कार्ल मार्क्सचं काहीसं स्फोटक बरंचसं माहितीपूर्ण प्रज्ञात्म चरित्र.
कार्ल मार्क्सचं काहीसं स्फोटक बरंचसं माहितीपूर्ण प्रज्ञात्म चरित्र.
KARL MARX – GREATNESS AND ILLUSION By GARETH STEDMAN JONES. Penguin . Hard Cover- Rs. 2561. Kindle- Rs. 1223.
मार्क्सचं एक नवं प्रज्ञात्मक चरित्र नुकतंच प्रसिद्ध झालंय. मार्क्स आणि मार्क्सवाद या दोन गोष्टी लेखक स्टेडमन जोन्स यांनी कौशल्यानं वेगळ्या केल्या आहेत. मार्क्सनं जे लिहून ठेवलं त्यात बदल करून, त्यात गाळ साळ करून एंगिल्सनं मार्सवाद तयार केलाय असं लेखकाचं म्हणणं आहे. मार्क्सवाद म्हणून जे काही सांगितलं जातं ते सर्वच्या सर्व मार्क्सचं म्हणणं नसून त्यात काही भाग एंगल्सचा आहे असा लेखकाचा दावा आहे.
लेखक आहेत स्टेडमन जोन्स. ते तत्वज्ञानाच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत, लंडनच्या क्वीन मेरी विश्वशाळेत शिकवतात. १९५६ ला सुवेझ कालव्याचं राष्ट्रीकरण झाल्यापासून ते समाजवाद या विषयाकडं वळले. तिथून ते डावे झाले. काही काळ ते न्यू लेफ्ट या नियतकालिकाचे संपादक होते. हॉब्सबॉन इत्यादी डाव्या इतिहासकारांचा लेखकावर प्रभाव होता. कालांतरानं ते स्त्रीवादी झाले, मार्क्सवाद अपुरा आहे, मार्क्सचा विचार काळाच्या मर्यादेत विकसित झालेला असल्यानं त्याच्या मर्यादा आहेत, विसाव्या आणि एकविसाव्या शतकातल्या घटना मार्क्सवादाची भाकितं खोटी ठरवतात असं लेखकाला वाटू लागलं. १९९० नंतर लेखकानं मार्क्सचा सविस्तर अभ्यास करायचं ठरवलं, त्यातून प्रस्तुत पुस्तक सिद्ध झालंय.
इसाया बर्लिन, डेविड मॅकलेलन, फ्रान्सिस व्हीन, पीटर सिंगर यांनी मार्क्सची चरित्रं लिहिली आहेत. या सर्वांनी साधारणपणे मार्क्सवादी विचार पुरतेपणानं पक्का झाला असून स्थिर आहे असं मानलं. जोनाथन स्पर्बरनं २०१३ साली लिहिलेल्या ‘ कार्ल मार्क्स, ए नाईनटीन्थ सेंच्युरी लाईफ ‘ या पुस्तकात मार्क्सवादी विचारातली काही मिथकं उद्धस्थ केली.
जोन्स यांचं चरित्र मार्क्सवादी काही मार्क्सवादी मिथकं उघडी पाडत असतानाच मार्क्सवादी विचारांचं महत्वही अधोरेखित करतं.
व्यक्ती म्हणून मार्क्सचं जीवन अनंत विक्षिप्त गोष्टींनी भरलेलं होतं. मार्क्सनं गरीबीत दिवस काढले. मार्क्स दिवसेंदिवस, सलगपणे अनेक दिवसरात्री, नुसतं लिहित असे, शरीराला इतर कोणताच व्यायाम देत नसे. मसालेदार, महागडे पदार्थ मार्क्सला आवडत. प्रचंड दारू पीत असे. दारु पिऊन गोंधळ घालत असे. तो कमालीचा अहंमन्य होता, वेगळं मत ऐकून घेत नसे. त्याला त्याच्या घरकाम करणाऱ्या स्त्रीपासून अनौरस मुल होतं. इत्यादी गोष्टी फ्रान्सिस व्हीन या लेखकानं लिहिलेल्या चरित्रात आल्या आहेत. असल्या गोष्टीत स्टेडमन जोन्स यांना रस नाही. मार्क्सची प्रज्ञा, त्याची विश्लेषण शक्ती, त्याची बौद्धिक वाढ या गोष्टीमधे लेखकाला रस आहे.
कार्ल मार्क्स ज्या काळात जन्मला आणि विकसित झाला तो काळाचा विस्तृत पट लेखकानं या पुस्तकात चितारला आहे. त्यामुळं मार्क्स नीट समजतो. लेखकाच्या मते मार्क्सचं आधुनिक राजकीय इतिहास आणि तत्वज्ञानात अढळ स्थान आहे. अर्थ आणि उत्पादन या कसोट्यांवर सखोल चिंतन करणारा आणि विचार करणारा तो पहिला तत्वज्ञ असं मार्क्सचं वर्णन लेखक करतो. अर्थोत्पादन आणि अर्थव्यवस्थेच्या भांडवलशाही या रुपाचं मार्क्सनं केलेलं विश्लेषण अजोड आहे असं लेखकाचं मत आहे. परंतू राजकारणातून धर्म नाहिसा न होता तो आता समाजाच्या केंद्रात येणं, जगभर देशीवाद लोकप्रिय होत जाणं, भांडवलशाही विकसित होत जाऊन टिकणं, समाजवादी व्यवस्था कोसळणं या गोष्टी मार्क्सवादाचा पराभव दाखवतात असं लेखकाचं म्हणणं आहे.
कार्लचा जन्म ऱ्हाईनलॅंडमधल्या ट्रायरमधला. ऱ्हाईनलँड म्हणजे जर्मनी आधी प्रशियन साम्राज्याचा भाग होता. प्रशियन राजा ख्रिस्ती होता. त्यामुळं राज्यात ख्रिस्ती तत्वज्ञान प्रस्थापित होतं. ख्रिस्ती विचारात समष्टीपेक्षा व्यक्तीला महत्व होतं. व्यक्तीनं स्वतःचा विकास साधणं याला त्या विचारात प्राधान्य होतं. शेती आणि कारखान्यात मालक असे आणि तो आपला जास्तीत जास्त नफा होईल अशा रीतीनं व्यवस्था चालवत असे. देव माणसाला घडवतो असा विचार ख्रिस्ती धर्माच्या केंद्रात होता. ज्यू शोषक असल्यानं त्यांना समाजात बहिष्कार होता, त्यांना शाळेत शिक्षण घ्यायला बंदी होती, त्यांना सरकारी नोकऱ्या मिळत नसत.
मार्क्सचे वडील आणि काका ज्यू होते. मार्क्सही जन्मानं ज्यू. फ्रान्सनं, नेपोलियननं जर्मनीवर कबजा केल्यानंतर वातावरणात फरक पडला. नेपोलियनचाही ज्यूंवर राग असला तरी त्याना दिली जाणारी हीनतेची वागणूक फ्रेंचांना मंजूर नव्हती. फ्रेंच क्रांतीनं धर्माला राज्यवस्थेत दुय्यम ठरवलं होतं, समानतेवर आधारलेला समाज आणि कायदा फ्रेंचांनी सुरु केला होता. याचा फायदा मार्क्सच्या वडिलांनी आणि काकांनी घेतला. दोघं ख्रिस्ती झाले, वकिली करू लागले.
प्रशियन राजानं पुन्हा फ्रेंचांचा पराभव करून ऱ्हाईनलँड-जर्मनीचा ताबा मिळवून फ्रेंचांनी निर्माण केलेलं स्वातंत्र्याचं वातावरण उलट फिरवलं.
सामाजिक बदल घडत असतानाच जर्मनी, युरोप, ब्रीटनमधे औद्योगीक क्रांती झाली. ऊर्जेवर चालणारं महाउत्पादन आणि त्यातून निर्माण होणारा महाउद्योग युरोपीय समाजात निर्माण झाला. ( त्या आधी उद्योग कुटिरोद्योगाच्या रुपात होते.) भांडवल गुंतवून मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचं, ते मोठ्या बाजारपेठांत ओतायचं आणि त्यातून मोठ्ठा नफा मिळवायचा ही रीत समाजात सुरु झाली. उद्योग या महायंत्रामधे कामगार हा एक अतीछोटा भाग उरला, त्याचं स्वातंत्र्य आणि व्यक्तिमत्व संपलं. कामगार स्वतःच्या जगण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त उत्पादन करतो आणि ते भांडवलदार मालक ताब्यात घेतो, त्यातून आपल्या भांडवलात वाढ करतो अशा रीतीनं स्वतःचं भांडवल वाढवत जातो. या शोषणातून निर्माण होणाऱ्या विषमतेवर मार्क्सनं बोट ठेवलं.
युरोपातील धार्मिक विचार, सांस्कृतीक वातावरण, तत्वज्ञ, औद्योगीकरण, भांडवलशाही या सर्व घटनांचा अभ्यास मार्क्सनं एकत्रितपणे केला.
जमीन, जमिनीची मालकी, जमीन आणि खाणीच्या मालकाना मिळणारा रेंट, शेती आणि खाण उत्पादनाचा मुख्य भाग असणाऱ्या कामगारांची उत्पादनक्षमता,उत्पादनात गुंतलेलं भांडवल (त्यात यंत्रं आणि तंत्रंही आली) या घटकांचा मार्क्सनं बारकाईनं अभ्यास केला. उत्पादनाचं मूल्य, बाजारातली किमत, सरासरी किमतीपेक्षा जास्त मिळणारी किमत याचा अभ्यास मार्क्सनं फार बारकाईनं मांडला. मार्क्सच्या एकूण सामाजिक-राजकीय-आर्थिक अभ्यासाचा हा एक महत्वाचा भाग होता. भांडवलशाहीत मार्क्सनं कामगारांचं होणारं शोषण आणि विषमता यांचं विश्लेषण करताना युरोपातील शेती, खाणी, टेक्सटाईल उद्योग आणि बाजारपेठांचा अभ्यास केला.
त्या काळातलं एक उदाहरण मार्क्स ज्या मोझेल नदी खोऱ्यातल्या मोझेल वाईनच्या उत्पादनाचं आहे. मोझेल खोऱ्यात द्राक्षाच्या बागा होत्या. द्राक्षांपासून होणारी वाईन विशिष्ट लाकडाच्या पिंपात मुरण्यासाठी ठेवली जात असे. त्यासाठी लागणारं लाकूडही मोझेलच्या जंगलांत तयार होत असे. मोझेलपासून अंतरावर असलेल्या रुहर नदीच्या खोऱ्यात लोखंडाच्या खाणी होत्या, तिथं पोलाद उद्योग सुरु झाला. मोझेल खोऱ्यातलं लाकूड रुहर पोलाद उद्योगासाठी वापरलं गेलं. लाकडाच्या टंचाईमुळं मोझेल खोऱ्यातला वाईन उद्योग संपला, तोट्यात गेला.
या घटनांमधे नेमकं काय घडलं? मोझेलमधल्या शेतकऱ्यांची कार्यक्षमता किंवा मालकांची गुंतवणूक किंवा मालकी हे घटक वाईन उद्योग बसण्यात आणि कामगार बेकार होण्यास जबाबदार होते काय? की बाजारातली पोलादाची मागणी वाढणं, त्यामुळं पोलाद उद्योग भरभराटणं? मार्क्सच्या विश्लेषणानुसार कामगारांचं वेतन, कार्यक्षमता या घटकांचा परिणाम अधिक फायदा आणि शोषण यात होतो. परंतू मोझेलमधे तसं घडलं नाही. द्राक्ष आणि वाईनची किमत समाजात निर्माण झालेल्या एका नव्या उत्पादनामुळं हेलकावली.
वस्तूचं मोल मागणी आणि पुरवठ्यातल्या तोलावरून ठरतं असं मार्क्सवादी विचार मानतो. तसंच कामगाराचे श्रम हाही एक घटक वस्तूचं मोल ठरवतो. लेखक प्रश्न विचारतो की स्ट्रॉबेरीची किमत सफरचंदापेक्षा जास्त कां ठरते? त्याचा मागणी-पुरवठा-श्रममूल्याशी संबंध नाही. समाजाला, माणसाना एकादी वस्तू जास्त आवडते हेही वस्तूची किमत ठरण्याचं कारण आहे असा एक मुद्दा लेखक पुस्तकात मांडतो.
मार्क्स आणि मार्क्सवाद या दोन गोष्टी लेखकानं कुशलतेनं वेगळया केल्या आहेत. पुस्तकभर लेखक कार्ल मार्क्स असा उल्लेख न करता कार्ल या नावानं मार्क्सला संबोधतो. याचं कारण कार्ल हा माणूस वेगळा होता आणि मार्क्सवादासाठी प्रसिद्ध झालेला कार्ल मार्क्स वेगळा होता.
१८४४ मधे मार्क्सनं Economic and Philosophical Manuscripts लिहिलं. नंतर कम्युनिष्ट मेनिफेस्टो १८४८ मघे प्रसिद्ध झाला.नंतर मार्क्सनी तत्वज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी विषयावर अनेक पेपर्स लिहिले. मार्क्सनं भांडवलशाही, बाजारव्यवस्था, जागतीक बाजार इत्यादी मुद्द्यांच्या अभ्यास करून एक ८०० पानांचं हस्तिलिखित सिद्ध केलं. त्यानंतर कॅपिटल या विषयावर एका भल्यामोठ्या ग्रंथाची उभारणी मार्क्सनं सुरु केली. त्याचा पहिला भाग कॅपिटल या नावानं १८६७ साली प्रसिद्ध झाला. त्या नंतरही मार्क्सचा अभ्यास सुरु होता, नोंदी होत होत्या. मार्क्सचा अनेकांशी पत्रव्यवहार होता, त्यातही मार्क्स आपले विचार मांडत असे. कॅपिटल या ग्रंथानंतरचं मार्क्सचं सारं लिखाण आणि नोंदी एकत्र करून एंगल्सनं कॅपिटलचे पुढले तीन खंड प्रसिद्ध केले.
मुळात मार्क्सवाद आणि मार्क्सचं लिखाण हे वेगळं कसं करायचं? जोन्स यांनी कम्युनिष्ट मॅनिफेस्टो आणि कॅपिटल (भाग१) हे मार्क्सचं प्रसिद्ध झालेलं साहित्य एकीकडं ठेवलं. मार्क्सनं अनेकांना पाठवलेली पत्रं, कॅपिटलच्या पहिल्या भागानंतर केलेली अप्रसिद्ध टिपणं आणि एंगल्सनं प्रसिद्ध केलेले कॅपिटलचे खंड हा मजकूर लेखकानं वेगळ्या केला आणि ते साहित्य एंगल्सनं संपादित केलेलं साहित्य आहे असं मांडलं.
जोन्स यांनी एंगल्सनं प्रसिद्ध केलेलं साहित्य, अप्रसिद्ध साहित्य आणि मार्क्सचं प्रसिद्ध साहित्य याची तुलना करून आपलं पुस्तक सिद्ध केलंय. जोन्स यांचं म्हणणं असं की मार्क्स काळाच्या ओघात बदलत गेला, त्याची मतं बदलत गेली. एंगल्सनं त्यातली त्याला आणि तत्कालीन समाजवादी पक्षाला सोयीची मतं प्रसिद्ध केली. त्यांनी काही मतं गाळली आणि काही ठिकाणी खाडोखोड करून मार्क्सचं म्हणणं बदललं.
युरोपातल्या त्या काळातल्या राजकीय आणि आर्थिक उलथापालथींमुळं समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था हादरेल असं मार्क्सनं लिहिलं होतं. एंगल्सनी हादरेल हा शब्द खोडून त्या जागी नष्ट होईल असा शब्द टाकला असं लेखक हस्तलिखिताचा दाखला देऊन सांगतात.
एंगल्स डार्विन आणि मार्क्स यांच्या विचारधारेची तुलना करतात. मार्क्सवाद म्हणजे सोशल डार्विनिझम आहे असं एंगल्स म्हणत. मार्क्सला ते मंजूर नव्हतं. उत्क्रांती निसर्गात घडली, ती कोणी विशेष हेतू ठेवून घडवून आणली नव्हती असं मार्क्सचं म्हणणं. या उलट मार्क्स जी क्रांती, परिवर्तन घडवून आणणार होता ते परिवर्तन माणसाच्या हस्तक्षेपानं घडणार होतं.
खेड्यातलं प्राचीन जीवन समाजवादी क्रांतीच्या आड येतं असं मार्क्स मानत असे असं सामान्यतः मानलं जातं. भांडवलशाही जाऊन त्या जागी समाजवादी व्यवस्था येईल, खेड्यातली व्यवस्था जाऊन त्या ठिकाणी औद्योगिक कामगारांनी स्थापन केलेली समाजवादी व्यवस्था स्थापित होईल असं मार्क्स १८६७ पर्यंत म्हणत असे. परंतू १८६८ नंतर रशियातली सामुहिक शेतीची व्यवस्था समानतेवर आधारलेली व्यवस्था आहे असं मार्क्सचं मत झालं. रशियामधे सामुहिक शेती होत असे आणि वेळोवेळी खेडुत समाज जमिनीच्या व्यवस्थेची फेर मांडणी करत असे. याच पद्धतीनं आधुनिक समाज कां असू नये असं मार्क्सला वाटू लागलं होतं. मार्क्स आधुनिकतेवर नव्हे तर पुरातनतेवर आधारेल्या समाजाची कल्पना करत होता. १८८१ साली एका पत्रात मार्क्सनं म्हटलं होतं की क्रांती योग्य वेळी झाली तर ती रशियातील ग्रामीण सामुहिक मालकीची व्यवस्था टिकवून ठेवेल. एंगल्सनं कॅपिटलच्या पुढल्या भागाचं संपादन केलं तेव्हां हा भाग वगळला. कारण तेव्हाना कम्युनिष्ट चळवळीनं भांडवलशाहीकडून ग्रामीण व्यवस्था खतम होईल आणि समाजवादी क्रांती भांडवलशाही खतम करेल असं तत्व (मार्क्सच्या मताशी विपरीत) स्वीकारलं होतं. एंगल्सलनं त्याला सोयीची गोष्ट निवडली, गैरसोयीची गोष्ट वगळली.
लेखकाची वरील विषयावरची टिप्पणी अशी आहे- एकोणिसाव्या शतकातील रशियन ग्रामीण व्यवस्थेचा विचार हा मार्क्सचा भ्रम होता, एक मृगजळ होतं. लेखक म्हणतो की ग्रामीण व्यवस्था किंवा क्रांतीनंतर निर्माण होणारी औद्योगिक व्यवस्था हे दोन्ही गोष्टीही एक भ्रम होता हे विसाव्या शतकात घडलेल्या घटनांनी सिद्द केलं आहे.
मार्क्सनं आधुनिक औद्योगीक जगाचं केलेलं विश्लेषण मर्मभेदक आणि अचूक होतं असं लेखक म्हणतो. ” आधुनिक जगात तयार झालेल्या जागतिक बाजारपेठेनं अपूर्व अशा औद्योगिक उत्पादक शक्ती जन्माला घातल्या. ही गोष्ट मांडणारा मार्क्स हा पहिला विचारवंत होता. आधुनिक भांडवलशाही ही एक निरंतर घडत असणारी, अविश्रांत आणि पूर्णत्वाला न गेलेली घटना मार्क्सनं चितारली. भांडवलशाही नव्या गरजा शोधून काढते आणि त्या गरजा पूर्ण करणारी उत्पादनं निर्माण करते, संस्कृती आणि श्रद्धांचे तीन तेरा वाजवते, सरहद्दी जुमानत नाही, ती सेक्युलर वा धार्मिक वा कुठल्याही सत्तेची उतरंड मानत नाही, ती सत्ताधारी किंवा नागरीक असा भेद मानत नाही, ती मूल आणि पालक यातला फरक जाणत नाही, ती स्त्री आणि पुरुष यातला भेद जाणत नाही, ती सर्व गोष्टींचं रूपांतर विकाऊ वस्तूत करते असं मार्क्सनं लिहिलं…”

भांडवलशाहीचं इतकं मर्मभेदक विश्लेषण करणाऱ्या मार्क्सला ही नित्य बदलणारी व्यवस्था पुढं चालून कसा आकार घेईल, कशी विकसित होईल, कशी टिकेल याचा अंदाज बांधता आला नाही असं लेखक म्हणतो.
मार्क्सच्या विचारांच्या मर्यादा, समाजवादी व्यवस्थेचं अपयश, विकसित भांडवलशाही टिकणं या गोष्टी लेखकानं पुस्तकात मांडल्या आहेत. उत्पादनसंबंध ही मार्क्सनं शोधलेली विश्लेषणाची कसोटी अपूर्व होती असं लेखक म्हणतो. मार्क्सनं मेनिफेस्टोमधे लिहिलेल्या कित्येक गोष्टी (उदा. मोफत शिक्षण देणारी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था, वाढत्या उत्पन्नावर वाढते कर लावणारी कर व्यवस्था) भांडवलशाही देशांनीही स्वीकाल्या याचीही नोंद लेखक घेतो. पुस्तक वाचल्यानंतर हे पुस्तक मार्क्सची किंवा एंगल्सची बदनामी करणारं पुस्तक आहे असं वाटत नाही.
अमेरिकेत ओबामा आरोग्य व्यवस्थेत सरकारी हस्तक्षेप करतात आणि बर्नी सँडर्स श्रीमंतांवर अधिक कर लावा अशी मागणी करतात. दोघांवर ते समाजवादी आहेत असा आरोप होतो, दोघांनाही अमेरिकेतल्या मोठ्या लोकसंख्येचा पाठिंबा आहे. अमेरिकेत अतीश्रीमंत एक टक्का आणि आर्थिक त्रास सहन करणारे ९९ टक्के अशी विभागणी अमेरिकेतल्या समाजाला समजली आहे, ती नाहिशी केली पाहिजे असं समाज म्हणतो. थॉमस पिकेटी, टोनी अँडर्सन हे विचारवंत विषमता दूर करणाऱ्या उपायांची मागणी करतात, त्यांच्यावरही ते फिक्कट समाजवादी आहेत असा आरोप होतोय.
जगभर समाजवादी विचारांबद्दल हरकती आणि आक्षेप मांडले जात आहेत.कम्युनिष्ट, समाजवादी विचारांमधे, व्यवस्थेमधे अनेक जन्मजात दोष आहेत. मुख्य म्हणजे समाजातल्या प्रश्नांवरचे एकमेव आणि अंतिम उत्तर नव्हतं. काळाच्या ओघात तो विचार विकसित झाला, त्यावर काळाच्या मर्यादा होत्या. (इस्लाम असं म्हणतो की देवाचा शेवटला प्रेषित महंमद, त्या नंतर कोणताही प्रेषित पाठवायचा नाही असं देवानं ठरवलं.)समाजवादी विचार एक पोथी झाला. मुळ विचारांत काही दोष आहेत का याचा विचार पोथीनं केला नाही. लोकशाही विचाराचा अभाव हे पोथी होण्याचं एक कारण आहे. समाजवादी व्यवस्था अमानवी होती, तिच्यात क्रूरता होती, मार्क्सही क्रांतीसाठी दहशत-हिंसा झाली तरी हरकत नाही असं म्हणत असे. तंत्रज्ञान आणि उत्पादनव्यवस्था यामधे झालेल्या बदलांची दखल समाजवादी विचारांना घेता आली नाही, देश-धर्म-संस्कृती-परंपरा यांचं समाजातलं स्थान समाजवादी विचारांना समजलं नाही. पोथीबद्ध विचार – व्यवहार हेच या त्रुटींचं मोठ्ठं कारण आहे. मार्क्सनं जे काही सांगितलं ते सगळ्या प्रश्नांवरचं अंतिम उत्तर आहे असं मार्क्सवाद्यांनी ठरवलं आणि ते हिंसा व भावनात्मक ब्लॅकमेलिंग करून समाजावर ठसवलं.
प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकानं वरील प्रमाणे थेट आक्षेप घेतलेले नाहीत. लेखकाचा सूर चढा नाही. मार्क्सच्या विचारांचा आलेख लेखकानं शांतपणे मांडलेला असल्यानं मार्क्सवादी आणि मार्क्सवादी नसलेले अशा सर्वांना हे पुस्तक वाचावंसं वाटेल.
आजवर मार्क्सच्या विचारांवर अनेक भाष्यं झाली. जोन्स यांचं भाष्य त्यातलं सर्वात वेधक आणि स्फोटक आहे.
हे पुस्तक मार्क्सचं प्रज्ञात्मक चरित्र आहे. मार्क्स आणि मार्क्सचा काळ, त्या काळातले तत्वज्ञ, विचारवंत, राजकारणी यांचा तपशीलवार विचार या पुस्तकात आहे. भांडवलशाही ही विचारधारा किती लवचीक, प्रवाही आहे याचं दर्शन मार्क्सच्या लिखाणातून ध्यानात येतं असं लेखक म्हणतो.
।।