अमेरिकेचं आधुनिक वळण दाखवणारी दोन पुस्तकं
अमेरिकेचं आधुनिक वळण दाखवणारी दोन पुस्तकं
००
THE ACCIDENTAL LIFE .TERRY McDONELL .
From Conunterculture to Cyberculture. Fred Turner
||
१९६० ते १९८० हा वीसेक वर्षाचा काळ अमेरिकन आधुनिक इतिहासाला नवं वळण देतो. या काळात समाजात निर्णायक उलथापालथ झाली. समाजाची आर्थिक, राजकीय आणि तंत्रवैज्ञानिक घडी समांतर वाटेनं जाणाऱ्या तरूणानी विस्कटली. टेरी मॅक्डोनेल यांच्या आठवणी आणि फ्रेड टर्नर यांचा समांतर चळवळीचा आढावा ही दोन पुस्तकं या काळात काय घडलं ते दाखवतात.
लेखक गोळा करणं, त्यांना लिहितं करणं हाही संपादनाचा एक पैलू आहे. हा पैलू असणारं संपादक टेरी मॅकडोनेल यांचं एक्सिडेंटल लाईफ हे आठवणींचं पुस्तक सध्या वाचलं जातंय.
टेरी मॅकडोनेल १९६९-७२ या काळात हौशी बातमीदार आणि छायाचित्रकार होते. १९७४-७५ मधे ते सॅन फ्रान्सिस्को मॅगझीनमधे सहयोगी संपादक झाले. तिथून त्यांची संपादकीय कारकीर्द सुरु झाली. आऊटसाईड, रॉकी माऊंटन, रोलिंग स्टोन, न्यूजवीक, स्मार्ट, एस्क्वायर, मेन्स जर्नल स्पोर्ट्स वीकली या पत्रिकांचं संपादन त्यानी केलं. २००२-०५ या काळात ते टाईम साप्ताहिकाचे संपादक झाले. २००६-१२ या काळात त्यांनी टाईमचं सल्लागार संपादकपद सांभाळलं. आता ते स्वच्छंद पत्रकार म्हणून लिहित असतात.
टेरीनी प्रथम कादंबऱ्या लिहिल्या. मग ते छायाचित्रण करू लागले. मग त्यांना भटकायचा नाद लागला, त्यांनी जगभर फिरून फोटो काढले आणि तिथल्या समस्यांवर लिहिलं.
पुस्तकात छोटछोट्या ७८ नोंदी आहेत. प्रत्येक नोंदीत किती शब्द आहेत ते लेखकानं नोंदलं आहे. रायटर्स ब्लॉक नोंदीमधे १५० शब्द आहेत तर हंटर थॉम्सन नोंदीत ४७६३ शब्द आहेत. टेरी मॅकडोनेल यांनी संपादित केलेले पत्रकार आणि लेखक यांच्या आठवणी निबंधांत आहेत. लेखक कसे मिळवले, त्यांच्या नाना लहरी आणि वैशिष्ट्यं कशी सांभाळली, त्यांना विषय कसे दिले आणि त्यांच्याकडून कसं लिहून घेतलं याच्या छोट्या गोष्टी नोंदीमधे आहेत. काही वेळा टेरीनी मार खाल्ला, नोकरी जाण्याची पाळी आली. काहीवेळा दुनियाभर अपकीर्ती झाली. काही लेखक आयुष्यभर चिकटले, काही लेखक दुरावून निघून गेले, एक नोकरी गेल्यावर दुसरी कशी मिळाली इत्यादी सुरस कहाण्या पुस्तकात आहेत.
टेरी मॅकडोनेल म्हणतात की आपण पहिल्यापासूनच चाकोरीत वाढलो नाही. खरं म्हणजे टेरी संपादक व्हायचेच नव्हते. अगदी अपघातानेच ते पत्रकारीत आले. काहीही आखलेलं नव्हतं. आखून, ठरवून काही करण्याचा टेरीचा पिंडच नाही. अगदी आयत्या वेळी जे समोर येईल त्याला तोंड देणं आणि त्या क्षणी जे उत्तम आहे ते करणं ही त्यांची कामाची पद्धत. कामगिरीवर पाठवतांना टेरी बातमीदारांना मोकळं सोडत. गोष्टी घडू द्यायच्या, त्याना वळण द्यायचा खटाटोप करायचा नाही. विषयाच्या खोलात जायचं, जास्तीत जास्त पैलू पहायचे. मुलाखत जशी कशी आकार घेईल तशी होऊ द्या असं टेरी म्हणत. टेरीना बातमीदार, लेखक, साहित्यिक, खेळाडू इत्यादी माणसं धडकत गेली, अपघाती पद्धतीनं. म्हणून तर टेरीनी पुस्तकाचं शीर्षक अक्सिडेंटल लाईफ असं ठेवलंय.
संपादकपदी असताना त्यांनी त्या काळात गाजलेल्या टॉम मॅकग्वायर, टॉम वुल्फ, जिम हॅरिसन, हंटर थॉम्सन, रिचर्ड प्राईस, रिचर्ड फोर्ड, जेम्स सॉल्टर आणि त्यांच्यासारख्या पत्रकारांना लिहितं केलं. त्यांनी पत्रकारी इतकी जिवंत आणि थरारक केली की साहित्यिकही वर्तमानपत्रांसाठी लिहू लागले. साहित्यिक पाच दहा हजार शब्दांचे लेख साप्ताहिकासाठी लिहू लागले.
एडवर्ड अबी हा गाजलेला कादंबरीकार. तो न्यू मेक्सिकोत गेला. तिथं कासव संशोधन संस्था सरकारी अनुदान घेऊन काम करत होती. कासवं जतन करणं व वाढवणं हे या संस्थेचं काम होतं.प्रत्यक्षात कासवं गोळा करून मारणं आणि त्यांचे अवयव विकणं असा उद्योग संस्था करत होती. एडवर्डनं न्यू मेक्सिकोत मुक्काम केला. सगळा प्रकार खणून काढला. आज या पत्रकारीला शोध पत्रकारी म्हणतात. एडवर्डचं वार्तापत्रं कादबंरीसारखं लिहिलेलं होतं. हज्जारो शब्द. अमेरिकाभर ते वार्तापत्र गाजलं.
कॅलिफोर्नियातलं एक बेट असा विषय एडवर्डला हाताळायचा होता. टेरीनी एडवर्डला खास विमान चार्टर करून त्या बेटावर पाठवलं. ते वार्तापत्रंही गाजलं. त्या काळात कादंबरी लिखाणापेक्षा किती तरी जास्त पैसे वर्तमानपत्रातल्या लेखनाला टेरी देत असत. हंटर थॉम्सन वार्तापत्रं लिहिण्यासाठी तीन ते चार लाख डॉलरची आगाऊ रक्कम घेत असे. शब्दाला पाच डॉलर दिले जात, खर्च वेगळा. आता शब्दाला एक डॉलर मिळाला तर खूप झालं असं मानतात.
जिम हॅरिसन हा पत्रकार मुळातला कवी होता. कवी असल्यानं तो शब्दांबाबत फार हळवा होता. कोणीही संपादक कवीच्या शब्दाला कधी हात लावत नाही. जिम आपल्या वर्तमानपत्रातल्या लिखाणाकडंही कवितेसारखंच पहात असे. टेरीनी त्याचं लेखन संपादित केलं नाही.
जिमनी एक लेख लिहून पाठवला. टेरीनी तो वाचला आणि जिमला म्हणाले की लेखांत बदल करावे लागतील. उदा. पहिला पॅरा अनावश्यक आहे. खरी गोष्ट सुरु होते ती दुसऱ्या पॅऱ्या पासून. टेरीचं पत्र वाचून जिम खवळला. काहीही बदल न करता छापायचं असेल तरच छाप नाही तर छापू नकोस असा निरोप त्याच्या एजंटनं पाठवला. टेरीनं कळवलं की जिमला जे म्हणायचंय ते त्याच्या दुसऱ्या पॅऱ्यातच आहे, पहिल्या पॅऱ्यात नाही. लेखकाच्या मनात जे असतं ते कधी कधी लेखनात येत नाही. ते लेखनात आणणं ही संपादकाची जबाबदारी असते. टेरीनं तसं जिमला कळवलं. कित्येक महिने तो मजकूर छापला गेला नाही. शेवटी यथावकास टेरीच्या म्हणण्याप्रमाणं संपादित होऊन तो छापला गेला. जिम जाहीरपणे काही बोलला नाही, मूकपणे त्यानं संपादन मान्य केलं. पण खवळलेला जिम फोनवर टेरीला म्हणालाच- तू माझं मूल मारलंस.
गायक-कवी जिम मॉरिसन हे अमेरिकेतलं एक प्रख्यात थरारक आयकॉन व्यक्तिमत्व. त्याचं जीवन एक गूढरम्य कहाणी होतं. मृत्यूनंतरही त्याचे आल्बम लाखांनी विकले जात. त्याच्या मृत्यूला दहा वर्षं झाल्यानंतर टेरीनी रोलिंग स्टोन पत्रिकेसाठी एक कव्हर स्टोरी प्रसिद्ध केली. जिमचे भेदक डोळे वाचकाकडं रोखून बघत आहेत असा फोटो छापण्यात आला आणि शीर्षक देण्यात आलं- He’s hot, He’s sexy and He’s dead. मुखपृष्ठ आणि शीर्षक खूप गाजलं.
टेरींचं म्हणणं की हे शीर्षक त्याचंच होतं. त्यांच्या अनेक सहकाऱ्यांचं मत होतं की शीर्षक टेरीचं नव्हतं, सहकाऱ्याचं होतं. टेरी पुस्तकात म्हणतात की पत्रकारीत कित्येक वेळा श्रेय घेण्याची चढाओढ असते. अनेक संपादक, बातमीदार अनेक तास चर्चा करून स्टोरी तयार करतात, शीर्षक तयार करतात त्यामुळं शीर्षकाचं पितृत्व नेमकं कोणाकडं असतं ते ठरत नाही.
वियेतनाम युद्धात अमेरिका गळ्यापर्यंत बुडाली होती. अमेरिकन पत्रांमधे सरकारच्या बाजूनं आणि विरोधात वियेतनामबद्दल बराच मजकूर येत असे. वियेतनाममधे काय चाललंय ते जाणण्यात अमेरिकन नागरिकांना रस होता. टेरीनी एका पत्रकाराला वियेतनाममधे पाठवलं. वियेतनाम वेगळ्या पद्धतीनं कव्हर करण्यासाठी, तिथलं जनजीवन कव्हर करण्यासाठी. उत्तम वृत्तांत (रीपोर्ताज) बातमीदारानं पाठवला.पण त्याचं बिल आल्यावर मात्र प्रकाशकाचे डोळे फिरले. लाखो डॉलरचं वेश्या घरांचं बिल होतं. बातमीदार बहुतेक काळ वेश्यांकडंच रहात होता. नॉर्मल हॉटेलचं बिल देता आलं असतं, वेश्यांचं बिल दिलं तर बोंब होणार होती. बातमीदाराला मिळालेली माहिती वेश्यांकडंच रहाण्यामुळं मिळाली होती. टेरीला ते समजत होतं. फक्त प्रश्न होता बिलाच्या स्वरुपाचा. अमेरिकेत परतल्यावर नव्यानं हॉटेलांची बिलं देणं तर बातमीदाराला शक्य नव्हतं. कसंबसं प्रकाशकानं प्रकरण निस्तरलं.
न्यू यॉर्कमधलं एलेनचं रेस्टॉरंट हा अख्ख्या अमेरिकेतल्या लेखक, पत्रकार, संगितकार, गायकांचा अड्डा. फ्रँक सिनात्रा तिथं कायम दिसे. एलेनला अमेरिकेची बित्तंबातमी असे की कुठल्या पत्रात कुठली जागा रिकामी आहे, कोणतं पत्र संपादकाच्या शोधात आहे, कोणता चित्रपट दिद्गर्शक कोणत्या चित्रपटासाठी मुख्य भूमिकेच्या शोधात आहे. एलेनच्या रेस्टॉरंटमधे अनेक छोटी दालनं होती, तिथं माणसं ड्रिंक घेत घेत शांतपणानं बोलू शकत. अनेक मुलाखती तिथं पार पडत. एकाद्या बातमीचा महत्वाचा सोर्स काय आहे ते बातमीदार तिथंच संपादकाला सांगत असे, संपादकीय कचेरीत नव्हे. एलेनचं रेस्टॉरंट न्यू यॉर्कच्या संस्कृतीचा एक महत्वाचा अवयव होता. टेरी अर्थातच एलेनच्या रेस्टॉरंटमधे सतत जात असत.
एकदा टेरीना एस्क्वायरमधून हाकलण्यात आलं होतं. आपल्याला कां हाकललं ते टेरीला समजत नव्हतं. टेरीनी एलेनला फोन केला. कारण संकटसमयी नेहमी एलेन मदत करत असे. मागं टेरीनं रोलिंग स्टोन संपादन करायला घेतलं तेव्हां त्याची बातमीदारांशी, लेखकांशी ओळख नव्हती. एलेननं महत्वाच्या लेखक आणि बातमीदाराना गोळा केलं आणि टेरीची गाठ घालून दिली होती. एकदा टेरीनी स्मार्ट नावाचं एक प्रायोगिक मॅगझीन काढलं होतं. पैसे गोळा करायचे होते. एलेननं मदत केली होती. तर टेरीनी एलेनना फोन केला.
कळलंय मला-एलेन म्हणाल्या.
साऱ्या दुनियेला कळलंय-टेरी म्हणाले.
ते जाऊ दे, बोल आज रात्री भेटायला येतोस?- एलेननी विचारलं.
एलेननं शब्द टाकला आणि टेरीना स्पोर्टस इलस्ट्रेटेडचं संपादकपद मिळालं. टेरीला खेळ हा प्रकार नवा होता. टेरी तसं एलेनकडं बोलले. पुढल्या तीन चार दिवसात एलेनच्या सांगण्यावरून टेरीनी आपल्या स्टाफच्या लोकांना गोळा करून एलेनच्या बारमधे जंगी पार्टी दिली. स्टाफ पार्टीमधे दंग असताना एलेननी टेरीना बाजूला बोलावून घेतलं. तिथं होते जॉर्ज स्टाईनब्रेनर. स्टाईनब्रेनर हा अमेरिकेतला एक नंबरचा बेसबॉल खेळाडू. असा तसा कोणाच्याही हाती न लागणारा मोठा माणूस. एलेननं स्टाईनब्रेनरला सांगितलं- टेरीला मदत कर.
टेरी स्टाईनब्रेनरला घेऊन आपल्या स्टाफकडं गेला. ते तर उडालेच. स्टाईनब्रेनरनं टेरीची घडी बसवून दिली.
टेरीच्या संपादकीय कारकीर्दीत फिक्शन (कल्पनेवर आधारित मजकूर, साहित्य) आणि नॉनफिक्शन (सत्यावर आधारित मजकूर) यातल्या सीमारेषा पुसल्या गेल्या, अंधुक झाल्या. टॉम वुल्फ या लेखकानं सत्यावर आधारलेलं साहित्य अशी पत्रकारीची नवी व्याख्या मांडली. अक्सिडेंटल लाईफमधे अनेक निबंधात फिक्शन-नॉनफिक्शनची चर्चा येते. एकदा एक पत्रकार महिला टेरीना विचारते- तुमची कादंबरी साहित्य आहे की सत्य आहे?
सत्य मांडता येत असताना सत्याचं वर्णन कशाला करायचं? सत्य आणि वर्णन यातला फरक काय असा प्रश्ण साहित्य चर्चेमधे नेहमी येत असतो. या पुस्तकात जॉर्ज प्लिंपटन आणि अर्नेस्ट हेमिग्वे यांच्यातल्या चर्चेमधून तो मुद्दा टेरीनं समजून घेतला आहे.
प्लिंपटन विचारतो- एक मूलभूत प्रश्न आहे, तुमच्या कलेचं कार्य काय असतं? सत्य (समोर) असताना सत्याचं वर्णन कशाला करायचं?
हेमिंग्वे उत्तर देतो- त्यात कोडं पडण्यासारखं काय आहे? घडलेल्या घटना, अस्तित्वात असलेल्या गोष्टी, तुम्हाला माहित असलेल्या गोष्टी आणि तुम्हाला कधीही न समजणाऱ्या गोष्टी यामधून तुम्ही तुमच्या शोधक बुद्दीनं एक नवं असं काही तरी शोधता, लिहिता, वर्णन करता. ते सत्यापेक्षा जास्त सत्य असतं. तुम्ही ते नीटपणानं लिहिलं असेल तर ते अमर होतं. त्या साठीच तर तुम्ही लिहिता, दुसरं काहीही कारण नसतं.
नव्या पत्रकारीत वियेतनाम युद्धाचं वर्णन पत्रकारीत केलं गेलं. घटना दाखवली, माणसांचं बोलणं आणि सहन करणं दाखवलं. परंतू लेखकानं त्यात काही गोष्टी कल्पित गोष्टी लिहिल्या. वियेतनाम या महाकथेतल्या पात्रांनी न बोललेल्या पण त्यांच्या मनात असू शकतील अशा अनेक गोष्टी साहित्यिक लेखकानं मांडल्या. ते एक लेखकाला गवसलेलं सत्य होतं, प्रत्यक्षात वास्तवात ते कुठंही नोंदलं गेलेलं नव्हतं. लेखकाच्या शोधक बुद्धीला आणि प्रज्ञेला ते सत्य गवसलेलं होतं. ते नीटपणे गवसलं असेल तर त्यातून अजरामर साहित्य, सिनेमा, नाटक, कविता इत्यादी निर्माण होतं. टेरीनी संपादित केलेल्या पत्रिकांमधे लेखक हज्जारो शब्दांचा मजकूर लिहित असत. तो मजकूर म्हटला तर कल्पित आणि म्हटला तर वास्तव असे. अमेरिकन पत्रकारीत हे एक नवं युग ज्या लोकांनी सुरु केलं त्यामधे टेरी मॅकडोनेल याची गणना होते.
पुस्तकात दुसऱ्या महायुद्धानंतरच्या अमेरिकेचं चित्र उभं रहातं. दुसऱ्या महायुद्धाआधी अमेरिका जगापासून अलिप्त होता. दुसऱ्या महायुद्धात तो जगात ओढला गेला. अमेरिकन उद्योग आणि शैक्षणिक संस्था युद्धाला लागणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनात गुंतल्या. उद्योग आणि शिक्षण यांना सरकारी मदतीमुळं मोठ्ठी उभारी आली. सरकार, उद्योग आणि शिक्षण संस्था असं त्रिकुट अमेरिकेत तयार झालं. युद्धाचा परिणाम म्हणून जगाची बाजारपेठ अमेरिकेच्या हाती लागली. झालं. अमेरिका धडाधड श्रीमंत झाली.
वस्तू उत्पादा, वस्तूंचा उपभोग घ्या. अमेरिकेत एक नवी संस्कृती आकाराला आली. समृद्धी, ऐश्वर्य, उपभोग. दारू, मादकं, सेक्स, बंदुका. वेगवान कार. संगित. चित्रपट. ही नवी संस्कृती साहित्य आणि पत्रकारीत दिसू लागली. बेभान धुंदपार्ट्या, शिकारी, किमती कपडे आणि वस्तू, झणझणीत पार्ट्या माध्यमात दिसू लागल्या. नट, दिद्गर्शक, संगितकार, गायक, पुढारी, लेखक प्रचंड प्रसिद्ध होत होते आणि त्यांच्या आत्महत्याही होत होत्या. निव्वळ सुख हवं, युद्ध नको. जे काही करायचं ते उघडपणे आणि ढोल बडवून हा अमेरिकन स्वभाव पत्रकारीत दिसू लागला. वर्तमानपत्रांची पानंच्या पानं उपभोगदृश्यांनी भरू लागली. यातूनच नवी पत्रकारी आकाराला आली.
अमेरिकन जीवनाला दुसराही एक पैलू होता. तात्विक. उपभोग, उद्योग आणि शहरीकरणामुळं निसर्गाचा नाश होतोय हे पसंत नसलेली माणसंही अमेरिकेत खूप होती. त्यांचीही एक स्वतंत्र चळवळ सुरु झाली होती. ती माणसंही पुस्तकं लिहित होती, माध्यमं प्रसिद्ध करत होती.
एक पैलू फ्रॉम काऊंटरकल्चर टु सायबरकल्चर या पुस्तकात फ्रेड टर्नरनी मांडला आहे. १९६८ साली स्टुअर्ट ब्रँडनं होल अर्थ कॅटलॉग ही पत्रिका छापली. औद्योगीकरणाला वैतागून खेड्याकडं निघालेल्या लोकांची सांगड उद्योग आणि तंत्रज्ञानींशी घालून देण्याचा उद्योग कॅटलॉगनं केला. नॉरबर्ट विनरचं सायबरनेटिक्स ब्रँडनं कॅटलॉगमधे प्रसिद्ध केलं. ह्युलेट पॅकार्डनं काढलेला कॅलक्युलेटरही ब्रँडनं जनतेसमोर ठेवला. सॅन फ्रॅन्सिस्कोच्या बे एरियात, आज सिलिकॉन खोरं म्हणून प्रसिद्ध झालेल्या विभागात, तंत्रज्ञानात नवे शोध लागत होते. स्टीव जॉब ध्वनी आणि चित्रं उत्तम रूपात मुठीत मावेल अशा आकारात निर्माण करण्याच्या खटपटीत होता. ब्रँडनं ताजं तंत्रज्ञान आणि खेड्यात शेती करायला उपयोगी पडणारा छोटा ट्रॅक्टर आणि औजारं कॅटलॉगमधून जनतेसमोर मांडली.
ब्रँड तेवढ्यावर थांबला नाही. एका बसमधे सामग्री भरून नवं तंत्रज्ञान लोकांकडं पोचवत तो अमेरिकाभर भटकला. ब्रँड, केविन केली, हॉवर्ड ऱ्हाईनगोल्ड, जॉन पेरी बार्लो इत्यादी मंडळीनी एक नवी संस्कृती जन्माला घातली. सायबरसंस्कृती. माणसाला मुक्त करणारी, माणसाला सुखी करणारी, माणसाच्या निर्मितीक्षमतेला उपकारक ठरणारी तंत्रज्ञानं या मंडळीनी अमेरिकेसमोर ठेवली. बकमिन्सटर फुलर हे त्या संस्कृतीतलं एक उदाहरण. चार पाचशे चौरस फुटातही माणूस सुखानं राहू शकेल असं घर त्यानं डिझाईन केलं, बांधून दाखवलं.
ज्ञानाची पटीत वाढ आणि ज्ञानाचा उपयोग माणसाच्या आनंद आणि सुखासाठी वापर हे नव्या सायबरकल्चरचं वैशिष्ट्यं होतं.
समाज उपभोगाकडं जात असताना समाजाचं स्वास्थ्य आणि आनंद वाढवण्याकडं तंत्रज्ञानातल्या तरुणांनी लक्ष दिलं. निषेधाच्या चळवळीनं एक विधायक म्हणावं असं वळण घेतलं. टर्नर यांचं पुस्तक ते वळण समजून घ्यायला मदत करतं.
लेखक शोधणं, त्याच्याशी दोस्ती करणं, त्याला लिहितं करणं, त्याच्या लेखनाला वळण देणं, लेखकाच्या मनातले शब्द वाचकाच्या मनापर्यंत पोचवणं. हे सारं टेरी मॅक्डोनेलना कसं जमलं ते या पुस्तकात प्रत्ययाला येतं. वॉटरगेट उघडं पाडणाऱ्या कार्ल बर्नस्टिननं या पुस्तकाबद्दल लिहिलय- हे पुस्तक म्हणजे एक छान गोष्ट आहे आणि पत्रकारासाठी एक चांगलं पाठ्यपुस्तक आहे.
शीत युद्धाच्या काळात कंप्यूटर ही एक समाजविधातक-भीतीदायक गोष्ट आहे असं वाटू लागलं होतं. कंप्यूटर हा एक युटोपिया आहे असं वाटू लागलं होतं. या दोन्ही भीतींना उत्साही कंप्यूटरवाल्यांनी माणसाच्या स्वातंत्र्याच्या दिशेनं कसं वाळवलं याची गोष्ट एका पत्रकारानंच वरील पुस्तकात मांडली आहे. फ्रेड टर्नर हे पत्रकार आहेत.
।।