गाझातल्या हमासीनी इस्रायलवर हल्ला कां केला?

।।

माहितीपट

नो अदर लँड

।।

नो अदर लँड हा माहितीपट आहे?

म्हटलं तर आहे. वेस्ट बँक मधील मुसाफर याट्टा या गावातल्या पॅलेस्टिनी समाजाची ही गोष्ट आहे. वीसेक गावांचा एक समुदाय-समाज याट्टाच्या अवतीभोवती पसरलेला आहे. इस्रायलचे सैनिक रणगाडे आणि बुलडोझर घेऊन गावात घुसतात. गावातली घरं, शाळा पाडतात, लोकाना उघड्यावर सोडून जातात. कां तर म्हणे ती जमीन लष्कराच्या रणगाड्यांना सराव करण्यासाठी हवीय. गावकरी असहाय्य असतात. निदर्शनं करतात, सैनिकांशी हुज्जत घालतात, कधी कधी त्यांच्यावर गोटे मारतात. रणगा़ड्याला कसली इजा होतेय? गावकरी उघड्यावर, गुहेत जाऊन रहातात.

२०१९ ते २०२३ या काळात या गावात वरील विषयावरील घटनांचं चित्रण या माहिती पटात आहे.

पण यात बेसेल अद्रा या तरुणाची गोष्टही आहे. या तरुणाच्या पित्याचा गावात एक पेट्रोल पंप आहे. पण तो चळवळ्या आहे. इस्रायलच्या दादागिरीला विरोध करतो त्यामुळं त्याला अनेक वेळा तुरुंगवास आणि मारहाण घडलेली आहे. बेसेलनं कायद्याची पदवी घेतलीय पण वकिली करण्यासाठी लागणारं स्थैर्य त्याच्याकडं नाही. तो एक पत्रकारही आहे. इस्रायली सैनिकांच्या उद्योगांचं तो चित्रीकरण करतो, त्याचे व्हीलॉग करतो, ब्लॉग लिहितो. सगळ्या जगाला तो इस्रायलच्या दादागिरीची कहाणी सांगत असतो. जग इस्रायल भक्त असल्यानं त्याच्या ब्लॉगला दोनेक हजार व्ह्यू मिळतात. बस. पण जगाचं लक्ष वेधण्यात मात्र तो यशस्वी होतो.

त्यामुळँच पोलिसांचा त्याच्यावर डोळा आहे. पोलिस त्याला पकडण्याच्या खटपटीत आहेत. तो गावाबाहेर रहातो, पोलिसांना चुकवत रहातो. पण चळवळ चालवत असतो. यात त्याला युवाल या इस्रायली पत्रकाराची मदत मिळते. त्याचं घर उध्वस्थ होतं. त्याच्या एका नातेवाईकाला पोलीस गोळ्या घालतात, तो विकलांग होतो. असहाय्य, हताश असतो तरीही तो लढत रहातो.

माहितीपट म्हणून गावातली माणसं आणि त्यांचे हाल आपल्याला दिसतात. पण त्यात बेसेलचेही नातेवाईक असतात, बेसेलचं जगणंही गावाच्या जगण्यात गुंतलेलं असतं. त्यामुळंच ती बेसेलचीही गोष्ट होते.

फीचर फिल्ममधे शोभावेत असे अनेक प्रसंग या चित्रपटात आहेत. जणू पटकथेत ते लिहिलेलेच आहेत. एक तीनेक वर्षाची मुलगी आहे. सभोवतालचं भीषण वास्तव तिला शिवत नाही. ती आपल्या आईमावशीआजीला सांगते की काहीही झालेलं नाहीये, सगळं कसं मस्त आहे. दूरवर बुलडोझर चाललेला असतो ही मुलगी भोवरा फिरवत असते. पलीकडं पोलिस धूर सोडून माणसांना पळवत असतात, ही मुलगी कार्ट व्हील मारत असते. ही मुलगी, तिचे मित्र भेंड्या खेळत असतात.

सत्यजित रे यांच्या चित्रपटात शोभावेत असे डीटेल्स काही वेळा दिसतात. घरावर एक विजेचा दिवा आहे. तो दिवा बटन खाली वर करून बंद होत नाही, दिवा होल्डरमधे पिरगळून बंद केला जातो. 

उंच सखल प्रदेश आहे. दूरवरून, खालून, वळणं घेत रस्ता गावापर्यंत पोचतो. वाहनं दूरवरून दिसतात. बुलडोझर येताना दिसतात. रणगाडे आणि पोलिसांच्या चिलखाती गाड्या दिसतात.एकदा देखण्या गाड्यांची रांग दिसते. दूरवर गाड्या दिसल्या की लोकांना धडधडू लागतं.एकदा त्या गाड्यांच्या रांगेत पंतप्रधान ब्लेअर यांचीही गाडी असते. ब्लेअर येतात, चौकशी करून जातात.

दिवसा रेताड शुष्क दिसणारा प्रदेश काळोख पडल्यावर दिसेनासा होतो, त्याचं अस्तित्वच संपतं. चारही बाजूनी इस्रायली वस्त्यांची चमचम दिसते. 

पॅलेस्टिनी माणसाची गाडी असेल तर त्याची नंबर प्लेट हिरवी. इस्रायली माणसाची कार असेल तर पिवळी नंबर प्लेट. हिरव्या प्लेटच्या गाडीला वेस्ट बँकच्या बाहेर जायला परवानगी नाही. पिवळ्या नंबर प्लेटची गाडी पॅलेस्टिनी माणसानं चालवायची नाही, चालवर तर फटके आणि तुरुंगवास.

माणसाला चेक नाक्यावर किंवा कुठंही आपण कोण आहोत हे पिवळं किंवा हिरवं कार्ड दाखवून सिद्ध करावं लागतं.

जरा आठवणीला ताण द्या. हिटलरच्या काळात  सर्व ज्यूना पिवळ्या रंगाच्या कापडाचा तुकडा दंडावर बांधायचं बंधन होतं. 

माहितीपट गोष्टीसारखा मांडल्यानं काही संवाद गुंफण्यात आले आहेत. 

सध्या गाझामधे जे चाललंय त्याचा अर्थ या माहितीपटामुळं समजतो. गावातली माणसं दुर्बळ असतात, असहाय्य असतात. पलिकडं इस्रायलची माणसं भीतीदायक रणगाडे आणि चिलखती गाड्या घेऊन येतात. बुलडोझर सुरु होतो त्यावेळी पॅलेस्टिनी लोक केविलवाणे असतात, हातवारे करून जोरजोरात बोलतात. येवढंच त्यांना करता येतं. गाझातही सुरवातीला हीच स्थिती होती. बेसेलसारखे लोक तक्रारी करत, कोर्टात जात, बाहेरच्या पेपरात आपली कैफियत मांडत. पण त्यानं काही फरक पडत नाही. माणसं पार कोंडीत लोटली गेलेली होती. अशा स्थितीत हमासचा जन्म झाला.इस्रायलसारख्या बलाढ्या शक्तीपुढं आपण कस्पटासमान आहोत हे त्यांना कळत होतं. कधी तरी आपली खदखद व्यक्त करायची म्हणून हमासनं ऑक्टोबर हल्ला केला. तो आततायी होती, दहशतवादी होता. पण तसा हल्ला त्यांनी का केला हे या माहितीपटावरून समजतं.

माहितीपटांना प्रेक्षक मिळत नाहीत. महोत्सवांमधे ते दाखवले जातात, तिथं त्यांच्याबद्दल लिहिलं जातं, त्या वाटेनं माहितीपटातला विषय लोकांसमोर येतो.

हा माहितीपट दाखवायला अमेरिकन सिनेमाघरांनी नकार दिला. नेटफ्लिक्सनही तो दाखवायला नकार दिला. मुंबईतल्या मामी महोत्सवात तो दाखवला जाणार असं जाहीर झालं होतं. पण भारत सरकारनं प्रदर्शनाची परवानगी दिली नाही. पण २०२५ च्या ऑस्करमधे माहितीपटाला बक्षीस मिळालं.

माहिती पटाचे दिक्दर्शक पॅलेस्टिनी आणि इस्रायली आहेत. दोघांनाही वेस्ट बँकमधे गेल्यानंतर मारहाण झाली. बेकायदा वस्त्या करणाऱ्या इस्रायलीनी मारहाण केली आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.

।।

Comments are closed.