कापुस्किनस्की यांचं नवं पुस्तक
रिसर्ड कापुस्किनस्की हे एक पोलिश पत्रकार लेखक होते. १९५६ ते १९८१ या काळात कापुश्चिन्सकी आफ्रिका आणि आशियातल्या २७ देशात फिरले, तिथल्या राजकीय उलथापालथीच्या बातम्या त्यांनी प्रसिद्ध केल्या. त्यासाठी त्यांना ४० वेळा तुरुंगवास पत्करावा लागला, चार वेळा त्यांना फाशी सुनावली गेली, जिवावर बेतल्याच्या घटनांची तर मोजदादच नाही. पत्रकारी आणि साहित्य यांच्या सीमेवरचं त्यांचं लिखाण त्यांच्या गोष्टीरूप शैलीसाठी प्रसिद्ध आहे. मुळात त्यांचं लिखाण पोलिश भाषेत होतं.
१९७८ साली अनदर डे ऑफ लाईफ हे अंगोलातल्या युद्धावरचं त्यांचं इंग्रजीत भाषांतर झालेलं पहिलं पुस्तक होतं. ते गाजलं. त्यानंतर दी सॉकर वॉर, दी एंपरर अशी पुस्तकं इंग्रजीत प्रसिद्ध होत गेली आणि कापुस्किनस्की जगभर प्रसिद्ध झाले. २००७ साली त्यांचं निधन झालं. नोबडी लीव्ज हे रिसर्ड कापुस्किनस्की यांचं इंग्रजीत प्रसिद्ध झालेलं ताजं पुस्तक.
पोलंड हा आपला देश कापुस्किनस्की छोटछोट्या कथांमधून, वृत्तकथांमधून या पुस्तकात दाखवतात.
जगभर फिरणारे कापुस्किनस्की जेव्हां पोलंडमधे असत तेव्हां गावोगाव हिंडत आणि त्यावर स्वैर वार्तापत्रं लिहीत. ही वार्तापत्रं पोलिटिका या साप्ताहिकामधे प्रसिद्ध होत. त्यातले १७ वृत्तांत या पुस्तकात भाषांतरीत झाले आहेत. मूळ लेख पोलिश भाषेत आहेत.
लेखक पत्रकार होते. ते गावात जात, लोकांना भेटत, मुलाखत घेत, निरीक्षण करत आणि लेख लिहीत. साप्ताहिक असल्यानं सुमारे दोन हजार शब्दात लेखक वृत्तांत पूर्ण करत.
पोलंडमधलं एक गाव. वाळवंटी. ओसाड गावात एक दिवशी ट्रोफिम पोचला. तेव्हां गावात फक्त मंगोल नावाचा एक घोडा होता. ट्रोफिमनं त्या घोड्याला आपलंसं केलं, सांभाळलं. नंतर रिसेक आला. रिसेक मुलखाचा दारुड्या, पण बाईकवर बसला की कितीही प्याला असला तरी बरा असायचा. एकदा खूप प्याला असताना बायकोनं त्याला मोटार सायकलवर बसवलं. गडी निघाला. अपघात झाला. हाडं मोडली. कपाळाला खड्डा पडला. अपघातानंतर त्याला दृष्टीदोष झाला, दोन दोन वस्तू दिसायच्या. दोन बायका, दोन चंद्रं, दोन बाईक.सगळाच गोंधळ. तो घड्याळ दुरुस्त करी, यंत्रं दुरुस्त करी. गावात गंजून पडलेली शेती यंत्रं त्यानं दुरुस्त केली. त्यानंतर सियेनकेविच आला. भीक मागणं हाच त्याचा व्यवसाय. भीक मागून मागून त्यानं हजारो स्लॉटी (पोलिश चलन) बँकेत जमा करून ठेवले होते. नंतर एडक गावात आला. त्याला कम्युनिष्ट पक्षानं पाठवलं होतं. तो आल्या दिवसापासून दादागिरी करू लागला. तीन माणसांवर दादागिरी. एडकनंतर लिपको आला. पाच माणसं आणि मंगोल घोडा अशांचं गाव.
एके दिवशी मंगोल रात्री भटकत असताना समोरून येणाऱ्या ट्रकनं त्याला उडवलं. मंगोल मेला.
आता काय करायचं. शेती अडली. पाच जणांची ग्रामसभा भरली. घोडा हवा. रिसेककडं पैसे पडून होते. त्याला विनंती करण्यात आली. त्यानं साफ नकार दिला. शेवटी लिपको जिल्ह्याच्या ठिकाणी गेला, तिथल्या सरकारी खात्यातून काही पैसे मिळवले आणि एक घोडा आणला. मंगोल दोन असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. उशीरा पेरणी झाली. रायचं पीक आलं. पोटं भरतील येवढी सोय झाली.
गावगाडा सुरु झाला.
असंच एक गाव. फार अवे, दूर.
या गावात नुकतीच कार प्रकटली होती. कारच्या हॉर्ननं गावकरी गोंधळले, कारचा आवाजही त्याना घाबरवून टाकत होता. कार आली की लोक गाव सोडून पळून जात. गावात कोणालाही चष्मा लागलेला नव्हता. वारसॉ या राजधानीच्या शहरातून आलेला एक विद्वान माणूस चष्मा लावत असे. ते पाहून गावानं समजूत करून घेतली होती की विद्वान माणसं चष्मा लावतात. गावाला परवापरवापर्यंत ब्रेड माहित नव्हता. एक माणूस सांगतो की त्याची आई रायचं पीठ कालवून तव्यावर पसरायची, तोच असे ब्रेड. त्याच्या वडिलाना शहरातून पहिल्यांदा ब्रेड आणला तेव्हां त्याला आनंद झाला तसा आनंद पुन्हा कधी झाला नाही. युद्धापूर्वीची ही अवस्था नंतर काहीशी बदलली. युद्धापूर्वी एका रेडियोची किमत सात गायी होती. आता एक गाय विकून रेडियो मिळू लागला.
शहरातले लेक्चरर एका गावात जातात. तिथं राफ्टिंग करतात. राफ्टिंग म्हणजे वेगानं जाणाऱ्या प्रवाहात तराफ्यावरून वहायचं, स्वतःला वाचवायचं. हा एक धाडसी खेळ, पण त्यासाठी एक तराफावाला आवश्यक असतो. हातात एक लांब काठी घेऊन तो तराफा दगडांवर आदळण्यापासून थांबवतो, तराफ्याचा वेग नियंत्रित करतो. अत्यंत कष्टाचं काम. वर्षातून चार दोन वेळा शहरातून येणारी माणसांकडून मिळणारा मेहेनताना, त्यावर तो भागवतो. त्यापेक्षा अधिक मिळवावं असं त्याला वाटत नाही.
तराफावाल्याचं नाव जॅगियेलेस्की.
जॅगी कधी शहरात गेलेला नाही, त्यानं समुद्र पाहिलेला नाही. तो पेपर वाचत नाही, त्याच्याकडं टीव्ही नाही. तो गेल्या वर्षी सिनेमा थेटरात गेला होता. त्यानं रेडियो ऐकलेला नाही, पुस्तक वाचलेलं नाही.
एकदा प्रवाहाचा वेग फार होता, तो कमी करण्याच्या नादात काठी मोडली, जॅगी पाण्यात पडला, बर्फाळलेल्या पाण्यात वाहून गेला, कष्टानं किनाऱ्याला लागला. भिजलेला, बर्फ झालेला जॅगी दहा किमी चालत घरी पोचला.
न सांगता संकट येतं. न सांगता धाडस करू पहाणारे लोक येतात, पैसे देऊन जातात. सुख आणि दुःख, कशाचीही अपेक्षा नाही, खंत नाही.
एक लेक्चरर म्हणतो की तो देव आहे, दुसरा म्हणतो तो तत्वज्ञ आहे, तिसरा म्हणतो तो आशावादी आहे.
एक गाव. तिथला शिक्षक. मर मर मेहनत करतो, मर मर अभ्यास करतो, एक वेळ जेऊन रहातो, चैनीवर पैसे खर्च करत नाही, पुस्तकांवर खर्च करतो. शाळा त्याला ओझ्याच्या गाढवासारखं वागवते. विद्यार्थी त्याला मान देत नाहीत, त्याचा अपमानच करतात.
एक गाव. तिथला लंबूटांग शिक्षक. झेगॉर्झ स्टेपिक. त्याचं शरीर, हात, पाय, नाक, सारंच लांब, ताणलेलं, रबरासारखं. कॉलेजमधे शिकत होता तेव्हां तो ध्येयवादी होता, सक्रीय होता, सामाजिक राजकीय कामात गढलेला असे. शिक्षक झाला, त्याचं जगणं बदललं. शिक्षण, शिक्षक सगळंच बोगस असतं, विद्यार्थ्यांनाही केवळ पैसे मिळवण्यात रस, अभ्यास आणि ज्ञानात रस नाही.स्टेपिक कापुस्किनस्कीचा एकेकाळचा वर्गमित्र. कापुस्किनस्की भेटतात तेव्हां तो काडेपेटीतून एकेक काडी काढी, पेटवी, विझली की टाकून देई, दुसरी काडी पेटवी, नंतर तिसरी…. कापुस्किनस्की बोलत होते तेवढ्या काळात त्यानं एक अख्खी काडेपेटी संपवली.
कापुस्किनस्की एका खाणीच्या गावात जातात. रीपोर्टिंग करायला. तिथं अपघात झालेला असतो. स्टेफन कनिक नावाचा एक विशीतला तरूण कामगार खाणीत दरड कोसळल्यामुळं मेला होता. त्याचं गाव दूरवर कुठं तरी होतं. त्याचा बाप म्हातारा असल्यानं दफन करण्यासाठी खाणीच्या गावी येऊ शकत नव्हता. त्यामुळं कनिकचं प्रेत गावाला न्यायचं ठरतं. अधिकारी सहा कामगारांना ते काम सांगतो. एक कामगार आपला ओव्हर टाईम गमावायला तयार नसतो, नकार दोते. कापुस्किनस्की तयार होतात. शवपेटी न्यायला सहा जणं लागतात.
एक जीर्ण बस या कामी योजली जाते. बसही नकारच देत असते. काही अंतर गेल्यावर बस बसकण मारते. आता काय करायचं. फार काळ प्रेत तसंच ठेवलं तर सडणार असतं. पेटीवाहक ठरवतात की पेटी गावापर्यंत खांद्यावरून न्यायची. कच्चा रस्ता. जंगल. रात्र होते. सकाळ होण्याची वाट पहात शेकोटीशेजारी पेटीवाहक बसतात. मग पाच सहा छान छोकऱ्या येतात, त्या शेकोटीशेजारी या वाहकांबरबोर मजा करतात. गप्पा, जोक्स. दुसऱ्या युद्धात सैबेरियात सैनिकांची शवंही कशी जिवंत होतात त्याची थरारक गोष्ट एक जण सांगतो आणि कनिकचं प्रेत ठेवलेलं असतं तिथून विचित्र आवाज येतो. सर्वांची फाटते. असं करत करत शेवटी प्रेत कसं बसं त्या गावात पोचतं.
कापुस्किनस्की गोष्टी वेल्हाळ आहेत. अन्यथा घटना-मुलाखतीतून बातमी झाली असती, कापुस्किनस्की त्यातून एक लघुकथा तयार करतात. बातमीकथा.
बातमीदारीतला नियम असतो की बातमीदारानं स्वतःची मतं मांडायची नसतात. कापुस्किनस्की या नियमाला फाट्यावर मारतात, खोचक बोचक शेरे मारतात, प्रसंगी त्यांना जे सुचतं ते काल्पनीक मांडतात, तत्वचिंतन करतात. या शैलीसाठीच कापुस्किनस्की प्रसिद्ध आहेत. या शैलीमुळंच व कापुस्किनस्कीवर ते पत्रकार नाहीत, काल्पनिक लिहितात असा आरोपही होतो.
अनदर डे ऑफ लाईफ, अंगोला, दी एंपरर, शहा ऑफ शहाज, दी शॅडो ऑफ दी सन, इंपेरियम, ट्रॅवेल्स विथ हेरोडोटस ही त्यांची पुस्तक अत्यंत म्हणजे अत्यंतच वाचनीय आहेत. त्या पुस्तकात कापुस्किनस्कीनी अंगोला, इराण, इथियोपिया, रशिया इत्यादी ठिकाणची वर्णनं केलीत. प्रस्तुत नोबडी लीव्ज या पुस्तकात त्यांनी १९६० च्या दशकातल्या पोलंडचं चित्र उभं केलंय.
।।
Nobody Leaves.
Ryszard Kapuscinski.
Penguin.
||
या आठवड्याचं पुस्तक
गांधी कां मरत नाही.
ले. चंद्रकांत वानखडे
प्रकाशक. मनोविकास प्रकाशन.
गांधीजींचा खून झाला, म्हणजे गांधीजी मेले. विनोबांना विचारण्यात आलं – गांधींच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वात प्रथम कोणता विचार तुमच्या मनात आला.
विनोबा म्हणाले – माझ्या मनाला असेच वाटले की गांधीजींचा मृत्यू झालाच नाही आणि आजपर्यंत माझ्या मनात सतत हा विचार आहे की ते जिवंत आहेत. सज्जनांचा कधी मृत्यू होत नाही, ते सदाचे जिवंत असतात. दुर्जन कधी जिवंतच असतच नाहीत ते फक्त कल्पनेच्या जगात जगत असतात.
)(
एक विनंती. हा ब्लॉग तयार होणं आणि लोकांपर्यंत पोचणं यात तांत्रीक गोष्टी गुंतल्या आहेत, त्याचा काही एक खर्च आहे. तो निघावा यासाठी वाचकांनी ३०० रुपये किंवा अधिक रक्कम सोबतच्या लिंकवर पाठवावी. http://niludamle.com/pay.php. वर्गणी पूर्णपणे ऐच्छिक आहे.
।।