गोरक्षण, सबरीमाला, राममंदीर. दांडगाई नको.
दांडगाई करणाऱ्यांना आवरा.
उत्तर प्रदेशात बुलंदशहरमधे एका पोलिस ठाण्यावर नागरिकांनी हल्ला केला, ठाण्याला आग लावली. पोलिस आणि नागरीक यांच्यात धुमश्चक्री झाली, गोळीबार झाला. गोळीबारात दोन जण ठार झाले पैकी एक पोलिस अधिकारी होता.
योगेश राज या नावाच्या बजरंग दलाच्या एका तरूण कार्यकर्त्याच्या पुढाकारानं ही घटना घडली. योगेश राजला गावात प्राण्यांचे सांगाडे सापडले. योगेश राजचं म्हणणं होतं की ते गायीचे सांगाडे होते. योगेश काही लोकांना घेऊन पोलिस ठाण्यात गेला. पोलिसांनी गोहत्या करणाऱ्यांना पकडावं, शिक्षा करावी अशी योगेशची मागणी होती. केवळ कोणीतरी सांगाडे सापडलेत आणि तो गोहत्येचा मामला आहे असं सांगतोय येवढ्यावर आणि नेमक्या त्याच क्षणी पोलिस कशी कारवाई करणार? पोलिस आणि योगेशचे मित्र यांच्यात वादावादी झाली. पोलिस काहीच कारवाई करत नाहीत असं म्हणत नागरिकांनी पोलिसांवर विटा फेकल्या, मारहाणीला सुरवात केली. प्रकरण चिघळलं.
सांगाडे गाईचे होते हे सिद्ध व्हायचं तर तर ते ताब्यात घेऊन त्यांचं वैज्ञानिक परीक्षण व्हायला हवं. समजा ते गाईचे निघाले तर ते त्या जागी आले कसे, कोणी ते तिथं टाकले याची चौकशी व्हायला हवी. गाई नैसर्गिक रीत्या मेल्या होत्या की त्यांना मारण्यात आलं होतं याची चौकशी व्हायला हवी. ही प्रक्रिया पार पडल्यानंतरच गोहत्या झाली की नाही आणि ती कोणी केली ते ठरणार, सिद्ध होणार. पोलिसांना गुन्हाही माहित नाही, गुन्हेगारही माहित नाहीत तर त्यांनी कारवाई कशी करावी असा अगदी साधा मुद्दाही नागरिकांनी लक्षात घेतला नाही. हाणामारी करून मोकळे झाले.
पोलिस स्टेशनवर चालून गेलेल्यांची संख्या शेदोनशे असावी. पैकी वीस लोकांची जुजबी माहिती मिळाल्यानं पोलिसांनी त्यांची चौकशी सुरु केली, त्यांचा शोध घेतला. त्या वीसेक लोकांमधे काही लोक भाजपचे कार्यकर्ते आहेत. बहुसंख्य लोक पक्षाचे कार्यकर्ते नसावेत, सामान्य जनता होती. परंतू उत्तर प्रदेशात वातावरण अशा रीतीनं तापवण्यात आलं आहे की गोहत्येचा आरोप केला की माणसं बेभान होतात आणि आंधळेपणानं मारहाण, खून करतात. बहुतेक वेळा गोहत्येचा आरोप मुसलमानांवर होतो.
गायी भाकड होतात. भाकड झाल्यावर त्या पोसणं गरीब शेतकऱ्याला परवडत नाही. घरातलं माणूस जगवता येत नाही अशा स्थितीत गायी जगवणं कठीण होतं. अशा वेळी सामान्यतः गायी खाटकाकडं सोपवल्या जातात, बहुतेक वेळा खाटिक मुसलमान असतो. ज्यांना गायी खाटकाकडं पाठवणं योग्य वाटत नाही आणि पोसणं शक्य असतं ती माणसं गायी मरेपर्यंत, नैसर्गिक मरण येईपर्यंत पोसतात. गायीचं मरण एक तर खाटकाकडं किंवा शेतकऱ्याच्या गोठ्यात.
अलिकडं गोहत्या प्रकरण राजकीय झाल्यापासून शेतकरी गाय भाकड झाली की रस्त्यावर सोडून मोकळे होतात. मोकाट गायी इतरांच्या शेतात, घराच्या आवारात जाऊन तिथं मिळेल ते खातात आणि रस्त्यावर मुक्काम करतात. शेतकरी आणि नागरीक त्यामुळं त्रस्त झालेत, पण बोलू शकत नाहीत. बोललं तर गायप्रेमी ठोकून काढतात.
मध्य प्रदेशात आणि राजस्थानात हिंदुत्व परिवारातली मंडळी आणि सरकार यांनी काही आश्रम काढून त्यात गायी स्वीकारण्याची सोय केली आहे. शेकडो गायी तिथं दाखल होतात. खाटीक, शेतकरी आणि रस्ता यातून त्या वाचतात आणि गोशाळेत पोचतात. परंतू गोशाळेत त्या पोसणं गोशाळेतल्या लोकांना परवडत नाही. प्रत्येक गायीला दररोज कित्येक किलो चारा / खाद्य लागतं, कित्येक लीटर पाणी लागतं. ते आणायचं कुठून? सरकारी अनुदान पुरत नाही. गरीबांना पोसता पोसता हैराण झालेलं सरकार गाईना पोसताना अडचणीत पडतं. परिणामी गोशाळेत गाईंचे हाल होतात, गायी खाटकाकडं न मरता उपासमार व रोगराईला बळी पडतात.
कुठल्याही राज्यात गाय मेली तर ती कशी मेली याची नोंद करण्याची सोय नाही. गोशाळेत,शेतकऱ्याच्या गोठ्यात मेलेल्या गायीचीही नोंद नसल्यानं सांगडा मिळाला की गाय नैसर्गिकरीत्या मेलीय की कोणा खाटकानं तिला मारलंय ते कळायला मार्ग नसतो. गायीबद्दल माणसाला प्रेम असतं. प्राणी म्हणून आणि एक प्रकारची देवता म्हणून. तिची अवदसा माणसाला पहावत नाही. पण सारं प्रकरण व्यावहारीकतेच्या पलिकडं जाऊन राजकारणात पोचल्यानं पंचाईत झालीय. गाय लोकांना भडकवण्याचं साधन झालंय, लोकांच्या भडकण्यातून मतं मिळवता येतात. त्यामुळं सारं प्रकरण अवघड झालंय.
हज्जारो वर्षं भारतात गायी जगल्या, गायी मेल्या. पण गायींच्या मरण्यामुळं इतकी माणसं कधी जखमी झाली नाहीत, इतकी माणसं कधी मेली नाहीत.
गाय हा एक पवित्र प्राणी मानायचं समजा हिंदू समाजानं ठरवलं (सावरकरांचे विचार दूर सारून) तरी हरकत नाही. झेंडा पवित्र मानला जातो, त्याची विटंबना होत नाही, त्याचा गैरवापर करता येत नाही, तसं समजा गायीबाबत ठरवावं आणि मोकळं व्हावं. अर्थात ते एकाद्याच प्राण्याबाबत करता येईल. नाग, बैल, गणपतीचं वाहन उंदीर, सरस्वतीचा मोर, शिवाजी महाराज आणि राणाप्रतापांचा घोडा अशी पवित्रांची यादी करत बसलं तर कठीण आहे. जैनांना विचारलं तर कोणत्याच प्राण्याची हत्या करायला परवानगी देणार नाहीत. त्यांचं राज्य आलं तर ना बकरं मारता येईल, ना कोंबडी ना मासा. गोंधळ आहे. फक्त गायीचं मांस खाऊ नका बाकीचं मांस खाल्लं तरी चालेल अशी काही तरी तडजोड करून मामला संपवावा लागेल. शेवटी मानवी भावनांचा प्रश्न असल्यानं एकादा प्राणी प्रतीकरूपात मानून मोकळं व्हायला हरकत नाही. पण हा निर्णय हिंदू जनतेनं घ्यायला हवा, राजकीय पक्षानं नव्हे. समाजाला निर्णय करताना व्यापक परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागत असतो. समाजावर सोडलं तर समाज कदाचीत गोवंश हत्याबंदीचा निर्णय घेणारही नाही.
समजा हिंदू समाजानं गाय या प्राण्याला मारता कामा नये असं ठरवलं तर समाजानं आपलं आपणच तो निर्णय अमलातक आणण्याची व्यवस्था करायला हवी. कोंडवाडा, गोशाळा, गोठा याच्या बाहेर एकही गाय पडणार नाही याची व्यवस्था समाजानं आपली आपण करायला हवी. गाय जिथं कुठं असेल तिथं तिला नैसर्गिक मरण येईल इथपर्यंत सांभाळण्याची व्यवस्था शेतकरी करेल याची व्यवस्थाही समाजानं आपली आपण करायला हवी. त्यात सरकार येता कामा नये. कारण गाय ही एकदा श्रद्धास्थान, धार्मिक झाली की ती व्यक्तीगत होते, ती सार्वजनिक होत नाही, सरकारचा त्यात संबंध यायचं कारण नाही. हिंदू समाजातल्या श्रीमंत लोकांनी वर्गणी काढून गायींना सांभाळण्याची व्यवस्था करावी, शेतकऱ्याला गाय सांभाळण्यासाठी लागणारं अनुदान अदानी, अंबानी, हिंदुजा, मल्ल्या, नीरव मोदी इत्यादी धनवानांनी उपलब्ध करावं. हिंदुत्व परिवारातल्या लोकांना या ना त्या वाटेनं पैसे देत रहाण्याऐवजी त्यांनी सांगून टाकावं की तुमच्या पक्षाला आम्ही पैसे देणार नाही ते पैसे आम्ही गायीच्या रक्षणासाठी आणि राम मंदीर उभारण्यासाठी खर्च करणार आहोत. गायीचं मास, कातडं इत्यादी गोष्टीवर उपजीविका करणाऱ्या माणसांची पर्यायी व्यवस्थाही समाजानं आपली आपण करावी.
धर्म ही खाजगी बाब आहे, नागरीकांनी ती खाजगी ठेवावी आणि सरकारवर धर्माव्यतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवाव्यात.ज्यांना केवळ मतांचं राजकारण करायचं असतं अशा राजकीय पक्षानं यात पडू नये. राजकीय पक्षांना (त्यात रास्व संघ आलाच) फक्त सत्ता पवित्र असते, बाकीच्या गोष्टी केवळ साधनं असतात.
अर्थात आणखीही एक बाब आहेच. सरकार, जनता कायदे करते. ते पाळणं ही जनतेची जबाबदारी असते. गोहत्या बंदीचा कायदा केला तर तो कायदा पाळण्याची जबाबदारी पोलिसांवर टाकावी, न्यायदानाची जबाबदारी न्यायालयावर टाकावी. योगेश राज सारखं कायदा हातात घेऊन पोलिस आणि न्यायालय या दोन्ही गोष्टी आपल्या हातात घेऊ नयेत.
गेल्या काही दिवसात घडलेल्या दोन घटना या संदर्भात विचार करण्यासारख्या आहेत. सबरीमाला देवळाच्या बाबतीत न्यायालयानं रजस्वला स्त्रीला मंदिरात जायची परवानगी दिली. हिंदुत्व परिवाराला या भागनडीत मतं मिळवण्याची संधी दिसली. हिंदुत्व परिवारातल्या लोकांनी न्यायालय निर्णयाचा अपमान करून आंदोलनं उचकवलं. त्याच सुमारास राम मंदिर प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढं सरकवली. हिंदुत्व परिवाराची इच्छा होती की २०१९ सालच्या निवडणुकीच्या पुरेशा आधी निर्णय यावा. हिशोब असा की निर्णय त्यांच्या बाजूनं आला तर आनंद. समजा त्यांना अडचणीचा निर्णय आला तर सबरीमालाप्रमाणं निर्णय धुडकावून लावण्याची व्यवस्था करता येईल.
एक आफ्रिकी पुढारी होते. ते म्हणत की जनतेला त्यांच्याशी सहमत होण्याचं स्वातंत्र्य आहे. भारतीय माणसांचं कायद्याबाबतही तसंच मत आहे. कायद्यानं त्यांच्याशी सहमत असावं, त्यांचा सांगाती व्हावं. कायदा सांगाती होणार नसेल तर माणसं कायदा दूर सारून वागायला मोकळी असतात. भारतीय माणसंच राजकीय पक्ष निर्माण करत असल्यानं राजकीय पक्षही इतरांना त्यांच्याशी केवळ सहमत होण्याचंच स्वातंत्र्य देत असतात. पक्षाशी सहमत नसणारी माणसं देशद्रोही ठरतात, धर्मद्रोही ठरतात, क्रांतीद्रोही ठरतात, विषमता समर्थक ठरतात, भ्रष्ट ठरतात. सत्य आणि योग्यता केवळ आपल्याकडंच आहे असं राजकीय पक्ष मानतात.
देशातले पोलिस, न्यायव्यवस्था, संस्था एका राज्यघटनेनुसार कामं करत असतात. त्यांच्या हातून चूक होऊ शकते. त्यांचे निर्णय आपल्याला अमान्यही असू शकतात. सभ्यता आणि शालीनतेनं आपली मतभेद पुराव्यानिशी मांडायची तरतूद कायद्यात असते. न्यायालयाचे निर्णय अमान्य आहेत, ते निर्णय चुकीचे आहेत असंही म्हणण्याचं स्वातंत्र्य कायद्यानं दिलं आहे. पुराव्यानिशी, शालीनतेनं आणि सभ्यपणानं ते व्हायला हवं.
समाजात विविध मतमतांतरं असतात आणि त्यांच्या घुसळणीतून कायदा तयार होत असतो, कायदा कालमानानुसार बदलत असतो. पण सभ्यतेच्या आणि शालीनतेच्या मर्यादा सांभाळल्या तरच समाजात निरोगी परिवर्तन होऊ शकतं. अविचारानं, दांडगाईनं समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न झाला तर दांडगाई हीच कसोटी ठरू लागते.
गोवंश टिकवणं, स्त्रीचे अधिकार, न्यायालयात सोपवलेलं राम मंदीर प्रकरण या निमित्तानं समाजामधे दांडगाईला मान्यता दिली जाताना दिसतेय. अशानं कोणताच कायदा कधीही पाळला जाणार नाही. समाजानं या दांडगाई करणाऱ्यांना आवरायला हवं.
।।