ट्रंप आणि हिंसाचार

ट्रंप म्हणजे हिंसेला आमंत्रण

१० सप्टेंबर २०२४ रोजी ट्रंप-हॅरिस यांच्यात टीव्हीचर्चा झाली. ट्रंप यांच्या वक्तव्यात चिथावणी होती, हिंसाचाराची मुळं होती.

   🔪

१५ सप्टेंबर २०२४. डोनल्ड ट्रंप त्यांच्या फ्लोरिडातल्या गोल्फ क्लबवर  गोल्फ खेळत होते.  

गोल्फ कोर्सच्या परिघावर असलेल्या झाडांच्या रांगेत रायन राऊथ नावाचा ५८ वर्षाचा एक माणूस लपला होता. त्याच्या हातात एसकेएस पद्धतीची सेमी ऑटोमॅटिक बंदूक होती, बंदुकीवर टेलेस्कोप होता, गोप्रो हा कॅमेरा होता. त्यातून तो ट्रंपवर लक्ष ठेवून होता. ट्रंप ३०० ते ५०० मीटर येवढ्या अंतरावर होते, राऊथच्या टप्प्यात येत नव्हते.

ट्रंपना गोळ्या घालण्यासाठीच राऊथ उत्तर कॅरोलायनातल्या त्याच्या गावातून (बहुदा) आला होता. त्याच्याकडं दोन पिशव्या होत्या, एकीमधे अन्नपदार्थ होते. बराच वेळ थांबावं लागणार याची तयारी त्यानं केली असावी.

ट्रंप चालत असताना त्यांच्यापासून काही अंतरावर सुरक्षा जवान होता. त्याला समोर कुंपणाआड बंदुकीची नळी दिसली. त्यानं आसपासच्या सुरक्षा जवानाला कळवलं आणि घाईनं ट्रंप यांना गुंडाळून गाडीत घातलं, सुरक्षित ठिकाणी नेलं.

राऊथला कळलं की आता ट्रंप सापडणार नाहीत. त्यानं पिशव्या गुंडाळल्या, गाडीत बसला आणि निघाला. सुरक्षा रक्षकांनी परिसराला जागरूक केलं. एका ठिकाणी पोलिसांनी राऊथला घेरलं. बंदुका रोखल्या, गोळ्याही झाडल्या. राऊथ गाडीच्या बाहेर आला, पोलिसांनी त्याला हातकड्या घातल्या.

धडाधड चौकशी झाली. हवाई आणि कॅरोलायनातल्या त्याच्या घरांची झडती घेण्यात आली. राऊथचा फोन ताब्यात घेऊन तो केव्हांपासून फ्लोरिडात पोचला होता याची माहिती पोलिसांनी मिळवली. काही तासातच त्याची कुंडली पोलिसांनी मिळवली.

राऊथ हा एक बांधकाम कंत्राटदार होता. त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद झालेली होती. २००० साली त्याला ‘मास डिस्ट्रक्शनचं’ हत्यार बाळगण्याबद्दल अटक झाली होती. त्याला चोरीच्या आरोपाखाली शिक्षा झाल्या होत्या. एकदा तो वॉशिंग्टनला जाऊन सरकारी अधिकाऱ्यांना भेटला होता. त्याला म्हणे युक्रेनमधे जाऊन लढायचं होतं, त्यासाठी तो अफगाण सैनिक गोळा करणार होता.

पोलिस चौकशी करत आहेत. त्या चौकशीत ट्रंपच्या खुनाचा प्रयत्न तो कां करत होता याचा पत्ता लागेल.

(या आधी १५ जुलै २०२४ रोजी पेनसिल्वानियात प्रचार सभेत भाषण करतांना त्यांच्यावर एक गोळी झाडण्यात आली होती.)

दुपारी दोनच्या सुमाराला ही घटना घडली.

अगदी लगोलग. ट्रंप यांच्या निवडणूक मोहिमेतला फायनान्स विभागानं वेबसाईटवर मेसेज टाकला. ट्रंप यांच्यावर हल्ला झालाय, खालील बटन दाबून त्यांच्या मोहिमेला दान द्या. आधीच्या हल्ल्यानंतर काही लाख डॉलर ट्रंप यांच्या चहात्यांनी ट्रंप मोहिम अकाऊंटवर टाकले होते.

लगोलग ईलॉन मस्क यांनी स्वतःच्या मालकीच्या एक्सवर त्यांचं म्हणणं टाकलं. कोणी तरी मस्कना विचारलं की ट्रंपवर हल्ले कां होतात. मस्कनी लिहीलं ‘ कमला हॅरिसवर, जो बायडनवर हल्ले कां होत नाहीत?’ मस्क यांना एक्सवर १९ कोटी अनुयायी आहेत. लगोलग बोंबाबोंब झाली. हॅरिस, बायडनवर हल्ल्याची अपेक्षा बाळगणं दुष्टपणाचं आहे असं लोकं म्हणाली. लगोलग मस्कनं एक्सवरची पोस्ट काढून टाकली. ‘मी विनोद केला होता, लोक विनोद गंभीरपणे घेतात हे मला आता कळलं’ अशी प्रतिक्रिया मस्कनं दिली.

बायडननी ट्रंपना फोन केला. तुम्ही वाचलात याचा आनंद झाला, काळजी घ्या असं ते ट्रंपना म्हणाले.

ट्रंपनी फॉक्स न्यूजला सांगितलं ‘बायडन, हॅरिस माझ्या विरोधात चिथावणीखोर भाषणं करतात, माझा खून व्हावा असा त्या चिथावणीचा हेतू असतो.’

रायन राऊथ पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावरचे आरोप सिद्ध झाले तर त्याला ५ लाख डॉलर दंड आणि २० वर्षं तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

गुन्हे सिद्ध झालेला, गुन्हेगारीचा इतिहास असताना राऊथला बंदुक कशी मिळाली? कोणी विकत दिली? गिऱ्हाईकाच्या नावावर गुन्हे नाहीत ना, त्याच्या मानसीक स्थितीबद्दल काही सिद्ध पुरावे नाहीत ना, गुन्हेगार हिंसक नाही ना, याची चौकशी करून मगच बंदुक विकावी असं कायदा सांगतो.

 बंदुक बाळगणं हा अमेरिकन व्यक्तीचा अधिकार आहे, बंदुकीवर बंदी घालता कामा नये असं ट्रंप म्हणतात.

🔪

टीव्ही चर्चेत काहीही संदर्भ नसतांना ट्रंप म्हणाले ‘ ओहायोतल्या  स्प्रिंगफील्डमधले  बेकायदेशीर निर्वासित स्थानिकांची मांजरं आणि कुत्रे खातात’

माणसं मांजरं आणि कुत्रे खातात?

आजवर अमेरिकेत कधीच अशा घटनांची नोंद झालेली नाही.

ट्रंप एकदा नव्हे दोन वेळा चर्चेत तसं बोलले.

ओहायोचे  मेयर म्हणाले ‘तसं घडल्याची नोंद आमच्या शहरात नाही. ट्रंपना कोणी ही माहिती दिली माहित नाही.’

चर्चा मंगळवारी झाली. बुधवारी Christopher Pohlhaus नावाच्या एका नाझीवादी संघटनेच्या माणसानं  या बातमीचं पितृत्व घेतलं आणि ओहायोतल्या या घटना थेट राष्ट्रीय पातळीवर आणल्याबद्दल ट्रंप याना धन्यवाद दिले.

कोण आहेत ही ओहायोतली माणसं?

ओहायोत १० ते १२ हजार हैतीचे नागरीक आहेत.

हैती हा बेटदेश अमेरिकेच्या दक्षिणेला, क्युबाच्या पूर्वेला आहे. तिथं मोठ्या भूकंप झाला, फार नुकसान झालं. नंतर तिथली अर्थव्यवस्था कोसळली. नंतर तिथं अराजक माजलं, गुन्हेगारांनी ताबा घेतला. लुटालूट सुरू झाली. माणसांनी पळ काढला. जिथं चार घास मिळतील अशाच ठिकाणी माणसं जाणार ना? अमेरिकेत पोचली.

अमेरिकेत जॉर्ज बुश यांच्या काळात एक कायदा झाला. कठीण परिस्थितीत परदेशातून येणाऱ्या लोकांना अमेरिकेत रहायला परवानगी देतात, त्यांना काम करण्याचा परवाना दिला जातो.

ओहायो राज्यात स्प्रिंगफील्ड हे शहर उभं रहात होतं. तिथं कारखाने व इतर व्यवस्था उभ्या रहात होत्या, कामाला माणसं मिळत नव्हती. हैतीवाले तिथं पोचले. बरेच लोक कारचे सुटे भाग एकत्र करून कार तयार करणाऱ्या कारखान्यात काम करू लागले. स्प्रिंगफील्डनं त्यांचं स्वागतच केलं.

स्प्रिंगफील्ड हे एकेकाळी बऱ्या स्थितीत असलेलं गाव मधल्या काळात ओस पडलं होतं. अनेक घरं मोडकळीला आली होती. हैतीवाल्यांना रहाण्यासाठी घरं नव्हती. या घरांत ते गेले, घरांची डागडुजी केली, भग्नावशेष झालेलं गाव गरजवंत हैतीनी जिवंत केलं. हैतीवाले गावात मिसळून गेले होते.

नाझीवादी गटांनी सोशल मिडियावर बातम्या पसरवल्या. स्प्रिंगफील्डमधे गुरुवारी सकाळी अफवांचं पेव फुटले. हैतीची मुलं शिकतात त्या शाळांत बाँब ठेवलेत अशी बातमी पसरली. शिक्षकांनी शाळा सोडली. शाळेत निघालेली मुलं घरी परतली. वाटेत असणाऱ्या मुलांचे आईबाप हादरले. मुलांना आणायला पळत सुटले. दुकानं, कारखाने बंद झाले. शहर बंद पडलं, रोजगार बंद पडले.

पोलीस शाळा कॉलेजात पोलीस श्वानपथक घेऊन पोचले. कुठंही बाँब सापडले नाहीत. मेयर आणि पोलिस प्रमुखांनी गाड्या फिरवून जाहीर केलं की काहीही घडलेलं नाही, लोकांनी घाबरू नये.

हैतीचे लोक चर्चमधे गोळा झाले. आपण कधी कुत्रेमांजरं खाल्ली असं ते एकमेकाला विचारू लागले, पत्रकारांना म्हणाले. 

कुत्रे मांजरांची बातमी ट्रंपची पेटंट फेक न्यूज होती.

स्प्रिंगफील्डच्या मेयर, पोलिस प्रमुखांची वक्तव्य प्रसिद्द झाली. पत्रकारही तिथं जाऊन आले. शुक्रवारी ट्रंप कॅलिफोर्नियात प्रचार दौऱ्यावर होते. पत्रकारांनी स्प्रिंगफील्डबद्दल विचारलं. ट्रंप म्हणाले की कुत्रेमांजरे खातात हे खरंच आहे. हैतीचे लोक आमच्या लोकांची घरं लुटत आहेत असं ट्रंप म्हणाले. मी प्रेसिडेंट झालो तर सर्वप्रथम स्प्रिंगफील्डमधल्या निर्वासितांना हाकलून देणार. इतक्या मोठ्या संख्येनं लोकांना देशाबाहेर काढल्याचं जगातलं हे अद्वीतीय उदाहरण ठरेल. 

हैतीचे लोक  भग्नावशेष झालेली घरं ठीक करून तिथं रहात होते.

स्प्रिंगफील्डमधलं वातावरण तंग झालं. गुंडलोक गोंधळ घालतील अशा भीतीनं ते त्रस्त आहेत. खाजगीत बोलतांना ते म्हणतात की अमेरिकेत काही तरी जबर चमत्कारीक घडलं तर बरं होईल, आमच्या शहरावरचं लोकांचं लक्ष उडेल, आम्हाला स्वस्थता लाभेल.

अमेरिकेत काहीही घडलं, काहीही संकट आलं की त्याला बाहेरून आलेले निर्वासित जबाबदार आहेत असं पालुपद ट्रंप लावत असतात. स्प्रिंगफील्ड  त्या पालुपदाचा बळी होतं.

खोटं बोलून ट्रंप हिंसेला चिथावणी देतात आणि हिंसा त्यांच्यावर उलटते.

।।

Comments are closed.