गंधर्वगोडवा!
सह्याद्री वाहिनीनं संगीत स्वयंवर नाटक दाखवलं. मी ते पाहिलं. जरा निवांतीनं पहावं असा विचार करून यू ट्यूबवर गेलो, तिथं ते आणखी दोन वेळा पाहिलं; मधे मधे थांबवत, पुढं मागं करत पाहिलं.
खूपच मजा आली.
१९१६ साली मुंबईत सादर झालेलं हे नाटक पहाताना आनंद कां झाला?
पण तो विचार करण्याच्या आधी सादर केलेल्या नाटकाबद्दल बोलायला हवं.
सह्याद्रीनं दाखवलेल्या नाटकाचे दिक्दर्शक आहेत प्रमोद पवार. साधारणपणे १९१६ नंतर वीसेक वर्षं या नाटकाचा प्रयोग जसा कसा झाला असेल तसाच दाखवण्याचा प्रयत्न दिक्दर्शक प्रमोद पवार यांनी केला. राजवाडा, अंतःपूर, बगीचा, नदीचा काठ, चरणाऱ्या गायी इत्यादी गोष्टी कापडावर रंगवून त्यांनी नेपथ्य म्हणून वापरल्या. होता होईतो ते नेपथ्य, तो कपडेपट, तीच अभिनयाची पद्धत, गाण्याची तीच धाटणी सांभाळत तो काळ आणि त्या काळातलं नाटक प्रमोद पवार यांनी उभं केलं.
प्रमोद पवारांनी दाखवलेल्या स्वयंवरात रुक्मिणीची भूमिका संपदा मानेंनी केलीय. गाणं हा मुख्य भाग त्यांनी उत्तम सांभाळलाय. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं खूप मेहनत घेऊन पदं सादर केलीत. मकरंद कुंडले यांनी चाली बसवून घेतल्यात. मूळ चाली सांभाळतांना संपदा मानेंनी अनेक जागा वेगळ्या घेतल्या आणि त्या चांगल्या आहेत. स्वयंवरातली पदं पेलणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती संपदा मानेंनी करून दाखवलीय.
कृष्णाच्या भूमिकेत ओंकार प्रभुघाटे यांनीही योग्य अभिनय केलाय आणि गाणी म्हटलीत.
मकरंद कुंडले यांची ऑर्गन आणि कौस्तुभ दिवेकर यांचा तबला आपल्याला शंभर वर्षं मागे नेऊन तो काळ आपल्या कानांना ऐकवतो.
प्रमोद पवार यांनी हे सारं मुंबईत जमवलंय. कोविडच्या काळात. तीन महिने तालमी चालल्या. कधी तालमी गिरगावात साहित्य संघात होत तर कधी त्या कोणाच्या तरी घरी. गाणी बसवण्यासाठी कधी कुंडले साहित्य संघात जात तर कधी संपदा माने कुंडले यांच्या घरी डोंबिवलीला जात. तालमी कधी तुकड्या तुकड्यांनी तर कधी सर्व जण एकत्र असताना एकसंध होत. नाटकं आता कायमची बंद पडणार की काय या भीतीनं ग्रासलेल्या कलाकारांनी हे नाटक उभं करताना कशाकशाला तोंड दिलंय हे त्यांनाच विचारलं तर कळेल.
नाटकाचं चित्रीकरण करताना ते कसं करावं यावर दृश्य माध्यमात वेगवेगळी मतं आहेत. कॅमेरा कशासाठी? तर डॉक्युमेंटेशन करण्यासाठी. बस. विविध अँगल्स वगैरेचा चित्रपट पद्धतीचा वापर डॉक्युमेंटेशन करताना करू नये असं या मताच्या लोकांना वाटतं. त्यात तथ्थ्य आहे. सह्याद्रीनं काही वेळा क्लोजअपचा वापर केला आहे. क्लोज अप आला रे आला की अभिनयाची रीतच बदलते. नाटकातला अभिनय हा क्लोजअपचा अभिनय नसतो. नाटकात सर्व पात्रं प्रेक्षक एकाच वेळी पहात असतो. क्लोज अप आला रे आला की बाकीची पात्रं दृष्टीआड जातात. नाटकाच्या हिशोबात ते बरोबर नाही.
सह्याद्रीच्या स्वयंवरात क्लोज खटकले, पण एकूणात आस्वादात फार अडचण आली नाही.
सुरवातीच्या मुद्दयाकडं आता जातो.
स्वयंवर पहाताना मजा कां आली?
कारण स्वयंवर हे नाटक, ते लिहिणारे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, बखलेगुरुजींच्या चाली, बाल गंधर्व, तो काळ, त्या काळाची जादू इत्यादी सगळ्या गोष्टींची आठवण स्वयंवरच्या निमित्तानं येते. गिरगावात साहित्य संघात रात्र रात्र नाटक पाहून माणसं सकाळी आपाल्या घरी परतत. सारं अजब होतं.
स्वयंवर पुन्हा पुन्हा पहाताना सभोवतालचं विद्यमान वास्तव स्वयंवरनं विसरायला लावलं.
स्वयंवर पहाताना सभोवताली घरातली माणसं त्यांचे उद्योग करत फिरत होती. दारावर घंटी वाजत होती. टेलेफोन वाजत होता. भाजीवाला किंवा वाणसामानवाला येऊन गेला. ती व्यवधानं येऊनही मी नाटकाबरोबर प्रवास करत होतो.
मूळ नाटकात रुक्मिणीची भूमिका बाल गंधर्वांनी केली होती. बाल गंधर्व दिसायला सुरेख होते. त्यांचा कपडेपट फार भारी असे. उत्तम कपडे वापरण्यातून नाटकमंडळी कर्जबाजारी झाली होती. असं म्हणतात की प्रयोगाच्या वेळी त्यांच्या अंगावर पॅरिसहून मागवलेलं अत्तर शिंपडलं जात असे. त्यांच्या दिसण्यायेवढंच किंबहुना जास्त त्यांचं गाणं लोकांना आवडत होतं.
पदांना चाली दिल्या होत्या बखलेबुवांनी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ऊर्फ खाडिलकर मास्तरांनी अभिनय बसवून घेतला होता. बाल गंधर्व यांची एक स्वतंत्र शैली होती. त्यांच्या गाण्यात गोडवा होता, लडिवाळपणा होता. पदं रागांत बांधली गेलेली असत, बाल गंधर्व रागाची चौकट मोडून गात असत. एक राग सोडून दुसऱ्या रागात अगदी सहजपणे जात. हा सहजपणा असा होता की ते एक नवाच राग गात आहेत असं वाटत असे.
बालगंधर्वांना सारंगीवर कादरबक्ष साथ करत. साथ एकरूप झालेली असे, बालगंधर्वांची तान थांबलेली असे, कादरबक्ष यांचे सारंगीचे सूर वातावरणात असत, बालगंधर्वच गात आहेत असं वाटत असे.
त्या काळात वन्समोअरची पद्धत होती. प्रेक्षक तशी मागणी करत. मग नट तेच गाणं पुन्हा म्हणत. त्यामुळं तीन तासाचं नाटक सहज साताठ तास चालत असे. लोकांजवळ तेवढा वेळही असे. पण त्याचा अतिरेक होऊन नाटकाचं रुपांतर ” उभ्या मैफलीत ” होत असे. बाल गंधर्वांवर लोकं वेडे झाले होते त्यामुळं वन्समोअरना अंत नसे. पण बाल गंधर्व केवळ मायबाप प्रेक्षकांवरच्या प्रेमामुळं मोजके वन्समोअर घेत असत.
बाल गंधर्वांसारखं दुसरं कोणीच गाऊ शकणार नाही. पण निदान त्या गाण्याच्या अवीट चाली तरी सह्याद्रीच्या प्रयोगानंतर लोकांसमोर पोचल्या.
कृष्णाची प्रभाकर यांचं नाटक पक्कं बांधलेलं असे. त्याची एक घट्ट वीण असे. पहिल्या प्रवेशातच कृष्ण भीष्मक राजाच्या अंतःपुरात घुसतो आणि थेट राजकन्या रुक्मिणीला भेटतो. आपल्याला कळतं की हे नाटक कोणाभोवती गुंफलं गेलंय. अनेक संकटांचा सामना करत करत शेवटी रुक्मिणी आणि कृष्णाचं मीलन होतं.
गंमत आहे ती नाटकात पसरलेल्या गाण्यांत. कृष्ण आणि रुक्मिणी बोलण्यापेक्षा गाणीच जास्त म्हणतात. काही सांगायचं झालं की गाणं. गाणीही ऐसपैस.
इतकी गाणी? हिंदी सिनेमातही गाणीच गाणी असतात. असं कां? त्या काळापर्यंत गाणं हा माणसाच्या जगण्याच्या प्रत्येक क्षणाचा सोबती असे. प्रत्येक सण, प्रत्येक विधी गाण्यांना बांधलेला असे. पहाटे सडासारवण करतांना, जात्यावर धान्य दळतांना, पाणवठ्यावर पाणी शेंदताना, क्षणोक्षणी गाणी.लोकगीतांच्या रुपांत ही गाणी लोकांच्या तोंडी होती. ते गाणं नाटकात आलं.
लोकगीतं भारतातल्या प्रत्येक प्रांतात आहेत. आजही आहेत. महाराष्ट्रात त्यांनी नाटकात प्रवेश केला. नाट्यगीतं असा एक अद्वितीय गाण्याचा प्रकार मराठी भाषेत आला. या साऱ्याची उजळणी स्वयंवर पहाताना होते; संगीत मराठी नाटकं, बालगंधर्वांची संगित नाटकं हा मराठी संस्कृतीतला घटक आपल्या लक्षात येतो तो ते स्वयंवरसारख्या नाटकामुळं.
म्हणून तर स्वयंवर पहाताना मजा येते.
।।