मस्क संकटात
अमेरिकेत विस्कॉन्सिन या राज्यात त्या राज्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीची निडणूक झाली. अमेरिकेत न्यायव्यवस्था राजकीय असते, न्यायमूर्ती राजकीय पक्षाच्या पाठिंब्यानं निवडून येतात. विस्कॉन्सिनमधे सुझान क्रॉफर्ड या डेमॉक्रॅट निवडून आल्या. त्यांनी रिपब्लिकन ब्रॅड स्किमेल यांचा पराभव केला.
स्किमेल यांना ट्रंप यांचा पाठिंबा होता. ट्रंपनी त्याच्यासाठी ऑनलाईन सभा घेऊन पाठिंबा दिला होता.स्किमेल यांचे प्रचार प्रमुख होते ईलॉन मस्क. क्रॉफर्ड यांना कोणा मोठ्या पुढाऱ्याचा पाठिंबा नव्हता
ईलॉन मस्कनी स्किमेल यांच्यासाठी २ कोटीपेक्षा जास्त डॉलर खर्च केले. देणगी तर दिलीच. त्याच बरोबर मस्कनं मस्कस्टाईल मोहीम चालवली. क्रॉफर्ड यांना हरवा अशा मजकुराच्या आवाहनावर सही करणाऱ्या प्रत्येक माणसाला १०० डॉलर दिले. आणखी एक मोहिम. स्किमेल यांचा कार्यकर्ता गावात फिरे. मतदाराला गाठे आणि स्किमेलच्या पोस्टरसह मतदाराचा फोटो काढून नेटवर टाके. म्हणजे मतदार स्किमेलना पाठिंबा देत असं सिद्ध होत असे. अशा प्रत्येक फोटोला २० डॉलर बक्षीस. स्किमेल यांच्यासाठी मतदार गोळा करणं, मतदाराना मतदान केंद्रावर पोचवणं इत्यादी कामासाठी दोन एजंट मस्कनं नेमले. प्रत्येकाला १० लाख डॉलर या कामासाठी दिले. जाहीरपणे. याही समारंभाची जाहिरात.
पैसे घ्या मत द्या. मस्क स्टाईल लोकशाही.
क्रॉफर्ड यांनी प्रचाराचं सूत्र ठेवलं, मस्क वि. विस्कॉन्सिन. निवडणूक मस्क यांच्यासाठी लढवली जात होती. हे प्रचार मोहिम सूत्र अर्थातच मस्कना आवडलं. मोदी मोदी. मस्क मस्क. उलटा परिणाम झाला. लोकांना मस्कचा वात आला.
लोकांनी मस्कला झिडकारलं. त्याला झिडकारण्यासाठी क्रॉफर्ड यांना निवडून दिलं. प्रेसिडेंट पदाच्या निवडणुकीत ट्रंपना मतं देणाऱ्या नागरिकांनी या निवडणुकीत ट्रंपच्या उमेदवाराचा पराभव केलाय.
मस्कचा आर्थिक स्वार्थ या निवडणुकीत गुंतला होता. विस्कॉन्सिन राज्यात मस्कला त्याच्या टेसला कार कंपनीतर्फे विकायच्या आहेत. दुकानदाराला कमीशन द्यायची इच्छा नाही. विस्कॉन्सिन राज्यात तशी परवानगी नाही. कार दुकानातूनच, थेट कंपनीतून नव्हे, कार खरेदी कराव्या लागतात. मस्कला विस्कॉन्सिनचा संबंधित कायदा बदलायचा आहे. सर्वोच्च न्यायालयात कधी तरी हे प्रकरण जाणार आहे. त्या वेळी ७ न्यायमूर्तीच्या सर्वोच्च न्यायालयात रिपब्लिकन बहुमत असायला हवं. स्किमेल निवडून येते तर बहुमत मिळालं असतं. त्यासाठीच मस्कची ही खटपट चालली होती.
उद्योजकाला त्याच्या मनासारख्या गोष्टी घडायला हव्या असतात. त्यासाठी तो सरकार तर ताब्यात घेतोच, पण न्यायालयही ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो.
विस्कॉन्सिनमधले कार विक्री करणारे दुकानदार रिपब्लिकन पक्षाचे आहेत. त्यांच्या संघटनेमुळंच विस्कॉन्सिनमधे थेट कार विक्रीला परवानगी मिळत नाही.
खरं म्हणजे त्या विक्रेत्यांना पटवून, त्यांचा विरोध बोथट करून हवा तसा कायदा करून घेणं मस्कना शक्य होतं. पण ही वाट दूरची आहे, वेळ खाणारी आहे, महागही आहे. विक्रेत्यांना पटवण्यासाठी कदाचित शंभर कोट डॉलर लागले असते. मस्क शेठ आहे,त्यानं स्वस्तात पटवापटवी करण्याचा प्रयत्न केला.
आता गोची झालीय.
विस्कॉन्सिननं मस्कच्या म्हणजे ट्रंपच्याच तोंडाला तोंडाला काळं फासल्यानं ट्रंप नाराज झालेत. आता त्यांनी मस्कला ‘सरकारी कार्यक्षमता’ या खात्यापासून दूर करायचं ठरवलंय. याचा अर्थ ट्रंपनी मस्कला लाथाडलय.
टेसला कारच पंक्चर झालीय. मस्कला काही तरी जुगाड करावा लागेल असं दिसतंय.
।।