ओकारी आणणारा सुंदर चित्रपट
चित्रपट सबस्टन्स. मुख्य भूमिका डेमी मूर
‘डेमी मूर’ ला गोल्डन ग्लोब बक्षीस मिळालं, ऑस्कर नामांकन मिळालय.
ज्या सिनेमातल्या कामाबद्दल बक्षिस मिळालं तो सिनेमा आहे ‘सबस्टन्स’. या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचं ऑस्कर नामांकन मिळालंय.
चित्रपटाची दिक्दर्शिका कोरेली फार्जिट हिला दिक्दर्शनाचं नामांकन मिळालंय.
डेमी मूर आज ६२ वर्षाची आहे. सबस्टन्स हा सिनेमा तिनं गेल्या वर्षी म्हणजे वयाच्या ६१ व्या वर्षी केला. या वर्षी अमेरिकेत टीव्ही, ओटीटी, सिनेमा, नाट्य, मालिका इत्यादी वर्गवारीत बक्षिसं मिळालेल्या अभिनेत्रीमधे पन्नाशीच्या पलिकडच्या बहुसंख्य आहेत. टायटॅनिकमधे गाजलेल्या केट विन्सलेटला एक बक्षीस मिळालंय, ती ४९ वर्षाची आहे. जुडी डेंच आज ९० वर्षाची आहे, तिनंही ८५ व्या वर्षी ब्लाईद स्पिरिट या चित्रपटात भूमिका केली होती.
हॉलिवूडची गंमत अशी की तिथं अनेक चित्रपटात ‘नायिका’ नसते, मुख्य भूमिका असते. आपल्याला नायिका म्हटलं की ती तरूण असली पाहिजे, तिनं झाडाभोवती फिरून नायकासोबत नाच केला पाहिजे असं अजून वाटतं. हॉलिवूडमधे चित्रपटात भूमिका असते, मुख्य भूमिका असते, भूमिकेचं कोणतेही वय नसतं. पटकथा लिहितांना भूमिकेचं वय महत्वाचं नसतं. गोष्ट महत्वाची, गोष्टीतली पात्रं महत्वाची, ती तरूणच असायला पाहिजेत असं नसतं.
‘सबस्टन्स’मधे एलिझाबेथ ही पन्नाशी उलटलेली मॉडेल कम नटी आहे. ती फिटनेस ‘शो’मधली मुख्य ट्रेनर आहे. ‘शो’च्या निर्मात्याला म्हातारी झालेली नटी नकोशी होते, त्याला हवी असते एक तरूण मादक नटी.
एलिझाबेथ निराश होते. केवळ वय वाढल्यामुळं तिची भूमिका जाणार असते. ती एक सबस्टन्स नावाचं औषध घेते. हे औषध घेतल्यामुळं तिच्या शरीरातून तिचं दुसरं शरीर बाहेर पडतं.
औषधाच्या काही अटी असतात. एक आठवडा मूळ शरीर आणि एक आठवडा पर्यायी शरीर. एक शरीर झोपलेल्या अवस्थेत रहातं, पर्यायी शरीर जगात वावरतं. झोपवलेल्या शरीराला आठवड्याभराचा अन्न पुरवठा करावा लागतो. यात काही गडबड झाली, सबस्टन्स बंद झालं तर एक शरीर मरतं आणि विकृत झालेलं दुसरं शरीर शिल्लक रहातं.
एलिझाबेथ सबस्टन्स घेते. तिच्या शरीरातून सू ही सुंदर सुडौल मादक तरूण जन्म घेते. एलिझाबेथ झोपलेल्या स्थितीत आठवडाभर बाथरूममधे रहाते तेव्हां सू आठवडाभर शोमधे काम करते. मग सू झोपते आणि एलिझाबेथ सक्रीय होते.
सू सॉलिड लोकप्रिय होते. एलिझाबेथ सूचा द्वेष करू लागते.एलिझाबेथ सूला संपवते. सबस्टन्स बंद होतं. एलिझाबेथचं शरीर विकृत होत जातं, तिचं रूप राक्षसी होतं, जमलेल्या लोकांवर रक्ताचे फवारे टाकत आणि आपल्या शरीरातले अवयव भिरकावत एलिझाबेथ मरते.
यातलं एलिझाबेथचं काम डेमी मूरनं केलंय. सूचं काम दुसऱ्या एका तरूण वयातल्या नटीनं केलंय.
डेमी मूर एक मॉडेल होती. मॉडेल असण्याला लागणारे गुण तिच्यात होते. मॉडेलना अभिनेती करायचा मोह दिक्दर्शकाना होतो, मॉडेलच्या सुंदर आणि सुडौल असण्यामुळं. डेमी मूरला टीव्ही शो मिळाले, काही चित्रपटही मिळाले. डेमी मूर १९९० सालच्या घोस्ट या चित्रपटात गाजली. चित्रपटात तिनं भूमिकाही छान केली, ती खूप सुंदर दिसत होती, सुंदर होतीच अर्थात. घोस्टमधे ती स्टार झाली. एकदाच. पुढं चालून ती अभिनेत्री झाली नाही. प्रेक्षक तिला पॉप कॉर्न म्हणत, कलाकार म्हणत नसत. डेमीला त्याची पर्वा नव्हती. ती पडद्यावर आणि मंचावर नाना रुपात वावरत राहिली.
ती गाजली ती तिनं केलेल्या बखेड्यामुळं. स्त्री अभिनेत्रीना पुरुष अभिनेत्यांना मिळतात तेवढे पैसे दिले जात नाहीत अशी टीका ती करायला लागली. खूप चर्चा झाली. आणि सर्वात जास्त पैसे मिळवणारी, नटायेवढेच पैसे मिळवणारी म्हणून ती प्रसिद्ध झाली.
तिला फारशी कामं मिळाली नाहीत. सबस्टन्सची दिक्दर्शक आहे कोरेली फार्जी. धाडसी आहे, प्रयोगशील आहे, स्त्री स्वातंत्र्याचा विचार करणारी आहे. तिनं डेमी मूरनंच भूमिका करावी असा आग्रह धरला.
चित्रपटाचं कथानक ऑस्कर वाईल्ड या आयरिश कादंबरीकाराच्या पिक्चर ऑफ डोरियन ग्रे या कादंबरीशी मिळतंजुळतं आहे. त्या कादंबरीत डोरियन ग्रे या एका देखण्या तरूणाच्या पोर्ट्रेटची गोष्ट आहे. डोरियन ग्रे वाईट वागला की त्याचं पोर्ट्रेट वाईट दिसू लागे. शेवटी डोरियन ग्रेला आपण केलेल्या दुष्कृत्यांचा पश्चात्ताप होतो, तो आत्महत्या करतो. तिकडं लगोलग त्याचं पोर्ट्रेट सुंदर होतं.
सबस्टन्समधली अनेक दृश्य भीतीदायक आणि ओकारी आणणारी आहेत. चित्रपटात अनेक वेळा रक्त दिसतं. एलिझाबेथ वैतागून खात सुटते. एकदा ती चिकनची मोठ्ठी तंगडी खाते. त्यावेळी सू शोच्या शूटिंगमधे असते. सूला त्रास होतो. ती धावत बाथरूममधे जाते. बेंबीत हात घालते, चिकनची तंगडी खेचून काढते. एकदा सू नाच करत असताना एलिझाबेथनं काही तरी उद्योग केल्यानं सूच्या ढुंगणावर एक प्रचंड गळू आल्यासारखा बुडबुडा येतो. सूच्या अंगातून तिची आतडी वगैरे बाहेर पडतात. शेवटच्या दृश्यात तर एलिझाबेथच्या रक्ताचा पाऊस प्रेक्षकांवर पडतो.
इतकं हिडीस अशी दृश्य दाखवायची आवश्यकता होती काय असा प्रश्न दिक्दर्शिकेला समीक्षकांनी विचारला. दिक्दर्शिकेचं म्हणणं असं की समाजाच्या वर्तणुकीबद्दल नुसता राग येणं उपयोगाचं नाही, त्यांना किळस वाटला पाहिजे,ओकारी आली पाहिजे. पुरुष आणि समाज स्त्रीकडं केवळ शरीर आणि सेक्स संबंध म्हणूनच पहातो. स्त्रीची बौद्धिक, मानसिक क्षमता, तिचं व्यापक व्यक्तिमत्व दुर्लक्षिलं जातं. एलिझाबेथनं पन्नाशी उलटली पण तिची ट्रेनर म्हणून बौद्धिक आणि शारीरीक क्षमता उत्तम स्थितीत आहे याला शोच्या निर्मात्याच्या लेखी महत्व नाही ही गोष्ट नुसती चीड आणणारी असू नये तर ओकारी आणणारी असावी असं दिक्दर्शिकेचं म्हणणं आहे.
\\