पुस्तकं/ समजायला कठीण पण सॉलिड पुस्तक

पुस्तकं/ समजायला कठीण पण सॉलिड पुस्तक

WHO IS AFRAID OF GENDER

लेखक JUDITH BUTLER

प्रकाशन ALLEN LANE

।।

प्रस्तुत पुस्तक यंदा प्रसिद्ध झालं असून बटलर यांचं ते सर्वात ताजं पुस्तक आहे.

बटलर यांचे अनेक संशोधनपर प्रबंध आणि भाषणांच्या पुस्तिका प्रसिद्ध आहेत. पुस्तक या वर्गात बटलरनी केलेलं लिखाण मोजायचं तर प्रस्तुत पुस्तक २५ वं आहे.

जुडिथ बटलर वर्तमान काळातले सर्वाधिक वादग्रस्त, प्रक्षोभक विचारवंत आहेत. कॅलिफोर्निया विश्वशाळेत (बर्कले) ते शिकवतात आणि जगभर प्रवास करत असतात. लोकशाही, जेंडर या विषयावर ते जगभर चर्चासत्रं आयोजित करतात, वक्ता म्हणून अनेक संस्था-कार्यशाळांत त्या भाषणं करत असतात. तत्वज्ञान आणि साहित्य या विषयात त्यांनी शिक्षण,  पीएचडी घेतलीय.

जुडिथ बटलर जन्मानं स्त्री आहेत, पण त्या स्वतःला पुरुष-स्त्री अशा जैविक कसोट्या लावत नाहीत. त्यांना ‘ती’ असं स्त्रीवाचक संबोधलेलं आवडत नाही. इंग्रजीत त्या स्वतःला they असं म्हणवतात.

ते प्रक्षोभक कां आहेत या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या हू ईज अफ्रेड ऑफ जेंडर या पुस्तकात मिळतं. लिंग, लिंगभाव, सेक्स, जेंडर या विषयावर अनेक विचारवंतांनी आजवर लिहिलं असलं तरी  तो विषय बटलरनी  आजच्या काळाच्या संदर्भात मांडला आहे. विषयाला काळाचा संदर्भ दिला रे दिला की विषय वेगळ्या रीतीनं वाचकासमोर उलगडतो.

माणूस हा प्राणी स्त्री आहे की पुरुष हे जन्मतः त्याच्या शरीराच्या रचनेत ठरतं. लिंग, योनी, गर्भधारणा या कसोट्यांवर माणूस स्त्री आहे की पुरुष हे ठरत असतं. काही अंशी ती शारीरीक वैशिष्ट्यं लक्षणं  हा हार्मोन्सचा एकत्रित परिणाम आहे. हे झालं वैज्ञानिक  सत्य. 

जुडिथ बटलर सांगतात की स्त्री असणं म्हणजे काय हे शारीरीक कसोट्यांपलिकडं जाऊन समाज ठरवतो. स्त्री दुय्यम असते; स्त्री पुरुषांपेक्षा कमी प्रतीची असते; स्त्रीनं घर सांभाळलं पाहिजे; स्त्रीनं चूल आणि मूल सांभाळलं पाहिजे असं समाजानं ठरवलं आहे. हे स्त्रीचं रूप म्हणजे जेंडर. सेक्स आणि जेंडरमधल्या फरकावर बटलर बोट ठेवतात. सेक्स/लिंग नैसर्गिक आहे, जेंडर सामाजिक आहे, ते समाजानं ठरवलेलं आहे, ते नैसर्गिक नाही. 

इथवरची मांडणी सामान्यपणे अनेक विचारवंतांनी, स्त्रीवादी विचारवंतांनी केली आहे. बटलर कित्येक पावलं पुढं सरकतात.  

सामान्यतः स्त्रीवादी, स्त्रीस्वातंत्र्यवादी (फेमिनिस्ट) स्त्रिया जसं स्त्री स्वातंत्र्याबद्दल बोलतात तसं बटलर बोलत नाहीत, कारण ते स्वतःला मुळातच स्त्री या एकाच चौकटीत बांधत नाहीत.

स्त्रीला जस समाजानं एका सामाजिक चौकटीत बांधून तिच्यावर अन्याय केला आहे तसाच अन्याय समाजातल्या अन्य गटांवरही होत असतो याकडं बटलर लक्ष वेधतात. अन्याय होत असलेल्या गटात पुरुषही येतात. येवढंच नव्हे जगभरचे स्थलांतरीत, अल्पसंख्य, राजकीय वंचित इत्यादी गटही अन्यायाचे बळी असल्यानं ते स्त्री या वर्गातच मोडतात असं बटलर यांचं म्हणणं आहे.

भारतात डॉ. लोहिया स्त्री हा दलित वर्ग आहे असं आग्रहानं म्हणत असत आणि स्त्रीला योनीबद्ध करून तिचं माणूसपण हिरावून घेतलं जातं असं डॉ. लोहिया म्हणत असत.  

बटलर यांच्या या पुस्तकात आणि अलिकडच्या भाषणात पॅलेस्टाईनवर इसरायलनं केलेल्या अन्यायाचा उल्लेख आहे, असतो. इसरायल वेस्टबँकमधे पॅलेस्टिनींच्या जमिनी बळकावतं; अलीकडं तर गाझामधे इसरायलनं सरळ सरळ लष्करी आक्रमणच केलं आहे. पॅलेस्टिनी लोकांशी असलेलं राजकीय भांडण इसरायलनं वांशिक भांडण केलं आहे. पॅलेस्टिनी जनतेचे मूलभूत अधिकार, मानवी अधिकार पायदळी तुडवले आहेत, इसरायलची वागणूक हुकूमशहाची आहे असं बटलर म्हणत असतात.

एकेकाळी ख्रिस्ती लोकांनी ज्यूंवर अन्याय केला. उदा. हिटलर. तोच अन्याय आता ज्यू (इसरायल) पॅलेस्टिनींवर करत आहेत असं बटलर म्हणतात. 

बटलर आजच्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर बोलतात. वस्तू महत्वाची; वस्तूंचा उपभोग; वस्तुभोवती साऱ्या समाजव्यवहाराची रचना होणं यावर बटलर बोलतात. आजच्या वस्तुकेंद्री भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळं विषमता वाढतेय, गरीबी वाढतेय असं बटलर म्हणतात. हा अर्थिक अन्यायही जेंडर अन्याय याच वर्गात मोडतो असं बटलर म्हणतात, गरीबी आणि विषमता या मुद्द्यावर चळवळ उभारली पाहिजे असं म्हणतात. 

पर्यावरणाता नाश, निसर्गाचा नाश हाही आजचा महत्वाचा विषय आहे. आजची अर्थव्यवस्था पर्यावरण नाशाला कारणीभूत आहे असं त्या म्हणतात.

बटलर यांचा विचार स्फोटक ठरतोय याचं कारण तो जगातल्या प्रस्थापित व्यवस्थेलाच गदागदा हलवत आहे. इसरायल त्यांच्यावर रागावलं आहे. पोथीत अडकलेले ज्यू त्यांच्यावर रागावले आहेत. जन्मानं ज्यू असूनही बटलर इसरायलचा निषेध करतात ही गोष्ट त्याना पचत नाही.

पोपचा त्यांच्यावर खुन्नस आहे कारण कुटुंब या ख्रिस्ती विचाराच्या केंद्रावरच त्या हल्ला करत आहेत. लिंगयोनी फरकावर आधारलेला कुटुंबाचा विचार बटलर नाकारतात,सर्व मानव सारखेच आहेत, सर्वांची प्रतिष्ठा सारखीच आहे, यावर कुटुंबाची रचना असली पाहिजे असं बटलर म्हणतात. त्यामुळंच समलिंगी, लिंगबदल केलेले, लिंगव्यवहार हा व्यक्तिगत आवडीनिवडीचा भाग आहे या सूत्रावर कुटुंबप्रमुख असावेत, याच सूत्रावर ‘पतीपत्नी-आईवडील-पितापुत्रपुत्री’ संबंध ठरावेत अशी त्यांची मागणी आहे.

प्रस्तुत पुस्तकाचा अर्थ असा निघतो की आता साऱ्या जगाचीच नव्यानं मांडणी करण्याची आवश्यकता आहे.

आला दिवस साजरा करण्यात मग्न असलेली जनता हे असले विचार कसे काय मान्य करतील?

‘तुमची पुस्तकं जड असतात’ असं निरीक्षण भल्याभल्या नामांकितांनी नोंदवल्यावर दोन वर्षं मेहनत घेऊन हे पुस्तक बटलर यांनी लिहिलय. तरीही ते जडच आहे. तत्वज्ञानाचे अभ्यासक, प्राध्यापक, यांनाही ते जड जाईल. बटलर यांच्या यू ट्यूबवरच्या मुलाखती, त्यांच्या पुस्तकावर दर्जेदार नियतकालिकांनी लिहिलेली परीक्षणं इत्यादींचं वाचन केल्यानंतर पुस्तकाचा गाभा कळतो, तपशील कळत नाहीत.

जडपणा सोडा, हे पुस्तक म्हणजे बाँब आहे.

।। 

Comments are closed.