अमेरिकेतला उद्रेक

अमेरिकेतला उद्रेक

मिनिआपोलिसमधे फ्लॉईडनं दुकानात वस्तू घेताना २० डॉलरची नोट दिली. ती नोट खोटी आहे असं दुकानदाराला वाटलं. त्यानं पोलिसांकडं तक्रार  केली. पोलिस तडक हजर झाले. फ्लॉईडला हातकड्या घातल्या. तो कोणताही विरोध करत नसतांना त्याला खाली पाडलं. हातकड्यांत अडकला असतानाच त्याच्या मानेवर गुडघा दाबून ठेवला. फ्लॉईड म्हणत होता – मला श्वास घेता येत नाहीये, मी मरतोय. तरीही मानेवरचा गुडघा निघाला नाही. फ्लॉईड मेला.

बरोब्बर १२ तास आधी न्यू यॉर्कच्या सेंट्रल पार्कमधे एमी कूपर ही गोरी स्त्री कुत्र्याला त्याच्या गळ्यात पट्टा न बांधता फिरवत होती. पार्कमधे फिरताना कुत्र्याला पट्टा बांधला जावा असा कायदा आहे. एका आफ्रिकन तरुणानं तिला विनंती केली की तिनं कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधावा. एमी कुपरचं बिनसलं. तिनं पोलिसांना फोन केला “ एक काळा आफ्रिकन माणूस मला जीवे मारण्याची धमकी देतोय”. पोलिस आले, त्या काळ्या तरुणाला पकडून घेऊन गेले.

फ्लॉईडच्या मरणाची क्लिप व्हायरल झाली.

अमेरिकाभर निदर्शनं उसळली. अमेरिकाच नव्हे; फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया असं करत करत जगभर निदर्शनं झाली, भारत सोडून. 

अमेरिकेचे प्रेसिडेंट म्हणाले की निदर्शक दहशतवादी आहेत.

संतप्त निदर्शकांनी व्हाईट हाऊस समोर निदर्शनं केली.

व्हाईट हाऊससमोर, रस्ता ओलांडल्यावर एक चर्च आहे. बाहेर निदर्शनं उसळलेली असतानाही ट्रंप यांनी रस्ता ओलांडून चर्चमधे जायचं ठरवलं. पोलिसांनी अश्रूधूर, लाठीमार करून जमलेल्या लोकांना पळवून लावून रस्ता मोकळा केला. ट्रंप रस्ता ओलांडून गेले. चर्चमधे जाऊन प्रार्थना वगैरे केली नाही. एक बायबलची प्रत हातात घेऊन उंचावली, जाहिरातीत बनियन किंवा ब्रेसियर किंवा अंडरवेअरचं महत्व सांगण्यासाठी उंचावतात तशी. कॅमेऱ्यांसाठी. आपण ख्रिस्ती आहोत असं लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी. 

काही मिनिटातच ट्ंप व्हाईट हाऊसमधे परतले. परतल्यावर काही काळानं व्हाईट हाऊसच्या तळघरात तयार केलेल्या अत्यंत सुरक्षीत अशा बंकरमधे काही काळ काढला. त्यांना वाटत होतं की त्यांच्या जिवाला धोका आहे.

नंतर त्यांनी ट्वीट केलं की अमेरिका (म्हणजेच ट्रंप) धोक्यात असल्यामुळं मी सैन्याला पाचारण करून रस्त्यावर पसरलेल्या दहशतवादी निदर्शकांना सरळ करणार आहे.

ख्रिस्ती बिशपांनी प्रेसिडेंटचा निषेध केला. बायबल ही बाजारात विकायची वस्तू नाही, बायबल आणि ख्रिस्ताची शिकवण यांच्याशी विपरीत वर्तन करणाऱ्यांनी बायबलचा असा वापर करणं अयोग्य आणि धर्म विरोधी आहे असं पत्रक त्यांनी काढलं.

एकेकाळाचे ट्रंप यांचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस म्हणाले “ सैन्याचा वापर अमेरिकन नागरिकाचं राज्यघटनेनं दिलेलं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी करणं चूक आहे, राज्यघटनेशी द्रोह करणारं आहे.”

ह्यूस्टन या शहराचे पोलिस प्रमुख म्हणाले “ ट्रंप यांच्याकडं काही विधायक बोलण्यासारखं नसेल तर त्यांनी आपलं तोंड बंद ठेवावं.”

मिशिगनमधे निदर्शक रस्ता अडवून बसले होते तेव्हां शेरीफ तिथं पोचले. त्यांना कंबरेचं पिस्तूल काढून ठेवलं आणि ते निदर्शकांत सामील झाले.

कोलंबसमधे निदर्शकांनी पोलिसांसमोर लोटांगण घातलं, रस्त्यावर हात मागं घेऊन झोपले.

लॉस एंजेलिसमधे निदर्शक रस्त्यावर मांडी घालून बसले, नंतर नॅशनल गार्ड्सनी त्यांची गळाभेट घेतली.

लॉस एंजेलिसमधे एक गट, काळ्या तरुणांचा, दोन दुकानांबाहेर उभा होता, दुकान फोडायची त्यांची इच्छा दिसली. एक मध्यम वयीन काळी स्त्री तिथं पोचली, तिनं गडबड करणाऱ्यांना रोखलं. त्यांची संख्या जास्त होती. त्या स्त्रीचे कुटुंबीय आले, त्यांनी गडबड करू पहाणाऱ्यांना दुकानापासून दूर केलं.  ही घटना घडत असताना रस्त्यावरून पोलिसांच्या गाड्या जात होत्या. काळ्या कुटुंबानं हातवारे करून त्या गाड्यांना थांबवलं, बोलावलं. पोलिस आले आणि त्यानी दंगल रोखणाऱ्या काळ्यांनाच अटक केली.

मिनिआपोलिसमधली शांततामय निदर्शनं  सीएनएनचे दोन  बातमीदार चित्रीत करत होते,  कॅमेऱ्यासमोर बोलत होते.  एक बातमीदार काळा, एक गोरा. पैकी काळ्याला पोलिसांनी पकडलं, बेड्या घातल्या.   तो सांगत होता की आपण बातमीदार आहोत, त्यानं आपलं ओळखपत्रंही दाखवलं. पोलिसांनी ऐकलं नाही. शेजारच्या गोऱ्या बातमीदाराला पकडलं नाही, त्याच्याशी मित्रत्वानं वागले.

सैन्य बोलावण्याला विरोध करणाऱ्या जनरल मॅटिस यांच्यावर ट्रंप ट्विटून पडले. 

कोविडनं थैमान घातलं असताना, घराबाहेर पडणं घातक आहे हे माहित असतांनाही करोडो अमेरिकन रस्त्यावर आले. काळे, गोरे, हिस्पॅनिक, तरूण.

कोविडच्या थैमानाचे बहुतांश बळी काळे आणि गरीब आहेत. गेली कित्येक वर्षं त्यांच्याकडं आरोग्य विमा नाही. गेली कित्येक वर्ष त्यांना मिळणारा आठवड्याचा पगार मिळाल्या दिवशीच संपतो. त्यांच्याकडं कश्शासाठीही पैसे उरत नाहीत. गेली कित्येक वर्षं गरीबी वाढत चालली आहे. गेली कित्येक वर्षं ते काळे आहेत म्हणून त्याना तुरुंगात घालतात. एकदा तुरुंगाचा शिक्का बसला की त्याना नोकरी मिळत नाही. कंबरेला काही तरी पिस्तुलासारखं दिसतय असं वाटल्यावरून काळ्या माणसाला पोलीस गोळ्या घालून ठार मारतात. आणि ट्रंप समर्थक माणसं प्रत्येकी किमान दोन घातक बंदुका खांद्यावर लावून धांदल करतात तेव्हां त्याना पकडणं सोडाच, प्रेसिडेंट त्यांची पाठ थोपटतात.

अमेरिका ज्यांच्या श्रमावर श्रीमंत झाली ते काळे माणसं नाहीत, कमी प्रतीची जनावरं आहेत असं मानणारे गोरे अमेरिकेत सुरवातीपासून आहेत. त्यांनीच या “जनावरांना” अमेरिकेत गुलाम म्हणून आणलं. जेव्हां काळे आणि गोरे मिळून गुलामगिरी नष्ट करा म्हणू लागले, काळ्यांना समान पातळीवरचे अमेरिकन नागरीक मानू लागले तेव्हां अमेरिकेत दुफळी युद्ध झालं. वंशद्वेष्टे विरूद्ध समतावादी अशी लढाई झाली, त्यात वंशद्वेष्टे हरले. पण त्यांच्या मनातला द्वेष आणि चुकीच्या कल्पना काही गेल्या नाहीत.

अमेरिका श्रीमंत होत गेली पण काळ्यांना माणूस म्हणून वागवायला तयार झाली नाही. म्हणूनच १९६० नंतर अमेरिकेत उद्रेक झाला, काळे आणि गोरे दोघंही डॉ. किंग यांच्या बरोबरीनं समतेच्या आंदोलनात उतरले. हे आंदोलन दडपण्याची जाम खटपट निक्सन यांनी केली. निक्सन यांना अध्यक्षपद सोडावं लागलं ते वॉटरगेट प्रकरणामुळं, त्यांचा वंशद्वेष लपून राहिला. 

काळे शिकत होते, संघटित होत होते, पण मागं पडत होते. काळ्यांतली काही माणसं मात्र हताश झाली होती, त्यांनी गोऱ्यांच्या वंशद्वेषाला हिंसेनं उत्तर द्यायचा प्रयत्न केला.  काळ्यांच्या चळवळीत फूट पडली. ओबामा यांचा उदय झाला तेव्हां काळ्यांना वाटलं की आता पहाट झालीय आता गोऱ्यांच्या मनातला द्वेष भले शिल्लक राहील पण व्यवस्थात्मक अन्याय दूर होईल. परंतू ओबामा यांच्या आठ वर्षाच्या कारकीर्दीत काळ्यांना न्याय मिळाला नाही. त्यातूनच काळ्यांची ब्लॅक लाईव्ज मॅटर ही चळवळ सुरु झाली.

ट्रंप आले आणि पुन्हा गुलामीचा जमाना सुरु झाला. ओबामा यांनी काळ्यांना न्याय मिळावा यासाठी सुचवलेल्या पण प्रभावी नसलेल्या सुधारणाही ट्रंपनी गुंडाळल्या. वंशद्वेष्टे उघड मिरवणुका काढू लागले.

प्रश्न केवळ काळ्यांवरच्या अन्यायाचा असता तर कदाचित क्षोभ केवळ काळ्यांपुरताच मर्यादित राहिला असता. अमेरिकेत विषमता वाढतेय, गरीबी आणि शिक्षणाचा अभाव यांचा फटका गोऱ्या-हिस्पॅनिक अमेरिकनांनाही बसतोय. अमेरिकेतली अर्थव्यवस्था फक्त दहा टक्के लोकांसाठीच आहे आणि ८० टक्के सामान्य माणसांना चांगलं शिक्षण मिळणंही दुरापास्त आहे. लोकांचा राग आहे तो यावर. लोकांचा राग अमेरिकन व्यवस्थेवर आहे आणि ती व्यवस्था आणखी मोडून टाकणाऱ्या ट्रंपांवर आहे.

अमेरिका किंवा जगाच्या इतिहासात इतका बिनडोक, इतका प्रसिद्धी लोलूप, इतका अनीतीमान, इतका गुन्हेगार माणूस सत्ताधीश झाला नसेल.

अमेरिकेतला उद्रेक पारंपरीक अर्थाचा राजकीय उद्रेक नाही. रस्त्यावर आलेली बहुसंख्य तरूण मुलं डेमॉक्रॅटिक पक्षाची नाहीत, त्यांचा ओबामा-क्लिंटन यांच्यावरही राग आहे. राज्यकर्ते नुसत्या गप्पा मारतात, करत काहीच नाहीत ही व्यथा निदर्शकांच्या मनात खदखदत आहे. घोळ असा आहे की एकूण राजकीय एस्टाब्लिशमेंट जनहिताबाबत अनभिज्ञ असतानाच एक धटिंगण अध्यक्ष झालाय. 

काळ्यांना सहानुभूती दाखवून भागणार नाही. एकादी राजकीय स्कीम काढून काळ्यांना चार पैसे वाटून भागणार नाही. त्या पलिकडील व्यवस्थात्मक सुधारणा लोकांना हवीय. सुधारणा काय असेल हे निदर्शकांना सांगता येत नाहीये. कारण ही सुधारणा म्हणजे एकूणच अमेरिकेच्या राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेतली पूर्वी कधीही कल्पिलेली नाही अशी सुधारणा असेल. त्या सुधारणेचा आराखडा तयार व्हायला वेळ लागेल. पण तोवर निदान या धटिंगणाला तरी घालवला पाहिजे अशी लोकभावना आहे. हा माणूस एकूणच अमेरिकन समाज आणि देशाचीच वाट लावायला निघाला आहे. तेवढ्यावरच तो थांबणार नाही तर जगातही तो धुमाकूळ घालू शकेल. 

अमेरिकेत नव्हेंबरमधे निवडणुका आहेत. पुढल्या वर्षी जानेवारीत नवा अध्यक्ष आणि नवं सरकार तयार होईल. परंतू जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून तर जानेवारीपर्यंतचा काळ अमेरिका आणि जगालाच त्रासदायक ठरू शकतो. 

अमेरिकन जनता यातून कसा मार्ग काढते ते पहायचं.

भारत आणि जगानंच यातून बरंच शिकण्यासारखं आहे.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *