अरूणा पवार यांच्या आठवणी काढायची सवय आता लावायला हवी
अरुणा पवार गेल्या.
म्हटलं तर अचानक.म्हटलं तर त्यांच्या जाण्याची कुणकुण बरेच दिवस लागली होती. कारण त्यांना कॅन्सर होता. त्यावर त्या उपचार घेत होत्या. उपचाराच्या पहिल्या फेरीनंतर त्या छान झाल्या होत्या. डोक्यावरचे केस गेले असताना तर त्या खूप देखण्या दिसत होत्या. उपचारानंतर त्यांना एक नवंच आयुष्य मिळालं होतं. पण ते तसं नव्हतं. कॅन्सरनं उचल खाल्ली. डॉक्टर मंडळींनी उपचारांची शिकस्त केली. अरुणा पवार जे काही समजायचं ते समजल्या. अगदी आनंदानं, आपण आजारी आहोत याची जाणीवही कोणाला होऊ नये असं वागत त्यांनी शेवटले दिवस वरवर आनंदात काढले. वरवर आनंदात पण आतून अतीव वेदना त्याना होत होत्या. वेदना दाबून टाकणाऱ्या औषधांचा मारा डॉक्टरांनी केला. वेदना काही कमी होईनात. पण अरूणाचा जगण्याचा उत्साहही कमी होत नव्हता. वेदना आणि जगण्याची आनंदी ओढ या ओढाताणीत शेवटी वेदनांवर मात करून अरूणा पवार शांत झाल्या.
अरूणा पवार विनोद पवार यांच्या पत्नी होत्या आणि ऋतू पवार यांच्या आई होत्या. हे तर खरंच. तेव्हां अरुणा पवार गेल्या म्हणजे काय झालं ते त्यांना जितकं कळेल तितकं इतरांना कळणार नाही. हेही खरंच.
पण हेही खरंच की अरूणा पवार विनोद, ऋतू, विनोदचे आई वडील, विनोदचे नातेवाईक, अरूणाचे आई वडील आणि नातेवाईक आणि या सर्वांच्या भोवती पसरलेले नातेवाईक आणि मित्र यांच्या गोतावळ्यात सर्व ठिकाणी सतत आनंदानं वावरणारी एक व्यक्ती होती.
कोणाच्या घरी पाळणा हलणार याची बातमी लागली की त्या घरी अरूणानं केलेले पौष्टिक लाडू पोचवायची कामगिरी विनोद आणि ऋतूवर येत असे. अरूणानं बाळासाठी तयार केलेले पायमोजे, हातमोजे, टोपरं, स्वेटर सारं इतकं गोड असे की बाळाच्या घरच्या मंडळींवा वाटे की या बाईनं त्यांनाही असंच काहीबाही द्यायला हवं. अरूणाच्या हाती सतत सुया आणि दोरे आणि धागे. मुंबईत, महाराष्ट्रात, देशात, परदेशातही अरूणानं विणलेले क्रोशाचे रुमाल दिसतील.
अरूणाला रंगांची एक खास जाण होती. साडी, पँटचं कापड, टेबल क्लॉथ, चादरी. काहीही असो. कोणाच्या घरात कोणत्या रंगाचं आणि प्रकारचं कापड योग्य दिसेल हे त्यांना समजत असे. देशात, परदेशात कुठंही हिंडायला गेल्या की मित्रपरिवारातल्या मंडळींसाठी साड्या, कापडं त्या घेऊन येत. असंख्य मैत्रिणी, मित्रांच्या पत्न्या. प्रत्येकीसाठी शोभणारी साडी कशी काय त्यांना सापडायची हे कोडं सांगायला आता अरूणा नाहीत.
एक म्हण आहे. माणूस काबीज करायचा तो त्याच्या पोटातून. अरूणा आमिष, सामिष स्वयंपाक करत असत. स्वतः मासे खात नसत पण त्यांच्या हाती सापडलेला मासा सुखानं खादाडांच्या पोटात जायला तयार होई अशी ट्रीटमेंट त्या माशाला मिळत असे. पदार्थांची गंमत आणि रंगत आणतात मसाले. अरूणाना मसाले तयार करण्याचं गणित समजलं होतं. ब्राह्मणी असो की शहाण्णव कुळी, सर्व मसाले अरूणाच्या हातून एकदम साच्यातून निघावेत इतके सारखेपणानं लोकांच्या चवी चोंबाळत असत. त्यामुळं अरूणाच्या घरी जाऊन समजा हादडता आलं नाही तरी अरूणाचा डबा किंवा त्यांनी तयार पाठवलेल्या मसाल्यांच्या पुड्या तर अनेकांना मिळायच्या. दारुबिरू पिणाऱ्यांना लागणारे पदार्थ असोत की दिवाळीचा पवित्र फराळ असो. प्रत्येक बाबतीत अरूणाचा हात फार चविष्ट होता. परदेशातल्या कित्येक लोकांना जेव्हां अरुणा गेल्याची बातमी समजेल तेव्हां त्यांना त्यांच्या फडताळात विसावलेले अरुणानं पाठवलेले मसाले, पदार्थ, आठवतील.
लक्षात येईल की किती माणसं अरूणा पवार यांनी काबीज केली असतील.
जगात माणसं सांभाळणं ही एक महाकठीण गोष्ट असते. प्रत्येक माणूस आणि प्रत्येक कुटुंब हे स्वभावाच्या कंगोऱ्यांचं एक जंजाळ असतं. अशा अनंत जंजाळांना अरूणानं आपलंसं केलं होतं. मराठी माणसातली सगळी वैशिष्ट्यं आपल्या व्यक्तिमत्वात सांभाळत अरूणानं माणसं सांभाळली. कोण तऱ्हेवाईक आहे, कोण चिडचिड करणारं आहे, कोण स्वार्थी आहे, कोण कसं आणि कोण कसं. अरूणा म्हणे ” माणसं अशीच असणार की नाही, आपण काय कमी असतो?”. अशा कोणाही माणसाच्या घरी आजार निघाला, काही संकट निघालं कीही बाई लगेच निघालीच. मदतीला. सतत कोणा ना कोणाकडं असल्यानं माणसाच्या कंगोऱ्यांचे विषय निघाले की अरूणा ते गंमतीनं, तक्रार नसलेल्या सुरात, विनोदानं सांगे, विषय बदलून आनंदाच्या गोष्टींकडं वळे.
जग आणि माणसं कळणं आणि हुशारीनं आणि आपलेपणानं त्या जगाशी छान जुळवून घेत ते आनंदी करण्याची खटपट करणं.
विनोद पवार हा एक सार्वजनिक माणूस. त्याचं स्वतःचं असं फार कमी असतं. त्याचा पाय एका ठिकाणी ठरत नाही. हे वास्तवही अरूणानं छान पचवून विनोदचं सार्वजनिक जगणं सुकर करून टाकलं होतं. अरूणालाही खरंच स्वतःचं असं काय होतं?
उपचाराच्या पहिल्या फेरीनंतर ही बाई टुण्णकन आपल्या दुखऱ्या पायांवर उभी राहिली. जगभर फिरू लागली. मैत्रिणी, नातेवाईक, विनोद आणि ऋतूचे मित्र. अरूणाचा वावर पूर्ववत सुरु झाला. भेटणाऱ्या माणसांना वाटे की ही बाई कॅन्सरचं नाटक करतेय. इतकी आनंदी.
पण अरूणाला आतून समजलं असावं की आपलं काय होतंय. कधीही इतरांना जाणीव होऊन दिली नाही. भेटायला येणाऱ्या माणसाला कसं आनंदात ठेवू याच विवंचेत असे. विनोद आणि ऋतुलाही ते कळत असणार. पण तेही अरूणाच्या सहवासात आणि प्रभावानं तयार झालेले. दोघंही जणू काहीच घडलेलं नाही अशा थाटात त्यांचे उद्योग करत होते.
अरूणा पवार ही कोणाची तरी पत्नी होती, कोणाची तरी आई होती, कोणाची तरी मुलगी होती, कोणाची तरी सून होती. तेवढंच असतं तर अरूणाचं जाणं ही गोष्ट खाजगी, कौटुबिंक राहिली असती. पण अरूणा त्याही पलीकडं होती. नाटक, चित्रपट, कविता, गाणी, कथा-कादंबऱ्या इत्यादी क्षेत्रातल्या माणसांमधे ती वावरत होती, एक आनंदी स्त्री म्हणून. त्या क्षेत्रातल्या असंख्य माणसांशी तिचं एक आनंदाच्या धाग्यानं जोडलेलं नातं होतं.
चला. आता अरूणा पवारच्या आठवणी काढायची सवय लावून घ्यायची.
।।