एमिलिया पेरेझ वादग्रस्त चित्रपट
एमिलिया पेरेझ.
❖
एमिलिया पेरेझ या चित्रपटावर प्रेक्षक तुटून पडले. समीक्षक आणि सामान्य प्रेक्षकांपैकी अनेकांनी या चित्रपटाला एक स्टारही द्यायला नकार दिला. ऑस्करवाल्यांनी मात्र या चित्रपटाला १३ नामांकनं दिली आहेत.
❖
एमिलिया पेरेझ या सिनेमात नाट्य, थरार, रहस्य इत्यादी घटकांची रेलचेल आहे.
एक ड्रग टोळीचा नायक आहे. त्याचं प्रचंड साम्राज्य आणि संपत्ती आहे. त्याच्या मनात येतं की आपण एक नवा अवतार घ्यावा आणि आपल्या पापांचं परिमार्जन करावं. लिंगपरिवर्तन आणि शरीर परिवर्तन करणाऱ्या डॉक्टरांकडं तो जातो. पुरुषाचा स्त्री होतो. दानशूर संत होतो. शेवटी त्याचा अंत होतो. या कहाणीतल्या प्रत्येक वळणार चित्रपटात थरार आहे.
म्हटलं तर ही कथा सरळ आहे. दिक्दर्शकानं ती सरळ मांडली आहे. चित्रपट निर्मितीची सरळधोपट तंत्रं दिक्दर्शकानं वापरली आहेत. कल्पकता नाही. प्रसंग, पात्रं, संवाद, बटबटीत आहेत. चित्रपटाचा मुख्य धागा गुन्हेजगत असल्यानं रंगपेटीतले गडद चॉकलेटी,काळा हे रंग दिक्दर्शकानं वापरले आहेत.
म्हटल्यास नाविन्य आहे ते संवाद गाण्याच्या रुपात वापरण्यात. सिनेमातली पात्रं त्यांच्या मनातल्या गोष्टी मुक्त छंदातल्या गाण्यात व्यक्त करतात. ऑपेराचं तंत्र दिक्दर्शकानं वापरलं आहे. ऑपेरात पूर्ण प्रयोगभर गाणी असतात, प्रस्तुत चित्रपटात सामान्य संवादही आहेत आणि ऑपेरा संवादही आहेत. एकेकाळी गाजलेल्या माय फेअर लेडी या चित्रपटाची आठवण होते. तिथंही हेच तंत्र वापरण्यात आलं होतं. परंतू माय फेअर लेडीचं निर्मितीमूल्य खूप समृद्ध होती. संगीत,शब्द, चित्रीकरण, सारंच ऊच्च दर्जाचं होतं. प्रस्तुत चित्रपटातला त्या घटकांचा दर्जा सामान्य आहे.
चित्रपट ओके ओके आहे. कान्स आणि ऑस्कर नामांकनात गाजला नसता तर हा चित्रपट सिनेघरात लागला असता, मावळलाही असता.
थरार निर्माण करण्यासाठी अलीकडं वैज्ञानिक, तंत्रवैज्ञानिक शक्यतांचा वापर केला जातो. शक्यता अस्तित्वात आल्या तर काय होऊ शकतं ही गोष्ट कथानकात फुलवली जाते. एक लोकांना भरपूर माहित असलेला पुरुष. तो मेला असं दाखवलं जातं. प्रत्यक्षात त्याचं रुपांतर एका स्त्रीमधे होतं. ठीक. पण ही स्त्री एकाएकी प्रसिद्ध होते. एकाएकी तिच्याकडली समुद्रभर संपत्ती जगासमोर येते, ती स्त्री एक महान सामाजिक कार्यकर्ती म्हणून समाजासमोर येते. विज्ञान कल्पना म्हणून ते ठीक आहे. पण आजच्या जगात ही कल्पना रिडिक्युलस वाटते. पटकथा लिहिताना ती कल्पना पचेल अशा रीतीनं मांडावी लागते. मिडियातले लोक खोटेपणा पेरून हे साध्य करतात. गुन्हेगार माणूस मिडिया संत म्हणून लोकांसमोर ठेवतं. हे साधण्यासाठी राजकारण, कॉर्पोर्ट जग, फायनान्स जग एकत्र येतात. या गोष्टी तपशिलात न जाताही पटापट मांडल्या तर अशक्य गोष्टीही शक्य झाल्याचं भासतं.
तंत्र भले हाताशी असेल. कॅमेरे, स्पेशल इफेक्ट्स, साऊंड इंजिनियरिंग हे सारं हाताशी असलं तरी शेवटी सिनेमाचा पाया असतो पटकथा.तीच ठिसूळ असेल तर गडबड होते.
चित्रपटाचं कथानक मेक्सिकोत घडतं. चित्रपटाचं चित्रीकरण घडतं पॅरेसच्या स्टुडियोमधे. कथानकातली पात्रं मेक्सिकन आहेत, नट नट्या मेक्सिकन नाहीत. चित्रपटातले संवाद स्पॅनिश, मेक्सिकन स्पॅनिशमधे आहेत. अमेरिकन, युरोपीय किंवा तुम्हाआम्हाला सबटायटल वाचूनच संवाद कळतात. परंतू मेक्सिकन लोकांना नटनट्यांचे स्पॅनिशचे उच्चार खटकतात कारण नटनट्या मेक्सिकन नाहीत. मेक्सिकन आणि स्पॅनिश भाषा जाणणाऱ्यांना सबटायटलमधलं भाषांतर खटकतं, भाषांतरात आशय गायब होतो, भाषांतर हास्यास्पद होतं असं त्या त्या भाषा जाणणाऱ्यांचं मत आहे. त्यामुळं तमाम स्पॅनिश, मेक्सिकन जनता खवळली, त्यांनी चित्रपटाला फाडलं. अमेरिकन लोक, ऑस्कर निवड समितीनं सबटायटल्स तपासली नसल्यानं त्यांना चित्रपटात काही आक्षेपार्ह वाटलं नाही.
भारतातल्या कोणाही माणसाला जर चित्रपट इतर भाषकांसाठी करायचा असेल तर काय खबरदारी घ्यावी लागेल हे प्रस्तुत चित्रपट पाहिल्यावर कळेल.
चला आपण एक चित्रपट पाहूया असा विचार माध्यमातली माणसं, समीक्षक आताशा करत नाहीत. व्यापक सामाजिक भान, व्यापक सामाजिक जबाबदाऱ्या, ऐतिहासिक सत्य इत्यादी गोष्टींना फार महत्व येतं. चित्रपट पोलिटिकली करेक्ट आहे की नाही; समाजातल्या बहुसंख्य लोकांच्या सांस्कृतीक-राजकीय-ऐतिहासिक कल्पनांशी चित्रपट मेळ खातो की नाही हाच घटक महत्वाचा ठरतो. मुळात चित्रपट हे एक साहित्य (फिक्शन) आहे, तो काल्पनीक असतो, आपल्या वास्तवाबद्दलच्या कल्पना चित्रपट पहाताना पेटीत कुलुपबंद करून चित्रपट (नाटक, कादंबरी इत्यादीही) पहायचा असतो ही गोष्ट आता मागं पडत चाललीय. प्रस्तुत चित्रपटाच्या बाबतीतही तसंच घडलेलं दिसतंय.
चित्रपटातलं मुख्य पात्र एमिलिया पेरेझ, एक लिंग परिवर्तन-शरीर परिवर्तन झालेला पुरूष आहे. गंमत अशी की ती भूमिका करणारी नटी कार्ला गॅस्कोन एक लिंगपरिवर्तीत व्यक्ती आहे. कार्ला ही एक पुरुष होती, तिनं स्वतःचं रुपांतर स्त्रीमधे करून घेतलं आहे. कार्लानं साताठ वर्षांपूर्वी काही राजकीय विधानं केली होती. तिच्या विधानामधून ती काळ्यांचा आणि इस्लामचा द्वेष करते असा अर्थ निघतो. वरील विधानं प्रस्तुत चित्रपट स्पर्धांच्या रांगेत उभा रहाण्याच्या काळात माध्यमांत झळकली. जनता खवळली.
कार्लानं आपण ती विधानं करण्यात चूक केली असं म्हणून माफी मागितली. यावरही माध्यमांत मुसळधार चर्चा. अलीकडं माध्यमं आणि जनता असल्या चर्चांत खुष असते; चघळायला ही हाडकं बरी असतात. परंतू या वादंगांचा प्रभाव स्पर्धा भरवणाऱ्यांवर पडत असावा. पटकथा, चित्रण, अभिनय, तंत्र, संकलन इत्यादी मुद्द्यांवर विचार करून एकूणात चित्रपट कसा आहे याचा विचार अलिकडं कमी होतो, बाकीच्याच गोष्टीना महत्व येतं. चित्रपट हे समाजपरिवर्तानाचं,क्रांतींचं, वैचारिक परिवर्तनाचं साधन आहे असं मानलं जातं.
असो.
एमिरिया पेरेझ नावाचा चित्रपट माध्यमांच्या नादी न लागता स्वतंत्रपणे पहायला कसा आहे? ठीक आहे.
।।