गटारावरचं झाकण निघालं, दुर्गंधी व विषार हे वास्तव कळलं.
जे झालं ते बरंच झालं. पोलिस हे प्रकरण काय आहे ते कळलं तरी.
सीबीआयचे उपसंचालक देवेंद्र कुमार अटकेत आहेत. लाचबाजीचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआयचे संचालक राकेश अस्थाना यांच्यावर लाचबाजीचा आरोप असून त्यांची चौकशी चाललीय. त्यांनाही अटक होऊ शकते. सीबीआयचे विद्यमान संचालक आलोक वर्मा यांच्यावर अस्थाना यांनी लाचबाजीचा आरोप केला आहे. वर्मा आणि अस्थाना या दोघांनाही कामावरून दूर करून त्यांच्या जागी नागेश्वर राव या संचालकांची नेमणूक झाली. त्यांच्या विरोधातही सीबीआयमधे भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत.
थोडासा तपशील कळावा म्हणून राकेश अस्थाना यांचं उदाहरण घेऊ. त्यांच्यावर दोन आरोप आहेत. मोईन कुरेशी या मांसाची नीर्यात करणाऱ्या माणसाच्या आर्थिक गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी एक ते पाच कोटी रुपयांची लाच अस्थाना यांनी घेतली. तसंच बडोद्यातल्या स्टर्लिंग बायोटेक या कंपनीचे मालक संदेसरा यांनी केलेल्या सुमारे ५००० कोटीच्या आर्थिक गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी पैसे घेतले. दिल्लीतील हैदराबादमधील अनेक मोठ्या कंपन्यांची पापं पोटात घेण्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.
मोईन कुरेशी प्रकरणातली लाच अस्थाना यांच्यापर्यंत कशी पोचत होती? साना नावाचा एक माणूस हा उद्योग करत होता. साना मुळात आंध्र प्रदेश वीज बोर्डात सरकारी नोकर होता. ते काम करत असताना रियल एस्टेट व्यवहार करणाऱ्या उद्योगींशी त्याचा संबंध आला. म्हणजे त्या लोकांची बेकायदेशीर कामं करून देणं आणि त्या बदल्यात पैसे घेणं. वाट सापडली. सानानं सरकारी नोकरी सोडली आणि तो रियल एस्टेटमधे उतरला. तिथे त्यानं अधिक मोठ्या प्रमाणावर पैशाच्या उलाढाली केला आणि श्रीमंत झाला. त्यात त्याला आंध्रातल्या काँग्रेसी पुढाऱ्यांची मदत झाली. साना प्रतिष्ठित झाला. आंध्रातल्या बॅडमिंटन आणि क्रिकेट संघटनांमधे तो पदाधिकारी झाला. एकूण त्याचं स्थान इतकं उंचावत गेलं की सीबीआयमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधे त्याची ऊठबस वाढली. गुन्हे करणारे लोक सानाचा मध्यस्थ म्हणून वापर करू लागले. अशा रीतीनं अस्थाना यांच्याकडं पैसे पोचू लागले.
आता संदेसरांचं प्रकरण पाहूया. संदेसरा हे बडोद्यातले उद्योगपती. स्टरलिंग बायोटेक ही त्यांची मुख्य कंपनी. गुजरातेत किंवा देशातच कोणताही अर्थव्यवहार सरळ आणि कायदेशीर पद्धतीनं होत नसल्यानं उद्योगींना सरकारी अधिकारी व पुढाऱ्यांना लाच द्यावी लागते. त्यासाठी शेल कंपन्या म्हणजे दिखाऊ कंपन्या तयार केल्या जातात. संदेसरांनी अशा १७९ कंपन्या स्थापन केल्या. सुमारे ८००० कोटी रुपयांना बँकांना चुना लावल्यावर ते उद्योग लपवण्यासाठी संदेसरा यांना पैसे चारावे लागत. शेल कंपन्यांतून संदेसरा यांनी १४० कोटी रुपयांची रोख रक्कम काढली, पुढारी आणि सरकारी अधिकारी यांना खुष करण्यासाठी वापरली.
अस्थाना यांच्या मुलीचं लग्न बडोद्यात झालं तेव्हां त्या लग्नाचा बराचसा खर्च संदेसरा यांनी सांभाळला. अस्थाना यांच्या मुलीच्या लग्नाला खूप माणसं जमा झाली होती. त्यांना बडोद्यातल्या पाचतारा हॉटेलांत उतरवण्यात आलं होतं. बडोद्यात एक लक्ष्मी विलास राजवाडा आहे. सयाजीराव गायकवाड यांनी तो राजवाडा उभारला होता. या भव्य राजवाड्याचं रुपांतर हॉटेलात करण्यात आलंय. त्या हॉटेलात अस्थाना यांचे वऱ्हाडी उतरले होते. जंगी स्वागत समारंभही पार पडला. हॉटेलांचा खर्च, समारंभातला बराचसा खर्च अस्थाना यांना त्यांच्या खिशातून भरावा लागला नाही. हॉटेल मालकांनी सांगितलंं तो खर्च हॉटेलांनी काँप्लिमेंटरी ठरवला, अस्थाना यांच्या प्रेमाखातर तो खर्च सोसला. काही बिले अस्थानांच्या पत्नीनं दिली. त्यांचीही रक्कम वीसेक लाखात जाते. म्हणजे एकूणात लग्न काही कोटी रुपयात पडलं. संदेसरा यांनी लग्नाचा खर्च उचलला, त्याची चौकशी आता सीबीआय करतंय.
पोलिस खात्यातल्या अगदी सर्वोच्च अधिकाऱ्याचं वेतन सर्व सवलती वगैरे धरून दोन लाख रुपयेही नसतं. पण त्यांची रहाणी किती खर्चीक असते पहा.
संदेसरा नायजेरियात पळून गेलेत.
आंध्रप्रदेशात काँग्रेसी आणि गुजरातेत भाजपाची लोकं लाचबाजीशी सिद्ध करता येणं कठीण अशा रीतीनं अडकले आहेत.
स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच जनता ऐकत होती की पोलिस खात्यात खूप चोर भरले आहेत. पण त्या गोष्टी फक्त कुजबुजीपुरत्याच असत. कधी कधी एकाद दुसऱ्या चुकार बातमीमधे पोलिसांच्या गैरव्यवहाराचा पत्ता लागत असे. गुन्ह्यांची दखल न घेणं, दखल घेतल्यास चुकीचे एफआयआर नोंदणे, नंतर तपासामधे लफडी करणे, नंतर गुन्हेगारांना पाठीशी घालणे असे अनेक उद्योग लोकांच्या, कोर्टातल्या कुजबुजीत असत. पोलिस खात्याची जबाबदारी खांद्यावर असणारं गृहखातं, ते खातं चालवणारं सरकार आणि ते सरकार चालवणारे राजकीय पक्ष गप्प असत. निवडणुकीच्या भाषणात फक्त आरोपांचे फटाके वाजत. प्रत्येक निवडणुकीच्या आधी व नंतर विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांवर आर्थिक गुन्हेगारी खात्यातर्फे धाडी पडत आणि सीबीआय खटले भरी. पुढं त्या खटल्यांचं काय होई ते कळत नसे. सध्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांवर धाडी आणि खटले चाललेत.
मुलायम सिंग, लालू, मायावती इत्यादी लोकांवर वेळोवेळी धाडी पडत गेल्या,खटले भरले गेले. महाराष्ट्रातही अनेक पुढाऱ्यांच्या फायली गृहखात्यात असतात आणि एकाद्या पुढाऱ्यानं सत्ताधारी पक्षाच्या माणसांवर टीका केली की त्या फायली उघडल्या जातात. नंतर तो पुढारी एकदम उंदीर होऊन बिळात जातो. महाराष्ट्रात सध्या आपण त्याचा अनुभव घेतच आहोत.
या साऱ्या गोष्टी सांगोवांगी आणि तोंडातोडी आणि कानोकानी होत्या. अस्थाना, वर्मा इत्यादी लोकांनी एकमेकांवर खटले भरून सत्य लोकांसमोर आणलं.
सीबीआयचे सध्या रजेवर असलेले प्रमुख संचालक आलोक वर्मा यांच्या घरावर इंटेलिजन्स ब्युरो या पोलिस खात्याच्याच एका शाखेनं पाळत ठेवली. पाळत ठेवणारी माणसं अधिकृत पोलीस अधिकारी होते आणि त्यांच्याजवळ पोलिस खात्याची ओळखपत्रंही होती. आलोक वर्मा यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्या पोलिस अधिकाऱ्यांची मानगूट धरली, थपडा वगैरे मारून पकडलं. या बद्दल इंटेलिजन्स खात्यानं नाराजी दाखवली.
पोलिस लोकं माणसांना बिनधास्त पकडतात, धोपटतात. सामान्य माणसांना हा अनुभव बरेच वेळा येतो. पकडला गेलेला माणूस सिनेनट असेल किंवा पुढाऱ्याचा नातेवाईक असेल तर गोष्ट वेगळी. त्यानं खून केला असला तरीही त्याला सन्मानाची वागणूक मिळते. सलमान खान पकडला गेला तेव्हां पोलिस स्टेशनमधे त्यांचे स्वातंत्र्य सैनिकासारखं स्वागत झालं, पोलिसानी त्याच्या सह्या घेतल्या. त्याच्या जागी कोणी सामान्य माणूस असता तर त्याचा गुन्हा काय आहे याची चौकशीही न करता पोलिसांनी त्याला धोपटला असता.
अर्थात पोलिस कोणाला सामान्य माणूस ठरवतील तेही सांगता येत नाही. अरूण शौरी हे नामांकित पत्रकार आहेत, एके काळी केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्रीही होते. पोलिसांनी त्यांच्या विकलांग पत्नीला न घडलेल्या गुन्ह्यात गुंतवून कोर्टात उभं रहायला लावलं. वयस्क शौरी यांनाही अतोनात त्रास दिला. कारण शौरी यांनी सध्याच्या सरकारवर आणि नरेंद्र मोदींवर टीका केली.
आजवर कुजबूज होती. आता सारा मामला कायदेशीररीत्या कागदावर आलाय.
ते बरंच झालं. आता तरी जनता विचार करून पोलिस खातं वळणावर आणण्याचा विचार करेल. आता तरी पोलिस खात्याचा वापर करणाऱ्या राजकीय पक्षांना आणि पुढाऱ्यांना वळणावर आणण्याचा विचार जनता करेल.
झालं ते बरंच झालं. गटारावरचं झाकण निघालं. दुर्गंधी आणि विषार हे वास्तव कळलं. गटार साफ करणं आता शक्य होईल.
।।