अनारकली ऑफ आरा

अनारकली ऑफ आरा

स्त्रियांचा मान राखा असं सांगणाऱ्या सिनेमांमधे अनारकली ऑफ आरा या सिनेमानं एक दणदणीत भर घातलीय.

अनारकली ही एक गात गात नाचणारी किंवा नाचता नाचता गाणारी कलाकार आहे. ती भोजपूर जिल्ह्यात आरा या गावात रहाते. आसपासच्या गावांत ती कार्यक्रम करते. कधी लग्न प्रसंग, कधी संमेलन, कधी कोणाची तरी हौस. श्रोते असतात बिहारी. खेडवळ असतात. महानगरी संस्कृतीचे बटबटीस संस्कार त्यांनी स्वीकारलेले असतात. त्यांच्या दैनंदिन जगण्यात उसळी मारणाऱ्या आणि बंधनांचं अस्तित्वच नाकारणाऱ्या इच्छा, वासना भागवणारा परफॉर्मन्स अनारकली करत असते.

भोजपूरमधल्या रसिकांची एक स्वतंत्र भाषा असते. जंप मारे जवानी चोलीमे हे शब्द त्यांना आवडतात, समजतात. ही जवानी महाराष्ट्रातल्या शृंगारीक लावणीत ” कंचुकी तटतटली भरजरी ” अशा शब्दात व्यक्त होत असते. जवानी, कंचुकी या गोष्टी शहरी सिनेमात, राज कपूर यांच्या सिनेमात अधिक अलंकृत दिसतात. रंजनाचा संस्कारित आविष्कार उमराव जान सिनेमात पहायला मिळतो. उमराव जानमधल्या गीतांची भाषा, रेखाचा पेहराव, तिथं हजर असणाऱ्या माणसांच्या प्रतिक्रिया पहा. अनारकलीतली गाणी, अनारकलीचा पेहराव, रुमाल भिरकावत नाचणारे भोजपुरी लोक, सारंच वेगळं.

पुरुषांची अनिर्बंध होऊ पहाणारी आसक्ती हे वास्तव अनारकली लक्षात घेते, त्या आसक्तीला एका अंतरावर ठेवून ती त्या आसक्तीसह जगते. एका विद्यापीठाचा कुलगुरू धुंद होऊन अनारकलीला खेटतो.  अनारकली विरोध करते, कुलगुरूच्या मुस्कटात मारते. त्यानंतर बिहारमधली सत्ता अनारकलीला नामोहरम करण्याची खटपट करते. अनारकली सत्तेशी, पुरुषी दादागिरीशी संघर्ष करते. अनारकली म्हणते,  माझ्याशी सांभाळून वागा, मला गृहीत धरू नका, माझ्या स्वातंत्र्यावर,  माझ्या माणूस असण्यावर केलेलं आक्रमण मी स्वीकारणार नाही.

स्वरा भास्कर

अनारकली तीनच दिवसात चांगल्या सिनेमांघरातून बाहेर पडला. अनारकलीमधे ज्या बिहारी विद्यापीठाचं नाव घेतलं आहे त्या विद्यापीठानं चित्रपटातून विद्यापीठाचं नाव काढून टाकण्याची, चित्रपटातून ते प्रसंग काढून टाकण्याची मागणी केली. विद्यापीठाचं म्हणणं असं सिनेमामुळं विद्यापीठ बदनाम होतं. हा सिनेमा प्रदर्शित झाला त्याच काळात कंगना राणावत या अभिनेत्रीनं तिच्यावर चित्रपट दिग्दर्शक अतिप्रसंग करत असल्याची तक्रार दबत्या स्वरात केली होती.

बिहारमधे नाचणाऱ्या-गाणाऱ्या कलाकारांवर अत्याचार झाल्याच्या, खून झाल्याच्या घटना आहेत. जयप्रकाश नारायण यांच्या नावानं चालणाऱ्या एका विद्यापीठात कलाकाराशी अतिप्रसंग घडला होता. भारतीय संस्कृती  सुस्वर गीतांत स्त्रियांचं कौतुक करते, ओवाळणी करून तिला मान दिला जातो असा दावा करते. वास्तवात भारतीय माणसं स्त्रियांना वाईट वागवतात हे पुरातन वास्तव हा चित्रपट हाताळतो. चित्रपट  प्रवचनाच्या, उपदेशाच्या थाटात गोष्ट सांगत नाही.  भावनाचिंब शैलीही चित्रपट टाळतो.

अनारकलीतली मुख्य पात्रं बिहारी आहेत, वातावरण बिहारी आहे. त्या वातावरणात एक लाऊडनेस आहे. बोलण्याची ढब, कपड्यांचे रंग, पाटलोणींचे रंग, गॉगल्स या सर्वाला एक खेडवळ आणि बिहारी छटा आहे. माणसांच्या वागण्यातही नाजूकपणा नसतो, एक बटबटीत वळण असतं. ते या बटबटीतपण चित्रपटानं टिकवलं आहे. गाणी, नाच सारं काही लाऊड आहे, पण तीच त्याची गंमत आहे. एका विद्यापीठाचा कुलगुरू जाहीर समारंभात तर्राट होऊन मंचावर जातो आणि नाचणाऱ्या महिलेशी सलगी करतो हे अगदी बटबटीत आहे, वातावरणाशी मेळ खाणारं आहे. अनारकलीचे कपडे, कुलगुरूचे कपडे आणि केसाचा टोपही तिकडचाच आहे. अनारकली आणि ऑर्केस्ट्राचा मालक जत्रेत मिळणारा पिवळ्या धमक जाड फ्रेमचा गॉगल वापरतात, तो भारी आहे.

                                             स्वरा भास्कर, निल बट्टे सन्नाटामधे

चित्रपटात आरा या गावातल्या काही गल्ल्या आहेत आणि काही घरं आहेत. ती छान घेतलीत. वासेपूरमधल्या वाराणसीच्या चित्रीकरणाची आठवण होते. एलिझाबेथ एकादशीमधील पंढरपूर गावातल्या गल्ल्या आणि घरं आठवतात. आरा गावाच्या मानानं दिल्ली मात्र अगदी डल दाखवलीय.

स्वरा भास्करनं अनारकलीची भूमिका केलीय. भूमिकेला आवश्यक तो सगळा जिवंतपणा, वेग, शृंगार आणि शौर्यही स्वरा भास्करनं छान वठवलंय. स्वरा भास्करनं या आधी निल बटे सन्नाटा या चित्रपटात एका नवऱ्या शिवाय जगणाऱ्या आईची भूमिका केलीय. घरातली धुणीभांडी आणि रेस्टाँरंटमधली कामं करून चंदा आपल्या मुलीला वाढवते आणि मुलीला गणित यावं म्हणून स्वतः गणित शिकते. गरजू मुलांना  फावल्या वेळात चंदा गणित शिकवते. नाना वळणं येतात, नाना गैरसमज होतात. घालमेलीतून जाऊन शेवटी चंदाची मुलगी आयएएस होते. स्वरा भास्करची चंदाची भूमिका गाजली होती. चंदा आणि अनारकली अगदी भिन्न भूमिका करून स्वरा भास्करनं आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलंय.

                                             संजय मिश्रा, अनारकली ऑफ आरामधे

संजय मिश्रानं कुलगुरूची भूमिका केलीय. चित्रपटाला नायक नाहीच, कुलगुरू हा खलनायक मुख्य पात्र आहे. सिनेमा रंगत जातो तसतसा प्रेक्षक कुलगुरूला पहाताच खवळू लागतो, त्याला शिव्या देऊ लागतो. एका जाहीर समारंभात अनारकली कुलगुरूची लक्तरं वेशीवर टांगते, कुलगुरूच्या पत्नी आणि मुलीसमोर. हा प्रसंग घडत असताना कुलगुरूच्या मनात काय घडतं ते संजय मिश्रानं एक अक्षरही न उच्चारता दाखवलंय. दीर्घ काळ लक्षात रहावी अशी भूमिका संजय मिश्रानं वठवलीय. एक दुर्वर्तनी माणूस दिद्गर्शकानं तटस्थपणानं मांडला आहे.

संजय मिश्रानं या आधी मसान या चित्रपाट विद्याधर पाठक या एका पापभिरू शिक्षकाची भूमिका केलीय. गंगेच्या किनाऱ्यावर रहाणाऱ्या पाठकची मुलगी तारुण्य सुलभ सेक्समधे सापडते. तिचा मित्र आत्महत्या करतो. मुलगी बदनाम होते. पोलिस तिच्या बदनामीतून सुटका करण्यासाठी पाठकचं ब्लॅकमेलिंग करतात, पाठक ते पैसे फेडता फेडता जेरीस येतो. मसानमधल्या या भूमिकेबद्दल संजय मिश्राला बक्षीस मिळालं होतं. मसानमधे एक पापभिरू बाप आणि अनारकलीमधे एक स्त्रीलंपट कुलगुरू.

संजय मिश्रा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून बाहेर पडलेले आहेत. अभिनयाचं प्रशिक्षण घेतल्याच्या खुणा मिश्र त्यांच्या अभिनयात सापडतात. पट्टीच्या शिल्पकाराचं छिन्नी आणि हाताड्यावर उत्तम नियंत्रण असतं. शिल्पाच्या चेहऱ्यावरचे भाव आणि कपड्यांवरच्या चुण्या अगदी हलक्या फटक्यानं तो कसा साकारत असेल ते संजय मिश्रा यांचा अभिनय पहातांना कळतं.
चित्रपटात काही छोट्या भूमिका आहेत. अन्वर नावाचा एक कोवळा तरूण अनारकलीच्या प्रेमात पडतो. अनारकली त्याचं तारुण्यसुलभ प्रेम लक्षात घेते, एक अंतर राखून ती त्याच्याशी आस्थेचे संबंध ठेवते. नाचगाण्यांच्या सीड्या विकणाऱ्या एका माणसाची एक छोटी भूमिका चित्रपटात आहे. त्या गृहस्थाची सायकल, त्याचा गळ्यापर्यंत बटनानं बंद केलेला शर्ट, दिल्लीतली एक घरमालकीण अत्यंत शिवराळपणे बोलत असतानाही अगदी सभ्यपणानं तिच्याशी वागणं इत्यादी बारकावे ही भूमिका भरीव करतात.अन्वर, सीडीवाला, अनारकलीच्या ऑर्केस्ट्राचा मालक या भूमिकांसाठी केलेली नटांची निवड, त्यांना दिलेली ट्रीटमेंट छान आहे.

                                          संजय मिश्रा, मसान मधे

अविनाश दास या दिद्गर्शकाची हा पहिलाचा चित्रपट आहे. निल बट्टे सन्नाटा हाही अश्विनी अय्यर तिवारीचा पहिलाच चित्रपट होता. गेल्या वर्षी गाजलेला पण न चाललेला ऑटोहेड हाही दिद्गर्शकाचा पहिलाच चित्रपट होता. नवी मंडळी अगदी नवी कथानकं घेऊन चित्रपट काढत आहेत. गाजलेल्या कथा, कादंबऱ्या त्यांनी घेतलेल्या नाहीत. सभोवतालचं धगधगतं वास्तव ते चित्रपटात मांडतात. तसं पाहिलं तर सभोवतालचं वास्तव हा नेहमीच चित्रपटाचा विषय असतो. पण बरेचवेळा निर्माता-दिग्दर्शकाला  ते वास्तव गुळगुळीत करून, त्यात प्रवचन आणि उपदेश घुसवून, निष्कर्ष वगैरे तयार करून सामाजिक कर्तव्य पार पाडण्याचा मोह होतो. नवे दिद्गर्शक त्या भानगडीत पडत नाही. उत्कंठा टिकवून ठेवत, रंजकता टिकवून ठेवत, वेगवान चित्रण करत दिद्गर्शक कथानक उलगडतात. काही दिवसांपूर्वी ट्रॅप्ड नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तोही फार चालला नव्हता. मुंबईच्या भर वस्तीतल्या ओस पडलेल्या इमारतीत सतराव्या अठराव्या मजल्यावर अडकून पडलेल्या तरूणाची गोष्ट ट्रॅप्डमधे आहे. बाहेर पडण्यासाठी त्यानं केलेली धडपड प्रेक्षकाला अस्वस्थ करते. टॉम हँक्सच्या कास्ट अवे या चित्रपटाची आठवण ट्रॅप्ड पहाताना येत होती. गेल्या वर्षी मामी चित्रपट महोत्सवात एका क्रूर माणसानं आपली पत्नी आणि मुलाला एका घरात अडकवून ठेवणं आणि आईमुलानं सुटका करून घेणं अशी एक जीवघेणी गोष्ट चितारली होती. ट्रॅप्डचं तंत्र कदाचित थोडं ढिलं असलं तरी वरील चित्रपटांची आठवण यावी इतका प्रत्यय ट्रॅप्डनं आणून दिला.

या चित्रपटांचा आणखी एक विशेष असा की कथानकाला अनेक सामाजिक, राजकीय कंगोरे असतात. अनारकलीमधे बिहारचे पोलिस आणि राजकारण आहे. मसानमधे वाराणसीतल्या दाहक आणि क्रूर परंपरा, जातींचा लोच्या आहे. निल बटे सन्नाटामधे एकट्या स्त्रीला समाजात कसं वागवतात ते दिसतं. ट्रॅप्डमधे मुंबईतली न दिसणारी गुन्हेगारी आहे. परंतू या गोष्टी दिद्गर्शक सूक्ष्मपणे नेपथ्यावर ठेवतात. त्यांचा ढोल बडवत नाहीत, त्यावर व्याख्यानं झोडत नाहीत.

हल्ली असे सिनेमे पटकन उडतात. सिनेमा गाजवण्याचं आणि टिकवण्याचं तंत्रं अशा चित्रपटांच्या निर्मात्यांना जमत नाही असं दिसतय. माध्यमांमधे त्यांचं परिक्षण प्रसिद्ध होतं तेव्हां ते सिनेमाघरातून उडालेले असतात. वाहिन्यांवरही ते दिसत नाहीत. चांगले चित्रपट पाहू इच्छिणाऱ्यांसाठी काही तरी वाट निघायला हवी.

।।

 

 

4 thoughts on “अनारकली ऑफ आरा

  1. हो. वाट निघायला हवी हे नक्की. त्यासाठीचं दिग्दर्शन करणारा एखादा नवा दमाचा कल्पक माणूस/ किंवा व्यक्ती कुठे असेल? लवकर समोर यावी…

  2. Changale chitrapat pahanaryansathi kahitari vat nighayala havi, he patate.

    Nilu Damle, lekh aavadala.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *