कमला हॅरिस जोरात

कमला हॅरिस जोरात

बायडन निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले.  मतदानाला  १०० दिवस शिल्लक असताना डेमॉक्रॅटिक पक्षाला उमेदवार उभा करायचा आहे.  कोणीच माणूस दिसत नसल्यानं उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना उमेदवार करण्यावातून त्या पक्षाला गत्यंतर उरलेलं नाही.

हॅरिस यांनी कमालीच्या वेगानं मोहिमेचा ताबा घेतलाय. आता त्यांची टीम स्वतःची टीम आहे, ती बायडन यांची टीम नाही.

नेतान्याहू अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना बायडन यांना भेटायला गेले होते.बायडन हे अजूनही अध्यक्ष असल्यानं या भेटीत उपाध्यक्ष कमला हॅरिस त्यावेळी उपस्थित असतील अशी अपेक्षा होती. पण कमला हॅरिस नेतान्याहूना स्वतंत्रपणे भेटल्या, उपाध्यक्ष म्हणून नव्हे तर संभाव्य अध्यक्ष म्हणून नेतान्याहूना भेटल्या.

विविध जनमत पहाण्यामधे ट्रंप आणि हॅरिस यांच्यामधे फक्त एक टक्क्याचंच अंतर आहे. निरीक्षकांचं म्हणणं आहे की एक टक्का म्हणजे काहीच नाही, हॅरिस ते अगदी सहज पार करू शकतील.

प्राप्त परिस्थितीत निवडणुकीचा खेळ करणारे त्या पक्षातले अनुभवी लोक जुळवाजुळव करू लागले आहेत. क्लिंटन पती पत्नी, नॅन्सी पेलोसी, ओबामा इत्यादी बुजुर्गांनी हॅरिसना पाठिंबा जाहीर केलाय.  हॅरिस यांच्या मोहिमेसाठी २० कोटी डॉलर्सच्या देणग्याही गोळा झाल्या आहेत.

प्राथमिक फेरीतून वर न आलेल्या हॅरिसना  ऑगस्टमधे शिकागोमधे होणाऱ्या अधिवेशनात डेमॉक्रॅटिक पक्षाला निवडावे लागेल. पण गंमत अशी की निवडीसाठी आवश्यक असतात त्यापेक्षा किती तरी अधिक डेलेगेट कमला हॅरिसनी मिळवलेत.अमेरिकेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. 

निवडून आल्या तर त्या अमेरिकेतल्या पहिल्या स्त्री प्रेसिडेंट असतील, आशियाई-कॅरिबियन आई वडिलांच्या पोटी जन्मलेल्याही त्या पहिल्याच प्रेसिडेंट होतील.

उमेदवार झाल्यातच जमा असल्यासारखी कमला हॅरिसनी कामाला सुरवात केली आहे. वॉशिंग्टनमधे एका समारंभात त्यानी सलामीचं भाषण केलं. त्या म्हणाल्या ‘मी प्रॉसिक्यूटर आहे. मी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना हाताळलं आहे. मी ग्राहकांना फसवणाऱ्या भ्रष्ट लोकांशी दोन हात केले आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना फसवणाऱ्यांना मी वठणीवर आणलंय. म्हणूनच मी जेव्हां म्हणते की डोनल्ड ट्रंप यांच्यासारखी माणसं मला चांगलीच माहित आहेत, तेव्हां माझ्या बोलण्याकडं लक्ष द्या.’

कमला हॅरिस यांना ट्रंपशी लढत द्यायचीय. ट्रंप आक्रमक असतात, खूप वेडंवाकडं बोलतात. त्यांच्या जिभेला हाड नाहीये. सध्या महागाई वाढलीय, आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर बायडन यांचं धोरण वादळात सापडलंय, मेक्सिकोतून उपऱ्यांच्या लाटा येत आहेत. ट्रंप हे मुद्दे लावून धरणार. मेक अमेरिका ग्रेट अगेन (मागा) ही त्यांची लोकप्रिय घोषणा आहे, अमेरिकेची अवस्था वाईट आहे आणि आपण ती सुधारणार आहोत असं ट्रंप म्हणत आहेत. एकूण आंतरराष्ट्रीय धोरण आणि आर्थिक धोरण असं आखायचं की देशी उद्योगांची भरभराट होईल आणि देशातल्या लोकांना काम मिळेल असं ट्रंप म्हणत आहेत. या मुद्द्यावर बायडनही बचावाच्या आविर्भावात होते. त्यावर हॅरिस काय म्हणतात ते पहावं लागेल.

हॅरिस कॅलिफोर्नियाच्या ॲटर्नी जनरल होत्या आणि एकदा सेनेटवर निवडून आल्या होत्या. तेही जेमतेम. त्या व्हाईस प्रेसिडेंट झाल्या त्याही जेमतेम. वॉशिंग्टन पर्यंत पोचण्यासाठी बायडन यानी पक्षात वीस पंचवीस वर्षं मेहनत केली होती. तो अनुभव हॅरिसना नाही.

हॅरिसना आंतरराष्ट्रीय अनुभव नाही. संकटात सापडल्यानंतर व्हाईट हाऊसमधे सिच्युएशन रूममधे खूप तणावाच्या बैठका होतात, खूप दबावाखाली निर्णय घ्यावे लागतात. त्याचा अनुभव हॅरिस यांना नाही. अनुभव हा मुद्दा त्यांच्या विरोधात जाणार आहे.

अनुभव नाही ही बाजू जशी विरोधात जाते तशीच ती जमेची बाजूही होऊ शकते. हिलरी क्लिंटन परदेश मंत्री होत्या. त्या काळातल्या अनेक घटना वादग्रस्त होत्या. ट्रंपनी खऱ्या खोट्या गोष्टी गोळा करून क्लिंटन यांच्यावर खूप चिखल उडवला. हॅरिसवर फेकण्यासाठी ट्रंपांकडं चिखल कमी आहे.

हॅरिस यांचं मूळ, त्यांचं स्त्री असणं याचा फायदा त्यांना होईल. फक्त ५९ वर्षाच्या आहेत (ट्रंप, ७८ वर्षं) याचा फायदा त्यांना होईल. बाहेरून येणाऱ्या लोकांच्या बाजूनं त्यांनी खटले लढवलेत, त्याचा फायदा लॅटिनो मतदारांच्या बाबतीत होईल. लॅटिनो, काळे मतदार ट्रंप यांच्या विरोधात असतात, ते हॅरिसना सापडतील. गोरे अमेरिकन आणि गोरे तरूण हा ट्रंप यांचा खरा मताधार आहे. तो हॅरिस जेवढा फोडू शकतील तेवढी जास्तीची मतं हॅरिसना मिळतील.

पण बहुदा निवडणुक आर्थिक-राजकीय मुद्द्यांवर होणार नाही. व्यक्तीमत्वांची लढाईच मुख्य असेल. हॅरिस उलटतपासणी करण्यात निष्णात आहेत. कोर्टात,सिनेटमधे त्यानी कमीट्यांच्या कामात विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं होतं, नामोहरम केलं होतं.

ट्रंप यांना त्यांच्या चारित्र्यावर जाहीर सभांत, टीव्हीवर अडचणीत आणणं ही हॅरिस यांची रणनीती राहील असं दिसतंय. ट्रंपवर खूप खटले आहेत, अनेक आरोप आधीच सिद्ध झालेत. याच मुद्दयावर हॅरिस ट्रंपना हरवू शकतील.

।।

Comments are closed.