कमला हॅरिस पाकिस्तानी?
कमला हॅरिस पाकिस्तानी आहेत, मुसलमान आहेत असा मेसेज सोशल मिडियात फिरत आहे.
कोणीही व्यक्ती पाकिस्तानी आणि मुसलमान ठरली की आपोआप ती टाकाऊ, देशद्रोही वगैरे होते, निवडणुकीच्या व्यवहारातून बाद होते असं काही माणसं मानतात. जगात सर्वत्र, अमेरिकेतही. अमेरिकेतले भारतीय मतदार डोळ्यासमोर ठेवून आणि भारतातल्या भक्तगणांना आनंद मिळावा यासाठी कमला हॅरिसबद्दलचा मेसेज पसरवला जातोय.
कमला हॅरिस सेनेटर आहेत. कमला हॅरिस अॅटर्नी जनरल म्हणजे कायदे मंत्री होत्या. त्यांच्या नागरीकत्वाचे तपशील उघड आहेत, हज्जारो ठिकाणी नोंदले गेलेले आहेत, सिद्ध झालेले आहेत.
कमला हॅरिस यांची आई तामिळनाडूतली, हिंदू. कमला हॅरिसचे काका, आजोबा, भावंडं तामिळनाडूत आहेत.
कमला हॅरिस यांचा पती कॅरिबियन आहे, ज्यू आहे. त्यांनी रीतसर, कागदपत्रं वगैरे करून लग्न केलेलं आहे.
मग हे पाकिस्तानचं खूळ कुठून आलं?
असत्य वारंवार मोठ्या आवाजात कानावर पडत राहिलं की माणसं, विशेषतः भक्त मंडळी त्यावर विश्वास ठेवतात. पुरावे आणि तर्क या गोष्टी गुंडाळल्या की कोणत्याही गोष्टीवर विश्वास बसतो. भारतात एके काळी लोकांनी गणपती दूध पितो यावर विश्वास ठेवला होता. लोकांनी खात्री करून घेण्यासाठी गणपतीला दूध पाजलं, तो काही दूध पिईना, तरीही लोकं म्हणाले की आपल्याकडं नसला तरी दुसरीकडं तो दूध पीत असेल. थोडक्यात असं की गणपती दूध पीत होता यावर लोकांनी विश्वास ठेवला.
हीच भारतातली माणसं आता कमला हॅरिस पाकिस्तानी आहेत असे मेसेज वाचत आहेत, फॉरवर्ड करत आहेत.
भारतीयांनाच कां दोष द्यायचा?
अमेरिकेत आज काही लाख ट्रंप भक्त सहज निघतील जे ओबामांचा जन्म इंडोनेशियात झाला होता, ते अमेरिकन नाहीतच असं ठामपणानं मानतात. कारण ट्रंप यांचं तसं म्हणणं आहे. ट्रंप यांनी ती गोष्ट अगणीत वेळा माध्यमांतून आणि भाषणातून लोकांच्या कानावर आणि डोळ्यावर आदळली आहे. दुनियाभरचे पुरावे असताना ट्रंप आजही रेटून इंडोनेशियन जन्माचा आरोप करतात आणि लोकं टाळ्या वाजवून मान्यता देतात.
सोशल मिडिया सुरु झाल्यापासून राजकारणाचा पोतच बदलला आहे.
गेले काही दिवस अमेरिकेत पोस्टल मतदानाच्या विरोधात ट्रंप यांनी मोहिम सुरु केली आहे. डेमॉक्रॅटिक पक्षानं आणि सरकारातल्या अंतर्गत गटानं पोस्टल मतदान हा एक मोठा फ्रॉड रचला आहे असा आरोप ट्रंप करत आहेत. मतपेट्या बोगस आहेत, मत मोजणी बोगस आहे, मतपत्रिका बोगस आहेत, असे आरोप ट्वीटर, व्हॉट्सअप, फेसबुक, पोस्टर्स, जाहिराती यातून केले जात आहेत. या मेसेजेसचा भडीमार केला जातोय. ९३८ फेसबुक ग्रुप, २७९ फेसबुक पेजेस, ३३ यू ट्यूब व्हिडियो आणि शेकडो ट्वीट यामधून पोस्टल मतदान हा एक ट्रंप यांच्या विरोधात केलेला कट आहे असा संदेश सांगितला जातोय. डॅन बोंगिनो नावाच्या माणसानं टीव्हीवरून ही अफवा पसरवली आणि ती २९ लाख लोकांनी पाहिली.
अमेरिकेत कित्येक राज्यात कित्येक वर्षं माणसं पोस्टाच्या पेटीत आपलं मत टाकतात. निवडणूक आयोगानं या मतदानाला मान्यता दिलेली आहे. प्रक्रियेची तपासणी वारंवार झाली असून त्यात भ्रष्टाचार होत नाही हे सिद्ध झालेलं आहे. रिपब्लिकन पक्षाची मानली जाणारी राज्यंही पोस्टल मतदान घडवत असतात. २०१६ च्या निवडणुकीत ट्रंप यांना भरपूर पोस्टल मतं मिळाली होती. हे सत्य पेपरांतून, सरकारी वक्तव्यांतून, टीव्ही वाहिन्यांतून अनेक वेळा मांडलं गेलं असलं असत्याचा मारा चालू आहे आणि अनेक भक्त त्यावर विश्वास ठेवत आहेत.
तेच मास्क वापरण्याबाबत. ट्रंप सतत सांगत फिरतात की मास्क वापण्याची आवश्यकता नाही, स्वतः मास्क न वापरता फिरतात आणि सांगतात की सारं काही ठीक असून कोविड आपोआप नाहिसा होणार आहे. भक्त मंडळी त्यांच्यावर विश्वास ठेवून कोविडचे बळी होत आहेत.
खोट्या बातम्या, अफवा इत्यादींचा अतोनात मारा झाल्यावर फेसबुक जागं झालं. फेसबुकवर येणारा मजकूर तपासून पहायला फेबुनं सुरवात केली.
वर्तमानपत्रात नाना प्रकारे माहिती पोचत असते. पेपरातले बातमीदार, बातमी संपादक, पानाचा संपादक, मुख्य संपादक इत्यादी मंडळी ती माहिती तपासतात, त्या माहितीचा उगम कुठे आहे, त्या माहितीचा आधार काय आहे ते तपासतात आणि नंतरच बातमी छापतात. माणूस म्हटल्यावर होणाऱ्या चुका आणि लबाड्या गृहीत धरूनही पेपरांची ही कामाची पद्धत योग्य पद्दत म्हणून जर्नालिझममधे स्वीकारली गेली. प्रचार प्रसारासाठी निघालेली नियतकालिकं सोडली तर कित्येक पेपर वरील पद्धत अवलंतात.
सोशल मिडिया सुरु झाला तेव्हां प्रसिद्ध होणाऱ्या माहितीची तपासणी करण्याचा विचार माध्यमानं केला नाही. सुरवातीच्या काळात कुतुहुल, उत्सूकता आणि वात्रटपणा या उद्देशानं माणसं सोशल मिडियात घुसली. पण राजकीय पक्षांना या माध्यमाचं मर्म समजलं. नगण्य पैशात आणि मेहनतीत प्रचंड अफवा पसरवता येतात, विरोधकांना बदनाम करता येतं हे राजकीय पक्षांना कळलं.
भारतात हे गणीत भाजप-संघाच्या लक्षात आलं, अमेरिकेत ते ट्रंपना कळलं. दोघांनीही सोशल मिडियात कल्पनाही करता येणार नाही अशा रीतीनं निराधार मजकूर पसरवायला सुरवात केली.
जोवर ट्रंप यांचा खोटेपणा मिडियात एकतरफी चालला होता तोवर ट्रंप खुष होते. फेसबुक, ट्वीटरनं संपादकांची संख्या वाढवली आणि द्वेषकारक खोटा मजकूर गाळायला सुरवात केली, ट्रंप यांच्या ट्वीटवरचा मजकूर विश्वासार्ह नाही असं लेबल डकवायला सुरवात केली तेव्हां ट्रंप खवळले, आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलीय असं म्हणू लागले.
मत असो की माहिती, दोन्हीला काही तरी आधार असतो, असायला हवा. तो आधार कितपत खरा इत्यादी मुद्दे वादाचे होऊ शकतात, पण तरी आधाराचा आधार घेतला जातो.
श्रद्धेचा एक स्वतंत्र प्रांत असतो. श्रद्धा हा प्रांत आधार आणि पुराव्यांचा नाही.पूर्ण समाज आणि समाजातली सर्व अंगं श्रद्धेनं व्यापलेली नसतात.
पेपर चालवणं, बातम्या देणं, निवडणुका लढवणं, सरकार चालवणं इत्यादी गोष्टींचा आधार माहिती असतो,श्रद्धा नसते. किती कोटी माणसं बेकार आहेत, किती कोटी लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही इत्यादी गोष्टी श्रद्धेच्या असू शकत नाहीत. भारताची अर्थव्यवस्था वाईट असते किंवा चांगली असते ही गोष्ट श्रद्धेच्या आधारे ठरत नाही. कोविडमुळं अमेरिकेत हाहाकार माजलाय ही गोष्ट श्रद्धेत बसत नाही. दुर्दैवानं ही गोष्ट माणसं विसरत आहेत. ट्रंप जे जे करतात किंवा करत नाहीत ते ते सारं श्रद्धेचा-भक्तीचा भाग झालंय, माहितीचा किंवा आधाराचा भाग राहिलेलं नाही.
सोशल मिडियानं माहिती-मत-आधार-पुरावा ही साखळी मोडून टाकली आहे.
श्रद्धाळू आणि भक्तांना त्यात आनंदच आहे, तो त्यांना मिळो बापडा. पण उपाशी -तहानलेली माणसं, समाजातली विषमता, रुपयेआणेपैच्या हिशोबात होणारा अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार या गोष्टींना माणसाला दैनंदिन तोंड द्यावं लागतं, ती श्रद्धा नाही. पोटातली भूक, अज्ञान, अनारोग्य हा काही श्रद्धेचा भाग असू शकत नाही.
श्रद्धा हा विरंगुळा असतो, ती एक कंफर्ट देणारी, सुख देणारी भावना असते. ती माणसाला आवश्यक असतेच यात शंका नाही.
अन्न, पाणी, आरोग्य, रोजगार, शिक्षण, तोट्यातली बँक, रिकामी तिजोरी, चार दोन वर्षात मालामाल होणारे पुढारी, चार दोन वर्षांत उभी राहिलेली श्रीमंत पार्टी ऑफिसं या गोष्टी श्रद्धा असू शकत नाहीत. त्यांचा चटका प्रत्येकाला बसत असतो.
सोशल मिडियाचा राजकारणासाठी होणारा गैरवापर राजकारणच नव्हे तर एकूणच समाजाला अधोगतीकडं नेतोय याकडं लक्ष देण्याची निकड आहे.
।।