अशा भीषण माणसाच्या हातात नागरीक देश सोपवतात.

अशा भीषण माणसाच्या हातात नागरीक देश सोपवतात.

डोनल्ड ट्रंप ही काय चीज आहे ते केवळ एका पत्रकार परिषदेत स्पष्टपणे कळलं.

ब्रिटीश प्रधान मंत्री कीर स्टार्मर युक्रेन व इतर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी वॉशिंग्टनला गेले होते. ट्रंप यांच्या मंत्री मंडळाबरोबर चर्चा, जेवतांना चर्चा आणि नंतर ट्रंप यांच्याबरोबर चर्चा अशा तीन सत्रांमधे युक्रेन प्रश्न चर्चिला जाणार होता. त्यात काही एक धोरण ठरणार होतं. नंतर संयुक्त पत्रकार परिषदेत संयुक्त वक्तव्य जाहीर होणार होतं.

वरील चर्चासत्रं सुरू व्हायच्या आधीच ट्रंप आणि स्टार्मर यांनी पत्रकार परिषद घेतली.

१. दुसऱ्या दिवशी झेलेन्सकी अमेरिकेत ट्रंपना भेटण्यासाठी येणार होते. 

काही दिवसांपूर्वी ट्रंपनी झेलेन्सकी यांची संभावना ‘हुकूमशहा’ या शब्दात केली होती. झेलेन्सकी निवडणुक घेत नाहीत, झेलेन्सकी यांना चार टक्के नागरिकांचीही पसंती नाही’ असं ट्रंप म्हणाले होते.

एक पत्रकार म्हणाला ‘तुम्ही तर म्हणालात  की झेलेन्सकी हुकूमशहा आहे..’

ट्रंप यांचा चेहरा मख्ख होता. ते म्हणाले ‘ मी तसं म्हणालो? मी तसं म्हणालो यावर माझा विश्वास बसत नाहीये’

काही वेळानं ट्रंपनी झेलेन्सकींवर स्तुतीसुमनं उधळली. ट्रंप म्हणाले ‘झेलेन्स्की हा माझा ग्रेट फ्रेंड आहे. आमची रिलेशन्स ग्रेट आहेत. आम्ही ग्रेट काम करणार आहोत….’

२. ट्रंप म्हणाले ‘युक्रेनचे झेलेन्सकी उद्या मला भेटायला येणार आहेत; अमेरिकेला हवी असलेली  अब्जवधी डॉलरची दुर्मीळ खनीजं खणायला परवानगी देणाऱ्या करारावर ते सही करणार आहेत. त्या पैशामुळं त्यांनाच मदत होणार आहे.’

वरील वाक्य पूर्ण झाल्यावर लगेचच ट्रंप म्हणाले ‘पण इतकी खनीजं त्यांच्या खाणीत आहेत की नाहीत ते माहीत नाही, नसतीलही.’ 

३. आपण लवकरच (युक्रेन युद्धाबाबत) शांतता करार करणार आहोत असं ट्रंप म्हणाले. शेजारी युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर बसलेले. 

स्टार्मर म्हणाले ‘करारामुळं पुतीन यांचा फायदा होता कामा नये, पुतीन यांनी केलेल्या आक्रमणाला शाबासकी मिळता कामा नये. करार झाल्यानंतर पुतीन जर तो करार पाळणार नसतील तर कराराच्या बाजूनं युके उभं राहील, युकेचे सैनिक त्यासाठी युक्रेनमधे उतरतील.’

पुतीननी आक्रमण केलं होतं,युद्धाला युक्रेनला जबाबदार धरणं योग्य नाही असं स्टार्मर यांचं मत होतं. ट्रंप बरोबर उलटं बोलले होते. युद्ध झेलेन्सकीनीच ओढवून घेतलं असं ट्रंप म्हणाले होते.

यावर पत्रकारांनी ट्रंपना विचारलं ‘ कराराची अमलबजावणी करण्यासाठी अमेरिकन सैन्य युक्रेनमधे जाईल काय?’

ट्रंप म्हणाले ‘अमेरिकन सैन्याचं पाऊल युक्रेनमधे पडणार नाही.’

पत्रकारांनी विचारलं ‘ब्रिटीश सैन्य युक्रेनमधे जाणार आहे. तुम्ही त्या सैन्याला मदत करणार?’

ट्रंप म्हणाले ‘ कशाला मदत करायची? मी नाही मदत करणार.त्यांच्याकडं सैनिकी कोशल्य आहे, शोर्य आहे, त्यांना मदत लागणार नाही.’

पण  हे वाक्य पूर्ण झालं आणि लगोलग ट्रंप म्हणाले ‘ त्यांना मदतीची जरूर लागली तर मी त्यांच्यासोबत सदैव राहीन’

तात्पर्य काय? ट्रंप यांनी कसलाही विचार केलेला नाही, कोणतंही साधार धोरण त्यांच्याकडं नाही, दर मिनिटाला त्यांचं धोरण बदलू शकतं.

४. ही पत्रकार परिषद होत असतानाच टेटबंधू (अमेरिकन) फ्लोरिडातल्या विमानतळावर उतरले होते. 

टेटबंधूंवर रोमानियात बलात्कार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खटला चालला होता. आरोप सिद्ध झाले होते, अधिक चौकशी चालू होती. अमेरिकन सरकारच्या वतीनं रोमानियन सरकारवर दबाव टाकण्यात आला आणि टेटना अमेरिकेत येऊ द्या असा दम देण्यात आला होता. रोमानियन सरकारनं पड खाऊन टेट बंधूंना अमेरिकेत जाऊ दिलं होतं.

पत्रकार परिषद होत असतांनाच जगभरच्या वाहिन्यांवर टेटबंधूंचं विमान दाखवलं जात होतं आणि एका भीषण गुन्हेगाराला अमेरिकन सरकार कसं संरक्षण देतंय याची माहिती प्रसारीत करत होतं.

एका पत्रकारानं ट्रंपना विचारलं ‘ गुन्हेगार टेटबंधू अमेरिकेत परतले आहेत, या बद्दल तुमची प्रतिक्रिया काय?’

ट्रंप म्हणाले ‘त्या बद्दल मला काहीच माहिती नाही.’

ट्रंप मख्ख होते.

शेजारी बसलेल्या स्टार्मरनाच अवघड झालं. स्टार्मर म्हणाले ‘टेट बंधू गुन्हेगार आहेत. याची योग्य ती दखल घ्यावी लागेल.’ 

५. अमेरिकन सरकारच्या वतीनं हज्जारो सरकारी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आलं होतं. सरकारच्या वतीनं हा उद्योग ईलॉन मस्क या न निवडून आलेल्या ट्रंप यांच्या मर्जीतल्या माणसानं घेतला होता. 

प्रस्तुत पत्रकार परिषद झाली त्याच्या आदल्या दिवशी एका फेडरल न्यायमूर्तीनी लोकांना बडतर्फ करणारा आदेश  घटनाबाह्य आहे असा निकाल दिला होता, ती कारवाई बंद करा असा आदेश दिला होता.

पत्रकारानी त्या बाबत ट्रंपना विचारलं.

ट्रंप म्हणाले ‘ सरकारमधे अनेक माणसं उगाचच भर्ती करण्यात आली आहेत. ती कामं करत नाहीत. तो सरकावर म्हणजे समाजावर बोजा आहे. त्यांना काढलंच  पाहिजे.’

कायदा,घटना, नीतीमत्ता, सत्य, लोकशाही प्रक्रिया इत्यादी सर्व गोष्टींना फाट्यावर मारणारा माणूस. कोणतीही ठाम माहिती वा आधार हाताशी नसतांना ट्रंप त्या त्या क्षणी जे काही वाटतं ते ट्रंप बोलून जातात, तेच अमेरिकन सरकारचं धोरण असतं. अशा माणसाला लोक निवडून देतात. असा माणूस जगावर राज्य करू लागलाय. असा माणूस जगातल्या सर्व देशांना त्यांनी कसं वागावं याचे आदेश देत सुटलाय. एका श्रीमंत आणि बलाढ्य देशाचा प्रमुख असल्यानं दुनिया त्याच्यासमोर वाकतेय, तो  काहीही बोलला तरी मूग गिळून बसतेय.

स्टार्मर, मॅक्रॉन आणि जर्मनीचे होऊ घातलेलेले चान्सेलर मर्झ ट्रंपचं म्हणणं अमान्य करत आहेत (खुबीनं) ही गोष्ट दिलासा देणारी आहे.

।।

Comments are closed.