहीही येत नाही.
अलीकडं प्रेक्षकांना सारं फटाफट हवं असतं. तीन मिनिटाच्या गाण्यात शेकडो माणसं, शंभर वेळा कपडे बदलतात, शंभर वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. कधी आकाशातून, कधी जमिनीवरून, कधी डावीकडून, कधी उजवीकडून दिसतात. १८० सेकंदांत पन्नास दृश्यांचे तुकडे. कुठल्याही दृश्याचा अर्थ काय होतो याचा विचार करायला वेळ नसतो, दुसरा तुकडा हजर.हे सारं कां तर प्रेक्षकानं विचार करू नये. प्रेक्षकानं चारशे रुपये तिकीटावर खर्च करावेत, दोनशे रुपये पॉप कॉर्नवर, पन्नास रुपये बाटलीबंद पेयावर. खर्च करण्याची संधी मिळावी यासाठी समोर पडदा आणि त्यावर सिनेमा.
पहाणं, वाचणं, विचार करणं, तर्क लढवणं, विश्लेषण करणं, आनंद घेणं इत्यादी गोष्टी इतिहासजमा होत आहेत. जे सिनेमा पहाण्याबाबत तेच निवडणुकीबाबतही. कानात आणि डोळ्यात कोंबलेल्या मेसेजवरून सांगितलं जातं त्याला मत द्या. अक्कल वापरू नका.
ॲडलसन्स ही मालिका शांतपणे विषय मांडते. विचार करायला लावते. विचार करायला वेळ देते.
ऑस्ट्रेलियात किशोर वयीन मुलांना सेल फोन वापरायची बंदी घालण्याचा विचार चाललाय. युरोपमधेही तसंच काही तरी करणार म्हणतात. ब्रीटनही या मालिकेनंतर मुलांनी काय पहावं, काय नाही यासाठी काही तरी योजना करणार म्हणतय.
डोकी गहाण ठेवलेले लोकप्रतिनिधी आता काही तरी करायचं म्हणताहेत.
ते जाऊ द्या.
आपण मालिका पहावी, आपलं डोकं तासावं,आपल्या डोळ्यांना चांगलं काही तरी पहायची सवय लावावी.
।।