ट्रंप पुतीन गुऱ्हाळाची निष्पत्ती?शून्य?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रंप आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवरून दोन तासांची चर्चा झाली. युक्रेनमधलं युद्ध एक महिन्यासाठी थांबवण्यासाठी ही चर्चा होती. यात युक्रेन कुठंही नव्हतं. युक्रेनला मदत करणाऱ्या युरोपियन देशांचा एकही प्रतिनिधी या चर्चेत नव्हता.
चर्चा सुरू त्या चोविस तासात युक्रेनचे ड्रोन रशियात बाँब टाकत होते आणि रशियाची विमानं युक्रेनवर बाँबफेक करत होती. पुतीन दिलेला शब्द पाळत नाहीत हे झेलेन्सकीना माहित होतं, तसं झेलेन्सकी वारंवार म्हणाले होते.
चर्चा झाल्यावर संयुक्त पत्रक निघालं नाही. पुतीननी रशियात स्वतंत्र प्रतिक्रिया दिला, ट्रंप सवयीनुसार फॉक्स वाहिनीसमोर बोलले, व्हाईट हाऊसमधे नाही.
ट्रंप म्हणाले की चर्चा पॉझिटिव झाली. पण चर्चेत काय ठरलं ते ट्रंपनी नेमकं टाळलं. युद्ध तहकूब होईल; रस्ते-बंदरं-पूल इत्यादीवर हल्ले करायचे नाहीत असं ठरलं असं ट्रंप म्हणाले. पुतीन म्हणाले की फक्त ऊर्जा निर्मिती केंद्रांवर हल्ले करायचे नाहीत येवढंच ठरलं. नेमकं काय ठरलं?
पुतीन म्हणाले की तहकुबीच्या काळात युक्रेनला सैन्याची, शस्त्रांची जमवाजमव करता येणार नाही, इतर देशांनी युक्रेनमधे येता कामा नये. ट्रंप म्हणाले की तसं काहीही चर्चेत ठरलं नाही. नेमकं काय ठरलं?
फॉक्स वाहिनीवर ट्रंप म्हणाले की चर्चा उत्तम झाली, आर्थिक बाबतीत रशियाशी कसकसं सहकार्य करता येईल याची चर्चा झाली; रशियात दुर्मिळ खनीजं खूप आहेत त्याचा वापर कसा करता येईल यावर विचार झाला. पुतीन या बाबत काहीच बोलले नाहीत.
ट्रंप यांची ख्याती अशी की ते त्यांच्या मनात येईल ते बोलतात. कित्येक वेळा त्यांच्या मनात काही तरी असतं पण ते प्रत्यक्ष चर्चेत बोलत नाहीत. पण नंतर मात्र तसं बोललो होतो असं म्हणतात. म्हणजे ते काहीच बोललेले नसतात, ते सारं त्यांच्या फक्त मनात असतं. मनाचा अभ्यास करणाऱ्यांना ट्रंप हे एक आव्हान आहे, त्यांच्या अभ्यासाला प्रस्तुत चर्चा हे एक चांगलं साधन ठरायला हरकत नाही.
ट्रंप यांचं गाझाबद्दलचं मत जगजाहीर आहे. गाझाचा प्रश्न राजकीय आहे, त्यात बराच इतिहास गुंतलेला आहे हे ट्रंप यांच्या गावी नाही. गाझाची जमीन ताब्यात घ्यायची, ती डेवलप करायची, त्यातून अमाप पैसा गोळा करायचा येवढंच त्यांना समजतं. ट्रंप हे रियॅलिटी डेव्हलपर आहेत, प्रेसिडेंट नाहीत. पुतीन यांच्याशीही त्यांनी रशियातल्या नैसर्गिक गोष्टींचा व्यापार कसा करता येईल, रशिया आणि अमेरिका एकत्रीतपणे कसा आर्थिक भरभराट साधू शकतील, यावर चर्चा केली असण्याची शक्यता आहे. त्यामुळंच चर्चेत काय ठरलं ते दोघंही सांगत नाहीयेत. चर्चेची अधिकृत नोंद ट्रंप अमेरिकेच्या लोकसभेसमोरही ठेवायला तयार नाहीयेत. ती चर्चा ते माध्यमात मांडतात.
महिनाभराची युद्ध तहकुबी झाल्यास पुतीनना ती कशासाठी हवी होती? रशियाला सावरायला वेळ मिळणार होता. सध्या रशियाचे एक हजार सैनिक दररोज मरत आहेत. सैनिकांची चणचण उत्तर कोरियातले सैनिक आणून तात्पुरती भागवण्याचा प्रयत्न रशियानं केला खरा. पण तो अगदीच तात्कालीक उपाय होता. रशियाला जोरात सैन्य भरती करायची आहे. लढाईला पैसा व शस्त्रंही कमी पडतायत. त्याची काही तरी व्यवस्था रशियाला करायचीय. युक्रेननं चालवलेले ड्रोन हल्लेही रशियाला महाग पडत आहेत. हे ड्रोन युक्रेननं स्वतःच तयार केलेले असल्यानं युक्रेन त्या बाबत कोणावरही अवलंबून आहेत.हे ड्रोन मॉस्कोवर हल्ला करतात हे रशियाला जड जातंय. रशियाला उसंत हवीय.
युद्ध थांबलं की युक्रेनही आपली बाजू मजबूत करेल याची भीती रशियाला आहे. युरोपीय देशांनी एक होऊन युक्रेनला सर्व प्रकारची मदत द्यायची तयारी सुरु केलीय. रशियाशी लढण्यासाठी स्वतःचं लष्करी बळ उभं करण्याची पावलं युरोपीय देश टाकत आहेत. फ्रान्सचे प्रेसिडेंट मॅक्रॉन तर म्हणाले की वेळ पडल्यास फ्रेंच सैन्य युक्रेनमधे उतरेल. या गोष्टी घडल्या तर रशियाची बाजू अधिक कमकुवत होईल.
तेव्हां रशियाला युद्ध तहकुबी हवी होती आणि नकोही होती. समजा तहकुबी झाली तरी ती एकतरफी व्हावी, युक्रेन दुर्बळ रहावं आणि रशिया अधिक ताकदवान व्हावं अशी पुतीनची इच्छा होती.
या गोष्टीत ट्रंपना इंटरेस्ट नव्हता. युक्रेन-रशियानं जी काही काशी करायची ती करावी, ट्रंपचा मतलब युक्रेन आणि रशियातील खनीजं मिळवण्याशी होता.
चर्चेबाबत जे काही बाहेर आलं त्यावर झेलिन्सकीची प्रतिक्रिया होती ‘बोलणी झाली ते चांगलं झालं. युद्ध संपण्याच्या दिशेनं पडलेलं ते पहिलं पाऊल आहे. रशियाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, आमच्या संरक्षण व्यवस्थेचं काय करायचं ते आम्ही पाहून घेऊ, पुतीनच्या अटी आपल्याला मान्य नाहीत.’
म्हणजे शेवटी काय घडलं? पुतीनच्या अटी मान्य नसल्यानं पुतीन आणि झेलिन्सकी दोघांनाही चर्चा निष्फळ वाटली. ट्रंपचा तर प्रश्नच नाही. ते त्यांच्या मनातल्या नंदनवनात विहरत असतात.
प्रस्तुत चर्चा सुरु असताना युरोपीय देश लंडनमधे आणि हेगमधे भेटत होते. मुत्सद्दी आणि लष्कर प्रमुख स्वतंत्रपणे बैठका करत होते. ट्रंपना (म्हणजे सध्याच्या अमेरिकेला) युरोपबरोबर रहायचं नाहीये, अमेरिकेचं हित येवढाच एक मुद्दा ट्रंप यांना महत्वाचा आहे अशा स्थितीत आपल्याला आता स्वतंत्र व्हायचं आहे, अमेरिकेवर अवलंबून असणं थांबवायचं आहे असं युरोप ठरवतंय. युक्रेनवरचं आक्रमण युरोपीय देशांवरच्या आक्रमणाची नांदी आहे असं युरोपला समजलंय.
अमेरिका आणि युरोप यांच्यात दरी निर्माण झालीय. म्हटलं तर हेच पुतीन यांचं यश आहे असं म्हणता येईल. जागतीक प्रश्नांच्या चर्चेतून रशियाला वगळता येणार नाही हे पुतीननी सिद्ध केलंय. चर्चेची ही एक निष्पत्ती मानता येईल.
।।