अमेरिकेतली रस्त्यावर जगणारी माणसं
अमेरिका
आयडाहोमधून निघून ओरेगन मार्गे लास व्हेगासला जाताना वाटेत नेव्हाडाचं वाळवंट लागतं. हॉलीवूडच्या चित्रपटात हे वाळवंट एकेकाळी खूप दिसायचं. झुडुपांचा समुद्र पसरलेला. कित्येक मैल दोन्ही बाजूला एकही घर दिसत नाही. पर्वत दिसतात खूप दूरवर क्षितिजाला बिलगून. वाटेत पेट्रोल पंप नसतो, तहान लागली तर प्यायला पाणी मिळत नाही. इंटरनेटचं कनेक्शन नसल्यानं जीपीएस चालत नाही.
वाटसरू किंवा कारप्रवासी भीषण एकांतात सापडतो. टाकीत पुरेसं पेट्रोल भरलेलं नसलं आणि टाकी रिकामी झाली तर मरणच. जाणाऱ्या येणाऱ्यानं दया दाखवली तरच सुटका होणार.
अशा एकांतात रस्त्याच्या कडेला एक झोपडी दिसते. झोपडी म्हणजे काय तर चार काठ्यांवर एक प्लास्टिक टाकलेलं. कार थांबवून थोडी वाट पाहिली तर त्यात एक म्हातारा दिसतो. त्याच्या हातात एक पुस्तक असतं, वाचत निवांत पडलेला असतो.
इथं हा माणूस कसा आला? कां आला? हा माणूस चक्रम होता? जगावर वैतागून इथं आला होता? की तत्वज्ञ होता? फारसं बोलायलाही राजी नाही. येवढंच म्हणाला की तो ओरेगनचा. नोकरी नाही.रहायला घर नाही. किती दिवस रस्त्यावर पडून रहाणार? या परम एकांतात येऊन पडला. जाणारे येणारे पाणी, अन्न देतात. पुस्तकं देतात. कुठल्याही विषयावरचं पुस्तक असो. तो वाचतो.
अमेरिका हा देशच विचित्र आहे. अनंत परस्परांना छेद देणाऱ्या गोष्टीनी खचाखच भरलेला. त्या आयडाहोत सिने कलाकार टेकडीवर रहातात, पूर्ण टेकडी हिरव्यागार हिरवळीनं आच्छादलेली. टेकडीवरची हिरवळ हिरवी ठेवायची तर किती पाणी लागत असेल याची कल्पनाच करवत नाही. इतकं पाणी अमेरिकन शहरं वापरतात की हुव्हर या महाकाय धरणातला पाणी साठाही आटत चाललाय. अमेरिकेत पाण्याचा दुष्काळ पडेल असं जाणकार म्हणतात.
हा माणूस शहरात रहायला जागा नाही म्हणून वाळवंटात येऊन पडलाय.
पश्चिम किनाऱ्यावर सॅन फ्रान्सिस्को आणि पूर्व किनाऱ्यावर न्यू यॉर्क. आकाशाला भिडणाऱ्या इमारती. विविध वस्तूनी खचाखच भरलेली दुकानं. दिवसा माणसं दुकानात ये जा करतात, रात्री या दुकानाच्या बाहेर पाटवाटेवर दुकानातच रिकामे झालेले खोके पसरले जातात, त्यात माणसं रात्र काढतात.
रहायला घर नाही.
कधी कधी अक्खं कुटुंब खोक्यात रहातं.
सकाळ झाली की घडी घालून खोका इमारतीच्या मागल्या गल्लीत ठेवायचा.
या खोक्यातल्या कुटुंबाजवळ कधी कधी भूभू असतात. भूभू पिलांना जन्म देतात. ती पिल्लंही या खोक्यात वाढतात आणि दिवसभर रस्त्यावर हुंदडतात.
रहायला घर नाही.
अमेरिकेत घरांची किंमत वाढलीय आणि घरांचं भाडं वीस टक्केनी वाढलंय. महागाई वाढत गेल्यानं सरासरी उत्पन्न असणाऱ्या माणसाला भाडं भरता येत नाही. वाढलेलं भाडं द्या नाही तर घर सोडा असा तगादा घरमालक लावतात. कित्येक महिने भाडं थकतं. शेवटी घर सोडावं लागतं.
न्यू यॉर्क, शिकागो अशा काही शहरांत रात्रीच्या सराया बांधण्यात आल्यात. थंडीत बाहेर बर्फ पडताना या सरायीमधे माणसाला अंथरूण, पांघरूण दिलं जातं. तिथं कायमचा मुक्काम करता येत नाही.रस्त्यावर यावंच लागतं.
बेघर लोकं शहरात दिसतात. कारण खेड्यात घर आणि काम मिळालं नाही की माणसं शहरात येतात.शहरात रोजगार असतो. कधी तरी रोजगारही म्हणावे तेवढे वाढत नाहीत. बाहेरून आलेली माणसं बेघर आणि बेरोजगार होतात, पण गावात परत जात नाहीत. कसं जाणार? अमेरिका म्हणजे काही कुबेरभूमी नाही, तिथंही खेड्यातले रोजगार मर्यादितच असतात. माणसं शहराकडं धावतात.
कुठून कुठून माणसं न्यू यॉर्कमधे यावीत? दक्षिण अमेरिकेतून, आफ्रिकेतून, आखाती देशातून, चीनमधून. चक्क गुजरातेतून माणसं अमेरिकेत येतात. गुजरातेत गरीबी आहे काय? थोडीशी असेल. गुजरातेतले गरीब नव्हे तर मध्यम वर्गी सुखवस्तू गुजरातेतून अमेरिकेत येतात. त्यांना अमेरिकेत येऊन श्रीमंत व्हायचं असतं.
दुबाईतला कोणी तरी अमदाबादला विमान घेऊन येतो. खाजगी विमान. व्हिसा नाही, रीतसर तिकीट नाही. अमेरिकेत पोचवतो असं म्हणून काही लाख रुपये घेतो. वाटेत युरोपातले आणि अमेरिकेतले मोठे विमानतळ चुकवून बारक्या विमानतळावर थांबत अमेरिकेकडं जातात. वाटेत ठिकठिकाणी पैसे चारतात. बरेच वेळा पकडले जातात, पैसे घालवून भारतात भिकारी होऊन परततात. काही वेळा अमेरिकेत पोचतात पण नारीकत्व न मिळाल्यानं हमाली करत विना कागदपत्रं दिवस काढतात.
त्यातली काही माणसं रस्त्यावर विसावतात.
बायडन-हॅरिस प्रशासनानं घोषणा केली होती की कोणाही माणसाला रस्त्यावर रहाण्याची पाळी येणार नाही. त्यांचं म्हणणं कागदापुरतं रहातं. सरकारं भले श्रीमंत असतील, त्यांना श्रीमंतांचीही काळजी घ्यावी लागते. गोळा झालेला सर्व पैसा गरीबांच्या कल्याणासाठी सरकार कसा वापरणार? बेघर वंचित रहातात.
गुजरात-पंजाबातले लोक सोडा. त्यांना कितीही पैसे मिळाले तरी कमीच पडतात. बाकीची जनता कधीही सुखासुखी आपलं घर सोडून परगावी वा परदेशी जात नसते. सीरियात युद्ध झालं. अफगाणिस्तानात तालिबाननं उच्छाद मांडला. रुवांडामधे हत्याकांड झालं. माणसं चंबुगवाळं घेऊन युरोप किंवा अमेरिकेत येतात.
अमेरिकेपर्यंत जाणं जमलं नाही तर निदान शेजारच्या देशात तरी जातात. पॅलेस्टिनी लोक पळून शेजारच्या जॉर्डनमधे गेले. रस्त्यावर राहिले. रस्त्यावरच तात्पुरती घरं बांधून राहिले. ही घरं आज तिसऱ्या पिढीतही तात्पुरतीच राहिलीत. आज जॉर्डनमधले तिसरी पिढी आवारा पद्धतीनं जगतेय. ना शिक्षण, ना आरोग्य व्यवस्था, ना कायम स्वरूपी प्रतिष्ठित रोजगार, ना नागरीकत्व. बेघर जन्मतात, बेघर जगतात, बेघर मरतात.
आज अमेरिकेत ७.८ लाख लोक बेघर आहेत. हीच माणसं कधी तरी ड्रगच्या तडाख्यात सापडतात. पकडली जातात. तुरुंगात जातात. चला. म्हणजे त्यांना घर मिळतं. भले दहा बाय पाचचं घर असेल. पण घर मिळतं.
।।