अरब स्प्रिंग, नरसंहारांवरच्या डॉक्युमेंटऱ्या,प्रेसिडेंट, व्यक्ती नव्हे एक वस्तू, गाढव समाज नष्ट होण्याची भीती.
अरब स्प्रिंग, मागले पाढे पंचावन्न.
१० वर्षांपूर्वी ट्युनिशियात महंमद बुआझिझी या फेरीवाल्यानं स्वतःला जाळलं आणि अरब स्प्रिंग क्रांती उफाळून आली. येमेन, लिबिया, इजिप्त, सीरिया या देशात तरुणांनी बंडं केली. तरुणांची मुख्य मागणी लोकशाही आणि स्वातंत्र्याची होती.
एकट्या ट्युनिशियात सत्ता बदल झाला, तिथं लोकशाही सुरु झाली. येमेन, सीरिया आणि लिबियात यादवी माजली, सत्ता आणि दडपशाही टिकून राहिली. इराक, लेबनॉन, सुदान, सुदान मधे स्थिती २०१० च्या तुलनेत जर्राशी बदलली. इजिप्तमधे अल सिसि यांची हुकूमशाही आणखी मजबूत झाली. सौदी अरेबियात महंमद सुलतान यांनी विरोधकांना तुरुंगात ढकललं, विरोधाला वावच ठेवला नाही.
सत्ताधारी घराणं किंवा माणूस, त्याच्या मागं मशीद, दोघांनाही मतभेद मान्य नसतो. हे वास्तव आहे, ही तिथली परंपरा आहे. नागरीक सत्तेच्या मेहेरबानीवर अवलंबून असतो. पैसे देऊन, कौटुंबिक संबंध वापरून माणसं आपापलं हित सांभाळतात. लोकशाही, जबाबदार सरकार इत्यादी गोष्टीविना माणसं जगत असतात. असा हा तोल अजून शिल्लक आहे. सत्तेच्या हाती तेलातून आलेला पैसा जोवर आहे तोवर लोकांना काही अंशी पोसणं आणि काही अंशी गप्प ठेवणं जमेल. आर्थिक सुबत्ता जेव्हां धोक्यात येईल त्या वेळी बदलाच्या शक्यता निर्माण होतील.
एकूणात विचार करता अरब प्रदेशात लोकशाही निर्माण व्हायला वेळ लागेल येवढाच अर्थ घ्यायचा.
।।
नरसंहारांवरच्या डॉक्युमेंटऱ्या.
१९७५ ते १९७९ या चार वर्षात पॉल पॉट या कम्युनिष्ट पुढाऱ्यानं कांपुचियात सुमारे २० लाख माणसं मारली. कम्युनिष्ट विरोधक मारून टाकून त्याला एक कम्युनिष्ट समाज निर्माण करायचा होता. या काळात माध्यमाच्या सर्व खाणाखुणाही पॉल पॉटनं पुसून टाकल्या. फिल्म व्यवसायातली माणसं वेचून वेचून ठार मारली. या भयानक काळात वाचलेल्या माणसांच्या मुलाखती, त्या काळात चोरून केलेलं चित्रण यांच्या आधारे कंपुचियन फिल्मवाल्यांनी डॉक्युमेंटऱ्या केल्या.
राया मोरॅग यांचं Perpetrator Cinema हे पुस्तक त्या डॉक्युमेंटऱ्यांचा अभ्यास करतं. Rithy Panh, Rob Lemkin and Thet Sambath, and Lida Chan and Guillaume Suon या डॉक्युमेंटरी निर्मात्यांच्या डॉक्युमेंटरींचं विश्लेषण या पुस्तकात आहे.
लेखिका म्हणते की रवांडा, जर्मनीतला ज्यू नरसंहार अशा घटना घडून गेल्यानंतर डॉक्युमेंटरी करणारी माणसं तडजोडीच्या मूडमधे असतात. गुन्हेगारांना माफ करा, नव्यानं समाज बांधा असं डॉक्युमेंटऱ्या सांगतात. परंतू कांपुचिया हत्याकांडानंतर तयार झालेल्या डॉक्युमेंटऱ्या वेगळं सांगतात. त्या होरपळलेल्या लोकांच्या मुलाखतीतून सांगतात की गुन्हेगारांना शोधून काढा आणि त्यांना जबर शिक्षा द्या, जेणे करून भविष्यात कोणी हा उद्योग करणार नाहीत.
या डॉक्युमेंटरीत हत्याकांडाची दृश्यं, होरपळलेल्या माणसांचे अनुभव आणि गुन्हे करणारी माणसं अशा तीन गोष्टी एकमेकासमोर ठेवलेल्या आहेत. डॉक्यूमेंटऱ्या फार भेदक झाल्या आहेत.
राया मोरॅग या जेरुसलेम युनिवर्सिटीत चित्रपट विषयाच्या प्राध्यापक आहेत.
Perpetrator Cinema.
Raya Morag. Wallflower Press.
।।
प्रेसिडेंट, व्यक्ती नव्हे एक वस्तू.
प्रेसिडेंट झाल्यानंतरचा बराक ओबामा यांचा पहिलाच परदेश दौरा होता.
अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळली होती. अफगाणिस्तान आणि इराकमधे अमेरिका गुंतली होती. उत्तर कोरिया आणि इराण अण्वस्त्रं परजत होते. वरील संकटं तयार झाली होती इतरांच्या राजवटीत आणि त्यांच्यावरची उत्तरं जग ओबामा यांच्याकडून मागत होतं.
ओबामानी फ्रान्सकडं अफगाणिस्तानसाठी पैसे, शस्त्रं आणि सैनिक मागितले. फ्रान्स तयार नव्हतं, अफगाणिस्तानाच्या चिखलात रुतायची फ्रान्सची तयारी नव्हती.
प्रवासात असतानाच विमानात रात्री उशीरा बातमी आली की उत्तर कोरियानं एक मिसाईल परीक्षण केलंय.ओबामांना उठवण्यात आलं. राष्ट्रीय सल्लागार गोळा झाले, इतर मतदनीस गोळा झाले. ताबडतोब प्रतिक्रिया तर द्यायलाच हवी होती.
येव्हांना दौरा सुरू होऊन आठेक दिवस झाले होते. ओबामा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना झोप मिळत नव्हती. ओबामांच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळं तयार झाली होती.
” मला तासभर झोपू द्या. तुम्हीच एकादं स्टेटमेंट तयार करा, मी झोप झाल्यानंतर त्यावर निर्णय घेतो.”
सारं जग ओबामाच्या स्टेटमेंटची वाट पहात होतं.
उत्तर कोरिया असंच जगाशी फटकून राहून अण्वस्त्र चाचण्या आणि मिसाईल चाचण्या करणार असेल तर ते त्यांना महागात पडेल असं वक्तव्यं ओबामांच्या नावानं विमानातून प्रसिद्ध झालं. ते प्रसिद्द झालं तेव्हां ओबामा झोपेतच होते. जगानं या व्यक्तव्याबद्दल कौतुक केल्याचं दुसऱ्या दिवशी सकाळी ओबामानं कळलं तेव्हां त्यांना कळलं की असं असं वक्तव्य आपल्या नावानं केलं गेलं होतं.
तुर्की पार्लमेंटसमोर ओबामांचं भाषण होतं. तुर्की प्रेसिडेंट एर्डोअन विरोधकांना चेपत होते. त्या बद्दल ओबामानी त्याना झापावं अशी ओबामा समर्थकांची अपेक्षा होती. तुर्कीनं विसाव्या शतकात आर्मेनियनांचा नरसंहार केला होता, त्या बद्दल तुर्कीला क्षमा मागायला लावा असं मानवी स्वातंत्र्यवाले अपेक्षित होते.
ओबामानी दोन्ही गोष्टी केल्या नाहीत. अमेरिकेच्याही हातून इतिहासात चुका झाल्या आहेत. लोकशाही वाटेनं प्रश्न सोडवता येतात असा अमेरिकेचा अनुभव आहे, तोच जगाच्या उपयोगी पडेल असं ओबामा म्हणाले.
ओबामा विरोधक चॅनेलनी ओबामावर टीका केली की त्यांनी अमेरिकेचं श्रेष्ठत्व न सांगता अमेरिकेच्या चुका कबूल केल्या.
पहिल्याच दौऱ्यात ओबामा थकले. म्हणाले ” लोकांना वाटतं की प्रेसिडेंट होणं किती छान असतं. पण तसं नसतय, फार त्रास असतो…मला माझ्या विचारानुसार वागता येत नाही, नुसती पानं पुढं सरकवत रहावं लागतं.”
दौरा सुरु होत असताना विमानात माईकवरून सतत अनाऊन्समेंट होत. प्रेसिडेंड पंधरा मिनिटात येतील. प्रेसिडेंट विमानात पोचले आहेत. प्रेसिडेंट विश्रांती घेत आहेत. प्रेसिडेंटनी सल्लागाराना बोलावलं आहे.
कुठंही ओबामा असा उल्लेख नाही.
बराक ओबामा ही व्यक्ती उरली नव्हती ती एक प्रेसिडेंट नामाक वस्तू झाली होती.
।।
गाढव समाज नष्ट होण्याची भीती.
जगभरात सध्या गाढवांना जाम मागणी आलीय. कारण चीनला गाढवं हवीयत.
कारण कारण साधं आहे. कारण काही चिनी देशी औषधात गाढवाचं कातडं वापरलं जातं. गाढवाच्या कातडीमधे वेदनानाशक गुण आहेत असं चिनी देशी औषधवाल्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणे की कातडीतल्या औषधी गुणांमुळं चेहऱ्यावरच्या पुटकुळ्या नाहिशा होतात.
चीनमधे सुमारे १० लाख गाढवं जन्मतात. पण औषधांसाठी ४० लाख गाढवं लागतात. त्यामुळं येव्हांना चीनमधली गाढवं संपलीत.
चीनमधे गाढवांना मार्केट आहे हे कळल्यावर कझाकस्तानातून गाढवांची आयात सुरु झाली. सापडलं गाढव की पाठवा चीनमधे. गाढवाच्या किमतीही चौपट झाल्या.
कझाकस्तानची वाळंवंटी आणि पहाडी अर्थव्यवस्था गाढवावर अवलंबून आहे. गाढव हे सर्वात स्वस्त आणि कार्यक्षम वाहन आहे. काम झालं की त्याला लाथ घालून हाकलून द्यायचं, ते गावभर फिरून आपलं पोट भरतं. त्याला ना पशुखाद्य द्यावं लागतं, ना इंजेक्शन.
पण गाढवं चीनमधे रवाना होऊ लागली आणि आता कझाकस्तानची अर्थव्यवस्था गडबडली आहे. कदाचित चिनी बनावटीचे ट्रक त्यांना विकत घ्यावे लागतील.
चीननं आफ्रिकन देशात पैसे गुंतवलेत. तिथं गाढवं वाढवणाऱ्या आणि पाठवणाऱ्या कंपन्याही चीननं काढल्या आहेत. आफ्रिकेतून धडाधड गाढवांची निर्यात होऊ लागलीय. द. आफ्रिका, नायजेरिया, बोटस्वाना या देशांनी गाढव पैदाशीला प्रोत्साहन दिलं असून निर्यातीचा कोटा टरवून दिला आहे. पण कोट्याची ऐशी की तैशी करून काळ्या बाजारात गाढवं विकली जाताहेत. केनयात गाढवाची सरासरी किमत ४० डॉलर होती ती १६० डॉलरवर गेलीय.
आफ्रिकन देशांतली गाढवं कमी होत चाललीयत, तिथं गाढवांचा काळाबाजार होतोय, तिथल्या अर्थव्यवस्थाही बिघडत आहे. बोटस्वानानं गाढवांच्या निर्यातीवर बंदी घातलीय.
जगात सुमारे ४ कोटी गाढवं जन्मतात. चिन्यांची मागणी पूर्ण करण्याच्या नादात उद्या गाढव ही जमातच नष्ट होण्याची भीती लोकांना वाटतेय.
।।