सिनेमे. अमेरिकन फिक्शन

सिनेमे. अमेरिकन फिक्शन

अमेरिकन फिक्शन या चित्रपटाला ऑस्करसाठी ६ नामांकनं होती,   साहित्य कृतीवरून तयार केलेली पटकथा या वर्गातलं बक्षीस ऑस्करनं फिक्शनला दिलंय. पर्सीवल एव्हरेटच्या इरेजर या कादंबरीवरून पटकथा तयार करण्यात आलीय.

चित्रपटाचा नायक आहे थेलोनियस एलिसन (टोपण नाव मंक). जेफ्रे राईटनं ही भूमिका केलीय. एलिसन प्राध्यापक आहे, लेखक आहे. आफ्रिकन अमेरिकन (काळा) आहे. वैतागलेला आहे. काळ्यांना गोरे अमेरिकन ज्या रीतीनं पहातात ते त्याला मंजूर नाहीये. आपण काळे आहोत म्हणून काळ्यांच्याच दृष्टिकोनातून जगाकडं पाहिलं पाहिजे ही लोकांची धारणा त्याला मंजूर नाहीये. त्यानं पर्शियन या एका ग्रीक शोकांतिकेवर आधारित कादंबरी लिहिलीय, लोकांना ती ‘काळी’ नसल्यानं पसंत नाहीये. लोकांचं म्हणणं की त्यानं फक्त काळेच रेखाटायला हवेत.  

त्याच काळात एका स्त्री लेखिकेनं वुई लिव्ज इन डा घेट्टो या नावाची कादंबरी लिहीलीय. काळे लोक कशी इंग्रजीची ऐशी की तैशी करतात, झोपडपट्टीत कसे वागतात ते दाखवणारी वरील कादंबरी बंडल असते पण तिचं मात्र कौतुक होतं.

मंक जाम वैतागलाय. त्यात त्याच्या घरच्या अडचणी. आईला अलझायमर झालाय आणि तिला सांभाळण्यासाठी लागणारा पैसा कसा उभा करायचा अशी चिंता आहे. पैसे पाहिजेत. मंक टोपण नावानं एक फालतू कादंबरी लिहितो. कादंबरीत एक बेबंद, व्यसनी, गुन्हेगार मुलगा आहे. तो असभ्य भाषेत बोलतो. तो बापाशी भांडतो आणि बापाला गोळ्या घालतो.काळे कसे बेबंद असतात, कसे हिंसक असतात, कसे गावंढळ आणि हिंसक असतात, कसे बंदूकबाजी करतात अशा चाकोरीतल्या गोऱ्यांना आवडणाऱ्या गोष्टी घुसडून मंक कादंबरी खरडतो. एकदमच वाईट असल्यानं प्रकाशक तिला लाखो डॉलर देऊ करतो आणि एक चित्रपट निर्माता कोटी कोटी डॉलर त्यावरच्या चित्रपटासाठी देऊ करतो. 

पण त्यातही गोची आहे. कादंबरीचा लेखक एक खुनी आहे, त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झालीय आणि तो तुरुंगातून पळालाय असं मंकचा प्रकाशक जाहीर करतो. मंकला हे सारं चुकीचं वाटतं. पण प्रकाशक सांगतो असं थरारक काही केलं तरच पुस्तक खपतं. हा बनाव टिकून रहावा यासाठी मंक टेलेफोनवरून मुलाखत देतो, आवाज बदलून. प्रकाशक लेखकाला पाहू मागतो, मंकचा प्रकाशक सांगतो की तो फरार असल्यानं त्याचा चेहरा दाखवू शकत नाही.

पुस्तकं कशी खपवली जातात, लेखकाची प्रतिमा कशी तयार केली जाते या अमेरिकन वास्तवाचं हे विडंबन भारी आहे.

अशी ही कथा. शेवटी चित्रपटाला कसं वळण दिलं जातं ते चित्रपट पाहूनच अनुभवण्यासारखं आहे.

अमेरिकन समाजाच्या काळ्यांबद्दलचा कल्पना काय आहेत, अमेरिकन प्रकाशन व्यवहार किती उथळ आहे यावर चित्रपटानं बोट ठेवलंय. पण ते घणाघाती घाव अशा स्वरूपात नाहीये. एका हलक्याशा गोष्टीतून ते आपल्याला कळतं.

काळ्या लोकांबद्दल अमेरिकन (गोऱ्या) लोकांच्या  समजुतीच्या अगदी दुसऱ्या टोकाचं असं असं मंकचं कुटुंब आहे. अमेरिकन समाजात आजही काळा माणूस घरातला नोकर म्हणून दाखवला जातो, स्थूल काळी स्त्री घरातली नोकराणी म्हणून दाखवली जाते, सर्रास गुन्हे करणारी माणसं काळीच असतात असा समज व्हावा अशा रीतीनं काळी पात्रं अमेरिकन चित्रपटात येतात. चित्रपटातलं काळं कुटुंब अगदीच वेगळं. बोस्टनच्या किनाऱ्यावर श्रीमंत लोकांच्या वस्तीत मंक वाढलाय. मंकची बहीण आणि भाऊ डॉक्टर आहेत. मंकचं घर ऊच्चभ्रू वळणाचं आहे, भिंती उत्तम पेंटिंग्जनी मढवलेल्या आहेत. 

मंकच्या डॉक्टरबहिणीचं घटस्फोट झालाय. मंकचा भाऊ गे आहे आणि ड्रगवाला आहे. मंकला गर्ल फ्रेंड लाभते. तेव्हां तिचा आधीच्या नवऱ्यापासून ब्रेक अप झालेला आहे. आईला अलझायमर होतो तेव्हां तिचा खर्च करण्याची मंकची कुवत नाही. मंकचा भाऊ कुटुंबापासून तुटलेला आहे, आपले आईवडील मंकचे लाड करतात, आपल्याला दूर ठेवतात याचा राग त्याला आहे,  त्यामुळं तो खर्च करायला तयार नाही. बहीण नुकतीच वारलीय. तिचे थोडेफार पैसे आहेत पण तेही वांध्यात आहेत. तेव्हां किनाऱ्यावरचं घर विकून पैसे उभे करावे लागणार अशी स्थिती आहे.

आपण गोरे नाही आहोत याचा अभिमान मंकच्या आईला आहे.

 या मंडळींची कातडी काळी आहे, पण त्यांचं जगणं गोऱ्यांच्या तोडीचं आहे.

अशा काळ्यांची पंचाईतच असते. उदा. बराक ओबामा. त्यांच्या जगण्यातली प्रत्येक गोष्ट ‘ऊच्च’ अभिरुचीची असते, त्यांची वैचारीक घडण ‘उच्च’ प्रकारची असते. काळे असूनही ते रांगडे वागत नाहीत. याचं वैषम्य गोऱ्यांनाही असतं आणि काळ्यांनाही. काळे लोक ओबामा किंवा मंक दोघानाही ओरियो म्हणतात. ओरियो बिस्कीटं काळी असतात पण दोन बिस्किटांच्या मधला क्रीमचा थर मात्र गोरा असतो. हे लोक खरे काळे नाहीतच, ते आतून गोरेच आहेत याचा काळ्यांना राग असतो. गोऱ्यांना आतल्या आत वाटत असतं की ते काळ्यांसारखेच वागते तर बरं झालं असतं.

अशा कोंडीत सापडलेल्या मंकचं आणि त्याच्या कुटुंबाचं चित्रण चित्रपटात आहे. जेफ्रे राईटनं भूमिका छान जमवलीय. मंकची बहीण, मंकचा भाऊ आणि गर्ल फ्रेंड याही भूमिका छान जमल्यात. एक छान चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळतं.

अनेक बोचरे मुद्दे चित्रपट सुचवतो. काळं साहित्य असा काही प्रकार असायलाच हवा काय? काळं साहित्य, गोरं साहित्य, दलित साहित्य, सवर्ण साहित्य, जैन साहित्य, मुसलमान साहित्य, मराठा साहित्य, कोकणस्थ ब्राह्मण साहित्य असे कप्पे साहित्यात असतात काय? साहित्य हे साहित्यच असतं ना? कथावस्तूनुसार काळ, भौगोलिक जागा, संस्कृती इत्यादी गोष्टी येतील. पण मुळात ते साहित्यच असणार ना?

।।

Comments are closed.