आधीच माकड, त्यात मद्य प्यालं…

आधीच माकड, त्यात मद्य प्यालं…

डोनल्ड ट्रंप एकदा अध्यक्ष झाले. दुसऱ्यांना हरले. जो प्रेसिडेंट दुसऱ्या टर्ममधे निवडून येत नाही त्याचा उल्लेख अमेरिकन लोक वन टर्म प्रेसिडेंट असा हेटाळणीच्या सुरात करतात. पुन्हा ट्रंपनी निवडणुक लढवली, निवडून आले. 

अमेरिकेच्या इतिहासात असं घडलेलं नाही. 

पहिल्या निवडणुकीच्या काळात त्यांनी केलेल्या ३७ गुन्ह्यांबद्दल ट्रंपना शिक्षा झाली. प्रेसिडेंट  गुन्हेगार सिद्ध होण्याची ही पहिली वेळ होती. ट्रंपचं म्हणणं की खटला राजकीय होता, आपण निर्दोष आहोत.

२०२० च्या निवडणुकीत झालेला पराभव ट्रंपनी मान्य केला नाही. बायडनना अधिकृत अध्यक्ष म्हणून मान्य करण्याचा औपचारीक विधी होता; तो पार पडू नये यासाठी १० हजार गुंड ट्रंपनी संसदेवर पाठवले. निवडणूक रद्द करणं आणि संसदेवरचा हल्ला ही कृत्यं देशद्रोहाची मानली जातात. त्यावरचा खटला अजून प्रलंबित आहे.

दोन वेळा ट्रंप यांची इंपीचमेंट झाली. सेनेटमधे त्यांच्या पक्षाचं बहुमत असल्यानं ट्रंप वाचले.

व्हाईट हाऊसमधले कागद, नोंदी, दस्तैवज,यात  महत्वाची माहिती असते, ती सरकारची मालमत्ता असते, कोणीही ती व्हाईट हाऊसच्या बाहेर नेऊ शकत नाही. प्रेसिडेंटपद गेल्यावर मारे लागो या आपल्या निवासस्थानी परततांना ट्रंपनी व्हाईट हाऊसमधले कागदपत्रं पळवून नेले.

अध्यक्ष होण्याच्या आधीपासून ट्रंपनी इन्कम टॅक्स भरला नव्हता, आपले आर्थिक व्यवहार कर खात्याला सुपूर्द केले नव्हते. अध्यक्ष झाल्यावर, अध्यक्षपद गेल्यावर, आजही त्यांनी ती माहिती सरकारला दिलेली नाही. करही भरला नाही.

देशद्रोहाचा खटला भरल्यावर ट्रंप यांच्या वकीलांनी सेनेटमधे सांगितलं ‘अध्यक्षाला सर्व प्रकारच्या खटल्यापासून संरक्षण आहे. त्यानं अगदी खूनही केला तरी त्याच्यावर खटला होऊ शकत नाही. सबब संसदेवर हल्ला केला आणि निवडणूक कायद्याचा भंग केला या बद्दल ट्रंप यांच्यावर खटला भरणं बेकायदेशीर आहे.’

‘स्त्रियांना मी त्यांचे गुप्तांग मुठीत पकडून खेचतो..’ असं ट्रंपनी म्हटलं होतं.

अशा माणसाला अमेरिकेनं पुन्हा एकदा निवडून  दिलं आहे.

हिटलरनं संसद भवन जाळून टाकलं होतं. 

तो तर जाहीर सभेत सांगत असे की कम्युनिष्ट, लोकशाहीवादी, उदारमतवादी, ज्यू, विकलांग, भटके ही सारी मंडळी देशद्रोही, वंशद्रोही आहेत, त्यांना मी नाहिसं करणार आहे.

हिटलरनं  कायदा करून राजकीय पक्षांवर बंदी घातली होती.  त्याचा पक्ष सोडून इतर पक्षांवर बंदी. संसदेत त्यानं केलेल्या कायद्याला संसद, राष्ट्रपती, न्यायालय कोणीही विरोध करू शकत नाही अशी तरतूद त्यानं राज्यघटनेत केली होती.

जर्मन जनतेनं त्या हिटलरला निवडून दिलं.

तेव्हां डोनल्ड ट्रंप निवडून आले यात आश्चर्य वाटायचं कारण नाही.

जर्मन जनता भांबावली होती. जर्मनीची आर्थिक स्थिती कां खालावली त्याचं कारण जनतेला कळत नव्हतं. अनेक पक्ष होते, अनेक पुढारी होते, ते सर्व जर्मनीच्या हलाखीची अनेक कारणं सांगत होते, जनता गोंधळात पडली होती. जनता गोंधळात होती, नेते गोंधळात होते, पक्ष गोंधळात होते. हिटलरचा गट सोडता बाकीच्या गटांत एकमत नव्हतं. असं घडत होतं  कारण जर्मनीत लोकशाही होती. 

 जर्मनी हा देश सर्वश्रेष्ठ आहे, जर्मन हा वंश सर्वश्रेष्ठ आहे, नालायक लोकांनी ते श्रेष्ठत्व गमावलं आहे, मी जर्मनीचं श्रेष्ठत्व पुन्हा प्रस्थापित करणार आहे, माझ्या हाती एकहाती सत्ता द्या असं हिटलरनं म्हटलं. तसं म्हणतांना त्यानं प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून घेतला आणि इतर माणसांची तोंडं बंद केली, त्याना मारून टाकलं.

लक्षावधी ज्यू आणि जगभरची कोट्यावधी माणसं हिटलरच्या लहरीखातर मारली गेली.

लोकांनी निवडून दिलेला, लोकशाहीनं निवडून दिलेला जगातला सर्वात क्रूर आणि विकृत माणूस अशी हिटलरची नोंद इतिहासात झाली.

 ट्रंप अघ्यक्ष झाले यात काही अघडित घडलंय असं मानू नये.

डोनल्ड ट्रंप यांची वक्तव्य हे त्यांचं धोरण मानलं जातं. कारण रिपब्लिकन पक्षातर्फे धोरणं जाहीर झालेली नाहीत. 

गेली चार वर्षं ट्रंप सांगत आलेत की दक्षिण अमेरिका आणि जगातल्या इतर ठिकाणाहून आलेल्या परक्यांमुळं अमेरिकेची वाट लागलीय.   पोर्टो रिको हा देश म्हणजे कचऱ्याचा ढीग आहे असं ट्रंप यांच्या सभेत एका वक्त्यानं सांगितलं, ट्रंपनी टाळ्या वाजवल्या. दक्षिण अमेरिकन लोक अमेरिकेत बेकायदेशीर रीत्या रहातात, परके लोक सर्रास गुन्हेगार आहेत, बलात्कारी आहेत असं त्यांनी अनेक वेळा सभेत सांगितलंय.

म्हणून ते परकीयांचा बंदोबस्त करणार आहेत, त्यांना बाहेर घालवून देणार आहे, त्यांचं देशात येणं बंद करणार आहेत. तसं केलं की त्यांनी बळकावलेल्या अमेरिकन लोकांच्या नोकऱ्या अमिरिकनांना पुन्हा परत मिळतील.

चीन, मेक्सिको, भारत इत्यादी सर्व देशांमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर ते जकात लावणार आहेत. भारतीय मालावर १० टक्के जकात असेल, चीनमधल्या मालावर ६० टक्के असेल आणि मेक्सिकन मालावर १०० टक्के असेल. जकात लावल्यावर परदेशी माल महाग होईल, देशी माल खपेल, देशी  उत्पादन वाढेल, देशी रोजगार वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे.

श्रीमंत उत्पादकांवर कर बसवला नाही तर त्यांचं उत्पन्न वाढेल आणि मग ती मंडळी अमेरिकन समाजाच्या हितावर पैसे खर्च करतील. असं ट्रंप म्हणतात. 

डोनल्ड ट्रंप म्हणतात त्यावर विश्वास कसा  ठेवायचा?

 अमेरिकेतल्या अभ्यासकांनी ट्रंप यांच्या वक्तव्यांची नोंद करून त्यात सत्य किती आहे याचा अभ्यास केला. दोन वर्षात ट्पंप २७०० वेळा खोटं बोलले अशी नोंद त्यांनी केलीय.

हैती या देशातून आलेले लोक ओहायो राज्यात स्प्रिंगफील्ड या गावात स्थानिकांचे कुत्रे आणि मांजरं खातात अशी नावनिशीवर  माहिती ट्रंप यांनी भाषणात दिली. आपण खरंच बोललो, तिथल्याच लोकांनी आपल्याला ही माहिती दिलीय असं त्यांनी दोन वेळा सांगितलं. स्प्रिंगफील्ड या गावातले पोलीस, मेयर, शेरीफ यांनी असं काहीही कधीही घडलेलं नाही असं जाहीर केलं. तरी ट्रंप त्यांच्या विधानाला चिकटून राहिले.

  जॉन मेक्केन हे रिपब्लिकन नेते( अध्यक्षपदाचे ओबामांचे प्रतिस्पर्धी) वियेतनाम युद्दातून  पळून आले होते, त्यांच्या वडिलांनी त्यांना तुरुंगातून सोडवून आणलं असा आरोप ट्रंपनी केला. थोडक्यात ट्रंप यांच्या भाषेत मॅक्केन ‘लूजर’ होते, पळपुटे होते.

अमेरिकन लष्करातर्फे खुलासा करण्यात आला की मॅक्केन हे शूर लढवय्ये होते, त्यांना वियेतनाममधे पकडण्यात आलं, त्यांच्यावर तुरुंगात अत्याचार करण्यात आले, ते सारं मॅक्केननी सहन केलं, युद्ध संपल्यावर त्यांची सुटका झाली.

ट्रंप त्यांच्या विधानाला चिकटून राहिले.

बराक ओबामा अमेरिकेत जन्मलेले नाहीत, ते मुसलमान आहेत असं ट्रंप म्हणाले. ओबामांचं जन्म सर्टिफिकेट हा रेकॉर्ड आहे. ओबामा ख्रिस्ती आहेत आणि चर्चमधे जात असतात हे चर्चनं पुराव्यासहीत माध्यमांसमोर ठेवलं.

ट्रंप अजूनही ओबामाचा उल्लेख मुद्दाम बराक हुसेन ओबामा असा करतात कारण त्यांचा पिता हुसेन या नावाचा आफ्रिकन होता. ओबामांची आई ख्रिस्ती होती हे जगाला माहित आहे, ट्रंप यांना ते मान्य नाही.

ट्रंप काय बोलतात यावर विश्वास कसा ठेवायचा?

पैसा, पैसा आणि पैसा; व्यक्तिगत संपत्ती; येवढंच ट्रंपना समजतं. जगातली प्रत्येक गोष्ट ही डील असते, व्यापारी वाटाघाट असते असं ते मानतात. इसरायल आणि गाझामधील संघर्ष असो; इराणशी संबंध ठेवणं असो; युक्रेन-रशिया युद्ध असो; चीनची उत्पादनं अमेरिकेत येणं असो; समोरच्या माणसाला घाबरवायचं; खोटं बोलून त्याला प्रभावित करायचं; डील पदरात पाडून घ्यायचं; हीच ट्रंप यांच्या  विचाराची आणि वागण्याची पद्धत आहे.

इव्हाना यांच्याशी ट्रंपना लग्न करायचं होतं. ती त्यांना आवडली होती, हवी होती. इतके पैसे देईन, घटस्फोट झाला तर दिलेल्या सर्व गोष्टी परत घेईन आणि दरमहा इतकी पोटगी देईन असा करार ट्रंपनी इव्हानासमोर ठेवला. ही कुठली लग्नाची पद्धत? तू तर म्हणतोस की तुझं माझ्यावर प्रेम आहे मग प्रेम असं व्यक्त करतात? असं इव्हानानं विचारलं.ती तयार होईना. ट्रंप म्हणाले तुझ्या खात्यावर ५० हजार डॉलर जमा करतो. इव्हाना म्हणाली १ लाख जमा कर. ट्रंप म्हणाले, चल काँप्रोमाईज, ७५ हजार देतो.   यथावकाश ट्रंपना इव्हाना आवडेनाशी झाली, ट्रंपनी तिचा   शारिरीक छळ केला,घटस्फोट झाला. 

ट्रंपना एक जमीन घ्यायची होती. बँक पैसे द्यायला तयार नव्हती  तारण ठेवण्यायेवढे पैसे ट्रंपजवळ नव्हते. ट्रंप वडिलांकडं गेले आणि कौटुंबिक ट्रस्टमधे मुखत्यारपत्र मला द्या असं  म्हणू लागले. आई म्हणाली कुटुंबाची मालमत्ता सर्वांची असते, अशी एकाला देता येणार नाही. त्यावर ट्रंप भडकले, फक यु अशा शब्दात त्यांनी आपल्या पित्याला सुनावलं.

ट्रंप यांच्याकडं जमा होणारी माणसं अशा पद्धतीनं जमा झालेली असतात.

अमेरिकन जनतेनं अशा माणसाकडं पुन्हा सत्ता दिलीय.

काय म्हणायचं या अमेरिकन जनतेला?

।।

Comments are closed.