कोविड, ट्रंप आणि वुडवर्ड यांचं नवं पुस्तक
Rage
Bob Woodward
Simon & Schuster
||
बॉब वुडवर्ड यांच्या १९ पुस्तकांपैकी किमान १० पुस्तकं तरी त्या त्या वेळी बेस्ट सेलर च्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिली आहेत. प्रस्तुत रेज हे पुस्तक त्या परंपरेला अपवाद नाही.
वुडवर्ड बातमीदार आहेत. एकादी बातमी ते घेतात, तिला चिकटतात आणि त्या बातमीतलं बातमीपण संपेपर्यंत त्या बातमीचा पिच्छा सोडत नाहीत. १९७२ सालच्या जून महिन्यात चार दरोडेखोर वॉटरगेट या इमारतीत डेमॉक्रॅटिक पक्षाच्या कचेरीत घुसले या घटनेच्या बातमीला वुडवर्ड चिकटले आणि १९७४ च्या ऑगस्ट महिन्यात प्रे. निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला या घटनेपर्यंत त्यांनी बातमीचा पाठपुरावा केला. अनंत माणसं आणि टनावारी कागद चाळून त्यांनी वॉटरगेट प्रकरण खोदलं. त्यावर त्यांचं पहिलं पुस्तक, ऑल दी प्रेसिडेंट्स मेन, प्रसिद्ध झालं.
जानेवारी २०२०; चीनच्या वुहान या शहरात कोविड पसरला या घटनेची दखल अमेरिकेत ओब्रायन आणि पॉटिंगर या दोन अध्यक्षीय सल्लागारांनी घेतली. हे प्रकरण फार गंभीर आहे हे त्या दोघांनी अभ्यास आणि तपास करून प्रे. ट्रंप यांना सांगितलं. कोविड पसरला. ट्रंप यांनी कोविडकडं गांभिर्यानं पाहिलं नाही, त्यांना आपल्या अध्यक्षपद टिकवण्याचीच चिंता होती. दोन लाखांचा बळी कोविडनं घेतला.
कोविड आणि प्रे. ट्रंप असा विषय बॉब वुडवर्ड यांनी निवडला. मार्च ते जुलै २०२० पर्यंत त्यांनी ट्रंप यांच्या १७ मुलाखती घेतल्या. या काळात त्यांनी व्हाईट हाऊसमधल्या ट्रंप यांच्या पाच पन्नास सहकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. आणि त्याच्या आधारे रेज हे पुस्तक लिहिलं.
कोविड आणि प्रे. ट्रंप.
ट्रंप यांचं व्यक्तिमत्व, त्यांची कामाची पद्धत, त्यांचे विचार (अविचार?), त्यांची कारकीर्द या मुद्द्यांचे आधार उभे करत करत त्यांनी ट्रंप यांचा कोविड आचार हे पुस्तक उभं केलं.
संरक्षण मंत्री जनरल मॅटिस, परदेशनीती मंत्री रेक्स टिलरसन, इंटेलिजन्स संचालक डॅन कोट्स आणि ट्रंप यांचे प्रसिद्धी सहाय्यक पारस्केल यांच्या मुलाखती, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्याशी ट्रंप कसे वागले यांचे तपशील पुस्तकात आहेत.
वुडवर्ड यांची शैली शोध पत्रकारीची. बाहेर न येणारी, लपवण्यासाठी महाखटपटी केली जाणारी माहिती ते शोधून काढतात. ही माहिती साधार असते. कागदपत्रं, पुस्तकं, संबंधित माणसांच्या रोजनिशा आणि टिपणं, बैठकांची मिनिट्स, कात्रणं आणि मुलाखती यांचे आधार वुडवर्ड त्यांच्या बातम्यांत आणि पुस्तकांत देतात. व्हाईट हाऊस आणि प्रेसिडेंट हे त्यांचं कार्यक्षेत्र. वुडवर्डनी त्यांच्या ५० वर्षांच्या कारकीर्दीत ९ प्रेसिडेंटांवर लिहिलं आहे.
प्रेसिडेंट अमेरिकेतल्या सर्व एस्टाब्लिशमेंट्समधे पसरलेला असल्यानं वुडवर्ड पेंटॅगॉन, सीआयए, एफबीआय, काँग्रेस, सेनेट, कोर्ट इत्यादी वारूळात जातात. तिथं त्यांना खरी माहिती देणारी माणसं भेटतात. या माहितीचा गैरवापर व्यक्तिगत सुखासाठी किवा स्वतःचं व्यक्तिमत्व उठावदार करण्यासाठी वुडवर्ड वापरत नाहीत. सगळी माहिती केवळ आणि केवळ बातमी साधार करण्यासाठीच वापरतात. खरं म्हणजे कुठल्याही बातमीत किंवा पुस्तकात वुडवर्ड दिसतच नाहीत.
वुडवर्ड यांची माहिती खोटी आहे असं आजवर सिद्ध झालेलं नाही. वुडवर्डच्या बातमीदारीमुळं निक्सन यांना अध्यक्षपद सोडावं लागलं. निक्सन वुडवर्डची पुस्तकं वाचत नसत. त्यांच्या पत्नीनं पुस्तक मागवून घेतलं, निक्सन यांनी वाचू नका असं सांगितलं असूनही ते वाचलं, वाचून त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. निक्सन किंवा त्यांच्या पक्षाला वुडवर्ड यांच्यावर खटला भरता आला नाही, वुडवर्ड खोटं बोलत आहेत असं ते म्हणू शकले नाहीत.
वुडवर्डच्या पुस्तकात विशेषणं आणि निराधार मतांचा व शेऱ्यांचा पसारा नाही. तो नेहमीच नसतो. तारीखवार, कोण कुठं काय बोललं याचे तपशील पुस्तकात असतात. पुस्तकात मांडलेली विधान खरी आहेत; वुडवर्ड यांना जे म्हणायचंय ते पुस्तकात नेमकेपणानं आलंय की नाही हे त्यांची पत्नी एल्सा वॉल्स तपासत असतात. वुडवर्डनी लिहिलेल्या १९ पुस्तकांपैकी १७ पुस्तकं पत्नीनं एडिट केलेली आहेत. त्यांनी वुडवर्डना पानन पान अनेक वेळा नव्यानं लिहायला लावलं आहे, सुधारायला लावलं आहे. वुडवर्डनी टाईप केलेले कागद एल्सांसमोर आले की त्या पेन्सिल घेऊन प्रत्येक वाक्यातला खरेपणा पहातात आणि वाचकाला मजकूर समजेल की नाही याची खात्री करून घेतात.
अशा प्रकारची बातमी देणं, पुस्तक लिहिणं हे एकट्याचं काम नसतं. अनेक माणसांच्या सहकार्यानं ते काम पार पडत असतं. निक्सन प्रकरणानंतरच्या त्यांच्या सर्व पुस्तकात कार्ल बर्नस्टीन हे त्यांचे सहबातमीदार होते. दोघं बातमीचे धागे वाटून घेत, स्वतंत्रपणे ते धागे जुळवत आणि नंतर एकत्र बसून त्या घाग्यांतून बातमी तयार करत. ते ज्या वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकात काम करत तिथले त्यांचे सहकारी, स्टेनो, हरकामे इत्यादी सर्व मंडळी त्यांच्या सोबत असत. पोस्टचे कार्यकारी संपादक बेन ब्रॅडली आणि पोस्टच्या मालकीणबाई कॅथरीन ग्रॅहॅम यांचं वुडवर्ड यांच्या बातमीवर बारीक लक्ष असते. दोघंही वुडवर्ड यांना बातमी आणि सत्य यापासून इंचरभरही इकडे तिकडे जाऊ देत नसत. पण हे करत असताना वुडवर्ड यांना पूर्ण संरक्षणही त्या दोघांनी दिलं.
पुस्तकात दोन गोष्टी असतात. माहिती आणि शैली. वुडवर्डनी वॉटरगेट प्रकरणातली पहिली बातमी लिहिली तेव्हां कार्ल बर्नस्टीन यांनी बातमी डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण बदलली. तुम्हाला बातमी लिहिता येत नाही असंच बर्न्सटीन म्हणाले. वुडवर्ड रागावले. पण बर्नस्टीननं सुधारून लिहिलेली बातमी खरोखरच चांगली होती हे त्यांनी मान्य केलं आणि त्या दिवसापासून दोघांची गट्टी जमली. सुरवातीच्या पुस्तकांना आलेली रंजक, वेगवान शैली ही बर्नस्टीन यांची कामगिरी होती. दोघांमधे कधीही भांडणं झाली नाहीत.
माणसं बातमीदारावर विश्वास असल्यानं माहिती पुरवतात. माहिती देणाऱ्याला उघडं न पाडता त्या माहितीचा उपयोग बातमीदार करत असतो. वुडवर्ड यांच्यावर कित्येक वेळा सरकार आणि न्यायालयानं बातमीचा उगम सांगा असा दबाव आणला. वुडवर्डनी तो कधीही मान्य केला नाही.वॉटरगेट प्रकरणात माहिती देणारे एफबीआयचे संचालक मार्क फेल्ट यांना डीप थ्रोट असं टोपण नाव दिलं गेलं. हे नामकरण करण्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न वुडवर्ड, बर्नस्टीन, ब्रॅडली यांपैकी कोणीही केला नाही.
बातमी, बातमीची सूत्र या गोष्टी चर्चेचर्चेमधे विकसीत होत जातात. अनेक माणसं त्यात सहभागी होत असतात. कोणा एकाच्या डोक्यात वैज्ञानिक शोधासारखी बातमी उगम पावली असं कधीच घडत नसतं. त्यामुळं बातमीचं पितृत्व घेण्याचा प्रयत्न एका परीनं निरर्थक असतो. अनेकांच्या सहभागानं बातमीचं, पुस्तकाचं, अंतिम रूप साकार होत असतं. रेज हे पुस्तक बारकाईनं वाचलं की वरील सगळ्या गोष्टी लक्षात येतात.
डोनल्ड ट्रंप याना भेटत असताना वुडवर्ड सांगत असत की आपण पुस्तक लिहितोय आणि त्यासाठीच भेटतोय. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी संभाषण टेप करत असत. फोनवर बोलणं झालं तर त्याचं टिपण लगेच लिहून काढत असत.
एका मुलाखतीच्या वेळी ट्रंप वुडवर्डना म्हणाले की तुम्ही निक्सनचा पोपट केला होता आणि माझ्यावरही तुम्ही टीका करणार आहात हे मला माहित आहे. पण तरीही विनंती करतो की माझ्यावर बरं लिहा.
रेज प्रसिद्ध झाल्यावर ट्रंप त्यांच्यावर रागावलेले दिसत नाहीत.
वुडवर्ड म्हणाले की कोविड प्रकरणी घटना, निर्णय यांची प्रोसेस समजून घेणं हे माझं कर्तव्य आहे, तेच पत्रकारीचं मुख्य काम आहे. प्रेसिडेंट, त्यांचं ऑफिस, त्यांची माणसं कसकसे निर्णय घेतात, सरकार कसं काम करतं याची प्रोसेस वॉटरगेट प्रकरणात वुडवर्डनी तपासली.
ट्रंप यांचं एकूण वर्तन अनैतिक, भयानक, अतीअहंकारी, बेकायदेशीर, विनाशक आहे. ही विशेषणं वुडवर्ड पुस्तकात वापरत नाहीत. ट्रंप यांचे सहकारीच ही विशेषणं त्यांच्या मुलाखतीत वापरतात.
पुस्तकाच्या शेवटी वुडवर्ड फक्त एकाच वाक्यात आपलं मत लिहितात. “ ट्रंप राष्ट्राध्यक्षपदाला लायक नाहीत”
||