ओबामा आणि ट्रंप यांच्यातला फरक

ओबामा आणि ट्रंप यांच्यातला फरक

अँजेला मर्केल यांच्याबरोबर एक जेवण बैठक करायचं आधीच ठरलं होतं.

  बर्लीनमधल्या एका हॉटेलात एका हॉलमधे ओबामा आणि मर्केल एकत्र जेवले. तीनेक तास. ओबामांची कारकीर्द संपत होती,  ट्रंप कारकीर्द सुरु होत होती. ट्रंप काय करतील याची भीतीचिंता मर्केलनी व्यक्त केली. ओबामाही चिंतित होतेच, म्हणाले, वाट पाहूया. ब्रीटन युरोपियन समुदायातून बाहेर पडत होतं आणि सीरियन स्थलांतरीतांच्या स्फोटक प्रश्नाला जर्मनी आणि युरोपला तोंड द्यावं लागत होतं. मर्केल चिंतित होत्या. सीरियन स्थलांतरितांना जर्मनीत प्रवेश देण्याच्या त्यांच्या निर्णयावर जर्मन जनता खवळली होती. युरोप आणि जर्मनीला संकटातून बाहेर काढण्यासाठीच पुन्हा एकदा चॅन्सेलर पदासाठी निवडणुकीला उभं रहायचा विचार, नाईलाजानं, मर्केल करत होत्या.

आठ वर्षाच्या अध्यक्षीय कारकीर्दीत कठीण प्रसंग आले तेव्हां ओबामा मर्केलशी बोलत, त्यांचा सल्ला घेत. मर्केल यांच्या स्थिर, व्यावहारीक, धीम्या आणि शहाणपणाचा आधार ओबामा यांना वाटत असे.  

 मर्केल ओबामाना निरोप द्यायला विमानतळावर पोचल्या. ओबामा पुढल्या टप्प्यासाठी दक्षिण अमरिकेला निघाले होते. ओबामा कारचा दरवाजा उघडून खाली उतरले, विमानाच्या शिडीकडं निघाले. मर्केलनी गळा भेट घेऊन त्यांना निरोप दिला. मर्केल यांच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंब ओघळला. विमानात पोचल्यावर ओबामा सहकाऱ्याला म्हणाले ” मर्केल एकट्या पडल्यात. ”

   वरील उतारा वर्ल्ड अॅज इट ईज या पुस्तकातला आहे. बराक ओबामा यांचे सहकारी, मदतनीस, सल्लागार बेन ऱ्होड्स यांनी हे पुस्तक लिहिलंय.  आठ वर्षाच्या अध्यक्षीय कारकीर्दीत ऱ्होड्स ओबामांच्या अगदी निकटच्या सहवासात असत. व्हाईट हाऊसमधे, परदेशातल्या दौऱ्यावर.

  ओबामा नेता म्हणून कसे होते, अध्यक्ष म्हणून कसे होते याची कल्पना ऱ्होड्स यांच्या पुस्तकातून येते. ओबामा यांचं व्यक्तिमत्व ओबामांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकातून आधी कळलं होतं. अध्यक्षीय राजकारणात येण्याआधी ओबामा यांनी दोन पुस्तकं लिहिली. ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकात त्यांनी आपण कसे वाढलो याचं चित्रण केलं. दी ओडॅसिटी ऑफ होपमधे ओबामानी आपलं विचारविश्व चितारलं. ऱ्होड्स यांच्या पुस्तकामुळं ओबामा अधीक समजतात. 

ओबामा यांच्या अध्यक्षीय काळात जगामधे अनेक वादळं आणि संकटं निर्माण झाली. बलाढ्य देशाचा प्रमुख म्हणून ओबामांना निर्णय घ्यावे लागले. त्यांनी इराक, अफगाणिस्तानात सैन्य पाठवलं. लिबियात गद्दाफीच्या विरोधात कारवाई केली. ओसामा बिन लादेनला मारलं. इराणशी सलोखा केला. क्यूबा या पारंपरीक कम्युनिष्ट शत्रूदेशाशी संबंध प्रस्थापित केले.  आंतरराष्ट्रीय पर्यावरण करार केला. अमेरिकेत प्रत्येक माणसाला आरोग्य संरक्षण देणारी विमा व्यवस्था उभारली. ओबामा यांनी केलेली प्रत्येक गोष्ट अमेरिका आणि जगाच्या दृष्टीनं महत्वाची होती, त्यांच्यावर साऱ्या जगाचं लक्ष होतं.

साऱ्या जगाच्या भल्याशी संबंध असणारे निर्णय ओबामा कसे घेत होते याचं सविस्तर चित्रण ऱ्होड्स यांनी पुस्तकात केलं आहे. 

उदा. सीरियामधे असद यांनी रासायनिक शस्त्रं वापरल्यानंतर झालेली परिस्थिती. दमास्कसमधे हजारेक माणसं मेली होती. तोंडातून फेस येत तडफडणारी मुलंमाणसं जगानं आणि अमेरिकेनं पाहिली. असद यांच्यावर तातडीनं कारवाई केली पाहिजे असं सारं जग म्हणून लागलं होतं. 

पण काय करणार? 

सीरियावर हल्ला करणार? हवाई हल्ला करणार? त्यात नागरीकही मरणार होते आणि त्या वेळी रासायनिक हल्ल्याची तहकीकात करण्यासाठी गेलेले युनोचे निरीक्षकही मरणार होते.सैन्य पाठवणार? चार दोन सैनिक पाठवून भागलं नसतं. हज्जारो सैनिक, रणगाडे, काय न् काय. म्हणजे पुन्हा एक स्वारी. इराक, अफगाणिस्तान इत्यादी स्वाऱ्या करून अमेरिकेनं लोकमताचा रोष ओढवून घेतला होताच. आता पुन्हा तो उद्योग करायचा? त्यात अमेरिकी सैनिक मरू द्यायचे? 

अमेरिकन लष्करी अधिकारी आणि खासदार काही तरी करावं असं म्हणत होते पण लष्करी कारवाईची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. खाजगीत म्हणत की हल्ला करावा, लढाई करावी. पण जाहीरपणे मात्र विरोध करत होते. जगभरचे देशही कारवाई हवी असं म्हणत होते पण त्यात आपले सैनिक पाठवायला देश तयार नव्हते. 

अमेरिकन माणसं दुःखी होती पण आपली तरुण पोरं मरू द्यायला तयार नव्हती.

पेच होता. काही करायचं तरी कठीण आणि न करावं तर जबाबदारी टाळण्यासारखं होतं.

व्हाईट हाऊसमधले जाणकार,लष्करी अधिकारी, उपाध्यक्ष, परदेशमंत्री, मंत्रीमंडळ, सेनेट आणि हाऊसमधले दोन्ही पक्षाचे नेते व खासदार, जगातल्या महत्वाच्या देशांचे प्रमुख, युनोचे प्रमुख यांच्याबरोबर ओबामा स्वतः चर्चा करत होते, आपली पूर्ण टीम त्यानी या कामी लावली होती. समांतर पातळीवर मुत्सद्देगिरीनं असद यांना पडतं घ्यायला भाग पाडण्याचा प्रयत्न ओबाम करत होते. त्यासाठी ते पुतीन यांच्याशी व्यक्तिगत पातळीवर बोलत होते. अंजेला मर्केल यांचा सल्ला ओबामानी घेतला. 

आठवडाभर ओबामा आणि त्यांचे सहकारी यांना रात्रीची झोपही मिळाली नाही.

नेमक्या याच काळात पुस्तकाचे लेखक बेन ऱ्होड्स सुट्टीवर होते. ऱ्होड्स सतत कामं करतात, आपल्याकडं, घराकडं, मुलांकडं लक्ष देत नाहीत अशी तक्रार मिसेस ऱ्होड्स करत असत. म्हणून ऱ्होड्स यांनी ओबामांना विनंती करून रजा मिळवली होती. संकट सुरु झाल्यावर ऱ्होड्सना या कामी जुंपण्यात आलं. ओबामांनी मिसेस ऱ्होड्सना फोन करून त्यांची क्षमा मागून ऱ्होड्सना कामाला लावलं होतं.

मतभेद होते, आपसात चर्चा होत, वादावादी होई, वातावरण तापलेलं असे. हे सारं माध्यमांतूनही बाहेर येत असे. अमेरिकेत काहीही गुप्त रहात नाही.

सरतेशेवटी पुतीन यांचा शब्द निर्णायक ठरला.  रासायनिक शस्त्रांचा साठा नष्ट करायला असद यांनी मान्यता  दिली.

  ट्रंप कोणालाही विचारत नाहीत. हॉटेलच्या खोलीत किंवा स्वतःच्या बेडरुममधे बसून टीव्हीवर जे दिसतं त्यावरून ते निर्णय घेतात आणि ट्वीट करून मोकळे होतात. ट्रंप पद्धत ही राज्यशास्त्रात एक स्वतंत्र प्रशासन शैली म्हणून मान्यता पावणार आहे. किती तरी देशांत ही शैली प्रचलीत आहे. नेत्याला वाटतं की त्याला सारं काही समजतं. तो निर्णय घेऊन मोकळा होतो. आसपासची माणसं टरकलेली असतात, ती मम म्हणतात. नंतर सभोवतालचे ढोल वाजू लागतात. ढोल गजरापुढं इतर आवाज क्षीण होतात. पुढं  व्हायचं तेच होत रहातं.

अमेरिकन लोकशाही कशी काम करते, अमेरिकन सरकार कसं काम करतं याची कल्पना या पुस्तकावरुन येऊ शकते. अमेरिकन व्यवस्थेमधे अनेक उप व्यवस्था आणि संस्था असतात. प्रत्येक व्यवस्था स्वतंत्रपणे चालते. प्रत्येक संस्था इतर संस्थांवर वचक ठेवते. 

ओबामांच्या निकटच्या वर्तुळात सुझन राईस या एक सल्लागार होत्या. ओबामांच्या निर्णयाला त्या कडवा विरोध करत. अनेक वेळा त्यानी आपला विरोध टिकवला पण ओबामा यांचा निर्णय मात्र अमलात आणला. सेनेट, हाऊस या संसदेच्या शाखा ओबामांना सतत रोखत होत्या. माध्यमं सतत लोकमताचा दबाव आणत होती. खुद्द लेखकही अनेक वेळा आक्रमक धोरणाची आवश्यकता जोरात मांडत असे आणि ओबामा ते अमान्य करत.

ओबामा हा इंटलेक्चु्अल माणूस होता, कायद्याचा अभ्यास त्यानं केला होता. ओबामा ध्येयवादी होता, ध्येयं अमलात आणण्यासाठी हा माणूस सत्तेत गेला होता. पण त्यांच्या सोबत काम करणारी शेकडो माणसं आणि संस्था प्रत्येक प्रश्नाच्या सैद्धांतिक बाजू, व्यावहारीक बाजू मांडून ओबामाना वळणावर आणायचा प्रयत्न करत. 

सी जिन पिंग या चीनच्या सर्वेसर्वा अध्यक्षांच्या संपर्कात ओबामा असत. पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्यात सी जिन पिंग यांना खूप रस होता ही बाब लक्षात ठेवून ओबामा नेहमी सी जिन पिंगशी सल्लामसलत करत, अडचण आली की सि जिन पिंगना पुढं करत. पुतीन यांच्याशीही ओबामा यांचे वैचारिक संबंध होते, व्यक्तिगत नव्हे.

अमेरिका निर्णय घेते तेव्हां त्यांचा परिणाम साऱ्या जगावर होत असतो याची जाणीव अमेरिकेच्या अध्यक्षाला असायला हवी. इतक्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर छचोर, उथळ, विचार न करणारा माणूस पोचला तर जगाचं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच अमेरिकन समाजव्यवस्थेनं नाना प्रकारचे संस्थात्मक दबाव तयार करून ठेवलेले आहेत, अनेक बाजूंच्या दबावामुळ तोल निर्माण व्हावा अशी अमेरिकन राज्यघटनेच्या निर्मात्यांची इच्छा होती. ओबामा अमेरिकन राज्यघटनेला अपेक्षीत असलेले एक गंभीर व पोक्त राजकारणी होते.

पुस्तकात याचा प्रयत्य जागोजागी येतो.

ओबामा यांनी ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकात आपली वाढ कशी झाली याचं चित्रण केलं आहे. त्यानंतर त्यांनी ऑडॅसिटी ऑफ होप या पुस्तकात त्याना अभिप्रेत असलेल्या जगाचं चित्र उभं केलं आहे. दोन्ही पुस्तकं ते अध्यक्ष होण्याच्या आधीची असून त्या पुस्तकांतून ओबामाचं व्यक्तिमत्व लक्षात येतं. प्रस्तुत पुस्तकात ओबामांचं अध्यक्षीय काळातलं वर्तन दिसतं. ओबामाचे विचार आणि त्यांचं वर्तन यात काही तफावत आहे काय याचा विचार तीनही पुस्तकं वाचून करता येण्यासारखा आहे. ओबामांच्या कारकीर्दीचं मूल्यमापन करायला हे पुस्तक उपयोगी पडू शकेल.

ऱ्होड्स हे मुळातले लेखक आहेत. ललित साहित्याच्या शैलीत त्यांनी पुस्तक लिहिलंय. वाचक अगदी सहजपणे वाचत जातो. आपण फार गंभीर गोष्टी वाचल्यात हे त्याच्या लक्षातही येत नाही.

।।

पु्स्तक  -THE WORLD AS IT IS

लेखक -BEN RHODES.

 

One thought on “ओबामा आणि ट्रंप यांच्यातला फरक

  1. ‘Saint’ Barack deported 3 million illegal immigrants, dropped 26k bombs on majority-Muslim countries in his last year, & kept Guantanamo open after campaigning on a repeated pledge to close it. A lot of people won’t ever forget those things, & nowadays Reality is that US economy, jobs & stock markets are all surging.BOTH Cuba and NK still have no human rights and BOTH still have political prisoners. Did USA had something back from Barak’s Cuban policy?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *