इराण. काटेरी मुकूट, काटेरी सिंहासन
इराणचे ताजे अध्यक्ष मसूद पेझेशक्यान यांनी अध्यक्षपदाची सूत्र घेतली त्याच दिवशी, काही तासानी इस्माईल हानिये या हमासच्या नेत्याचा तेहरानमधे खून झाला. हानिये पेझेशक्यान यांच्या अध्यक्षपदाच्या जाहीर सभेत हजर होते. हानिये पेझेशक्यान यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठीच तेहरानमधे पोचले होते. अत्यंत कडेकोट सुरक्षित जागी ते रहात होते त्या गेस्ट हाऊसमधे इसरायलनं ठेवलेल्या टाईम बाँबनं हानिये यांचा जीव घेतला.
अध्यक्षपदाचा मुकूटच नव्हे तर खुर्चीही काट्यानं भरलेली आहे याची कल्पना पेझेशक्यान याना आली असावी.
#
पेझेशक्यान यांच्याकडून जगाच्या आणि खुद्द इराणच्या खूप अपेक्षा आहेत.
पेझेशक्यान ६९ वर्षाचे आहेत, डॉक्टर आहेत, सर्जन आहेत. इराण इराक युद्धात आघाडीवरच्या सैनिकाना ते वैद्यकीय उपचार देत असत. १९९७ पासून ते राजकारणात आहेत, १२ वर्षं ते मंत्रीमंडळात होते. दोन वेळा त्यांनी अध्यक्षपदाची निवडणुक लढवली.
अध्यक्ष इब्राहीम रईसी यांच्या अपघाती मृत्युमुळं झालेल्या निवडणुकीत पेझेशक्यान निवडून आले. रईसी २०२१ ते २०२४ या काळात पावणेदोन वर्ष इराणचे अध्यक्ष होते.रईसी यांची कारकीर्द वादळी होती. रईसी सनातनी होते, अली खामने या सर्वोच्च धार्मिक नेत्याच्या पठडीतले होते. त्यांच्या कारकीर्दीत खूप भ्रष्टाचार माजला.
अमेरिकेनं इराणची अण्वस्त्र आणि अणुऊर्जा या मुद्द्यावर नाकेबंदी केल्यामुळं इराणची अर्थव्यवस्था संकटात होती. महागाई आणि बेरोजगारी खूप वाढली होती. रईसी हे धार्मिक विचाराचे असल्यानं सर्व प्रश्नावरचं उत्तर धार्मिकच असतं असं ते मानत होते. बेकार तरूण रस्त्यावर आल्यावर रईसी यांचे धर्मरक्षक रस्त्यावर आले आणि लोकांनी धर्मावलंब काटेकोरपणे केला पाहिजे असं सांगू लागले.
नीतीरक्षक पोलिसांच्या टोळ्या रस्त्यावर फिरत. हॉटेलात, मॉलमधे, रेलवे स्टेशनात, विमान तळावर जात आणि तिथं स्त्रिया केस नीट झाकत आहेत की नाहीत ते पहात. धर्मरक्षकांच्या पांढऱ्या व्हॅन रस्यावर फिरत आणि लाऊड स्पीकरवरून स्त्रियाना सांगत की त्यानी अंग झाकणारे कपडे घातले पाहिजेत. वगैरे.
इराणी धर्मसत्तेचं मत असं.इराणचं भवितव्य स्त्रियांच्या नैतिक वागण्यावर अवलंबून असतं; स्त्रियांनी कपडे नीट घातले, डोक्यावर पदर घेतला, चूल आणि मूल सांभाळलं की झालं. पुरुषांनी काहीही करावं, बलात्कार करावेत, भ्रष्टाचार करावा, ते सारं चालतं, ते धर्माच्या आड येत नाही.
२०२२ साली माहसा अमीन या तरूण मुलीला पोलिसानी रस्त्यावर पकडलं. तिच्या अंगावरचा हिजाब अघळपघळ, सैल होता असं पोलिसांचं मत. म्हणजे तिनं धर्म नीट पाळला नाही. तुरुंगात तिला मारझोड झाली, ती मेली. इराणमधे स्त्रियांचं एक प्रचंड आंदोलन उफाळलं. स्त्रियानी तुरुंग, मारझोड न जुमानता धर्मसत्ता झुगारून दिली.
स्त्रिया बुरखा पाळेनाशा झाल्या. तेहरानमधे हॉटेलं, मॉल इत्यादी ठिकाणी सर्रास हिजाब न घेता स्त्रिया वावरू लागल्या. पोलिस, नीतीरक्षक पोलीस दुर्लक्ष करू लागले. अनेक स्त्रिया कामानिमित्त लंडन आणि पॅरिसला जात तेव्हां त्यांना ब्रिटीश-फ्रेंच इराणी स्त्रिया केस झाकून फिरतांना दिसल्या. त्यांना आश्चर्य वाटलं.
इराणच्या इतिहासात पहिल्या प्रथम स्त्रियांचं स्वातंत्र्य हा मुख्य मुद्दा झाला होता.
एकूणात जनता धर्मसत्तेवर जाम वैतागली होती. पायघोळ झग्यातले मुल्ला, अयातुल्ला वगैरे लोक जनतेच्या टिंगलीचा आणि रोषाचा विषय झाले होते. इराणमधली निवडणुक आणि लोकशाही हा एक विनोदच झाला होता. अयातुल्ला मंडळी ज्याला मान्यता देतील तोच निवडणूक लढवू शकत होता यावरून लोकशाहीचं रूप लक्षात यावं.
अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा अपघाती मृत्यू झाला. लोकांना त्यांच्याबद्दल आदर नव्हता. त्याना हुतात्मा म्हणायलाही लोक तयार नव्हते. एक भ्रष्ट पुढारी अशी त्यांची प्रतिमा होती.
निवडणूक अटळ होती. एक उपचार. लोक मतदानाला यायला तयार नव्हते.नेहमीसारखेच अयातुल्लांनी निवडलेले उमेदवार होते. पेझेशक्यान हे अपवाद होते. त्यांच्या अंगावर डाग नव्हते, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते. एकाद्या सचोटीच्या व्यावसायिक डॉक्टरची जशी असावी तशी त्यांची प्रतिमा होती. त्यांचा प्रचारही साधा होता, मोठमोठी पोस्टर्स, होर्डिंग्ज नव्हती. लोक आपणहून त्यांच्याबद्दल चांगलं बोलत असत.
इराणमधली धर्मसत्ता आणि सरकार नेहमी अमेरिका ही एक दुष्ट शक्ती आहे अशी भूमिका घेत आलं आहे. अगदीच इलाज नाही म्हणून अमेरिकेबरोबर वावरायचं पण मुळात ती दुष्ट शक्ती आहे अशी इराणच्या धर्मसत्तेची भूमिका आहे. पेझेशक्यान अमेरिकेबरोबर जुळवून घ्यावं असं जाहीरपणे बोलत होते. अमेरिकेच्या प्रेमात नाहीत आणि अमेरिकेचा द्वेषही नाही. आर्थिक कोंडीतून इराणची सुटका करण्यासाठी अमेरिकेशी वाटाघाटी कराव्यात असं पेझेशक्यान जाहीर सभांमधे, जाहीर चर्चामधे बोलत असत.
अध्यक्षपदाच्या शर्यतीतल्या जाहीर चर्चांमधे केस झाकणं हा मुद्दा होताच.
पेझेस्क्यान यांनी त्या चर्चेत म्हटलं ‘प्रश्न हिजाब घट्ट असावा की सैल असावा असा नाहीये; बहुतेक स्त्रियांना हिजाब नकोय हा मुद्दा आहे. स्त्रियांना त्यांनी काय करायचं आणि काय नाही हे ठरवायचा अधिकार असायला हवा. शहानं (रेझा शहा पहेलवी) स्त्रियांनी हिजाब-बुरखा वापरताच कामा नये असा कायदा केला, बुरखा घेणं गुन्हा ठरवला. स्त्रियांनी शहाचा कायदा मानला नाही.आताच्या सरकारनं बुरखा घेतलाच पाहिजे, न घेतला तर गुन्हा ठरेल असं ठरवलंय. तेही स्त्रियांना मान्य नाहीये. थोडक्यात असं की स्त्रियांना काय हवंय ते पहा आणि ते करण्याचं स्वातंत्र्य त्याना द्या.
अशी भूमिका जाहीरपणे घेणारा पेझेशक्यान हा पहिलाच माणूस आहे. अशी भूमिका घेऊनही त्याना ना अटक होतेय, ना छळाला तोंड द्यावं लागतंय. धर्मसत्ता मवाळ झालीय असा याचा अर्थ होतो काय? कदाचित लोकांचा दबावच येवढा असावा की धर्मसत्तेला पडतं घेण्यावाचून गत्यंतर उरलं नसावं.
बहरहाल लोकांना पेझेशक्यान बरे वाटले. लोकशाहीवरचा विश्वास उडाल्यानं ३९ टक्केपेक्षा कमी जनता पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला बाहेर पडली. निवडणूक होतेय, पेझेशक्यान मुक्तपणानं बोलू शकत आहेत हे दिसल्यावर लोकांचा विश्वास वाढला असावा. दुसऱ्या टप्प्यात ५१ टक्के जनता मतदान करती झाली. वाढलेली सर्व मतं पेझेशक्यान यांची होती.
अजूनही अयातुल्ला अली खामने हे इराणचे सर्वेसर्वा आहेत. धर्मरक्षक दल नावाचं बेबंद लष्कर अजूनही त्यांच्या हातात आहे. ठरवलं तर ते पेझेशक्यान यांची अडवणूक करू शकतात. त्यामुळं पेझेशक्यान यांची वाट बिकट आहे.
अमेरिकेनं लादलेली आर्थिक नाकेबंदी दूर करायची तर आंतरराष्ट्रीय नीतीत अनेक बदल पेझेशक्यान यांना करावे लागतील. इराणनं लेबनॉनमधे हेझबुल्ला ही संघटना पोसलीय. ही संघटना लेबनॉनच्या अंतर्गत राजकारणात भाग घेते आणि इसरायलच्या विरोधात दहशतवादी कारवाया करत असते. हेझबुल्लाच्या एका नेत्याला काही दिवसांपूर्वी इसरायलनं मारलंय. हेझबुल्ला आणि इसरायलमधे लढाई पेटली तर ती इतर ठिकाणीही पसरेल.
हेझबुल्लाचे हस्तक सीरियात आहेत, इराकमधेही आहेत.
इराणनं येमेनमधे हुती जमातीमधे माणसं पेरलीत. ते लोक सौदी अरेबियाशी मारामारी करत असतात, येमेनमधे सिविल वॉर चालवत असतात. लाल समुद्र आणि एडनच्या आखातातून वाहतूक करणाऱ्या अमेरिकन, ब्रिटीश, फ्रेंच इत्यादी जहाजांवर हुती दहशतवादी हल्ले करत असतात.
या सगळ्या उद्योगांचं केंद्र आणि इसरायल विरोध. इसरायलला पाठिंबा देणाऱ्या देशांशीही इराणचं भांडण आहे.
पेझेशक्यानना नाकेबंदी उठवायची असेल तर लेबनॉन, इराक, सीरिया, येमेन या ठिकाणी चाललेले उद्योगही बंद ठेवावे लागतील. ते पेझेशक्यान यांना जमेल? कारण ते धोरण आधीपासून, म्हणजे थेट खोमेनी यांच्या सरकारपासून ठरलेलं आहे. पेझेशक्यान इराणचं परराष्ट्र धोरण नव्वद अंशात घूम जाव करू शकतील? इराणमधली धर्मसत्ता हे बदल मान्य करेल काय? धर्मसत्तेला आव्हान देण्यायेवढी जनशक्ती पेझेकशक्यान यांच्याकडं आहे काय?
धोरणात बदल म्हणजे इसरायलशी जुळवून घेणं. अरब देशांनी इसरायलशी समझौता केलेला आहे. पेझेकश्यान यांना ते जमेल?
वरील प्रश्नांची उत्तरं पुढल्या काळात मिळतील. अमेरिकेबरोबर नावापुरत्या वाटाघाटी करून वेळ पेझेकश्यान खेळत रहातात की धोरणात बदल करतात हे पुढल्या काही आठवड्यातच कळेल.
पेझेकश्यान इराणचे अध्यक्ष होणं ही एक महत्वाची घटना आहे. अनेक जागतीक बदलांच्या शक्यता त्यात गुंतलेल्या आहेत. अमेरिकेत कदाचित कमला हॅरिस निवडून येतील. ब्रीटनमधे स्टार्मर निवडून आलेत. हॅरिस, स्टार्मर या दोघांनाही पठडी नाहीये, दोघंही काही नवं करू शकतील. त्यांची धोरणं अर्थातच इराणशीही संबंधित असतील.
।।