अरब जगातलं क्रौर्य दाखवणारी रियाद सत्तुफची कॉमिक कादंबरी

अरब जगातलं क्रौर्य दाखवणारी रियाद सत्तुफची कॉमिक कादंबरी

सीरिया. होम्स या मोठ्या शहरापासून काही अंतरावरचं तेल माले नावाचं गाव.   रियाद सत्तुफ बापाचं बोट धरून बाजारातून घराकडं निघालेला असतो. वाटेत मुख्य चौक लागतो. बाप, अब्देल रझाक,  अचानक हातातली बादली रियादच्या डोक्यावर उलटी करतो. रियाद घुसमटतो. बाप रियादला जोरात फरफरटत ओढत घराकडं घेऊन जातो. घराच्या जवळ पोचल्यावर रियादच्या डोक्यावरची बादली काढतो. बापानं असं कां केलं ते रियादला कळत नाही. बापाचं लक्ष नाही असं पाहून रियाद पटकन मागं वळून पहातो. चौकात खांबांना प्रेतं लटकत असतात. हफेझ असाद या सिरियाच्या अध्यक्षाच्या आज्ञेवरून विरोधकांना फासावर लटकवण्यात आलेलं असतं.

ही साधारणपणे १९८४ सालची गोष्ट आहे. २०१५ साली  रियाद सत्तुफनं ही घटना आपल्या The arab of the future नावाच्या पुस्तकात रंगवली. रंगवली म्हणजे शब्दशः रंगवली. अरब फ्युचर ही रियादची कॉमिक शैलीची कादंबरी आहे.   कॉमिक कादंबरी. चित्रपट्ट्या काढून त्यात रियादनं आपलं लहानपण जगासमोर ठेवलं आहे. रियादचं हे पुस्तक अमेरिकेत, फ्रान्समधे बेस्ट सेलर झालं. रियादनं हे सूत्र धरून याच नावानं दुसरा भाग प्रकाशित केला, पाठोपाठ तिसरा भागही प्रकाशित केला. आता चौथ्या भागाचं काम तो करतोय. तीनही भाग हातोहात खपले. पश्चिमी जगात, अरब देशांत या पुस्तकाचा खूप खप झाला, खूप चर्चा झाली.

रियाद दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर आहे. रियाद पॅरिसमधे रहातो. धोका असूनही मोकळेपणानं हिंडत असतो, मुलाखती देतो.

रियादचा जन्म १९७८ सालचा. २००४ सालापासून तो शार्ले हेब्डो या साप्ताहिकात व्यंगचित्रं पट्ट्या काढत असे.  दी अरब फ्युचरचा विचार त्याच्या डोक्यात २०११ साली आला. त्या वर्षी बशर असदनी विरोधकांवर वरवंटा फिरवायला सुरवात केली. रियादचे नातेवाईक संकटात होते. त्यांना फ्रान्समधे आणण्यासाठी, त्यांना फ्रेंच विजा देण्यासाठी रियादनं प्रयत्न सुरु केले. फ्रेंच सरकार विजा द्यायला तयार नव्हतं. फ्रेंच सरकारनं अनंत अडथळे उभे केले. रियाद वैतागला. त्या वैतागात त्यानं आपल्या बालपणावर कॉमिक गोष्ट सांगायचं ठरवलं. २००४ मधे रियादनं सुंता या विषयावर एक कॉमिक गोष्ट प्रसिद्ध केली होती. रियादनं ती पुस्तकं प्रकाशकाकडून परत मागवली, आणि त्या कादंबरीत भर घालून कॉमिक कादंबरी तयार केली.  तिथून फ्युचर अरब पुस्तक मालिकेची सुरवात झाली. २०१५ साली मालिकेतलं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं.

रियादचा पिता अब्देल रझाक हा त्याच्या घराण्यातला पहिला शिकलेला माणूस. खिशात पैसे नसताना फ्रान्समधे शिकायला गेला. त्याची दया आली म्हणून म्हणा किंवा कसंही म्हणा क्लेमेंटाईन या तरुण फ्रेंच ख्रिस्ती मुलीनं त्याच्याशी मैत्री केली, लग्न गेलं. अब्देल रझाकनं इतिहास या विषयात पीएचडी केली. त्याला  अरब असण्याचा अभिमान होता.   लिबियात, त्रिपोलीतल्या कॉलेजात,  त्याला एका कॉलेजात लेक्चररची नोकरी मिळाली. तिथंच रियादचा जन्म झाला.

लिबियात गद्दाफीनं हिरवा समाजवाद लादला होता. खाजगी मालकी रद्द झाली होती. सरकार देईल त्या घरात रहायचं. सरकारनं सांगितलं घर सोडा की घर सोडायचं, तुमच्या घरात सरकारनं पाठवलेला दुसरा माणूस येणार. साऱ्या गोष्टी रेशनवर होत्या. कोणी काय खायचं, कसं रहायचं, किती कापड वापरायचं वगैरे गद्दाफी ठरवत असत. त्यांची आज्ञा पाळली नाही तर माणूस खल्लास. एकदा गद्दाफीनं आदेश काढला, प्रोफेसर लोकांनी शेतात राबलं पाहिजे. शेतकऱ्यांनी कॉलेजात शिकवायचं आणि प्राध्यापकांनी शेती करायची. असाच उद्योग एके काळी माओनंही केला होता.अब्देलला ते शक्य झालं नाही. त्यानी लिबिया सोडलं.

होम्स गावात, म्हणजे अब्देलच्या माहेरी, कॉलेजात एक जागा रिकामी होती. अब्देल तिथं गेले. सीरियातली परिस्थिती भयानक होती. धान्य मिळत नव्हतं. घरं, रस्ते, हॉस्पिटलं, काहीच ठीक नव्हतं. पण आपल्या गावात आलोय हेच अब्देलना  फार मोलाचं वाटत होतं.

होम्समधे रियाद गेला तेव्हां तो सहा सात वर्षाचा होता. एक मोठं संयुक्त कुटुंब होतं. अनेक भावंडं होती, काके-मामे-मावश्या होत्या. रियादनं तिथं पहिल्यांदाच ‘ यहुदी ‘ शब्द ऐकला. यहुदी म्हणजे ज्यू. मुसलमान ज्यूना दुष्ट समजतात, ज्यूंचा नायनाट करणं हे मुसलमानांचं धर्मकर्तव्य असतं. रियादच्या एका भावानं त्याला यहुदी असं म्हणून हेटाळलं. कारण रियाद दिसायला आईच्या वळणावर गेला होता. त्याचे केस सोनेरी होते, रंगही गोरा होता, तो फ्रेंच असल्यासारखा दिसे. त्याची आई फ्रेंच, ख्रिस्ती होती म्हणून सारं खानदान त्याला कमी लेखत असे. दांडगे भाऊ त्याला सतत छळत, मारत. एकदा आज्जीनं बाजारातून सफरचंदं आणली होती. रियादचे भाऊ एकेक सफरचंद चावत आणि रस्त्यावर फेकून देत. रियाद नुसता पहात बसे. आज्जी त्या भावांचंच कौतुक करे.

रियादला चित्रकला शिकवण्यासाठी एक मध्यमवयीन स्त्री येत असे. एके दिवशी तिला तिच्या वडिलानी गळा दाबून ठार मारलं. कारण लग्न झालेलं नव्हतं तरीही ती गरोदर होती. यावरून रियादचे आई वडील भांडले. वडील म्हणत होते की लग्न झालेलं नसतांना गरोदर रहाणं म्हणजे घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवणं. अरब संस्कृतीनुसार तिला मारणं, ऑनर किलिंग, हाच उपाय असतो. आई म्हणाली की हे कृत्य अमानुष आहे, स्त्रीवर अन्याय करणारं आहे. रियादच्या आईनं पोलिसांत तक्रार केली.  खुनी माणसाला अटक झाली. पण काही दिवसांतच तो सुटून छाती उंचावून फिरू लागला. गावाचं, पोलिसांचं म्हणणं होतं की तुरुंगात टाकणं हे अरब संस्कृतीत बसणारं नव्हतं. रियादनं आपल्या दुसऱ्या कादंबरीत हा प्रसंग चितारला आहे.

रियादनं दैनंदिन जीवनात जे जे पाहिलं ते आपल्या कादंबऱ्यांत रंगवलं आहे. कुत्री मांजररांना मुलं माणसं सहजगत्या पकडत, फावड्यानं ठार मारत, एका अणकुचीदार काठीवर खोवून त्याची मिरवणूक काढत. पुस्तक विकत घेण्याची कुवत नसलेल्या विद्यार्थ्यांना मास्तर वर्गात झोडपून काढत. धनवान माणसं गरीबाला मारत. सत्तेतला माणूस सत्तेत नसलेल्याला मारे. बलवान माणूस अशक्त माणसाला मारे.ज्यू, शिया, सुन्नी,ख्रिस्ती कोणीही मारला जाऊ शके. समाजउतरंडीवरची माणसं वरच्या माणसापुढं वागतात आणि खालच्या माणसाला लाथा घालतात.

रियादच्या बापाचं वागणं असह्य झाल्यावर  रियादच्या आईनं काडीमोड घेतला, दोन मुलांना घेऊन फ्रान्समधे स्थायिक झाली. कष्ट करून मुलाना वाढवलं. पॅरिसमधेही रियादला शाळेत छळवाद झाला. तो  चांगलं फ्रेंच बोलत असला,   दिसायलाही फ्रेंच दिसत असला तरी त्याचं नाव रियाद असल्यानं त्याला वाळीत टाकलं गेलं. त्याच्या नावाचं गलिच्छ रूप करून त्याला हिणवलं गेलं. रियादला अरबांनी दूर ठेवलं आणि फ्रेंचांनीही सामावून घेतलं नाही.

रियादचे सारे अनुभव त्याच्या कॉमिक कादंबऱीत आलेले आहेत. जवळ जवळ १० वर्षं रियादनं शार्ले हेब्डो या प्रसिद्ध व्यंगचित्र साप्ताहिकात काम केलं. त्यामधे त्यानं फ्रेंच मुलांच्या जीवनावरच्या कॉमिक चित्रपट्ट्या काढल्या, त्या गाजल्या.

रियाद म्हणतो की राष्ट्रवाद वगैरे सगळं झूट आहे,  आपले दोष झाकण्यासाठी, आपल्यातलं क्रौर्य लपवण्यासाठी राष्ट्रवाद नावाचा व्यवहार लोकं अंगिकारतात. अरब राष्ट्रवाद, सीरियन राष्ट्रवाद, फ्रेंच राष्ट्रवाद इत्यादी सगळे राष्ट्रवाद एकाच प्रकारचे आहेत असं रियाद म्हणतो.

कॉमिक पुस्तकं हा कादंबरीचा आकृतीबंध अलिकडं लोकप्रिय झाला आहे. चित्रं वाचायला सोपी असतात. माणसाची देहबोली, चेहऱ्यावरचे भाव चित्रामधे जितके चांगले समजतात तितके शब्दातून समजत नाहीत. कार्टून किंवा कॅरिकेचर ही पद्धत व्यक्तिंचे अनेक पैलू हलक्या विनोदातून सांगते. शंकर, सरवटे, मारियो यांची व्यंगचित्रं आठवून पहावीत.  कॅरिकेचरमधे  हळुवारपणे माणसाच्या व्यक्तिमत्वातल्या बोचऱ्या भागावर बोट ठेवता येतं. व्यक्तीचं एकादं ठळक वैशिष्ट्यं, एकादा ठळक दृश्य भाग कॅरिकेचरमधे वेधकपणे दाखवता येतो. कोणाचं नाक मोठं असतं, कोणाचे ओठ मोठे असतात. कोणाच्या हातातली काठी किंवा छत्री वेधक असते. कोणाची केसाची ठेवण वेधक असते. हर्ज या चित्रकाराचं टिनटिन हे कॉमिक जगातलं सर्वात जास्त प्रसिद्ध, सर्वात जास्त खपलेलं, सर्वात जास्त लोकप्रिय कॉमिक होतं. त्यातला टिनटिन, टिनटिनचा कुत्रा आणि इतर पात्रं लोकोत्तर ठरली. टिनटिनची गोष्ट म्हटली तर एक काल्पनिक साहस होतं म्हटलं तर संस्कृतीवरचं एक बोचरं टिपण होतं. मुलं आणि प्रौढ, दोघांनीही टिनटिन तुफ्फान वाचलं.

रियादची शैली हर्जच्या शैलीपेक्षा वेगळी आहे. हर्जच्या चित्रात खूप तपशील असतात, चित्रं कोरीव असतात. रियादची चित्र ढोबळ, काहीशी बटबटीत असतात. रियादच्या चित्रातली माणसं  मिकी माऊसमधल्या पात्रांच्या जवळ जाणारी आहेत. रियादच्या शैलीमुळं  कॉमिकची वाचनीयता कमी होत नाही, कथनातली वाचनीयता कमी होत नाही. रियादची ती एक वेगळी शैली आहे येवढाच अर्थ घ्यायचा.

एकामागोमग एक असे शब्द वाचत जाणं डोळ्याला आणि डोक्याला शीण आणतं. शब्दाचा आकार मोठा करून डोळ्यावरचा ताण कमी करता येतो. मजकुरात चित्रं टाकूनही वाचन सुसह्य करता येतं. कॉमिक हा वाचन सुसह्य करण्याचा उत्तम मार्ग ठरतो.

या आकृतीबंधात लहान मुलांबरोबर  मोठ्यांसाठीही गोष्टी सांगितल्या जातात. लहान मुलांसाठी परीकथा असतात, फँटसी असते, प्राण्यांभोवती गोष्टी गुंफल्या जातात. मोठ्यांसाठी विज्ञानफिक्शन असतात, गुन्हेकथा असतात, चातुर्यकथा असतात, रेग्यूलर कादंबऱ्याही असतात. पोर्नो कादंबऱ्याही असतात. कॉमिक पुस्तकांत जपान आघाडीवर आहे. या साहित्यावर नंतर एनिमेटेड सिनेमे केले जातात.

इतिहास इत्यादी गंभीर विषय कॉमिकमधे सहसा हाताळले जात नाहीत. आर्ट स्विडलमननं ज्यू छळछावणी हा विषय घेऊन मॉस नावाची कादंबरी कॉमिक रुपात प्रसिद्ध केली होती. ऑशविझच्या छळछावणीतून वाटावलेल्या लोकांच्या अनुभवावर ही कादंबरी आधारित होती. त्यानंतर रियादची ही गंभीर कादंबरी.

रियादनं २०१४ मधे सेक्रेट लाईफ ऑफ युथ या नावाची एक कॉमिक गोष्ट चितारली. गोष्ट आहे एका शाळेतल्या मुलांच्या पौगंडावस्थेची. या शाळेचा प्रिंसिपल म्हणत असे की आमच्या शाळेत शिवी ऐकायला मिळणार नाही. ( कॉमिकमधे शाळेत दिल्या जाणाऱ्या शिव्यांचा उल्लेख आहे. मराठी वाचकांना अशा शिव्या वाचायची सवय नसल्यानं त्या इथं दिलेल्या नाहीत.) प्रत्यक्षात पोरं कायच्या काय शिव्या द्यायची, सेक्सबद्दल बोलायची, वाचायची. रियादनं ते अनुभवलं, चितारलं. मुलं काय बोलतात ते (चोरून) ऐकण्यासाठी रियादनं  पॅरिसमधल्या एका शाळेत  दोन आठवडे मुक्काम केला.

समीक्षक म्हणतात की रियाद हा एक स्पंज आहे. तो वातावरणात जे जे असेल ते ते शोषून घेतो. शोषून घेताना स्वतःचे विचार, स्वतःची मतं इत्यादी गाळण्या नाहिशा होतात. निरीक्षण हा क्रिएटिव कलाकाराचा महत्वाचा घटक असतो. कलाकार कितीही तटस्थ रहायचा प्रयत्न करो, शेवटी त्याचे विचार, त्याचं व्यक्तिमत्व, निरीक्षणात काही प्रमाणात अडथळे निर्माण करत असतं. रियादच्या बाबतीत ते अडथळे नसतात हे समीक्षकांचं म्हणणं रियादच्या चित्रातून लक्षात येतं. त्यानं बालपणात घेतलेले अनुभव प्रदुषित न होता, तटस्थपणे पुस्तकातून वाचकांसमोर येतात.

रियादच्या पुस्तकावर वादंग झाले. डावे, मुसलमान, अरब या मंडळींचं म्हणणं की रियाद अरब-इस्लामी संस्कृतीचं विकृत रूप मांडतोय. रियाद म्हणतो की मी काहीच म्हणत नाहीये, माझ्या पुस्तकात राजकारण नाहीये, लहानपणी अनुभवलंय तेच  पुस्तकात लिहिलंय, अर्थ वगैरे काढणं हे वाचकांचं काम आहे, आपण फक्त वास्तव मांडलंय.

।।

 

 

5 thoughts on “अरब जगातलं क्रौर्य दाखवणारी रियाद सत्तुफची कॉमिक कादंबरी

  1. लेख आवडला।
    चित्रकादंबरी करायला श्री गजू तायडे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान ची फेलोशिप मिळाली आहे।

  2. This is quite a fascinating coverage that has the authors’ input on how Riad Sattuf be understood through his creative writing based on experiences since his childhood in Syria to the present in France. Another bold Salman Rushdie in the making?

  3. रियाद ची माहिती वाचता वाचता अरब देशातील माहितीही मिळाली. धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *