खुनी माणूस वास्तवीक पंतप्रधान, गृहमंत्री होऊ शकतो…

खुनी माणूस वास्तवीक पंतप्रधान, गृहमंत्री होऊ शकतो…

MBS: The Rise to Power of Mohammed Bin Salman

Ben Hubbard

()()()

खाशोग्गी या सौदी पत्रकाराचा खून करण्याचा आरोप असलेल्या सौदी राजपुत्राचं, महंमद बिन सलमान (एनबीएस) यांचं हे चरित्र आश्चर्य वाटण्यासारखं नसलं तरी खूप माहितीपूर्ण नक्कीच आहे.

पुस्तकातली एक हकीकत अशी.

लेबनॉनचे पंतप्रधान साद हरारी यांना रियाधहून फोन आला की प्रिन्स एमबीएसनी भेटायला बोलावलंय. हरारी रियाधमधे व्यवस्था केलेल्या ठिकाणी पोचल्यावर त्याना सांगण्यात आलं की योग्य वेळी त्यांची आणि एमबीएसची भेट घडेल. वेळ सांगितली नाही. मध्य रात्र उलटल्यावर एक वाजता त्याना फोन आला की उद्या सकाळी आठच्या आधी त्यानी एमबीएसनं राजवाड्यात भेटायचंय, तिथून वाळवंटात फेरफटका मारायला जायचंय.

स्पोर्ट्स शूज, जीन्स, कॅज्युल शर्ट अशा वेशात हरारी राजवाड्यात पोचले कारण वाळवंटात फेरफटका मारायचं ठरवलं होतं. तिथं पोचल्यावर त्यांच्यासोब असलेले रक्षक आणि हरारी यांचे फोन काढून घेण्यात आले. एका दालनात त्याना नेण्यात आलं. तिथं त्यांना शिवीगाळ करण्यात आली, मारहाण करण्यात आली. त्यांना सांगण्यात आलं की बऱ्या बोलानं त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा नाही तर त्यांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागेल.

हरारीना हॉटेलच्या खोलीत पोचवण्यात आलं. तिथं एक कॅमेरा तयार होता. हरारीसमोर एक कागद ठेवण्यात आला होता, त्यावर त्यांनी करायचं भाषण लिहिलेलं होतं. भाषणातलं मुख्य वाक्य होतं- मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे. भाषणात इराण आणि लेबनॉनमधले इराणचे हस्तक हेझबुल्ला यांच्यावर टीका होती. 

हे निवेदन झाल्यानंतर हरारींना  अरब अमिराती, इजिप्त या ठिकाणी फिरवण्यात आलं, तिथं त्यांची भाषणं वगैरे आखण्यात आली.  

एमबीएसचा डाव असा होता. हरारीच्या राजीनाम्यानंतर लेबनॉनमधे सुन्नी आणि शियांमधे हाणामारी सुरु होईल आणि त्याचा परिणाम म्हणून येमेनला असलेला पाठिंबा इराण काढून घेईल.

पण लेबॉनॉनमधली माणसं समजून होती. तिथं दंगलबिंगल काही झाली नाही. एमबीएसचा डाव फसला.

 ()()()

महमंदन बिन सलमान एमबीएस या नावानं ओळखले जातात. मध्य पूर्वेचं राजकारण आणि सौदी अरेबिया या दोन्ही गोष्टी आमूलाग्र बदलायचं, इराणच्या विरोधात आखातातले देश उभे करायचं त्यांनी ठरवलं. इराणचा पाठिंबा असलेल्या येमेनवर त्यांनी बाँब हल्ले सुरु केले. इराणचे हस्तक हेझबुल्ला लेबनॉनच्या सत्तेत सामील होते म्हणून तिथली सत्ता उलथवायची असा एमबीएसचा डाव होता.  

()()

एमबीएसचा आणखी एक किस्सा.

महंमद बिन नायेफ क्राऊन प्रिन्स होते. गृहमंत्री होते.एमबीएसचे भाऊ.

रमझान चालू असताना एके दिवशी त्याना निरोप आला की राजे सलमाननी त्याना भेटायला बोलावलंय. महंमद मोटारींचा काफला घेऊन राजवाड्यात पोचले. राजवाड्यातल्या दारात त्यांच्या इतर सहकारी व रक्षकांना दूर ठेवण्यात आलं, फक्त दोन रक्षकांसह त्याना लिफ्टपर्यंत पोचवण्यात आलं. लिफ्ट वरच्या मजल्यावर उघडली तेव्हा सशस्त्र रक्षकांनी महंमद आणि त्यांच्या रक्षकांना ताब्यात घेतलं. त्यांची शस्त्रं आणि फोन काढून घेतले. त्यांना एका खोलीत नेऊन डांबण्यात आलं. राजांची भेट वगैरे झालीच नाही.

खोलीमधे महंमदना शिवीगाळ करण्यात आली. ते व्यसनी आहेत, भ्रष्ट आहेत, त्यांचे सर्व दुर्व्यवहार जाहीर केले जातील असं सांगण्यात आलं. बऱ्या बोलानं आपल्या राजपुत्रपदाचा राजीनामा द्या नाही तर बदनामी आणि अटक इत्यादीला तोंड द्यावं लागेल असं सांगण्यात आलं. महंमदनी नकार दिला. मध्य रात्र उलटेपर्यंत त्याना छळण्यात आलं. ते डायबेटिक होते. त्याना अन्न आणि औषधं नाकारण्यात आली. पहाटेपर्यंत महंमद पुरते कोलमडले होते. राजीनामा द्यायला तयार झाले.

इकडे रात्रीतल्या रात्रीतच राजदरबारेकरींना म्हणजे सगळ्या राजपुत्रांना सांगण्यात आलं होतं की राजे सलमान यांनी व्यसनी महंमद यांना त्यांच्या पदावरून हटवलं आले आणि त्यांच्या जागी महंमद बिन सलमान यांची नेमणूक केली आहे.

बिन सलमान ही काय चीज आहे आणि त्यांची वर्तणुक कशी असते हे येव्हाना सर्वाना माहित असल्यानं कोणीही हुं का चुं केलं नाही.

पहाटे तारवटलेल्या स्थितीत बिन नायेफ खाली इमारतीच्या बाहेर आले तर समोर कॅमेरे सज्ज होते. बिन सलमान समोर उभे होते. बिन नायेफ यांच्या अंगावर काळ्या रंगाचा अंगरखा चढवण्यात आला. असा अंगरखा घालणं म्हणजे निरोप देणं असं मानलं जातं. बिन नायेफनी बिन सलमानला वंदन करून त्यांना यश चिंतिलं. बिन सलमाननी बिन नायेफना सांगितलं की भविष्यात त्यांचा मान राखला जाईल, त्यांचा सल्ला घेतला जाईल. हे सर्व कॅमेऱ्यात चित्रीत होत होतं.

नंतर काही मिनिटातच जगानं पाहिलं की बिन नायेफ यांनी राजीनामा देऊन बिन सलमान यांच्याकडं सत्ता सोपवली होती.

बिन नायेफची समुद्र किनाऱ्यावरच्या एका प्रासादात पाठवणी करण्यात आली. तिथं ते कायमचे स्थानबद्ध झाले. त्यांची सर्व पदं, सर्व अधिकार काढून घेण्यात आले, त्यांची बरीचशी संपत्तीही जप्त करण्यात आली.

२०१७ च्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सौदी, येमेन, अरब अमिराती, इजिप्त, लेबनॉन इत्यादी ठिकाणच्या राजपुत्र, मंत्री, उच्चाधिकारी, बँकर्स, उद्योगपती इत्यादी लोकांना फोन गेले की त्यांनी ताबडतोब रियाधमधे यावं, त्यांच्याशी महत्वाची बोलणी करायची आहेत. आपणहून आला नाहीत तर तुम्हाला धरून आणावं लागेल असा निरोप होता. सर्वाची व्यवस्था रिट्झ कार्लटन या आलिशान संकुलात करण्यात आली होती. या संकुलात नाना आकाराचे सूट्स होते, काही सूट्सचा आकार पाच हजार चौरस फुटांचा होता.

काही माणसं काय ते समजून आपणहून दाखल झाली, काही माणसांना गठडी वळून आणण्यात आलं.

खोल्यांत  दाखल झाल्यावर त्यांचे फोन काढून घेण्यात आले. अणकुचीदार वस्तू, चाकू इत्यादी घेण्यात आले,  पेनंही काढून घेण्यात आली. सर्वाना नाना प्रकारच्या कपड्यांचे बारा सेट देण्यात आले. कोणालाही खोली सोडून बाहेर पडायला परवानगी नव्हती.

प्रत्येकाशी वाटाघाटी करण्यात आल्या. प्रत्येकाला सांगण्यात आलं की त्यानं अमूक एक करोड डॉलरचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळं तुरुंगवास, फाशी, दंड अशी कोणतीही कारवाई होऊ शकेल. बऱ्या बोलानं बिन सलमान सांगतील तेवढी रक्कम जमा केली तर सुटका होईल.

काही आठवडे हा उद्योग चालला होता.   वर्षभरात २००० अकाऊंट्स गोठवण्यात आले, सुमारे ८०० अब्ज डॉलरची संपत्ती गोठवण्यात आली. दंड म्हणून सुमारे १०७ अब्ज डॉलर सरकार जमा करण्यात आले. 

सुमारे ३८१ व्यक्तीना फटका बसला. सर्वच्या सर्व बिन सलमान यांचे शत्रू होते.

()()()

जमाल खाशोग्गी एके काळी बिन सलमान यांचे काहीसे मित्र होते. ते पत्रकार होते. बिन सलमान यांच्या सुधारणांना त्यांचा पाठिंबा होता पण सौदीमधे व्यक्तीस्वातंत्र्य असलं पाहिजे, लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे असं ते म्हणत. ते अरब आणि अमेरिकन पेपरात लिहीत असत, भटके होते.

खाशोग्गी बिन सलमान यांना नकोसे झाले.

व्हिसाच्या कामासाठी खाशोग्गी लंडनहून इस्तंबुलला गेले. त्यांची हालचाल सौदी इंटेलिजन्सनं नोंदली होती. इंटेलिजन्स हे खातं बिन सलमान यांच्या थेट हाताखाली होतं. 

खाशोग्गी इस्तंबूलला पोचण्याच्या आधीच, आदल्या दिवशी सौदी पोलिस म्हणा, हस्तक म्हणा, सुमारे पंधरा जण वेगवेगळ्या वाटांनी, चार्टर्ड विमानानं इस्तंबूलला पोचले. काही रियादहून आले, काही दुबाईहून, काही कैरोहून. निरनिराळ्या ठिकाणी उतरले. आलेल्या माणसांत खाशोग्गी यांच्यासारखीच ठेवण असणारा एक जाडगेला माणूसही होता.

इस्तंबूलमधल्या सौदी दुतावासातल्या लोकाना सूचना देऊन दुतासावासापासून दूर रहाण्यास सांगण्यात आलं.

  इस्तंबूलच्या दूतावासातल्या इतर स्टाफला रजा देण्यात आली होती. खाशोग्गी दूतावासात पोचल्यावर त्याना बेशुद्ध करून ठार मारण्यात आलं. शवातलं रक्त काढून शव सुकं करण्यात आलं. तुकडे बॅगात भरून दूतावासाच्या बाहेर नेऊन नाहिसे करण्यात आले. खाशोग्गी दूतावासात प्रवेश केल्याचं चित्रण कॅमेऱ्यात होतं. खाशोग्गींचा तोतया बाहेर पडून शहरात गेल्याचं चित्रण मुद्दाम करण्यात आलं. घोटाळा येवढाच झाला की खाशोग्गींचे दूतावासात जाताना बूट वेगळे होते आणि नंतरच्या खाशोग्गीचे बूट वेगळे होते.

सौदी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून दुतावासातले सीसीटीव्ही कॅमेरे हटवण्यात आले होते. परंतू दुतावासातली ध्वनीचित्रण करणारी यंत्रणा शिल्लक होती. त्या यंत्रणेनं खाशोग्गीना मारतांना झालेली संभाषणं नोंदली, ती संभाषणं तुर्की सरकारकडं होती.

सौदी सरकारनं प्रथम खाशोग्गी नुसतेच नाहिसे झाले असं म्हटलं. नंतर बाचाबाचीत ते मारले गेले असं सांगितलं. नंतर खून झाला हे कबूल केलं. नंतर खुनात सहभागी झालेल्या लोकांना शिक्षा करणार असल्याचं जाहीर केलं.

इतकी माणसं, इतकी विमानं, इतक्या गाड्या, इतक्या हॉटेलच्या खोल्या, दुतावास, इतकं सारं कोणी खाजगी माणूस करू शकतो काय? सरकारच्या संमतीशिवाय ते कसं शक्य आहे? सरकारातल्या वरिष्ठांच्या सहमतीशिवाय ते कसं शक्य आहे? 

बिन सलमान यांनी त्यात आपला हात असल्याच्या आरोपाचा इन्कार केला. जगानं काही काळ कटकट केली पण नंतर श्रीमंत देशाच्या श्रीमंत मालकाबरोबर जुळवून घेतलं.

हब्बार्ड यांच्या पुस्तकात बिन सलमान यांचं चरित्र भरपूर तपशीलासह रेखाटलं आहे. भरपूर तपशील दिले आहेत. सावधपणानं त्यांनी थेट आरोप करण्याचं टाळलं आहे, पण वाचणाऱ्याला जे समजायचं ते समजतं.

 सौदी अरेबियात अमाप पैसा आहे. हा पैसा आणि सत्ता सौदी घराण्याच्या खिशात जातो. सौदी घराण्यातल्या वरिष्ठांच्या खिशात जातो. अमाप पैसा मिळत असल्यानं माणसं गप्प रहातात आणि तो पैसा वापरणारे सौदी राजे, सौदी राजपुत्र, सौदी मंत्री माफिया सत्ता चालावी तशी सत्ता वापरत असतात. मानवी हक्क, मानवी स्वातंत्र्य इत्यादी गोष्टींची फिकीर त्याना नसते. स्वतःला ते इस्लामचे कट्टर समर्थक म्हणवतात पण त्यांच्या वर्तणुकीत धर्म कुठंच नसतो. असं असलं तरी त्यांच्याकडं असलेला पैसा पाहून जग त्यांच्याशी सलोखा ठेवत असतं.

प्रस्तुत पुस्तक वाचल्यानंतर वरील गोष्टी लक्षात येतात.

बिन सलमान फक्त ३५ वर्ष वयाचे आहेत. त्यांचे वडील ८५ वर्षाचे आहेत. त्यांच्या वडिलांची प्रकृती ठीक नसते. लवकरच बिन सलमान स्वतः राजे होतील आणि पुढे चाळीस पन्नास वर्षं राज्य करतील.

जगानं त्यांच्याशी जुळवून घ्यायचं आहे.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *