पुस्तक. मुल्ला गफूर ते टाटा

पुस्तक. मुल्ला गफूर ते टाटा

आजही टाटांचं नाव घेतलं की टॅक्सीवालाही भारावून जातो. अंबानींचं नाव घेतल्यावर मात्र लोक तोंड आंबट करतात. असं कां होतं. 

पुस्तक : India before the Ambanis: A history of Indian Business, Money and Economy.

लेखिका : Lakshmi Subramanian.

 ❖

 अंबानी यांच्या आधीचा भारत या शीर्षकावरूनच पुस्तकात काय असेल याचा अंदाज येतो. 

धीरूभाई अंबानी हे आधुनिक भारतातले सर्वात मोठे बिझनेसमन. एडनमधे त्यांनी निर्यात व्यवसाय केला. त्यात  मिळालेले पैसे घेऊन १९५८ साली धीरूभाई भारतात परतले. बाजाराचं म्हणणं त्यांना उत्तम कळू लागलं होतं. त्यांनी निर्यात आयात व्यवसाय सुरु केला. सरकारनं निर्यातीसाठी दिलेल्या सवलती वापरून त्यांनी कृत्रीम धाग्याची आयात सुरु केली. भारतीय बाजारात सुताच्या कपड्यांऐवजी कृत्रीम धाग्याच्या कपड्याला मागणी होती. नंतर त्यातून मिळालेला पैसा त्यांनी पेट्रोलियम उद्योगात गुंतवला. तिथून त्यांची रिलायन्स ही कंपनी नाना प्रकारच्या उद्योगात पसरली. 

थोडे  शेअर्स घेण्याची कुवत असलेल्या  हज्जारो सामान्य माणसांना धीरूभाईनी मैदानात गोळा केलं. माझ्या उद्योगात पैसा गुंतवलात तर तुम्हाला फायदा होणार आहे हे त्यांनी माणसांवर ठसवलं. प्रचंड पैसा गोळा केला.  सामान्य माणसाकडून खूप पैसा घेतला असला तरीही कंपनीतला स्वतःचा वाटा येवढा मोठा ठेवला की कंपनीवर त्यांचा ताबा शिल्लक राहिला,

 धीरूभाई बिझनेसमधे आले तेव्हां  १९६० मधे भारतात लायसेन्स परमिट राज्य सुरु झालं होतं. सरकारनं उद्योगावर बंधनं घातली, सवलती दिल्या, उद्योगाच्या नाड्या आपल्या हातात ठेवल्या.  धीरुभाईंनी सरकारी नियम आणि प्रोसीजरमधील फटी शोधून काढल्या. राजकीय पुढारी,   मंत्री, नोकरशाहीतली माणसं त्यांनी हाताशी धरली. नैतिक अनैतिक, कायदेशीर बेकायदेशीर यातल्या अंधुक निसरड्या वाटांचा फायदा त्यांनी घेतला. 

  उद्योगी आणि राजकीय लोक यांचा त्यांच्यावर रोष झाला. खटले, आरोप, प्रचार  इत्यादीना त्यांना सामोरं जावं लागलं.  

लेखिकेनं अंबानींचं  बिझनेस चरित्र पुस्तकात शेवटल्या धड्यात मांडलं आहे. 

पुस्तकाची सुरवात सतराव्या शतकातल्या सुरतमधल्या बिझनेसमेनच्या चरित्रापासून आहे. मुघलांचा काळ होता. अब्दुल गफूर १७ जहाजांचा काफिला बाळगून आयात निर्यात करत होते. शांतीदास झवेरी, वीरजी व्होरा हे त्या काळातले बँकर पैशाची उलाढाल करत होते. जमिनीवरचा व्यवहार झवेरी,व्होरांकडं; समुद्रावरचा व्यवहार मुल्ला गफूरकडं. कारखानदारी नव्हती.  सावकारी, सराफी, दलाली या वाटांनी पैशाची उलाढाल होत असे.

मुघलांच्या जागी ब्रिटीश आले तेव्हां  जमशेटजी जीजीभाय आले. त्यांनी चीनशी चहा आणि अफूचा व्यापार केला, खूप पैसा कमावला. पुढं याच व्यवहारात जमशेटजी टाटा आले. टाटांनी काळातला बदल ओळखून व्यापारातून आलेला पैसा उद्योगात घातला, कापड गिरण्या सुरु केल्या, पोलाद उद्योग सूरू केला. टाटांच्याच मालिकेत पुढं गोदरेज, बजाज,किर्लोस्कर इत्यादी बिझनेसमन आले. टाटांनी बँकही चालवली होती. गोदरेज,बजाज ही मंडळी वित्त व्यवहाराच्या बाहेर पडली, उद्योग चालवू लागली. त्यांना लागणारी गुंतवणूक बँका व इतर वित्त संस्थांकडून मिळू लागली होती.

वित्त संस्था आणि उद्योग हे दोन स्वतंत्र प्रांत झाले.

शेअर बाजार हा पैसे गोळा करण्याचा एक नवाच प्रांत सुरु झाल्यावर त्याचा फायदा अंबानी यांनी घेतला.

ब्रिटीश येण्यापूर्वी कच्च्या मालाची निर्यात आणि पक्क्या मालाची आयात हे भारतीय अर्थव्यवहाराचं प्रमुख सूत्र होतं. ब्रिटीश आल्यावर भारतातच पक्का माल तयार होऊ लागला, कारखानदारी सुरु झाली. ब्रिटीश पूर्व काळात खाजगी बँकर (सावकार,अडत्ये, एजंट, दलाली, कर्ज, हुंडी) वित्त पुरवठा सांभाळत असत. ब्रिटीश काळात, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बँका, विमा कंपन्या आणि शेअर बाजार यातून वित्त पुरवठा होऊ लागला. हे सारं लेखिकेनं पुस्तकात प्रवाही व रंजक शैलीत मांडलं आहे. 

लेखिका प्राध्यापक आहे. प्राध्यापकीला आवश्यक तटस्थपणा पुस्तकात आहे. अंबानी यांना झोडायचं किंवा त्यांची आरती ओवाळायची असं मजकुराचं रूप नाही. पुस्तकातून अनेक बारकावे लक्षात येतात.

सरकार आणि बाजार हे दोन घटक महत्वाचे असतात. दोन्ही घटक एकमेकावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात. हे दोन्ही घटक हुशारीनं सांभाळावे लागतात. टाटा, गोदरेज, बजाज यांनी ते सांभाळले.

सरकार, बाजार या बरोबरच समाज हाही एक घटक असतो. समाजालाही सांभाळावं लागतं, ती एक नैतिक  जबाबदारी असते. समाजाला सांभाळलं तर बिझनेसमनला प्रतिष्ठा मिळते आणि त्याचा उपयोग पुन्हा बिझनेस वाढवण्यात होत असतो. टाटा, बजाज, किर्लोस्करांनी ते सांभाळलं.

मुघल राज्यकर्ते बिझनेसला स्वातंत्र्य देत. ते मुसलमान असले तरी राज्य करणं ही सेक्युलर गोष्ट ते सांभाळत. त्यांना वेळोवेळी हिंदू सावकार आणि बिझनेसमननी भरपूर मदत केली. मुघल राजे हिंदू राज्यांच्या विरोधात लढले तेव्हांही हिंदू बिझनेसमननी त्यांना मदत केली. मुघल राजांनी करवाढ केल्यानंतर मुसलमान बिझनेसमननी मुसलमान कारभाऱ्याच्या विरोधात तलवार उपसली आहे. मुद्दा:  राजा- सरकार आणि बाजार सांभाळणं.

मुघलांनंतर टाटा इत्यादीनी ब्रिटीशांना सांभाळलं. 

तेच नेमकं अंबानी यांनीही केलं. तरीही अंबानी बदनाम झाले, टाटा मात्र आदर्श झाले. असं कां घडलं? लेखिका याचं उत्तर वाचकांवर सोपवते. पैसे कमवण्याच्या नादात समाजात पसरणाऱ्या भ्रष्टाचाराला अंबानी यांनी खतपाणी घातलं; समाजासाठी जे करायला पाहिजे ते केलं नाही हे कारण असेल काय?

टाटांनी शिक्षण संस्था काढल्या. हॉस्पिटलं काढली.इमारतींपासून ते  आशयापर्यंत प्रत्येक गोष्ट तिथं उत्तम असते. मुंबईत एनसीपीए हे कलासंकुल आहे. तिथली इमारत पहा, आतली कलाकुसर पहा, तुम्हाला मदत करणाऱ्या माणसांचं वागणं पहा. तुलना करण्यासाठी  अंबानी यांनी बांद्राकुर्ला विभागात बांधलेलं कला संकुल पहा.   टाटा आणि अंबानी यांच्यातला फरक लक्षात येतो.

लेखिकेनं भेदक विश्लेषण टाळलं आहे. हरकत नाही. पण भारताचा ४ शतकांचा बिझनेसचा इतिहास छान मांडला आहे हे  किती चांगलं आहे नाही कां?

।।

Comments are closed.