रविवार. डेंजरस तत्वज्ञ

रविवार. डेंजरस तत्वज्ञ

तत्वज्ञान हा मामला मुळातच स्फोटक असतो. तत्वज्ञान अमलात यायला लागलं की मग विचारूच नका.

जुडिथ बटलर हे तत्वज्ञ आहेत. ते जगभर फिरतात, जिथं जिथं ते जातात तिथं त्यांच्या विरोधात निदर्शनं होतात, त्यांना धक्काबुक्की होते. अनेक युरोपिय देशांच्या पंतप्रधान-प्रेसिडेंटांनी त्यांच्यावर टीका केलीय; पोप तर म्हणतात की बटलर ख्रिस्ती धर्म नष्ट करत आहेत.

आता पहा, जुडिथ बटलर जन्मानं आणि बायॉलॉजिकली स्त्री आहेत. पण त्या स्त्रीसारख्या वागत वावरत नाहीत. त्या म्हणतात की मी स्त्री आहे आणि पुरुषही आहे, मी लवचीक आहे. त्यामुळं जुडिथचा उल्लेख ती असा न करता ते (they) असा करावा लागतो.

  बटलर टेरर झालेत कारण त्या स्त्री/जेंडर  हा विषय स्फोटक रीतीनं मांडत आहेत.

  जन्मजात जैविक वैशिष्ट्यात स्त्रीला अडकवून स्त्री नावाची एक भूमिका समाजानं तयार केलीय. स्त्री मुलाला जन्म देते; म्हणून स्त्रीनं मुलाला वाढवण्यात आयुष्य खर्ची घातलं पाहिजे; मुलाला वाढवण्यात म्हणजे अर्थातच घर चालवण्यात. स्त्रीला पाळी येते त्या काळात ती अशक्त असते, शारीरीक त्रासानं पिडलेली असते; म्हणून ती अशक्त कमकुवत असते; पुरुष पैसे कमावतो त्यासाठी आवश्यक गोष्टी करतो सतत बाहेर असतो, म्हणून तो कुटुंब प्रमुख, म्हणून तो महत्वाचा. असं करत करत स्त्री दुय्यम होत गेली. मनूनं तर सांगूनच टाकलं की स्त्री स्वातंत्र्याच्या लायकीची नाही. पुढं पुढं भारतात तर स्त्री ही पायातली वहाण असं लोक म्हणू लागले. 

योनी,स्तन,गर्भाषय,लांब केस ही जैविक वैशिष्ट्य असणारा प्राणी समाजानं एक दुय्यम प्रतीची व्यक्ती असा ठरवला.

इथवरचा विचार अनेक तत्वज्ञ, स्त्रीवादी विचारवंतानी कित्येक वर्षं मांडला आहे. जुडिथ बटलरनं स्त्रीजेंडर हा विचार अधिक विस्तारला, त्याला वर्तमान काळाचे संदर्भ जोडले.

शरीरानं स्त्री, मनानं पुरुष. शरीरानं पुरुष, मनानं स्त्री. स्त्रीत्व-पुरूषत्व ही दोन्ही जैविक बंधनं न पाळणारे. कोणाशीही शरीरसंबंध ठेवणारे म्हणजे समलैंगिक आणि भिन्न लैंगिक अशा दोन्ही गोष्टी असणारे. अशी माणसं समाजात आहेत.   या माणसांना लग्न करता येत नाही, कुटुंब तयार करता येत नाही, त्यांनी केलेल्या कुटुंबाला समाजाची मान्यता नसते, कुटुंबातल्या सदस्यांना कायदेशीर स्थान नसतं आणि अधिकार नसतात.

थोडक्यात असं की कोणतीही दोन मनुष्य एकत्र येऊन संसार करू शकतात ही गोष्ट जगातल्या कायद्यांना आणि धर्माना मान्य नाही. जैविक दृष्ट्या स्त्री आणि पुरुष यांचंच कुटुंब असलं पाहिजे असं समाज मानतो. प्रस्थापित कुटुंब संस्थेमधे पालकांना अधिकार असतात, मुलांना अधिकार असतात, कुटुंब मोडली तर त्यातल्या सदस्यांचे अधिकार आणि कर्तव्य काय असतात हे सगळं कायद्यात सांगितलेलं असतं. परंतू वर वर्णन केलेल्या व्यक्तीना कायदा मान्यता देत नसल्यानं ती माणसं अधिकार, सवलती इत्यादींपासून वंचित असतात.

जुडिथ बटलर वरील सर्व  व्यक्तींकडं ती मनुष्यं आहेत या दृष्टीनं पहातात आणि मनुष्यांना समान अधिकार असले पाहिजेत असं म्हणतात.

तिथंच धर्माचा पापड वाकडा होतो. हिंदू असोत, ज्यू असोत, ख्रिस्ती असोत की मुस्लीम; सर्व धर्मांचे कुटुंब-वारसा इत्यादींबद्दलचे विचार प्राचीन आहेत. वर्तमान जगातलं वास्तव धर्मांना समजून घेता आलेलं नाही, त्याला धर्मात स्पेस देता आलेली नाही. धर्म हा लवचीकता हरवलेला एक रबर झालाय. त्यामुळं धर्मवाले जुडिथ बटलर यांच्यावर  वैतागतात.

जुडिथ बटलर लिंग,लिंगभावना,जेंडर हा विचार आणखीन विस्तारतात. धर्मानं  समलैंगिक, लिंगबदल इत्यादींना  वाळीत टाकलंय तसंच स्टेट-सरकारं समाजातल्या अनेक घटकांना अधिकारापासून वंचित करतात. धर्म जसं अनेकांना सामावून घ्यायला तयार नाहीये तसंच स्टेटही अनेक समाजगटांना, विचारांना सामावून घ्यायला तयार नाहीये. म्हणून सरकारं, स्टेट यांची वागणूकही जेंडर लढ्याचा भाग आहे असं बटलर सांगतात.

उदा. इसरायलचं गाझावरचं आक्रमण आणि पॅलेस्टाईनचा प्रश्न. ज्यूंवर पूर्वी घोर अन्याय झालाय हे तर खरंच. ज्यूना एक समाज म्हणून सुरक्षितता मिळणं आवश्यक आहे हेही खरंच. ती सुरक्षितता एका भूमीच्या रुपात ज्यूनी पॅलेस्टाईनमधे इसरायल कोरून मिळवली. ती मिळवतांना जाम लोचे झाले ते सोडा पण जसं असेल तसं  इसरायल हे राष्ट्र तयार झालं. तेच इसरायल आता पॅलेस्टाईनमधे नरसंहार करतंय. आपल्याला नरसंहाराला तोंड द्यावं लागलं तशी वेळ पॅलेस्टाईनवर येऊ नये ही साधी गोष्ट इसरायलच्या  डोक्यात येत नाहीये.

बटलर पॅलेस्टाईनमधील जनतेच्या बाजूनं उभे आहेत, तसं आपल्या पुस्तकांतून मांडतात.

 राजकारणाचा भाग म्हणून पॅलेस्टिनीचं शिरकाण होतं, समाजातल्या अल्पसंख्यांकांना चिरडलं जातं, प्रदूषण करणारी अर्थव्यवस्था राबवून जगाची वाट लावली जाते. हे सारं घडू शकतं याचं कारण समाजाचं व्यवस्थापन लोकशाही पद्धतीनं होत नाही. समाजातले बलवान गट माध्यमं आणि अर्थव्यवस्थेचा ताबा घेतात आणि समाजविधातक वागतात.

 जेंडरचा व्यापक विचार करून समाजाची मांडामांड जर नीट करायची असेल तर समाजातल्या सर्व घटकांचा समाजाच्या व्यवस्थापनात सहभाग असायला हवा. म्हणजे लोकशाही हवी.

बटलर जगभर लोकशाही या विषयावर जनजागृती करत हिंडत असतात. सभा घेतात, कार्यशाळा घेतात, चर्चासत्रं आयोजित करतात, स्वतः त्यात भाग घेतात.

बटलर सारं जग गदागदा हलवत आहेत.

२०१७ साली बटलर गेले साओ पावलोमधे. ब्राझिल. त्यांनीच आयोजित केलेल्या एका लोकशाही या विषयावरील चर्चासत्रात त्या भाग घेणार होत्या.

विमानतळ, हॉटेल, चर्चासत्राची जागा,प्रत्येक ठिकाणी त्यांच्या विरोधात ऊग्र निदर्शनं झाली. त्यांच्या प्रतिमा जाळण्यात आल्या. तुम्ही तुमच्या घरी चालते व्हा नाही तर मसणात जा पण आमच्या देशात येऊ नका असं फलकांवर लिहिलं होतं. मोठी पोस्टर्स लागली होती, पोस्टर्सवर गुलाबी रंगाच्या ब्रा चिकटवण्यात आल्या होत्या. ‘तू समलिंगी आहेस. आधी स्त्री हो, मगच काय ते बोल’ असा संदेश या पोस्टरवर होता.

ब्राझिलमधे पाऊल ठेवण्याच्या काही दिवस आधी बटलर यांचं जेंडर ट्रबल हे पुस्तक प्रसिद्ध झालं होतं, त्याच्या लाखो प्रती संपल्या होत्या, पुस्तक गाजत होतं.

पोप महाशय भडकले होते. जेंडर ट्रबल हे पुस्तक आणि त्यातला जेंडर विचार हा अणुस्फोट आहे असं पोप म्हणाले. हा अणुस्फोट कुटुंब व्यवस्था आणि समाज नष्ट करेल असा इशारा पोप फ्रान्सिस यांनी दिला होता. मानवी समाजाच्या निर्मितीचा ख्रिस्ती सिद्धांतच बटलर उखडत आहेत असा आरोप पोपनी केला.

२०१२ साली बटलर  जर्मनीत फ्रँकफर्टला गेले होते. थियोडोर अडोर्नो यांच्या नावाचं आंतरराष्ट्रीय पारितोषिक ते  घेणार होते. फ्रँकफर्टमधे वर्तमानपत्रांनी  त्यांच्या विरोधातलं पत्रक छापून त्यांचं स्वागत केलं. जर्मनीतल्या ज्यूनी त्यांना वरील पारितोषिक देऊ नये असं पत्रक काढलं. थियोडोर अडोर्नो हे एक ज्यू विचारवंत होते, हिटलरच्या छळछावणीतून ते सुटले होते, त्यांच्या नावाचं पारितोषिक एका ज्यू विरोधक व्यक्तीला देऊ नये असा मंडळींचा आग्रह होता.

बटलर समारंभासाठी सभागृहाशी पोचले तर तिथं त्यांना निदर्शकांनी अडवलं. धक्काबुक्की झाली, पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

दोन वर्षांपूर्वी बटलर एका सार्वजनिक चर्चेत भाग घेण्यासाठी पॅरिसला गेल्या होत्या.बटलर यांचं पॅरिसमधे खूप जाणं येणं असतं, तिथं त्या अनेक संस्थांमधे शिकवतात. फ्रान्सनं त्यांना बोलावणं सहज समजण्यासारखं आहे. फ्रान्स ही तत्वज्ञान आणि वैचारिक  बंडांची जननी आहे. मानवी स्वातंत्र्य, समता, लोकशाही या तत्वांचा जन्म फ्रान्समधे झाला.तात्विक संघर्ष फ्रान्समधे होणार नाही तर कुठं होणार? 

तर पॅरिसमधली सभागृहातली चर्चा आटोपून बटलर बाहेर पडत असताना एका स्त्रीनं बटलरच्या दंडाला गच्च धरलं. ती बाई भावनाविवश होती.

‘तू माझ्या मुलांना बिघडवतेस.’ ती स्त्री.

त्या स्त्रीचे हात हातात घेऊन ज्युडिथ म्हणाली- मी तुझ्या मुलांना कसं बिघडवतेय सांग.

ती स्त्री म्हणाली’ तू बोलतेस.तुझ्या बोलण्याचा परिणाम मुलांवर होतो, ती प्रभावित होतात. ती इस्रायलचं संरक्षण करेनाशी होतील. तू युरोपीय नाहीयेस, तुला माहीत नाहीये की एक नवं होलोकोस्ट येऊ घातलंय.’

ज्युडिथच्या आजोळचे सगळे होलोकॉस्टमधे मारले गेले होते.

 ‘तू आणि मी, आपल्याला भयमुक्त समाजात रहायची इच्छा आहे, आपल्याला हिंसा नकोय, आपल्याला होलोकॉस्ट नकोय. आपल्या दोघांच्या भावना सारख्याच आहेत. इथे नको, आपण नंतर भेटूया, बोलूया…तू माझ्या मावशीसारखीच आहेस…’

ज्युडिथनं तिला मिठी घातली.

बटलर स्वतः ज्यू आहेत. त्यांचे आई वडील हंगेरीतून अमेरिकेत स्थलांतरीत झाले, ज्युडिथचा जन्म अमेरिकेतला, ते अमेरिकन नागरीक. बर्कले या गावातल्या कॅलिफोर्निया विश्वशाळेत बटलर  शिकवतात. साहित्य आणि तत्वज्ञान हे त्यांच्या अभ्यासाचे, शिकवण्याचे विषय आहेत, त्यात त्यांनी पीएचडी मिळवलीय.

वय वाढू लागलं तसतशा बटलर  टॉमबॉय सारख्या, पुरुषासारख्या वागू लागल्या, पुरुष घालतात तसे कपडे घालू लागल्या. म्हणजे शारीरीक लक्षणांच्या अर्थानं त्या स्वतःला स्त्री मानेनाशा झाल्या. यथावकाश त्या लेस्बियन झाल्या, ब्राऊन या राज्यशास्त्राच्या स्त्री प्राध्यापिकेशी त्यांनी लग्न केलं. त्यांनी आयझॅक नावाचा एक मुलगा स्वीकारलाय, तो स्वतःचं नाव आयझॅक ब्राऊन बटलर असं लावतो. आपल्या तिघांचं हे असं कुटुंब आहे आणि कायद्यामधे कुटुंबाला असलेले अधिकार आपल्याला मिळाले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे.  

आतापर्यंत बटलरनी २५ पुस्तकं लिहीलीयत, पुस्तक प्रसिद्ध झालं की ते बेस्ट सेलर होतं, त्याच्या लाखो प्रती संपतात अशी त्यांच्या (काही) पुस्तकांची ख्याती आहे. हू ईज अफ्रेड ऑफ जेंडर हे त्यांचं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालंय.

।।

Comments are closed.