गाढव समाज नष्ट होणार? इटालियन वडापाव, २७ वा जेम्स बाँड, अरब स्प्रिंग
हां हां म्हणता अरब स्प्रिंगला १० वर्ष झाली.
ट्युनिशियात २०१० च्या डिसेंबर महिन्यात बौझिझी या तरुणानं स्वतःला जाळून घेतलं.
तो फेरीवाला होता. गाडीवर फळं विकत फिरत असे. कुठंही गाडा उभा केला की पोलीस लाच मागत. दररोजची लाच आणि उत्पन्न यात मेळ बसेनासा झाला. संध्याकाळी घरी परतल्यावर आठ माणसांच्या पोटात पुरेसं अन्न घालायला त्याच्याजवळ पैसे उरलेले नसत. शेवटी कंटाळून त्यानं सरकारी कार्यालयासमोर स्वतःला जाळून घेतलं.
बातमी देशभर पसरली. तरूण रस्त्यावर उतरले. त्यांनी पंतप्रधान बेन अली यांचा राजीनामा मागितला. बेन अलीनी पोलिसी बळ वापरलं. तरूण आणखीनच संतापले. मग जनताही रस्त्यावर उतरली. आंदोलन पसरलं, बेन अली पळून गेले.
बहुसंख्यांची आर्थिक हलाखी आणि भ्रष्ट हुकूमशाही अशी ट्युनिशियासारखीच स्थिती असलेल्या येमेनमधे तरुण रस्त्यावर आले. तशीच स्थिती असलेल्या शेजारच्या लिबियात आणि नंतर त्याला लागून असलेल्या इजिप्तमधे तरूण रस्त्यावर आले. पाठोपाठ सिरियाचा नंबर लागला.
आंदोलन पसरवलं फेसबुकनं. लोकांची स्थिती आणि सरकारची दडपशाहीच्या बातम्या फेसबुकवरून पसरवल्या जात होत्या. सरकार इंटरनेट बंद करत असे, फेसबुकचे अकाऊंट बंद करत असे, फेसबुकचा वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुरुंगात ढकलत असे. जसजशी दडपशाही वाढली तसतसं तेवढ्याच जोमानं नवनवी तंत्रं तरूणांनी शोधून काढली आणि बातम्या पसरवल्या.
फेसबुकवरून सांगितलं जाई की कैरोच्या ताहरीर चौकात संध्याकाळी जमायचं आहे. हां हां म्हणता लाखभर तरूण गोळा होत.
सरकार टीव्ही आणि पेपरातून आंदोलकांविरोधात प्रचार करत असे. त्या प्रचाराचा खोटेपणा सिद्ध करणारी आणि आंदोलनातलं सत्य सांगणारी माहिती तरूण सोशल मिडियात पसरवत. त्यामुळं सरकारचा प्रचार निरुपयोगी ठरला.
आंदोलनाचा उद्देश आणि तो प्रसारित करण्याचं साधन (फेसबुक) या दोनच गोष्टींच्या आधारे लोकांचा प्रक्षोभ संघटित झाला, देशात कोणतेही राजकीय पक्ष किंवा संघटना नसतानाही. देशाच्या सीमा ओलांडून लोकं संघटित झाले. ट्युनिशिया कुठे आणि येमेन कुठं, तरीही दोन्ही ठिकाणच्या लोकांचे विचार जुळले.
आंदोलनं झाली, हळू हळू विरली. लिबियात सत्तापालट झाला पण पर्याय मागणाऱ्या लोकांची सत्ता तिथं प्रस्थापित झाली नाही, अराजक माजलं. इजिप्तमधे जनरेट्यामुळं मुबारक यांना सत्ता सोडावी लागली. पण आंदोलक सत्ता काबीज करू शकले नाहीत. मुबारक पठडीतील जनरल सिसी यांनी सत्ता काबीज केली. सीरियात सत्ताधारी आसद यांनी पाशवी बळ वापरून विरोध चिरडून काढला. त्यांनी लाखो माणसं मारली, लाखोंना देशाबाहेर जायला लावलं. देश बेचिराख झालाय तरीही आसद यांची सत्ता मात्र कायम आहे.
अरब स्प्रिंग आंदोलन आसपासच्या अरब देशात पसरलं नाही. इजिप्तला लागून सुदान आहे, तिथं आंदोलन गेलं नाही. इजिप्तच्या पलिकडं सौदी अरेबिया, तिकडं आंदोलन गेलं नाही.
आंदोलन झालेले देश आणि आंदोलन न झालेले अरब देश यांच्यात एक मुद्दा समान होता, तो म्हणजे लोकशाहीचा अभाव. सर्व देशात कोणा तरी एका माणसाची, एकाद्या घराण्याची सत्ता होती. सत्ताधारी कुठे कुठे लष्कर आणि पोलिसी बळावर सत्ता काबीज करून बसला होता. तरीही तिथं लोकांनी उठाव केल्याचं दिसत नाही.
आंदोलन न झालेल्या देशांत (सुदान सारखं उदाहरण वगळता) आर्थिक प्रश्न तीव्र नव्हते. तिथे स्वातंत्र्य नव्हतं हा मुख्य प्रश्न होता. सौदी अरेबियात सौद घराण्याच्या हुकूमशाही वागण्याबद्दल असंतोष होता. बहारीनमधे बहुसंख्येनं असलेल्या शियांना दडपलं जात होतं. असंतोष होता पण त्यात आर्थिक भाग कमी होता, स्वातंत्र्याचा भाग अधिक होता. तिथल्या सरकारांनी नाराज लोकांना पैसे वाटून गप्प बसवलं, अगदीच कटकट करणाऱ्यांना तुरुंगाची हवा दाखवली.
अरब स्प्रिंग हे एका परीनं लोकशाहीची, स्वातंत्र्याची मागणी करणारं आंदोलन होतं. लोकांना विचार करण्याचं, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य हवं होतं. पोपटाला भले हवं तेव्हां हवं तेवढं खायला मिळो, पण शेवटी तो पिंजऱ्यात असतो. काही देशात उपाशी पोपट, काही देशांत पोट भरलेले पोपट. पिंजऱ्यात असणं ही पिंजरावासी पोपटांची मुख्य अडचण.
इजिप्त आणि सीरियातले बहुसंख्य गरीब भाकरी मागत होते आणि भाकरीची मागणी करण्यासाठी आवश्यक स्वातंत्र्य मागत होते. सौदी आणि बहारीनमधे भाकरीचा प्रश्न नव्हता, प्रश्न होता मोकळेपणानं जगायला न मिळण्याचा. सत्ताधारी माणसाला खुष ठेवा आणि जगा ही तिथली जगण्याची रीत. अधिकार म्हणून काहीही मिळणार नाही, सत्तेतल्या माणसाशी कसही जुळवून घ्या, त्यासाठी हवं तर कौटुंबिक संबंध वापरा नाही तर लाच द्या.
उपाशी असलेले बाहेरचे पोपट आणि पिजऱ्यात असलेले पोट भरलेले पोपट. सत्ताधारी म्हणत की तुम्हाला स्वातंत्र्याची जरूरच काय, आम्ही आहोत की तुमची काळजी घ्यायला. पोपटांच्या मनात येई की आमचं भलं कशात आहे हे तुम्ही ठरवू नका आमचं आम्ही ठरवू.
आखाती देशामधली समाजव्यवस्था बंदिस्त आहे. तिथं लोकशाही संस्था नाहीत, लोकशाहीचा इतिहास नाही. सत्ता आणि प्रजा यातला संबंध तिथं घराणं, धर्म, पंथ, दडपण्याची शक्ती या मुद्द्यावर ठरतात.
अरब प्रदेश इस्लामी आहे. बऱ्याच इस्लामी विचारवंतांचं म्हणणं आहे की इस्लाममधेच लोकशाही आहे, त्यासाठी निवडणुका, पक्ष, लोकसभा असल्या गोष्टींची आवश्यकता नाही. कुराणात सांगितलंय तसं वागा, तीच राज्यव्यवस्था असं या लोकांचं म्हणणं असतं. सामान्यपणे अरब प्रदेशातली माणसं या विचारांची असतात.
अलीकडं तरूण अरब इस्लामी नसलेल्या जगात जातात आणि तिथं असलेली लोकशाही व्यवस्था त्यांना योग्य वाटते. अशा पश्चिमी विचारांचा प्रभाव असणारी माणसं प्रामुख्यानं अरब स्प्रिंग आंदोलनात होती. असं म्हणता येईल की त्यांच्या लेखी कुराण हा धर्मग्रंथ होता, राज्यव्यवस्था नव्हती.
पश्चिमी लिबरल लोकशाही विचार तयार होण्यासाठी, कार्यक्षम होण्यासाठी लोकशाही संस्था आवश्यक असतात. मोकळं सेक्युलर शिक्षण, लोकशाही संस्था व संघटना, राजकीय पक्ष, स्वतंत्र माध्यमं इत्यादी गोष्टीच्या आधारे पश्चिमी लोकशाही उभी रहात असते. तो पाया अरब देशात नसल्यानं आंदोलन पृष्ठभागावर राहिलं, त्याला आवश्यक बळ समाजातून मिळालं नाही.
प्रश्न आहे कारभार किवा गव्हर्नन्सचा. कारभार लोकांशी मेळ खाणारा असावा, लोकांच्या सवयीचा असावा. ते कसं जमवायचं ते राज्यकर्त्यांनी पहावं.भारतात व्यक्तीला महत्व असतं, विचारधारा किवा कार्यक्रम किंवा धोरणं यांचा विचार नागरीक अगदीच कमी करतात. कुटुंब प्रमुख, प्रसिद्धी जमलेली माणसं, प्रतिमेचं वलय असलेली माणसं, सत्ताधारी आणि बलवान माणसं यांच्यापुढं भारतीय माणूस विचार वगैरे गुंडाळून ठेवून झुकतो. नेहरू, इंदिरा, जयप्रकाश, वाजपेयी, ठाकरे, मोदी अशा व्यक्तींच्या प्रेमात माणसं असतात, त्या व्यक्तींचे विचार वगैरे भानगडीत माणसं जात नाहीत. हे आहे भारतीय समाजाचं वैशिष्ट्यं.
इस्लामी जगात कुराण. भारतात व्यक्ती.चीनमधे सत्तेची उतरंड, जपानमधे परंपरा.
प्रत्येक देशात स्वतःची कारभाराची धाटणी आहे. त्या धाटणीत, चाकोरीत लोकशाही वगैरे बसवलं जातं किंवा दूर सारलं जातं. बहुतेक वेळा लोकशाही हा शब्द जगभरच फार सैलपणे वापरला जातो.
त्यामुळंच अरब स्प्रिंगमुळं अरब प्रदेशात पश्चिमी थाटाची लोकशाही आणि राज्यव्यवस्था निर्माण झाली नाही हे समजण्यासारखं आहे.
समाजातल्या बहुसंख्य लोकांना चांगलं जगता येतंय कां आणि मोकळा श्वास घेता येतोय कां हा मुख्य मुद्दा.
तो कसा सांभाळायचा ते प्रत्येक देशात त्या त्या देशातल्या समाजरचनेवरून, चालीरीती ठरवतात.
माणसं सुखी नसतील तर काय करायचं हे त्या त्या समाजानं पहावं. लोकशाही असूनही भारतात माणसं दुःखी आहेत आणि लोकशाही नसूनही सौदी आणि इजिप्तमधे माणसं दुःखी आहेत. त्या देशांना यातून त्यांच्या पद्धतीनं मार्ग काढावा लागेल. तो मार्ग कुठल्याही राज्यशास्त्राच्या पाठ्य पुस्तकात सापडणार नाही.
।।
इटालियन वडापाव
परवा टीव्हीवरच्या फूड शोमधे एका मुलीनं एक नव्या प्रकारचा वडा तयार करून दाखवला. वडा पावमधे वापरायचा वडा.
आपल्याकडं पावाबरोबर खाल्ला जाणारा वडा सामान्यपणे बटाटावडा असतो. बटाटावड्यातली भाजी एका विशिष्ट मराठी चवीची असते. तिखट, लसूण, कोथिंबिर, थोडीशी साखर, थोडासा हिंग. बेसनात गुंडाळलेलं सारण. हा खासच मराठी प्रकार.
एकेकाळी तो स्वतंत्रपणे वडा म्हणून चटणीबरोबर खाल्ला जात असे. मुंबईच्या धबडग्यात सुलभतेनं खाता यावायासाठी तो पावात घातला गेला. चपट केलेला वडा, त्यावर चटणी, त्याचं पावात केलेलं सँडविच. पटकन घेऊन खात खात जाता येतं.
खास मराठी खाद्याचं खास मुंबई रुपांतर.
परवाच्या शोमधे या वड्यातलं बटाट्याच्या भाजीचं सारण दूर सारून त्यात मॅक्रोनी पास्ता या गोष्टी शिजवून त्या चीजमधे घोळून वड्यात घालण्यात आल्या.
हा प्रकार चविष्ट तर असणारच. पास्टा, चीज.चैन. पण वेगळ्या प्रकारची चैन. बटाटा वड्याची चैन वेगळी, ही चैन वेगळी. तुलना कशाला करायची?
याच शोमधे शेफनं पराठा पिझ्झा नावाचा पदार्थ करून दाखवला. पिझ्झाचे काही घटक पराठ्यात घालून तयार केलेला पदार्थ. टीव्हीच्या पडद्यावर तो पदार्थ छानच दिसला. शेफनं तो खाऊन ऊंऊंऊं करून कौतुक केलं. एकूणात तो पदार्थ छानच असणार.
उद्या हा पदार्थ कदाचित इटालीतही विकला जाईल.
माणसाला जीभ नावाचा एक अवयव आहे. तो अवयव नाक नावाच्या अवयवाशी झोंबाझोंबी करतो. या दोन्ही अवयवांना सतत काही नवं हवं असतं. त्या गरजेतून नवे पदार्थ जन्माला येतात.
एकेकाळी लोकं पदार्थांचं स्थानिक वैशिष्ट्यं टिकलं पाहिजे असा आग्रह धरत. चिनी पदार्थ लोकप्रीय झाल्यावर बियरबारमधे चायनीज भेळ नावाचा पदार्थ विकला जाऊ लागला. माझा एक मित्र संतापत असे. तो म्हणे की भेळ तरी खा नाही तर नूडल्स खा. चायनीज डोसा बशीत ठेवला की तो संतापत असे.
भारत हे एक बेट असण्याचा तो काळ होता. आता भारत जगाशी जोडला गेलाय. इंटरनेट, सॅटेलाईट, टीव्ही इत्यादीमुळं आपलं काय आणि परकी काय ते कळेनासं व्हावं असं झालंय. चीनमधे, मेक्सिकोत, थायलंडमधे अशा नाना ठिकाणी काय काय पदार्थ करतात ते साक्षात दिसू लागलं. घरोघरी स्त्रियापुरुष प्रयोग करू लागले.
पदार्थ आता स्थानिक राहिलेले नाहीत.
।।
गाढव समाज नष्ट होण्याची भीती.
जगभरात सध्या गाढवांना जाम मागणी आलीय. कारण चीनला गाढवं हवीयत.
कारण कारण साधं आहे. कारण काही चिनी देशी औषधात गाढवाचं कातडं वापरलं जातं. गाढवाच्या कातडीमधे वेदनानाशक गुण आहेत असं चिनी देशी औषधवाल्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणे की कातडीतल्या औषधी गुणांमुळं चेहऱ्यावरच्या पुटकुळ्या नाहिशा होतात.
चीनमधे सुमारे १० लाख गाढवं जन्मतात. पण औषधांसाठी ४० लाख गाढवं लागतात. त्यामुळं येव्हांना चीनमधली गाढवं संपलीत.
चीनमधे गाढवांना मार्केट आहे हे कळल्यावर कझाकस्तानातून गाढवांची आयात सुरु झाली. सापडलं गाढव की पाठवा चीनमधे. गाढवाच्या किमतीही चौपट झाल्या.
कझाकस्तानची वाळंवंटी आणि पहाडी अर्थव्यवस्था गाढवावर अवलंबून आहे. गाढव हे सर्वात स्वस्त आणि कार्यक्षम वाहन आहे. काम झालं की त्याला लाथ घालून हाकलून द्यायचं, ते गावभर फिरून आपलं पोट भरतं. त्याला ना पशुखाद्य द्यावं लागतं, ना इंजेक्शन.
पण गाढवं चीनमधे रवाना होऊ लागली आणि आता कझाकस्तानची अर्थव्यवस्था गडबडली आहे. कदाचित चिनी बनावटीचे ट्रक त्यांना विकत घ्यावे लागतील.
चीननं आफ्रिकन देशात पैसे गुंतवलेत. तिथं गाढवं वाढवणाऱ्या आणि पाठवणाऱ्या कंपन्याही चीननं काढल्या आहेत. आफ्रिकेतून धडाधड गाढवांची निर्यात होऊ लागलीय. द. आफ्रिका, नायजेरिया, बोटस्वाना या देशांनी गाढव पैदाशीला प्रोत्साहन दिलं असून निर्यातीचा कोटा टरवून दिला आहे. पण कोट्याची ऐशी की तैशी करून काळ्या बाजारात गाढवं विकली जाताहेत. केनयात गाढवाची सरासरी किमत ४० डॉलर होती ती १६० डॉलरवर गेलीय.
आफ्रिकन देशांतली गाढवं कमी होत चाललीयत, तिथं गाढवांचा काळाबाजार होतोय, तिथल्या अर्थव्यवस्थाही बिघडत आहे. बोटस्वानानं गाढवांच्या निर्यातीवर बंदी घातलीय.
जगात सुमारे ४ कोटी गाढवं जन्मतात. चिन्यांची मागणी पूर्ण करण्याच्या नादात उद्या गाढव ही जमातच नष्ट होण्याची भीती लोकांना वाटतेय.
।।
बाँड फिल्म पुन्हा लांबणीवर.
मला जेम्स बाँडच्या फिल्म्स जाम आवडतात. जीव धोक्यात घालून शत्रूकडची माणसं शोधणं, त्यांचा काटा काढणं आणि हा उद्योग करत असताना सोबत कायम अत्यंत मादक अशा स्त्रिया. मारधाड इतकी कल्पक की ते सारं खोटं आहे हे माहित असूनही पहावंसं वाटतं.
डॅनियल क्रेगनं जेम्स बाँडचं काम केलेला नो टाईम टू डाय हा ताजा बाँडपट तयार होऊन वर्षं झालंय. त्याला सिनेमाघरात जायला मुहूर्त मिळत नाहीये. निर्मात्याला वाटतंय की येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत स्थिती सुधारेल आणि चित्रपट सिनेमाघरात दिसेल.
बाँड फिल्म मोठ्या पडद्यावरच पहाण्यात मजा असते. त्यामुळं सिनेमा घरं उघडण्याची वाट निर्माता पहातोय.
१९५३ मधे इयान फ्लेमिंगनी एका कादंबरीत जेम्स बाँड हे पात्र रंगवलं होतं. त्यावरून १९६२ डॉक्टर नो ही पहिली बाँड फिल्म प्रदर्शित झाली. सीन कोनोरी मुख्य नट. फिल्म तुफ्फान गाजली. नो टाईम टु डाय हा २७ वा बाँडपट आहे.
तिथून दणादण बाँड फिल्मा सुरु झाल्या. किती तरी नटांनी बाँड रंगवला. स्पेशल इफेक्ट आणि खास साऊंड इफेक्ट हा बाँडपटाचा मुख्य भाग. आकाशात उडणाऱ्या गाड्या, विमानांच्या पंखावरची बाँडची कसरत, नाना प्रकारच्या बंदुका, काय न काय. केवळ स्पेशल इफेक्ट आणि साउंडमुळं ते सारं देखणं होत होतं. अनेक बाँड पटाना त्या स्पेशल इफेक्टसाठी ऑस्कर पारितोषिकं मिळाली आहेत.
सिनेमा घरं सुरु झाली नाहीत तर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर ती आपल्याला पहायला मिळेल.पण त्यात मजा नसणार. येवढ्याशा टीव्हीवर बाँड पहाण्यात मजा नाही.
जेम्स बाँड फिल्मनं आजच्या हिशोबात सुमारे १४ अब्ज डॉलर कमावले आहेत. ताज्या फिल्मवर निर्मात्यानं २५ कोटी डॉलर खर्च केलेत.
।।