पुस्तकं/सलमान रश्दी यांचं ताजं पुस्तकपुस्तकं

पुस्तकं/सलमान रश्दी यांचं ताजं पुस्तकपुस्तकं

पुस्तक : Knife

लेखक : Salman Rushdie (April 2024) 

#

नाईफ (सुरा) हे सलमान रश्दी यांचं ताजं पुस्तक. २०२२ साली रश्दी यांच्यावर सुरी हल्ला झाला होता. हादी मटार या लेबनीज तरुणानं हा हल्ला केला होता. दीडेक महिना रश्दी यांच्यावर उपचार झाले. त्यांचा एक डोळा गेला, बाकी सारं सही सलामत राहिलं.

 हल्ला झाला त्या क्षणापासून पूर्ववत होईपर्यंतच्या काळातले अनुभव प्रस्तुत पुस्तकात आहेत. त्या काळात रश्दी यांनी आपल्या आयुष्याकडं मागं वळून पाहिलं, चिंतन केलं. ते चिंतनही या पुस्तकात आहे.

रश्दी हल्लेखोराला कल्पनेत भेटले. कल्पनेतच त्यांनी हल्लेखोराची मुलाखत घेतली, त्याच्याशी चर्चा केली. ती काल्पनिक मुलाखत पुस्तकात आहे. त्या मुलाखतीला साहित्याची छटा आहे.

रश्दी हे कसलेले कादंबरीकार आहेत. त्यांचं भाषेचं आणि रचनेचं कौशल्य या पुस्तकात दिसतं. जिवावर बेतलेला प्रसंग आणि अत्यंत त्रासदायक उपचार याचं वर्णन कोणीही माणसानं केलं असतं. रश्दी तसं करत नाहीत. आपल्या पू्र्ण आयुष्याचा पट ते समोर ठेवतात आणि त्यात दुर्घटना-उपचार गुंतवतात. रश्दी स्वतःकडं एका कथानकातलं पात्र म्हणून पहातात. सलमान रश्दी आणि पात्र एकमेकापासून वेगळे रहातात.

एक प्रसंग.

 रश्दी बाथरूममधे आरशासमोर उभे असतात. आरशात त्यांना जखमांनी भरलेला चेहरा दिसतो, बटाट्यासारखा झालेला डोळा दिसतो, मानेवरचे वार दिसतात, एका हाताला प्लास्टर असतं. शरीरात अनेक ठिकाणी बँडेज, चिकटपट्ट्या चिकटलेल्या असतात. मोठ्या कष्टानं  कसाबसे रश्दी उभे असतात.

आरशातला रश्दी वेगळा असतो, आरशाबाहेरचा रश्दी वेगळा असतो. आरशाबाहेरचा रश्दी आरशातल्या रश्दीशी बोलतो. बाहेरचा रश्दी आरशातल्या रश्दीला विचारतो ‘तू कोण आहेस? माझी रिप्लेसमेंट म्हणून तुला आणलाय कां? तू नंतर पुन्हा मी होणारेस की आहेच तसा रहाणार आहेस, एक डोळा गेलेला…या लोकांनी एका मेलेल्या माणसाच्या जागी मला आणलय. आता ‘तो’ माणूस मेलाय आणि तूच शिल्लक रहाणार आहेस, आरशातल्या माणसा आता तूच खरा होशील आणि मी विस्मृतीत जाईन?…’

रश्दी एका ठिकाणी आल्फ्रेड हिचकॉकच्या सायको या चित्रपटाची आठवण काढतात. सायकोमधे काही कारण नसतांना जेनेट ली मरते, शोध घ्यायला आलेला डिटेक्टिवही मरतो. चुकीची माणसं मरत असतात. रश्दी म्हणतात ‘मृत्यू चुकीच्या पत्त्यावर जातो’. रश्दीच्याही पत्त्यावर मृत्यू निघाला होता पण मृत्यूनं विचार बदलला.

पुस्तकाच्या सुरवातीचा भाग. हल्ला होण्याच्या आधीची रात्र. रश्दी तळ्याच्या काठी बसलेत. आकाशात चंद्र आहे. चंद्राकडं पहात असतानाच रश्दी यांच्या मनात विचार लहरी उमटत असतात, तळ्यातल्या लहरींसारख्या. रश्दीला त्याची नुकतीच प्रसिद्ध झालेली व्हिक्टरी सिटी ही कादंबरी आठवत असते. या कादंबरीचा नायक एक राजा आहे, तो स्वतःला चांद्रवंशीय समजतो. कृष्णही चांद्र वंशीयच असतो. चंद्राचे वंशज दक्षिण भारतातल्या एका राज्यात उतरतात, अलिकडच्या काळात माणूस चंद्रावर उतरलेला असतो. रश्दीना १९०२ सालची एक फ्रेंच फिल्म आठवते. त्या फिल्ममधे माणसानं पाठवलेलं यान चंद्रात घुसलेलं दिसतं. ते यान चंद्रावर उतरतं, चंद्राच्या उजव्या डोळ्यात घुसतं, असं चित्रपटात दाखवलं होतं. 

रश्दींना चंद्राचा गेलेला डोळा दिसतो. रश्दींचा उजवा डोळा सुरामारीत गेलेला असतो, त्यानंतर हे पुस्तक लिहिलेलं असतं आणि त्यात चंद्राचा डोळा गेल्याचं आपण वाचतो. २०२२ साली काय होणार आहे हे लेखक १९०२ सालच्या घटनेत सांगतो.

रश्दी पुढं सांगतात की ही तर लेखकांची आवडती क्लृप्ती असते. पूर्वसंकेत.   वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिड्यूडमधे सुरवातीलाच मार्खेज सांगून टाकतो की ‘अनेक वर्षांनंतर सैनिकांनी बंदुका रोखलेल्या असताना..कर्नल बेंडियाला कळणार असतं की त्याला त्याचा बाप बर्फ दाखवणार असतो…’ वाचकाला माहित असतं पण कथेतल्या पात्राला माहित नसतं असं काही तरी लेखक सांगतो.

रश्दी पुस्तकात अनेक वेळा सांगतात की आपल्यावर असा काही हल्ला होणार आहे असं त्याला लहानपणापासून अनेक वेळा वाटलेलं असतं. हल्ल्याची स्वप्नंही  पडलेली असतात. आणि शेवटी तसा हल्ला होतो.

मटार हा हल्लेखोर जवळपास अडाणी आहे. त्यानं रश्दीच्या पुस्तकाची फक्त दोनच पानं वाचलीत. सेटॅनिक व्हर्सेस हे पुस्तक काय आहे आणि ते धर्मनिंदा करतं असं त्याला युट्यूबवरच्या विद्वानानं सांगितलं. रश्दी त्या विद्वानाला युट्युबी इमाम असं म्हणतात. हादीनं धर्माचा, कुराणाचा वगैरे काहीही विचार केलेला नाही. कोणी तरी त्याच्या मनात भरवलं, सणकी आली, हल्ला करून मोकळा झाला.

मटार हा माणूस काय आहे, कसा असेल याचा विचार, विश्लेषण रश्दीनी काल्पनीक मुलाखतीत केलंय. हेही एक साहित्यिक तंत्र.

पुस्तकात रश्दी आपली सध्याची पत्नी एलिझा हिच्याबद्दल खूप लिहितात, पोटातून लिहितात. रश्दी तिच्या प्रेमात आहेत,तिच्याशी लग्न केलंय, हल्ल्यानंतर तिने केलेल्या शुश्रुषेनं रश्दीचा जीव वाचवलाय.

२०१२ साली वयाच्या ६५ व्या वर्षी रश्दीनं ‘जोसेफ अँटन, ए मेमवा’ या नावानं आठवणी (आत्मचरित्र) लिहिल्या. त्यानंतरचं हे नवं आत्मचरित्र. आपलं लहानपण, आपली मुंबई-लंडन-न्यू यॉर्कमधली शहरी वाढ, सेटॅनिक व्हर्सेसनंतरचं वादळ इत्यादी आयुष्यातल्या मुख्य टप्प्यांना रश्दीनी या पुस्तकात स्पर्श केला आहे.

 अमेरिकेतील हॉस्पिटलं, उपचार पद्धती या पुस्तकात आपलं लक्ष वेधून घेतात. रश्दी जवळ जवळ मेलेच होते.डॉक्टरांनी त्याना उभं केले. एक प्रेत जिवंत केलं म्हणाना. त्रिशा मेली या मुलीवर न्यू यॉर्कमधे जीवघेणा हल्ला झाला होता. ती बरी झाली. ती लेखिका वगैरे नाही. तिनं उपचार, किती यातनातून जावं लागलं ते सारं तिच्या आठवणीत लिहिलं आहे. त्याची आठवण होते. नावं वगैरे बदलली तर तेच वाचतोय असं वाटतं.

रश्दीचे समकालीन लेखक पुस्तकात येतात. उदा. मार्टिन एमिस. त्याचं मरणं चटका लावून जातं. अमेरिकेत आणि इंग्लंडमधे लेखकांचे व्यक्तिगत संबंध कसे आहेत याची कल्पना पुस्तक वाचतांना येते.

पुस्तकात आठ ओळींमधे रश्दीनं त्यांचं कलेबद्दलचं म्हणणं मांडलं आहे. ‘कला ही चैनीची गोष्ट नाही. कला हे मानवी जीवनाचं सत्व आहे. कला आहे म्हणूनच माणूस मोकळेपणानं जगू शकतो, विचार करू शकतो. कला नसेल तर माणसाची विचार शक्तीच मावळेल, मरेल. कलेला वादविवाद चालतात, टीकाही मान्य असते, लोकांनी केलेला अव्हेरही कला स्वीकारते; कलेला हिंसा मान्य नसते. कला संरक्षण मागत नाही, कलेला जिवंत रहायचं असतं.’ 

।।

Comments are closed.