
इजिप्तमधील राजकारणाचं, समाजाचं दर्शन घडवणारी कादंबरी
इजिप्तमधील राजकारणाचं, समाजाचं दर्शन घडवणारी कादंबरी.
Chronicle Of A Last Summer.
Tim Duggan Books
120 pages
कचऱ्यानं भरलेले रस्ते. घाण आणि क्रूर इमारती. पोचे आलेल्या गाड्यांचे कर्कश्श हॉर्न. कार, टेंपो,सायकली, रेकले यांच्या गर्दीतून वाट काढणारी गाढवं, उंट गाड्या. वाहतुक तुंबल्यावर कारमधल्या माणसांना वस्तू विकणारी मुलं. दुर्गंधी. बेढब घरं. गिलावा नसलेल्या भिंती. …
एल रशिदीच्या क्रॉनिकल ऑफ लास्ट समर या कादंबरीतून कैरो शहराचा एकही तपशील निसटत नाही. कैरोत राहिलेल्या माणसांना, कैरो पाहिलेल्या माणसांना आपण थेट कैरोत वावरतो आहोत याचा प्रत्यय कादंबरीत येतो. आणि केवर वावर नव्हे तर कैरोतलं जगणं, तिथली घुसमट, तिथली राजकीय अस्थिरता या साऱ्या गोष्टी या कादंबरीमधून वाचकाला भिडतात.

‘ समर ‘ ही एल रशिदी यांची कैरोतल्या तीन पिढ्यांवरची कादंबरी आहे. कादंबरी राजकीय आहे. इजिप्तमधील तीन संक्रमण काळ या कादंबरीत आहेत. जमाल नासर यांनी सत्ता ताब्यात घेणं, अन्वर सादत यांचा खून झाल्यानंतर हुस्न मुबारक यांनी सत्ता घेणं आणि अरब स्प्रिंग.
कादंबरीची सुरवात मुलगी हे मुख्य पात्र आणि तिची आई यांच्यातल्या निःशब्द भेटीच्या प्रसंगांतून होते.
” एकादा पोलीस इमारतीत जाताना दिसे..मला वाटे तो आता कोणाला तरी पकडून नेणार. वर्गात मी एक गोष्ट लिहिली. गोष्टीचं शीर्षक- नाहिशी होणारी माणसं. त्यात मी नाहिशा होणाऱ्या लोकांबद्दल लिहिते. माणसं रात्री नाहिशी होतात. टीचर मला दहात शून्य मार्क देतात. म्हणतात की या वयात मी तशा गोष्टी लिहिता कामा नयेत. मी घरी येते. रडत रडत आईला गोष्ट दाखवते. आई गोष्ट मनातल्या मनात वाचते. एक शब्दही बोलत नाही. मला वाटलं की ती रागावलीय.ती रागावली की मला भीती वाटते. कधी कधी ती रागावल्यावर माझ्यावर ओरडते. कधी कधी रागावते तरी शांत रहाते. ती शांत रागवते तेव्हां भयंकरच…” मुलगी गप्प असलेल्या आईबद्दल बोलण्याच्या या प्रसंगातून कादंबरीची सुरवात होते.
हा प्रसंग घडतो तेव्हां मुलीचे वडील नाहिसे झालेले असतात. नासर यांनी क्रांती केली आहे, इजिप्शियन सम्राटाची सत्ता उलथवून लावलीय. मुलीचे वडील समाजातल्या प्रस्थापित ऊच्च स्तरातले असतात,सत्तेच्या वर्तुळातले असतात. ते नाहिसे झाले आहेत. पण ते नाहिसे कां झाले, ते कुठं आहेत, त्यांचं काय झालंय किंवा होणार आहे इत्यादी गोष्टी मनात येतात पण बोलत येत नाहीत.
सत्तेशी पटलं नाही, सत्तेच्या विरोधात असणं या कारणानं असंख्य माणसं नाहिशी होत होती. घराघरात तसं घडत होतं.
अन्वर सादत यांनी अमेरिकेच्या दडपणाखाली म्हणा किंवा इतर कारणानं म्हणा इस्लामी आणि समाजवादी लोकांवर दात धरला. माणसं नाहिशी झाली. सादत यांच्यावर राग असणाऱ्या इस्लामी गटांनी (मुस्लीम ब्रदरहूडनं) सादत समर्थकांना नाहिसं केलं. नंतर २०११ साली तहरीर चौक क्रांती.मुबारकना विरोध करणारी माणसं नाहिशी होऊ लागली. नंतर क्रांती झाली. नंतर पुन्हा क्रांती झाली आणि अल सिसी यांच्या लष्करी सत्तेला विरोध करणारी माणसं नाहिशी होऊ लागली.
साधारणपणे १९८४, १९९८, २०१४ या सालातले तीन उन्हाळे कादंबरीत आहेत. नाईलच्या काठ, तेहरीर चौकापासून काही अंतरावर असलेल्या मोहमंद महमुद स्ट्रीट. या दोन ठिकाणांनी उन्हाळ्यातल्या उलथापालथी अनुभवल्या. गर्दी. टँक्स. गोळीबार. धरपकड. रेटारेटी. पळापळ. चिरडलेली माणसं.
कादंबरी गोष्ट सांगणारी मुलगी, तिची आई, तिचे नाहिसे झालेले-परत आलेले वडील, काका आणि कम्युनिष्ट चुलत भाऊ या पात्रांभोवती, या कुटुंबाभोवती फिरते.
लंबाण न लावता पटापट गोष्ट सांगणं ही लेखिकेची शैली आहे. पत्रकारी शैली. लेखिका न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्समधे इजिप्तमधल्या घडामोडींवर लिहित असते. अरब स्प्रिंग या उलथापालथीच्या काळात लेखिकेनं घटनांचं ग्राफिक वर्णन करणारी वार्तापत्रं रिव्ह्यूसाठी लिहिली.
![]() |
लेखिका एल रशिदी |
लेखिकेचा पिंड पत्रकाराचा आहे. लेखिका राजकारण, समाजकारण, त्यात गुंतलेले मुद्दे यांनी घडलेली आहे. इजिप्तमधल्या राजकीय उलथापालथी हा लेखिकेच्या चिंतनाचा विषय आहे. लेखिकेनं तिच्या मनातले राजकीय विचार एका कथानकात गुंतवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं कथानक वरचढ होतं, पात्रं फारशी विकसित होत नाहीत. अर्थात त्यानं बिघडत नाही. अशा कादंबरीला आपण राजकीय कादंबरी म्हणावं. जोवर ही कादंबरी आपल्याला काही तरी सांगते, काही तरी नवं सांगते तोवर तिची रचना कशी आहे हा मुद्दा फारसा महत्वाचा नाही.
अरब स्प्रिंग या विषयावरचं एल घोनिम या माणसानं लिहिलेलं एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. एल घोनिम कंप्यूटर इंजिनियर होता. तो कैरोत वाढला. कामासाठी दुबाईला असताना इजिप्तमधे मुबारक यांची दादागिरी सुरु झाली होती, कामगार संप करत होते, विद्यार्थी आंदोलन करत होते. खालेद सैद या माणसाला मुबारकच्या पोलिसांनी छळ करून ठार मारलं. तेव्हां we are all khaled said या नावाचं एक फेसबुक पेज वाएल घोनिमनं सुरु केलं. ते व्हायरल झालं. लाखो तरूण त्या पेजवर पोचले. फेस बुक आणि ट्विटरचा वापर करून घोनिमनं दुबाईत बसून इजिप्तमधल्या तरुणांना चेतवलं, संघटित केलं. इजिप्शियन सरकारनं नाना तांत्रिक आयडिया वापरून घोनिमचे सोशल मिडियातले उद्योग बंद पाडायचे प्रयत्न केले. घोनिम निष्णात कंप्यूटर इंजिनियर असल्यानं त्यानं सरकारला सतत हुलकावण्या दिल्या. परिणामी इजिप्शियन जनता, विशेषतः तरूण तहरीर क्रांती करते झाले. क्रांतीत भाग घेण्यासाठी घोनिम इजिप्तमधे परतला. पोलिसांनी त्याचा क्रूर छळ केला. परंतू एका क्षणी त्याची सुटका झाली. पुढं अरब स्प्रिंग उलथापालथ झाली, नंतर फुस्स झालं, मोरसी निवडून आले, त्यांना हाकलून पुन्हा अल सिसी सत्ताधारी झाले वगैरे.
रेव्होल्युशन व्हर्शन टू या पुस्तकात घोनिमनं त्यानं केलेल्या प्रयत्नांची साद्यंत हकीकत मांडली आहे. इजिप्तमधे काय घडत होतं याचं थरारक वर्णन त्या पुस्तकात आहे. ती कादंबरी नाही, घोनिमनं सांगितलेली हकीकत आहे. पण कादंबरीतले अनेक गुण त्या पुस्तकात आहेत. थरार आहे, पात्रं आहेत, पात्रांची गुंतागुंत आहे, दोन वा अनेक दृश्य घटनांमधील अंधाऱ्या जागा आहेत.
घोनिमचं पुस्तक आणि एल रशीदीची कादंबरी यांना सांधणारा दुवा म्हणजे दोन्ही पुस्तकांमधून निघणारा निष्कर्ष. रशिदी कादंबरीत एका विक्रेत्याबरोबर होणाऱ्या चर्चेमधून सुचवते की इजिप्शियन
![]() |
ताहरीर चौक |
समाजाला बदल पचत नाहीत. इजिप्शियन समाज गतानुगतीक आहे, वरखाली होतं परंतू समाज पुन्हा आपली जुनी स्थिती प्राप्त करत असतो. नासरनं समाजवादी व्यवस्था आणायचा प्रयत्न केला, सादतनी इस्लामी विचार दूर सारून सेक्यूलर विचार प्रस्थापित करायचा प्रयत्न केला, अरब स्प्रिंगमधे तरूणांनी लोकशाही आणायचा प्रयत्न केला. उपयोग झाला नाही. इजिप्त पुन्हा जैसे थे. घोनिम जैसे थे वगैरे म्हणत नाही. तो जे घडलं, जसं घडलं ते सांगत जातो. पण २०११ साली सुरु झालेली उलथापालथ २०१४ साली थंड होते आणि इजिप्शियन गाडा, उंट गाडा म्हणा हवं तर, पुन्हा पूर्वीसारखा चालू लागतो हे घोनिमच्या पुस्तकाच्या शेवटाला लक्षात येतं.
एकादं पुस्तक किवा एकादी कलाकृती तयार होते तेव्हां तिला स्थानिक आणि स्थानिक नसलेले असे वाचक असतात. स्थानिकांना पुस्तकातले तपशील लक्षात येतात. उदा. न्यू यॉर्कमधील खाणावळींवरचं पीटर वेल्सनं लिहिलेलं पुस्तक न्यू यॉर्कमधला माणूस वाचतो तेव्हां तो कधी तरी त्या खाणावळीत जाणार असतो किवा गेलेला असतो. खाणावळी आणि पदार्थांवरचं पुस्तक त्याला वेगळं समजतं. ते पुस्तक मुंबई, बीजिंग, काबूल इत्यादी ठिकाणचा माणूस वाचतो तेव्हां तो कधीही न्यू यॉर्कच्या खाणावळीत जाणार नसतो हे त्याला माहित असतं. तरीही ते पुस्तक तो वाचतो, त्याला ते पुस्तक वेगळं समजतं. एकच पुस्तक स्थानिकांना आणि दूरस्थांना वेगवेगळं समजतं, आवडतं.

जाता जाता तहमीमा अनाम या बंगाली ब्रिटीश लेखिकेच्या तीन कादंबऱ्यांचा उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी Golden Age (2007), The Good Muslim (2011), The Bones of Grace (2016) या कादंबऱ्या लिहिल्या. रशिदीनी तीन उन्हाळे, तीन कालखंड घेतले. अनाम यांनीही बांगल देश निर्मितीचा काळ, बांगला देश झाल्यानंतरचा काळ आणि बांगला देशात इस्लामी अतिरेकाचा आताचा काळ असे तीन कालखंड कादंबऱ्यात चितारले आहेत.एकाच कुटुंबातल्या व्यक्तींचं पुढं काय होतं असा प्रवाह या कादंबरीत आहे.
।।