आपण कुठे आहोत?

आपण कुठे आहोत?

भारताला ब्रिटीश सत्तेपासून राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याला आता ७५ वर्षं होत आहेत. 

 लोकांना विचार देश कसा आहे बुवा? लोक म्हणणार महान आहे. म्हणजे कसा आहे? असं म्हटलं की लोक बावचळतात. कारण महानता कशी ठरवायची ते त्याला कळत नाही.

उदा. जिथं सार्वजनिक आरोग्य चांगलं असतं ते देश बाहेरूनच चांगले दिसतात, सांगावं लागत नाही. माणसं रस्त्यावर, उघड्यावर संडास करत असतील तर लगेच त्यावरून त्या समाजाचा दर्जा लगेच लक्षात येतो, सांगावं लागत नाही. 

पंतप्रधानांनी जर्मनीत जमलेल्या भारतीयांना सांगितलं की आता भारतात प्रत्येकाच्या धरी संडास आहे, कोणीही उघड्यावर हगनदारीत जात नाही. भारत हगीनदारी मुक्त आहे.  

पण तसं दिसायला हवं की नाही?

दिल्ली, कलकत्ता, मुंबई, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, वाराणसी, अशा कुठल्याही शहरात ट्रेननं जा. ट्रेन शहराच्या जवळ पोचली की तुम्हाला रळांवर आणि रुळांच्या दोन्ही बाजूला लोक डब्बे घेऊन काड्या चघळत संडास करताना दिसतात. मोजदादही करता येत नाही. खेड्यांतही परिस्थिती वेगळी नाही. 

किती घरात संडास आहेत वगैरे आकडे सरकार धडपणे देत नाही.

जागतीक आरोग्य संघटनेनं मात्र एक आकडा दिलाय. संघटनेच्या मते भारतात १५ टक्के जनता उघड्यावर संडास करते. 

म्हणजे पहा, मोदी खोटं बोलत होते.

जागतीक आरोग्य संघटनेनं सांगितलं की भारतात कोविडनं ४७ लाखपेक्षा जास्त माणसं मेली. भारत सरकार आकडेच प्रसिद्ध करत नव्हतं, प्रसिद्ध केले तेव्हां फक्त साडेचार लाख मेले असं सांगितलं. भारत सरकारचं म्हणणं असं की आरोग्य संघटनेची आकडे गोळा करण्याची पद्धती सदोष आहे.

 कोविडच्या काळात काय घडत होतं ते आपण सर्वांनी अनुभवलं आहे. अशा रीतीनं माणसं मरणारा समाज कसा असू शकतो याची कल्पना सहज करता येते.

 स्वातंत्र्य दिनी सरकारनं टूम काढली की प्रत्येक माणसानं आपल्या घरावर झेंडा लावला पाहिजे.  

२०११ सालचे आकडे सांगतात की भारतात  १.८ कोटी मुलं बेघर होती, रस्त्यावर, पुलाखाली रहात होती. त्याच वर्षीचा आकडा सांगतो की देशात १.८७ कोटी घरांचा तुटवडा आहे. खुद्द दिल्ली शहरात तीन वेगवेगळ्या संघटना बेघरांचा आकडा ४६ हजार ते १.५ लाख इतका सांगतात. 

ही रस्त्यावरची माणसं झेंडे कुठं लावणार?  

मुंबई-पुण्यातल्या सुखवस्तू वस्त्यांत किंवा अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर रहाणाऱ्या भारतीयांना रस्त्यावर रहाणारी माणसं दिसत नाहीत, रस्त्यावर संडास करणारी माणसं दिसत नाहीत. त्यांना विचारलं की भारत कसा आहे तर ते सांगणार की भारत सुखात आहे. पण दूरवरचा देश ज्यांना दिसतो ती माणसं म्हणणार की अजूनही दुःखात असणाऱ्या माणसांची संख्या खूप मोठी आहे. 

भारतात १६६ व्यक्तींची संपत्ती अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. अब्जोपतींच्या संख्येच्या हिशोबात भारताचा क्रमांक तिसरा लागतो. स्वातंत्र्य मिळालं त्या वेळी किती लोक अब्जोपती होते? नेमका आकडा मिळत नाही, निझामाजवळ अब्जांची संपत्ती होती असं कळतं. पण अब्जोबती अगदीच कमी होते असं म्हणता येईल आणि आज त्यांची संख्या वाढत चाललीय, १६६ चा आकडा पार करतेय ही गोष्ट चांगली. 

पण याच १६६ अब्जोपतींच्या देशात ५.४ कोटी माणसं आज बेकार आहेत,  नोकरीसाठी वणवण फिरत असतात. ही दुःखाची बाब. 

दोन तीनशे वर्षं ब्रिटिशांनी भारताचं शोषण केलं. दुष्काळ, उपासमारी, बेकारी ही संकटं खांद्यावर घेऊन भारत स्वतंत्र झाला. दीर्घ काळ काँग्रेस या पक्षानं देशावर राज्य केलं. सुमारे १९६७ नंतर देशातल्या सर्व पक्षांना देशात, राज्यात सत्ता मिळाली. आता गेली सुमारे ९ वर्षं भारतात केंद्रात भाजपची सत्ता आहे आणि ८० टक्के राज्यांत भाजपेतर पक्षांची सत्ता आहे. अशा रीतीनं स्वतंत्र भारताला भारतीय लोकांनी चालवलेल्या सरकारांचा ७५ वर्षांचा अनुभव आहे.

या काळात उत्पादन वाढलं. रोजगार वाढला. शाळा निघाल्या आणि आरोग्य व्यवस्थाही विकसित झाली. लोकांच्या डोक्यावर छप्पर आलं आणि अंगावर कपडे आले. पण बेकारी, विषमता, अडाणीपण, अनारोग्य पाठ सोडत नाहीये.

 जगातल्या १८० देशांची माहिती गोळा करून रीपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संघटनेनं माध्यम स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, खुलेपणाचा  निर्देशांक काढला. भारताचा क्रमांक आहे १४३. म्हणजे १४२ देशात भारतापेक्षा जास्त खुलेपणा आहे, पारदर्शिकता आहे, माध्यमांना स्वातंत्र्य आहे. पण ३७ देशात मात्र भारतापेक्षा जास्त वाईट स्थिती आहे असं निर्देशांक सांगतो. भारतात माणसांना मोकळेपणानं व्यक्त होण्याबाबत आपण १४२ देशांच्या मागं आहोत याचं दुःख करायचं की ३७ देशांच्या पुढं आहोत याचा आनंद व्यक्त करायचा?

युनायटेड नेशन्सनं १४६ देशातल्या बालकांची स्थिती काय आहे याची पहाणी केली. पाच वर्षापर्यंतच्या मुलांचं पुरेसं पोषण होतं की नाही, कुपोषण किती आहे, किती मुलांचा पाच वर्षाच्या आत मृत्यू होतो इत्यादी माहिती गोळा करून एक जागतीक कुपोषण निर्देशांक युनोनं जाहीर केला. त्यात भारताचा क्रमांक १०१ वा लागतो. पेच आला. अब्जोपतींच्या हिशोबात जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेला भारत १०० देशांच्या तुलनेत मागं आहे याचं दुःख करायचं की ४५ देशांपेक्षा भारतात स्थिती चांगली आहे याबद्दल सुख मानायचं?

अलीकडं एक हॅपिनेस निर्देशांक विकसित झालाय. हॅपिनेस म्हणजे मराठी भाषेत काय म्हणायचं? आनंद की सुख की समाधान? प्रत्येक शब्दाला खूप वेगळा अर्थ आहे. भारतीय भिकारी सुखी असतो. तेव्हां तीनही शब्दांना हॅपिनेस हा इंग्रजी शब्द भारतीय मानून पुढं चालायला हरकत नाही. नाही तरी  भारतात आता तमाम माणसं वाढदिवसाला हॅप्पी बर्थडे असंच म्हणतात.

एकूणात माणसाची आर्थिक स्थिती, त्याला किती सुखानं जगात काम करता येतं-वावरता येतं, भ्रष्टाचार कितपत त्रास देतो इत्यादी घटकांचा एकत्रित विचार करून माणूस हॅप्पी आहे का ते ठरवण्यात येतं. १४६ देशांच्या या पाहणीत भारताचा क्रमांक १४३ वा आहे. आणि काय गंमत आहे पहा. जिथं जगण्याचीच खात्री नाही अशा अफगाणिस्तानातली माणसं भारतीय माणसापेक्षा जास्त हॅप्पी आहेत असं हा निर्देशांक सांगतो.

  आपला क्रमांक इतका खाली आहे या बद्दल दुख व्यक्त करायचं की अजूनही तीन देश आपल्यापेक्षा खाली आहेत यात सुख मानायचं?

 पंचाहत्तर वर्षांच्या काळात भारत पुढं सरकला आहे यात शंकाच नाही. माणूस आज किती तरी अधिक जगतो आहे आणि १९४७ च्या तुलनेत तो अधिक सुखी जरूर आहे. आज जवळपास प्रत्येक माणसाच्या हातात सेलफोन आहे. मग तो माणूस बेघर असो, बेकार असो, उपाशी असो,अडाणी असो. आता त्या फोनचा वापर तो कसा करतो आहे हा स्वतंत्र मुद्दा आहे. पण घरात रेडियोही नव्हता अशा भारतात हातोहात सेलफोन आहे ही प्रगती मानायची की नाही? 

भारतातली परिस्थिती सुधारत असताना सारं जगच सुधारत होतं. शिक्षण, आरोग्य, रोजगार इत्यादी गोष्टी तंत्रज्ञानानं मारलेल्या उड्यांमुळं साऱ्या जगातच सुधारत गेल्या, भारतानंच फार मोठं वेगळं केलं असं घडलेलं नाही. 

परिस्थिती सुधारत गेली त्या बरोबरच अपेक्षाही वाढत गेल्या.  

तिथंच गोची झालेली आहे. भारतीय माणसाच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्याच्या जाणीवा रुंदावल्या आहेत, अगदी सहजगत्या त्याला खूप खूप म्हणजे खूप माहिती उपलब्घ होतेय.त्याच्या गरजा आणि अपेक्षा त्यामुळं वाढतात आणि त्या पूर्ण होत नसल्यामुळं   हॅपिनेस निर्देशांकात भारताची घसरण होताना दिसतेय.

जे घडलं त्याचं श्रेय मागायला देशातले यच्चयावत पक्ष तयार आहेत. जे घडलं नाही त्याचं खापर प्रत्येक पक्ष इतर पक्षांवर फोडतो आहे.

एक खरंच की येव्हांना देशातल्या सर्व पक्षांनी केंद्रात किंवा राज्यात सत्ता हाताळली आहे. त्यामुळं जे काही घडलय त्यात प्रत्येक सरकारचा काही एक वाटा आहे.

गेली दोन तीन वर्षं पहात आहोत. सत्ता आणि सत्ता येवढी एकच गोष्ट पक्षांना दिसते. खिसा आणि फक्त खिसा येवढंच पुढाऱ्यांना दिसतं. त्यामुळंच पक्ष चुलीत गेले असं म्हणायची पाळी येते. अर्थात पक्ष चुलीत घालूनही भागत नाही कारण सर्वात कमीत कमी सदोष असणाऱ्या लोकशाही या व्यवस्थेत पक्ष अटळ असणार आहेत. त्यामुळं भ्रष्ट पक्ष आणि भ्रष्ट पुढारी यांच्यासह काही तरी वाट जनतेला काढावी लागणार आहे. प्राप्त परिस्थितीवर डोकं ताळ्यावर ठेवून, चहात बुडवलेल्या पावासारखं पार खलास न होता, वाट शोधावी लागणार आहे.

 भारताच्या चार पाच हजार वर्षांच्या इतिहासात ७५ वर्षं म्हणजे ठिपकाही म्हणता येत नाही इतका कमी काळ आहे. पण जगण्याच्या खटाटोपात असणाऱ्या माणसाच्या हिशोबात ७५ वर्षं म्हणजे तीनेक पिढ्या होतात. त्यामुळं चारपाच हजार वर्षांच्या सीनियॉरिटीची ढेकर न देता, आज आणि उद्याची पाच पन्नास वर्षांचं जगणं ऐरणीवर आहे हे लक्षात ठेवून प्राप्त चिखलातून बाहेर पडावं लागेल.

।।

Comments are closed.