सिनेमे: परफेक्ट डेज, एक जपानी प्रयोग.

सिनेमे: परफेक्ट डेज, एक जपानी प्रयोग.

परफेक्ट डेज.

 जपानी फिल्म. कॅन महोत्सवात दोन पारितोषिकं आणि २०२४ च्या ऑस्करमधे सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठी नामांकन. 

चित्रपटाचा विषय आहे टोकियोतल्या हिरायामा या  टॉयलेट साफ करणाऱ्या माणसाचं जगणं. बिनलग्नाचा. बहुदा चांगल्या घरातला. बहुदा हेतूपूर्वक हे काम स्विकारलेलं. त्याची बहीण सुस्थितीत आहे. तिला आपल्या भावानं असलं कमी प्रतीचं काम करणं पसंत नाही. हिरायामाला त्याची तमा नाही. तो मनापासून हे काम करतो. दिवसभर काम करतो, रात्री झोपण्यापूर्वी दर्जेदार साहित्य (विल्यम फॉकनर, आया कोडा, पॅट्रिशिया हायस्मिथ ) वाचतो. फोटोग्राफीचा नाद आहे. फोटो काढतो, प्रिंट काढतो, चांगल्या प्रिंट ठेवतो, खराब प्रिंट फाडून टाकतो. त्या काळात लोकप्रीय असलेलं संगित (टोनी मॉरिसन, मायकेल बबल)  ऐकतो.

हिरायामाच्या आयुष्यात काहीच घडत नाही. अपघात नाही, गुन्हा नाही, हाणामारी नाही, प्रेम नाही,भंग नाही,सत्ता नाही, भांडण नाही.       का SSSS ही नाही. सकाळी उठतो. नाक्यावरच्या यंत्रातून सँडविच आणि पेयाचे कॅन घेऊन निघतो. टॉयलेट साफ करतो. आणखी एक टॉयलेट साफ करतो. आणखी एक. दुपारी टोकियोतल्या एका नागरी वनात  सँडविच खातो, तिथल्या झाडांचे फोटो काढतो. पुन्हा हा टॉयलेट, तो टॉयलेट. रात्री पुस्तक वाचत वाचत झोपतो.

सुटीच्या दिवशी लाँडरेटमधे कपडे धुवायला टाकून पुस्तकांच्या दुकानात जातो. तिथली विक्रेती त्याला ओळखते. पुस्तक/लेखक यांच्याबद्दल त्यांच्यात तुटक बोलणं होतं. वाटेत कॅसेट्स घेतो. घरी परततो.

रात्री सुखाचं झोपतो. स्वप्नात झाडं येतात.

चित्रपटभर हिरायामा सगळी मिळून फार तर तीसेक वाक्यं बोलतो. तीही अगदी तुटक. सुरवातीची पंचवीस मिनिटं एकही वाक्य बोलत नाही. कामाच्या जागी जाताना येताना कारमधे गाणी ऐकतो.

चित्रपट संथ आहे. कोजी याशुको हा एक नावाजलेला जपानी नट हिरायामाच्या भूमिकेत आहे. तो बोलत नाही, त्याच्या चेहरा बोलतो.   खरं म्हणजे चेहराही मोजकंच बोलतो. तो असा कां आहे याचा विचार आपण करत रहातो.

हा काय सिनेमाचा प्रकार?

सिनेमाची गंमत अशी की आपण फक्त पहात असतो. आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसत रहातात, आपण त्याचा अर्थ शोधत रहातो. दिक्दर्शक विम वेंडर्स आपल्याला ‘दाखवतो’, तुम्ही पहा आणि अर्थ शोधा असं सांगतो.

सिनेमाभर दिसतात टोकियोतले शेकडो टॉयलेट.  ही सार्वजनिक टॉयलेट आहेत. कल्पक आर्किटेक्टनी ती डिझाईन केलेली आहेत. प्रत्येक टॉयलेटचं डिझाईन वेगळं आहे. एका टॉयलेटची गंमत म्हणजे पूर्ण पारदर्शक काच असलेलं हे टॉयलेट स्त्रियांसाठी आहे. आत गेल्यानंतर एकादं बटन दाबलं, तत्सम काही तरी केलं की ते एका बाजूनं पारदर्शक होतं;  आतून बाहेरचं दिसतं पण बाहेरून आतलं दिसत नाही. प्रत्येक टॉयलेटमधे आकर्षक प्रकाश योजना आहे.

हिरायामा कारमधून साधनं घेऊन उतरतो, टॉयलेटमधे शिरतो.  कमोडजवळ बसतो. प्रेमानं कमोडचा आतला भाग साफ करतो. एक छोटा आरसा कमोडखाली सरकवून खाली कुठं डाग आहे का पहातो, तो डाग काढतो. बहुतेक ठिकाणी खालच्या भागात डाग पडलेले असतात, शेवाळ असतं, पण ते दिसत नसल्यानं त्याची काळजी उपभोक्ते करत नाहीत. टोकियोतल्या टॉयलेटवाल्यांना ते चालत नाही. पूर्ण चकाचक. हिरोयामा अगदी प्रेमानं युरीन पॉट साफ करतो.

बाय द वे तपशील संथ गतीनं दाखवणं ही जपानी, चिनी दिक्दर्शकांची शैली दिसते.

हिरायामा युरीन भांडं साफ करत असताना एक तरूण झिंगत येतो, शेजारच्या भांड्यात लघवी करतो. सफाई चाललेली असली की कोणी टॉयलेटचा वापर करायचा नसतो. तसा बोर्डही बाहेर ठेवलेला असतो. हिरायामा शांतपणे सफाई बंद करतो, बाहेर जाऊन उभा रहातो. तो झिंगाड बाहेर निघून गेल्यानंतर सफाई सुरु करतो. 

  एक माणूस येतो. त्याला जाम घाईची शू लागलेली असते. जांघेत हात घालूनच तो टॉयलेटकडं येतो. हिरायामा काम सोडून लगबगीनं बाहेर   पडून दरवाजा उघडून देतो.

हिरायामानं सफाई कामगाराचे कपडे घातलेले असतात. त्यावर दी टोकियो टॉयलेट हे शब्द लिहिलेले असतात. तो उद्यानात बसतो, दुकानात जातो, रेस्टॉरंटमधे जातो, सर्व ठिकाणी त्याला माणसं आदरानं वागवतात, तो निरलसपणे मेहनत करतो याचं कौतुक करतात.कमरेत वाकून स्वागत करतात.

  बहिणीचा माजी नवरा हिरायामाला भेटतो. तो कॅन्सरग्रस्त असतो, शेवटले दिवस मोजत असतो. हिरायामा त्याच्याबरोबर घटकाभर आनंदात घालवतो, सावल्यांचा खेळ खेळतो. हिरायामाची भाची हिरायामाला भेटायला जाते. त्याला टॉयलेटच्या सफाईत मदत करते. 

हिरायामाचा तरूण सहाय्यक.दुसऱ्या हातातल्या सेलफोनवर क्लिप पहात पहात कमोड जुजबी साफ करतो.  ‘तू कशाला टॉयलेट इतकं साफ करतोस? तू साफ केल्यानंतर नाही तरी पुन्हा खराबच होणारे ना?’ असा प्रश्न हिरायामाला विचारतो. हिरायामा उत्तर देत नाही. 

सहाय्यकाला प्रेयसीबरोबर धमाल करायची असते. पैसे नसतात.  एक रात्र मैत्रिणीसोबत घालवायची असते.  हिरायामा पैसे देतो.

 टोकियो हे महानगर आहे. तिथं प्रत्येक माणूस धावपळीत आहे. कोणाला वेळ म्हणून नाही. वस्तू. वस्तू. वस्तू विकत घ्यायच्या. वस्तूरूप जीवन. सुख? समाधान? ते विकत घेता येत नाही.

हिरायामाकडं टीव्ही नाही, इंटरनेट नाही, आयफोन  नाही. घरात कपडे धुवायचं यंत्र नाही. चटई आंथरून जमिनीवर झोपतो. त्याला छान झोप लागते, तो समाधानी आहे. सकाळी उठून बाहेर पडतो तेव्हां त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो, समाधान असतं. कारमधे बसल्यावर बबलचं गाणं लावतो ‘ मी खूप आनंदात आहे; नवं जीवन; नवा दिवस…’

  निर्मात्याला टॉयलेटवर डॉक्युमेंटरी करायची होती. दिक्दर्शक म्हणाला फिक्शन करूया, एका पात्राभोवती डॉक्युमेंटरी फिरवूया.

  तशीच पटकथा लिहिली गेली. डॉक्युमेंटरीसारखी. संवाद नाहीत. टोकियो शहर दाखवायचं, टॉयलेट दाखवायची. कोजी याशुकाला गोष्ट सांगितली. कोशिकानं पात्राबद्दल विचार केला. टॉयलेट साफ करत असताना त्याच्या मनात अललेला हिरायामा कोजीनं साकारला.  कोशिका उठतो. तोंड धुतो. बाहेर पडतो. टॉयलेट साफ करतो. कॉफी घेतो. पुस्तकाच्या दुकानात जातो. हे सारं कॅमेरा शूट करत रहातो. रिहर्सल नाही, रिटेक नाहीत, संवादही नाहीत.  चित्रीकरण होत गेलं, सिनेमा होत गेला.

  गोष्ट हळूहळू संथपणे उलगडत जाते. दोन तासांच्या चित्रपटात शेवटल्या पंधरा वीस  मिनिटात हिरायामा हा माणूस काहीसा कळतो. 

चित्रपट ऑस्कर दर्जाचा आहे की नाही? पण पहाण्यासारखा आहे. ऑस्करमधे स्पर्धा होती ‘झोन ऑफ इंटरेस्ट’ शी. त्यामुळं ऑस्कर कां मिळालं नाही ते समजू शकतं. 

।। 

Comments are closed.