सिनेमे/ दिक्दर्शक संपलेत, उरलंय ते यंत्र. कॅसोविझ.

सिनेमे/ दिक्दर्शक संपलेत, उरलंय ते यंत्र. कॅसोविझ.

कॅसोविझ हा हॉलिवूड शैलीत फ्रेंच चित्रपट करणारा धडाडीचा फ्रेंच दिक्दर्शक. त्याचे चित्रपट जगभर पाहिले जातात, ते विचार करायला लावणारे असतात. असा हा दिक्दर्शक आता चित्रपट करणं बंद करायचं म्हणतोय.

मॅथ्यू कॅसोविझला बोलताना पहाणं म्हणजे एक मजाच असते.

मॅथ्यू कॅसोविझ (जन्म १९६७) हा एक फ्रेंच नट आणि दिक्दर्शक आहे. त्यानं दहाएक छोट्या फिल्म केल्यात, दहाएक फीचर फिल्म केल्यात आणि वीसेक फिल्ममधे काम केलंय.

त्याच्या मुलाखती यूट्यूबवर सापडतात. सर्व मुलाखतीत त्याची दाढी खुरटलेली असते. ठरावीक लांबीचे केस तो कसे काय कायम टिकवून ठेवतो असा प्रश्न पडतो. दाढी इतकी वाढलेली असते की बरेच दिवस झालेत, करायची इच्छा आहे, पण कामामुळं जमत नाहीये, उद्या पाहूया असं काही तरी तो म्हणत असेल असं वाटतं.

पाय पुढं पसरून खुर्चीत बसतो. नामांकित माणसं असं करत नाहीत, ती नीट सावरून बसतात.

प्रश्न विचारला की विचारात पडतो. म्हणजे आधी काहीही विचार करुन आलेला नसावा, समोर जे येईल त्याला त्या त्या वेळी तोंड द्यायचं.

एक साधा ग्रे रंगाचा टी शर्ट. तोही युनिफॉर्म असल्यासारखा बऱ्याच मुलाखतीत दिसतो. स्टीव जॉबनं लांब हाताचा काळा टी शर्ट ही त्याची खूण तयार केली होती. आता युक्रेनचा प्रेसिडेंट झेलेन्सकीही टी शर्ट घालूनच हिंडतो; शर्ट-टाय-कोट-फॉर्मल ट्राऊझर असला मामला नाही, कायम अनौपचारीक. बाय द वे झेलेन्सकीही पेशानं नट होता, टीव्हीवरच्या फिल्मनंतर तो थेट राष्ट्रपती झाला.

मॅथ्यू कायम हसतमुख असतो. त्याच्या हसण्याला इंग्रजीत डिसआर्मिंग हसणं असं म्हणता येईल, तुम्हाला एकदम मोकळं करून टाकणारं हास्य.

तो हसत हसत बोलतो पण ऐकणाऱ्याला अंतर्मुख करून टाकतो.

मॅथ्यूला वेगाचं वेड आहे, त्यानं कार शर्यतीत अनेक वेळा भाग घेतलाय. एका शर्यतीत त्याला अपघात झाला, जबर जखमी झाला, कित्येक दिवस जायबंदी होता. हे सारं हसत हसत सांगताना मॅथ्यू म्हणतो की आता पुरे झालं, आता पुन्हा ते धाडस करायचं नाही.

मॅथ्यूनं एक सामाजिक धाडस केलं होतं. तो बेघर लोकांच्या प्रश्वावर बोलत असे. लोकं त्याला विचारात, तू येवढं त्या लोकांबद्दल बोलतोस, तू काय करतोस? मॅथ्यूनं पॅरिसच्या फूटपाथवरची काही माणसं घरी आणली. कुटुंबातल्या माणसांसारखं त्यांना वागवलं. पण काही काळानंतर त्यानं तो प्रयोग बंद केला. हे असं कोणाला घरी आणणं वगैरे खरं नसतं. एकाद्याची अशी मधेच आंशिक काळजी घेण्यातून प्रश्न सुटत नाहीत, ते बिकट होतात. जबाबदारी घ्यायची तर ती शेवटपर्यंत निभावता आली पाहिजे. ते मला शक्य नव्हतं. मी त्यानंतर निर्णय घेतला. आपण श्रीमंत व्हायचं, पैसा कमवायचा आणि आपल्याला योग्य वाटेल त्या कामी खर्च करायचा.

मॅथ्यू राजकीय भूमिका घेतो. त्याला अन्याय सहन होत नाही. तो धाडकन बोलून दाखवणार. सारकोझी प्रेसिडेंट झाल्यावर मॅथ्यू त्याच्यावर घसरला. सारकोझीला माणसं समजत नाहीत, त्याला राजकारणाचा अनुभव नाही, त्याचा अहंभाव फार तीव्र आहे, तो भंपक आहे, तो स्वतःला नेपोलियन समजतो पण त्याची लायकी खूपच कमी आहे, त्याचं सरकार भयानक आहे असं मॅथ्यूनं त्याच्या ब्लॉगवर लिहिलं. त्यानं केलेल्या सारकोझीच्या टीकेवर जाम आरडाओरड झाली.

  मेरील स्ट्रीपनं कॅन्स महोत्सवाच्या मंचावर ट्रंपवर टीका केली. रॉबर्ट डी निरो तर ट्रंपवरचा खटला चालू असताना कोर्टाच्या इमारतीसमोर गेला आणि पत्रकारांसमोर ट्रंपमुळं लोकशाही आणि स्वातंत्र्य कसं धोक्यात आहे असं सांगितलं. ट्रंप पाठिराखे खवळले पण फार बोंब झाली नाही.

तू राजकारणावर बोलतोस, पुढाऱ्यांवर टीका करतोस, तू राजकारणाचा द्वेष करतोस का असं एका मुलाखतकारानं मॅथ्यूला विचारलं.

मॅथ्यू प्रसन्न हसला. म्हणाला टीका करणं हा तर फ्रेंच संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. फ्रान्समधे कोणीही कोणाला सोडत नाही. माझ्याबद्दल विचाराल तर माझ्या तरूणपणी मी हिरीरीनं बोलत असे. शिराक आणि ल पेन यांच्यात संघर्ष झाला. तेव्हां मी लपेन यांच्या विरोधात बोललो. आता मॅक्रॉन आणि उजवे यांच्यात संघर्ष उडालाय.  लोकशाही, स्वातंत्र्य विरुद्ध टोकगामी विचार आणि अराजक अशी लढाई आहे. पण आता मला वेगळंच दिसतंय. आता माझ्या लक्षात येतंय की हे राजकारण आहे. हा बखेडा राजकारणी लोक करत आहेत.राजकारणी लोक सकाळी उठल्यापासून असले बखेडे करत असतात, तोच त्यांचा धंदा आहे. वास्तव वेगळं आहे, रस्त्यावर आमचे संबंध चांगले असतात, आम्ही एकमेकाचा द्वेष करत नाही, आम्ही एकमेकांशी चांगले वागतो.

हसत हसत मॅथ्यू म्हणतो, सिनेमा संपलाय आता. मी सिनेमा करणं बंद करतोय. आता सिनेमाघरात कोणी जात नाही. छोट्या स्क्रीनवर, ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोक फिल्मा पहातात. पोलिटिकल,आशयघन चित्रपटालाह  अर्थ उरलेला नाहीये. टिकटॉक आलंय. कोणीही उठून त्याला काय वाटतं ते चित्रीत करतात, लोक ते पहातात. मुख्य म्हणजे एआय. एआय आणि चित्रीकरणाची तंत्रं यांच्यामुळं जी फिल्म करायला मला दोन तीन वर्षं लागतील ती फिल्म काही आठवड्यात तयार होणार आहे. कल्पनाशक्ती नसलेली माणसंही फिल्म करतील कारण यंत्राची कल्पनाशक्ती वापरून फिल्म होणार आहे. पुढल्या काळात फिल्म कशा असतील याची कल्पनाही मला करवत नाहीये.

 दुसऱ्या महायुद्धावर एक फिल्म मी करायला घेतलीय.ती माझी शेवटली फिल्म असेल. तिच्यात प्राणी आहेत, प्राण्यांच्या डोळ्यातून मी दुसरं महायुद्ध पहाणार आहे.

कॅसोविझची १९९५ ची ल हेन (हेट) ही फिल्म गाजली होती. पॅरिसचा विसकटत चाललेला पट त्या चित्रपटात होता, पोलिसांचं वर्तन हा मुख्य विषय होता. या चित्रपटाच्या शेवटी एक माणूस उंच इमारतीच्या शेवटल्या मजल्यावरून खाली पडतो. यथावकाश तो पडणार, धाडकन आपटणार, नष्ट होणार हे स्पष्ट असतं. पडताना तो माणूस एकेक मजला गेला की म्हणायचा सो फार सो गुड, आतापर्यंत जे झालंय ते ठीक आहे…. 

कॅसोविट्झचं म्हणणं दिसतंय की मोक्ष अटळ आहे, आपण फक्त दिवस मोजायचे आहेत.

Comments are closed.