ओटो नावाची कॉमेडी

ओटो नावाची कॉमेडी

अ मॅन कॉल्ड ओटो.

ओटो नावाचा एक फार म्हातारा न झालेला जेमतेम साठी उलटलेला माणूस आहे. निवृत्त झालाय. एकटा आहे. पत्नी काही दिवसांपूर्वी गेलीय. स्वभावानं कटकट्या आहे. सभोवतालची कोणतीच गोष्ट त्याला सुखावत नाही. 

एक बिचारं मांजर त्याच्या गराजच्या दारात निमूट उभं असतं.  ते ओटोला पहावत नाही. उगाचच त्या मांजराला हाकलून लावतो. कचरा कुंडीच्या ठिकाणी एक तरूण सायकल उभी करतो. ओटो त्याला हटकतो. ही सायकल उभी करायची जागा नाही असं सुनावतो आणि सायकल तिथून हटवायला सांगतो. त्यामुळं लोकांपासून दुरावलाय.वैतागलाय. आत्महत्या करायचं ठरवतो. प्रयत्न करतो. कधी शेजारी दरवाजा ठोठावतो, कधी छताला टांगलेला हूक निखळतो. कधी काय न् कधी काय.

कटकट्या ओटोला नकोशी असली तरी माणसं त्याच्या आयुष्यात घुसतात. ओटो हळूहळू माणसात येतो. त्याच्यातला लुप्त झालेला समाजात सुखावणारा माणूस पुन्हा जागा होतो. ओटो माणसात येतो, चित्रपट संपतो.

सुखावणारं कथानक.

लोकांना सुखावेल, त्यांना दोन घटका आनंदात लोटेल अशीच चित्रपटाची रचना दिक्दर्शकानं केलीय. त्यामुळं साहजीकच चित्रपटाच्या मांडणीत गमती झाल्यात.

सुरवातच पहा. ओटोला फास तयार करायचा असतो. गळ्याचं, छतापासूनच्या अंतराचं माप घेऊन किती लांब दोरखंड लागेल याचा हिशोब करून ओटो दुकानात जातो. हिशोबानुसार समजा त्याला सव्वापाच फूट लांब दोर हवाय. पण दुकानदार अशा अर्धवट मापात दोर देत नाही. एक मीटर घ्या नाही तर दोन मीटर घ्या. मधलं नाही. ओटो भांडतो. मी सव्वापाच फूटच घेणार आणि तेवढ्याचेच पैसे देणार यावर अडून बसतो.

आता पहा. आत्महत्या करायला निघालेला माणूस. म्हणजे गंभीर प्रकरण. पण त्यांचं दोरावरचं भांडणं जातं विनोदाच्या अंगानं.  पूर्ण विनोदाच्या अंगानंही नाही. टॉम हँक्स हा नटाचा अभिनय गंभीर माणसाचाच दाखवलाय. खरं म्हणजे टॉम हा प्लास्टिक चेहऱ्याचा माणूस आहे. तो चेहऱ्यावर कोणत्याही सूक्ष्म छटा आणू शकतो. पण चित्रपटात तो धड विनोदीही नाही, धड गंभीरही दिसत नाही.

आत्महत्येचे प्रयत्नही असेच धड विनोद नाही, धड गंभीर नाही, धड काळा विनोदही नाही अशा रीतीनं आपल्या समोर येतात.

अगदी सुरवातीच्या फ्रेममधे टॉम हँक्स दिसतो. म्हणजे चित्रपट टॉमवर, ओटोवर आहे हे आपल्याला कळतं. आता ओटो हा कल्पित माणूस असला तरी भूमिका करणारा टॉम हँक्स आपल्याला चांगलाच माहीत असतो. 

आपल्याला टॉमनं केलेल्या नेगेटिव भूमिका आठवत नाहीत. समजा रोड टू पर्डिशनमधली खुन्याची भूमिका आठवली तरीही त्यात टॉमचं पात्र असं असतं की आतून त्याच्याबद्दल काहीशी सहानुभूतीच वाटते. किती कठीण स्थितीचा मुकाबला टॉमला करावा लागला, त्याची इच्छा नसतांनाही त्याला गुन्ह्याकडं वळावं लागलं हे पहात पहात टॉम गोळीबार करताना, बँक लुटताना दिसतो.  चित्रपटाच्या शेवटी टॉमचाही खून होतो तेव्हां आपल्याला वाईट वाटतं. अरेरे टॉमचा असा दुर्दैवी मृत्यू व्हायला नको होता असं आपल्याला वाटत रहातं.

 एकादा नट/नटी वैशिष्ट्यामुळं लक्षात रहातात, वैशिष्ट्य त्याना चिकटून रहातं. मीना कुमारी दिसली की आपण गृहीतच धरतो की पात्रं करूण असणार, रडकं असणार, दुःखी असणार. देव आनंद म्हणजे हॅपी गो लकी, शम्मी कपूर म्हणजे उछलकूद. वगैरे. तसंच टॉम हँक्सचं. उपकार करणारा, भला माणूस.त्यामुळं चित्रपटाच्या सुरवातीला ओटो कटकट्या, तक्रारखोर, लोकांना पिळणारा दिसला तरी चित्रपटाच्या शेवटी तो बदललेला असणार याची खात्री आपल्याला असते. आणि तसंच घडतं.

टॉम हँक्सच्या अभिनयात सहजता असते. तो नट वाटतच नाही. भूमिकेत जसा माणूस असेल तसा टॉम हँक्स होऊन जातो. फॉरेस्ट गंप आठवून पहा किंवा सेविंग प्रायव्हेट रायन आठवा. किती भिन्न माणसं. दर वर्षी त्याचा कुठला तरी चित्रपट कान्समधे असणार, ऑस्करसाठी असणार. किती नामांकनं आणि किती बक्षिसं. काही अर्थच उरत नाही. या लोकांना नामांकनं, बक्षीसं देणं बंदच करायला हवं. जसं ती मेरिल स्ट्रीप आहे किंवा आपल्या लता मंगेशकर होत्या. बक्षिसांच्या पलीकडं गेलेली माणसं.

ओटोच्या घराच्या समोरच्या घरात रहाणाऱ्या मेक्सिकन महिलेचं काम मेरियाना ट्रेविनो या स्पॅनिश नटीनं केलंय. ही नटी अमेरिकन चित्रपटात दिसत नसल्यानं आपल्या परिचयाची नाही. तरीही दिसता क्षणीच ती आपला कबजा घेते. तिची जातकुळी टॉम हँक्सचीच. तिच्याकडं पाहिलं की ती गुन्हेगाराची भूमिका कधीच करणार नाही असं वाटत रहातं, इतकी ती आपल्याच घरातली असल्यासारखी वावरते. ती पडद्यावर येते तेव्हां तिच्या हालचालीतून पन्नास सेकंदांतच कळतं की ही बाई कटकक्या हँक्सला वळणावर आणणार. भारी नटी आहे. इतकी भारी आहे की प्रसंगी ती टॉम हँक्सलाही मागं टाकते. 

फ्लॅश बॅकमधे ओटो कॉलेजात दाखवलाय. कॉलेजातच तो प्रेमात पडतो, लग्न करतो. कॉलेजमधला ओटो टॉम हँक्सच्या मुलानं साकारलाय. बाप-मुलगा एकाच चित्रपटात. ट्रुमन टॉमच्या वयाचा होता तेव्हां अगदी टॉमसारखाच दिसत असे, जरासा अधिक उंच होता.

आपल्याला मुलाला चित्रपटात घुसवलं अशी एक खड्डुस प्रतिक्रिया पेपरात आली होती. त्यावर टॉम म्हणाला ‘अरे हा फॅमिली बिझनेस आहे. माझं समजा हार्डवेअरचं दुकान असतं तर माझा मुलगा लहानपणापासून दुकानात बसला असता, दुकान चालवण्याची कला उमेदवारी करत शिकला असता, पुढं चालून त्यानं माझं दुकान चालवलं असतं की नै? तसंच हे आहे.’

पण एकादी भूमिका, एकादं पात्र पुढं काय करणार आहे हे कळणं म्हणजे चित्रपटाची मजा घालवण्यासारखंच असतं. एक कटकट्या माणूस आणि एक बेधडक पण अत्यंत उमदी स्त्री एकत्र येणार आणि नंतर सारं सारं गोडमगिट्ट होणार हे पहिल्या पाच मिनिटात कळलं तर मग चित्रपट पहायचा कशाला? चित्रपटात अनपेक्षितता हवी ना, धक्के हवेत ना? अगदी रहस्यपट असायला हवा असं नाही, पण उत्सुकता तरी टिकून रहायला पाहिजे.

 चित्रपट सुखावणारा आहे.  अती सुखावणारा आहे. कुटुंबासह पहावा असा आहे. ऑस्करला नामांकन होतं. ऑस्करला सिनेमा प्रचंड लोकप्रिय, प्रचंड पैसे मिळवणारा तरी असावा लागतो. किंवा पैसे मिळवले असतील नसतील, त्यात काही तरी भारी नवं, क्रिएटिव असावं लागतं. ओटोत यातलं काहीच नाही.

चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

Comments are closed.