ऑस्कर २०२३. Living.सामान्य माणूस ऑस्कर रांगेत.
ऑस्कर २०२३. Living.सामान्य माणूस ऑस्कर रांगेत.
२०२३ च्या ऑस्कर स्पर्घेक लिविंग या चित्रपटाला ॲडॉप्टेड पटकथा आणि अभिनय या वर्गांत नामांकनं मिळालीत. अभिनय William Nighy यांचा आहे आणि पटकथा Kazuo Ishiguro यांनी लिहिलीय. नाई यांना अभिनयाचं पारितोषिक मिळायला हरकत नाही.
या चित्रपटामागं बराच इतिहास आहे. १८८६ साली टॉलस्टॉयनी The Death of Ivan Ilych या नावाची एक छोटी कादंबरी लिहिली होती. या कथेतून प्रेरणा घेऊन अकिरा कुरोसावा या जपानी दिक्दर्शकानं १९५३ साली इकुरू (Ikuru-जगणं-to live) या नावाचा चित्रपट केला. इकुरुचीच गोष्ट हेमानस या द. आफ्रिकन दिक्दर्शकानं इंग्लंडच्या नेपथ्यावर इंग्लीश पात्रांकरवी लिविंग (Living) या चित्रपटात मांडलीय.
चित्रपटाची गोष्ट एका सरळ रेषेत रेखाटता येते.
पालिकेत काम करणारा एक बाबू आहे. विल्यम्स. वरिष्ठ कारकून. निवृत्ती जवळ आलीय.आयुष्यभर फक्त फायली इकडून तिकडं सरकवतो. निर्णय म्हणून घ्यायचा नाही, निर्णय पुढं ढकलण्याचा सतत प्रयत्न.
एका क्षणी आपल्याला कॅन्सर झालाय हे कळतं. काही दिवसांचंच आयुष्य उरलंय. जमा केलेले पैसे गोळा करतो, दारूबिरू पितो, छान हॅट घालून क्लबात जातो, मजा करतो, एका तरूण मुलीबरोबर मैत्री करतो. शेजार पाजारचे लोक, मुलगा आणि सून त्याला म्हातारचळ लागला आहे असं समजतात.
मौज करत असतानाच त्याला जाणवतं की आपल्या आयुष्यात आपण काहीच चांगलं काम केलं नाही. तो ऑफिसात येतो आणि एका उद्यानाचं रखडलेलं काम मार्गी लावतो. पालिकेला काम करण्याची सवय नसते, सगळे विल्यम्सच. ते उद्यानाच्या कामात अडथळे आणतात. विल्यम्स कधी नव्हे तो कणखरपणा दाखवून काम पार पाडतो.
उद्यानात छोट्या मुलांसाठी झोपाळे, घसरगुंड्या असतात. विल्यम्सला समाधान वाटतं. विल्यम्स मरतो.
तो मेल्यानंतर लोकांना कळतं की त्याला कॅन्सर झाल्ता, एक सत्कृत्य म्हणून त्यानं उद्यान उभारलं.
२०२३ च्या लिविंगमधे इंग्लंड आणि विल्यम्स आहेत, १९५३ सालच्या इकुरुमधे जपान आणि वाटानाबे आहे. येवढाच फरक.
सत्तर वर्षांनंतर तोच चित्रपट करायची कल्पना काझुओ इशिगुरो यांची. ब्रिटीश इशिगुरोंना २०१७ साली साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालंय. कादंबरीकार असूनही ते उत्साहानं पटकथा लिहितात. रिमेन्स ऑफ दी डे, नेव्हर लेट मी गो या चित्रपटांच्या पटकथा त्यानी लिहिल्या आहेत. मूळ कादंबऱ्याही त्यांच्याच.
कादंबरीकार असूनही त्यांना पटकथा लिहाव्या असं कां वाटतं? कागदावर लिहिलेल्या शब्दांतली माणसं पडद्यावर कशी दिसतात ते जाणण्याची, करून पहाण्याची उत्सुकता इशिगुरोंना आहे. कागदावरची भूमिका एक नट प्रत्यक्षात साकारतो म्हणजे काय होतं ते पहायला हवं असं इशिगुरोना वाटतं. कागद आणि शब्द हे एक माध्यम. स्वतंत्र. कॅमेऱ्यासमोर ती भूमिका वठवणं हे एक दुसरं स्वतंत्र माध्यम. अशा दोन स्वतंत्र माध्यमं हाताळताना नव्या गोष्टी कळतात, त्या घडवणं यात एक नवं कसब शिकावं लागतं, हे इशिगुरो शिकले. लिविंगमधे नाई या नटानं उभा केलेला विल्यम्स आपण कल्पू शकलो नव्हतो असं इशिगुरो म्हणाले.
शब्द काही एक सांगतो, चित्रं काही एक वेगळंच सांगतात, चित्रपट तर कायच्या कायच वेगळं काही सांगतात. हा अनुभव एक क्रियेटिव लेखक म्हणून इशिगुरोंना घ्यावासा वाटतो म्हणून तर त्यांनी रिमेन्स ऑफ दी डे या स्वतःच लिहिलेल्या कादंबरीची पटकथाही स्वतःच लिहिली.
पटकथा लिहीत असताना हेमानस या तरूण दिक्दर्शकाशी इशिगुरो यांच्या अनेक आणि अमाप चर्चा व्हायच्या. हेमानस हा पर्फेक्शनिस्ट माणूस. त्याला जे हवं असतं ते जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत हेमानस धडपडत रहातो. झूमवर चर्चा होत. कोविडचा काळ होता, द.आफ्रिकेतले हेमानस आणि लंडनमधले इशिगुरो यांच्या भेटी शक्य नव्हत्या, प्रवास बंद होता. चर्चा व्हायची. इशिगुरो मेल करायचे. हेमानस बदल सुचवायचा. इशिगुरो बदललेली कॉपी मेल करत. दिक्दर्शक दिसण्याच्या अंगानं चित्रपट करणार, इशिगुरो शब्दांच्या अंगानं विचार करणार.
कुरोसावा हे इशिगुरोंचे आवडते दिक्दर्शक. इशिगिरो नागासाकीचे, कुरोसावा टोकियोचे. कुरोसावा इकुरुमधून हळुवारपणे सांगतात की जपान या विशाल देशात किंवा जगात तुम्ही एक लहान व्यक्ती असता. पण असता, जगत असता. तुम्ही जे कराल ते लोकं विसरूनही जातील. पण तरीही तुम्ही असता, तुमच्या आयुष्यात तुम्ही काही तरी केलेलं असतं. हे तुमचं काही तरी केलेलं असणं, तुमचं जगणं, living, महत्वाचं असतं.
कुरोसावाचं हे सांगणं एक कादंबरीकार म्हणून इशिगुरोंना आवडलं.
इशिगुरो जन्मानं जपानी आहेत, शाळेच्या वयात ते इंग्लंडमधे स्थलांतरीत झाले, तिथलेच झाले. इंग्लीश संस्कृती त्यांना चांगलीच माहित आहे. इंग्लीशपण म्हणजे काय आहे ते त्याना माहित आहे. इंग्लीश माणूस भिडस्त असतो, विनम्र असतो, मर्यादाशील असतो.
इशिगुरो म्हणतात की १९५० च्या दशकात इंग्लीश माणसाचं इंग्लीशपण टिकून होतं, नंतर नंतर ते लयाला गेलं. विल्यम्स हा नायक इंग्लीशपणाचा नमुना आहे.
काय गंमत आहे पहा. नाई आज ७३ वर्षाचे आहेत. कसलेले अभिनेते आहेत. त्यांना तेच तेच करण्याचा कंटाळा आहे. सतत एकच गोष्ट करत रहायचं, एकाच ठिकाणी जात रहायचं त्यांना आवडत नाही. तो त्यांचा पिंड नाही. पण लिविंग या चित्रपटात एकाच खुर्चीवर,एकाच कार्यालयात, एकच काम करत रहाणाऱ्या कर्मचाऱ्याची भूमिका त्याना करावी लागलीय. जे आवडत नाही ते करून दाखवायचं.
नाई त्यांच्या तरूणपणात दिसायला देखणे नव्हते. त्या काळात नटानं देखणं असणं याला महत्व होतं. थिएटर, सिनेमातले लोक म्हणायचे, तुम्हाला कसं काम मिळणार? नाई म्हणायचे- अरे मला भूमिकेप्रमाणं दिसायचंय, मी व्यक्ती म्हणून कसा दिसतो याला काही अर्थ नाही. नाईंचं म्हणणं किती खरं आहे हे लिविंग या चित्रपटात दिसतं.
हेमानस द.आफ्रिकन आहेत, तिथंच वाढले आहेत, त्यांच्यावर तिथलेच संस्कार आहेत. इंग्लीश माणसाकडं ते एका अंतरावरून पाहू शकतात. १९५२-५३ सालचा इंग्लीश समाज एका अंतरावरून त्यांना पहाता आला, आजच्या इंग्रजी वातावरणापासून मुक्त विचार हेमानस यांना करता आला.
एका सामान्य माणसाची एक सामान्य गोष्ट. त्यात घडणाऱ्या घटनाही सामान्यच. घटना अगदी स्थानिक. सामान्य जीवन हाही चित्रपटाचा विषय होऊ शकतो. कुरोसावा नाट्य शोधतो, ते चित्रपटात आणतो.
दुसऱ्या महायुद्धानं जग बदलून टाकलं. मरणारी लाखो माणसं सामान्य होती, विनाकारणच ती मेली. एक काळ असा होता की युद्धबिद्ध झाल्यावर अमूक राजा किंवा सम्राट कसा थोर होता ते युद्धाच्या निमित्तानं सांगत. सगळी वर्णनं राजाच्या शौर्याची, त्याच्या थोरवीची. दुसऱ्या महायुद्धानंतर कळलं राजाबिजा हे इतिहासाचं मोजमाप खरं नाही, खरी मापायची असतात ती सामान्य माणसं. या नव्या जाणीवेनं युरोपमधे नव्या चित्रपटाला जन्म दिला. बायसिकल थीव्ज, उंबर्टो डी.
त्याच जाणीव लाटेत कुरोसावा वाढले.
लिविंग आणि इकुरा हे दोन चित्रपट एकापाठोपाठ एक पहाण्यासारखे आहेत. कुरोसावाचं ऋण हेमानस, इशिगुरो व्यक्त करतात.
।।
Living.
दिक्दर्शक -Oliver Hermanus
अभिनेता – Bill Nighy.
पटकधा – Kazuo Ishiguro.