दहशतवादाच्या विळख्यात पाकिस्तान
जाफर एक्सप्रेस दुर्घटनेनं पाकिस्तानमधलं वास्तव जगासमोर आणलं आहे.
११ मार्च रोजी सकाळी क्वेट्ट्याहून पेशावरकडं निघालेली जाफर एक्सप्रेस बलुचिस्तान लिबरेशन ऑर्गनायझेशन (बलिऑ)या संघटनेनं रूळ उडवून अडवली. गाडीत ४०० प्रवासी होते. त्यात १२५ प्रवासी पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेचे होते. दहशतवाद्यांची संख्या होती ३३. लष्करी कारवाईत सर्व दहशतवादी आणि २६ प्रवासी मारले गेले. दोन दिवस कारवाई चालली होती.
बलुच संघटना पाकिस्तान सरकारशी भांडत असते, पाकिस्तानी सुरक्षा दलावर आणि पाकिस्तानी सरकारी आस्थापनांवर हल्ले करत असते. पाकिस्तान सरकार बलुचिस्तानला सवतीसारखं वागवते; पाकिस्तान सरकार सर्व आर्थिक फायदे पंजाबकडं सरकवतं असा या संघटनेचा आरोप आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानातला सर्वात मोठा भूप्रदेश आहे, पाकिस्तानमधली किमती खनीजं याच विभागात आहेत. किमती खनीजं विकून पाकिस्तान पैसा मिळवतं पण त्यातला योग्य वाटा बलुचिस्तानला देत नाही असा या संघटनेचा दावा आहे. अर्थात हा दावा केवळ त्या संघटनेचा नाही, ती भावना सर्वसाधारण बलुच माणसाच्या मनातही आहे.
बलुचिस्तानातली खनीजं वापरण्यासाठी चीननं या विभागात रस्ते आणि रेलवे उभारली आहे. पाकिस्तान सरकार बलुचिस्तानला सवतभावानं वागवते याच्याशी चीनला देणंघेणं नाही, चीनला खनीजं आयात करायची आहेत. पण पाकिस्तान सरकारवरचा राग काढण्यासाठी बलिऑनं केलेल्या हल्ल्यात काही दिवसांपूर्वी दोन चिनी नागरीक मारले गेले होते.
बलुचिस्तानची सामाजिक घडण टोळ्या आणि जमातींवर झालेली आहे. टोळी प्रमुखांचं तिथल्या समाजावर वजन असतं. अफगाण समाजाला समांतर अशी स्थिती आहे. बलिऑवर काल परवापर्यंत टोळी प्रमुखाचं नेतृत्व होतं. पण अलीकडं ते नेतृत्व तरुणांकडं गेलं आहे. कारण बलुच तरूण निराशेनं ग्रासले आहेत. बलुचिस्तानचा विकास होत नाही. रोजगार निर्मिती अगदीच क्षीण असल्यानं बेकार तरूणांचे तांडे गावोगाव फिरत असतात. बलिऑच्या थरारक (हिंसक) पद्धतीबद्दल तरुणांना स्वाभाविक आकर्षण आहे. परिणामी बलिऑचं रूप आता बदललं आहे.
पाकिस्तानचं, पाकिस्तानच्या लष्कराचं म्हणणं आहे की बलुचिस्तानातल्या दहशतवादी कारवायांना अफगाणिस्तान आणि भारतातून फूस आणि मदत मिळत असते. जाफर एक्सप्रेस दुर्घटनेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लष्कर प्रमुखांनी जाहीरपणे भारत आणि अफगाणिस्तानवर तसा आरोप केला. पाक प्रधानमंत्री शरीफ यांनीही तोच आरोप केला. पाकिस्तानच्या पेपरांनीही तीच भूमिका घेतली.
अफगाणिस्तान दहशतवादात गुंतलं आहे याला अनंत पुरावे आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात तुंबळ वितुष्ट आहे. पश्चिम पाकिस्तानचा बराचसा प्रदेश अफगाण आहे, ब्रिटिशांनी तो जबरदस्तीनं वेगळा करून पाकिस्तानात घातला असं अफगाण लोकांचं म्हणणं आहे. त्या विभागात अफगाण वस्ती बहुसंख्य आहे, तिथं हद्द नसल्यासारखीच स्थिती आहे. अफगाणांची येजा दैनंदिन पातळीवर होत असते.
पाकिस्तान नेहमीच अफगाणिस्तानला अंकित करू पहात असतं, अफगाणिस्तानच्या राजकारणात हस्तक्षेप करत असतं. अफगाणिस्तानात रशिया असू नये, अमेरिकाही असू नये, अफगाणिस्तानातलं सरकार पाकिस्तान धार्जिणं असावं यासाठी पाकिस्तान १९७० च्या दशकापासून सक्रीय आहे. अफगाणाना ते पसंत नाही.
अफगाणांनी तहरीके तालिबान पाकिस्तान (ततापा) ही संघटना पोसली. ही संघटना पाकिस्तान सरकारशी भांडत असते, पाकिस्तानी लष्कर आणि पोलिसांवर सशस्त्र हल्ले करत असते. ततापाच्या लोकांना आश्रय आणि मदत अफगाणिस्तान देतं असा पाक सरकारचा जाहीर आरोप आहे, त्यावरून दोन देशात सतत मारामाऱ्या चाललेल्या असतात.
बलिऑला भले मदत करत नसेल पण पाकिस्तानला अफगाणिस्तान छळत असतं हे जगजाहीर आहे.
तशी परिस्थिती भारताबाबत दिसत नाही. कुलदीपक हा भारतीय एजंट पकडला गेला तेव्हां भारत बलुचिस्तानात हस्तक्षेप करतोय हा आरोप झाला. भारतानं अर्थातच हस्तक्षेपाचा आरोप फेटाळला आहे. वास्तव राजनीतीमधे शत्रूच्या प्रदेशात काड्या करत रहाणं हा एक अटळ घटक असतो. भारत त्याला अपवाद असायचं कारण नाही. परंतू भारताचा हस्तक्षेप अगदीच क्षीण असण्याची शक्यता आहे कारण तशा हस्तक्षेपाच्या खुणा बलुचिस्तानात दिसत नाहीत, आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तशी माहिती कधी दिल्याचं दिसत नाही.
बलिऑ हा पाकिस्तानचा चिंतेचा विषय होणं स्वाभाविक आहे. २०२३ मधे बलिऑनं ११६ हल्ले केले, त्यात ८८ माणसं मारली. २०२४ साली बलिऑनं ५०४ हल्ले केले आणि ३८८ माणसं मारली. बलिऑ व्यतिरिक्त तहरीके तालिबान, हफीझ गुल बहाद्दुर ग्रुप, लष्करी इस्लाम, हक्कानिया गट हेही पाकिस्तानात धुडगूस घालत असतात.
आणखी एक गट आहे. इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान असं या दहशतवादी गटाचं नाव आहे. इराण, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान यांच्यातल्या सलग भूभागाला खोरासान असं नाव आहे. हे खोरासान स्वतंत्र झालं पाहिजे असं या गटाचं म्हणणं आहे. हा गट अफगाणिस्तान आणि पाकिस्तान अशा दोन्ही ठिकाणी दहशतवाद माजवतो. या गटाच्या अफगाण कार्यकर्त्यांना पाकिस्तान मदत करत आणि पाकिस्तानात काम करणाऱ्यांना अफगाणिस्तान मदत करत असतं.
पाकिस्तानात दररोज कुठं ना कुठं तरी कोणता ना कोणता तरी गट दहशदवादी हल्ला करत असतो. दहशतवादग्रस्त देशांच्या यादीत बर्किना फासो या देशानंतर पाकिस्तानचा नंबर लागतो, जगातला दोन नंबरचा दहशतवादग्रस्त देश.
२०२४ साली झर्ब ई अजब कारवाई पाकिस्ताननं सुरु केली. हज्जारो दहशतवादी मारले. दहशतवादी मग तो कोणत्याही गटाचा असो, मारून टाकायचा असं एकात्म धोरण पाकिस्ताननं अवलंबलं होतं. पण दहशतवादाला फूस लावणाऱ्या राजकीय पक्षांनी गहजब करून ते धोरण बंद पाडलं. आता पाकिस्तानला पश्चात्ताप होतोय.
अफगाणिस्तान आणि भारताला दूषणं देऊन पाकिस्तानला दहशतवाद संपणार नाही. त्या दहशतवादाची मुळं पाकिस्तानातच आहेत. तहरीकेला एकेकाळी नवाज शरीफनी वापरलं, आता इम्रान खान वापरत आहे. पाकिस्तानचं राजकारण सुधारलं तरच तिथला दहशतवाद आटोक्यात येईल.
।।