घातक औषधं विकणारा उघडा पाडला एका फोटोग्राफरनं
All the Beuty and the Bloodshed.
||
प्रस्तुत माहितीपट अमेरिकन सामान्य माणसाला, विशेषतः भारतीय माणसाला, हादरवून टाकणारा, एक अगदीच नवं जग दाखवणारा आहे. हा माहितीपट समाजाच्या परिघावरच्या माणसांचं जगणं दाखवतो आणि समाजाच्या मध्यभागी राहून समाजाचं जगण हिरावून घेणारी माणसं दाखवतो.
नॅन गोल्डिन ही फोटोग्राफर. तिचं लहानपण फार तणावाचं. आई वडिलांचं पटत नसे, वडील आईला मारझोड करत असत. तिची मोठी बहीण. बंडखोर होती. आत्यंतिक तणावाखाली वाढली. तिनं आत्महत्या केली.
नॅनवर बहिणीचा प्रभाव.नॅनही मानसिक क्लेषातच वाढली. घराबाहेर पडली. एका मित्राबरोबर रहायला गेली. तो मित्र गे निघाला. नॅन म्हणते की ती लिबरेट झाली, आपलं सेक्स जीवन कसं असावं ते ज्यानं त्यानं स्वतंत्रपणे ठरवावं आणि त्यानुसार जगावं.
कॉलेजात असताना नॅनच्या हाताशी कॅमेरा आला.कॅमेऱ्यानं तिला व्यक्तिमत्व दिलं.जगावेगळ्या जगात जाऊन तिनं फोटो काढले.
ही माणसं केवळ तिचे विषय नव्हते. त्या माणसांच्या भल्यासाठी ती झटली. नॅननं न्यू यॉर्कमधल्या कला जगाशी भांडण करत करत आपल्या चित्रांचं प्रदर्शन कलादालनात केलं.
नॅन बिनधास्त दुकानातून वस्तू चोरत असे. शॉप लिफ्टिंग. नॅन व्यसनी झाली. ऑक्सीकाँटिन हे नारकोटिक औषध तिनं ड्रगसारखं वापरलं, ते व्यसन तिला भारी पडलं. दोन वेळा मरता मरता वाचली.
ऑक्सीकाँटिन हे औषध ॲडिक्शनकडं झुकणारं होतं ही माहिती ते ओषध तयार करणाऱ्या परड्यू फार्मा या कंपनीनं लपवली. वैद्यकीय व्यवसातल्या लोकांना चुकीची माहिती देऊन, ते औषध कमी घातक आहे असं सांगून, कंपनीनं ते औषध खपवलं होतं. लाखो लोकांचे प्राण गेले. कंपनीनं, मालक सॅकलर कुटुंबानं, १९९५ ते २००६ या काळात २० अब्ज डॉलर कमावले.
सॅकलरनी लोकांना मारून पैसे तर मिळवलेच पण त्या पैशाचा उपयोग करून प्रतिष्ठाही मिळवली. अमेरिकेतल्या आणि युरोपातल्या प्रतिष्ठित आर्ट गॅलऱ्या आणि म्युझियमना पैसे दिले आणि तिथं आपल्या नावाची पाटी लावली. सॅकलर हे कलाप्रेमी आहेत असं या वाटेनं त्यांनी लोकांच्या मनावर आणि इमारतींवर ठसवलं.
गोल्डिननं सॅकलर, त्यांचं अनैतिक व गुन्हेगारी पैसे कमावणं उघडं पाडलं. मोहिम उभारली. सॅकलरची समाजात येवढी प्रतिष्ठा आणि उठबस होती की गोल्डिनच्या मोहिमेवर टीका झाली, तिचा अपमान आणि थट्टा केली गेली, ती व्यसनी आहे वगैरेचा प्रचार केला गेला. गोल्डिन फारच कणखर निघाली.तिनं कश्शाचीही पर्वा न करता, खिशात एक पैसाही नसतांना मोहिम कल्पकरीत्या यशस्वी केली.
म्युझियम, आर्ट गॅलऱ्यांवरचं सॅकलरचं नाव गेलं. सॅकलरला कोर्टानं शिक्षा दिली.
पर्ड्यू फार्मा, त्या कंपनीचे मालक सेकलर, यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी न्यू यॉर्कर साप्ताहिकाचे पॅट्रिक कीफ स्वतंत्रपणे करत होते. शोध पत्रकारीचा एक नमुना म्हणून त्या शोधाकडं पहाता येईल.कीफ आणि गोल्डिन यांनी सहकार्य केलं, त्यातूनच गोल्डिनची मोहिम आणि न्यू यॉर्करमधला एक प्रदीर्घ लेख तयार झाला.
हा नॅन गोल्डिनचा प्रवास प्रस्तुत माहितीपटात आहे.
लॉरा पेट्रस या ऑस्कर विजेत्या फिल्ममेकरनं माहिती पटाचं दिक्दर्शन केलंय.
गोल्डिनचं घर, तिची बहीण, बहिणीबरोबरचं तिचं गहिरं नातं या गोष्टी गोल्डिनच्या लहानपणी कोणीकोणी काढलेल्या फोटोंतून आपल्याला दिसतात.
गोल्डिन गाजलेली फोटोग्राफर आहे. समाजाच्या परिघावर असलेलं झ्यांगड जग गोल्डिनच्या फोटोत असतं. गे, लेस्बियन, व्यसनी माणसं. वेश्या. नाना प्रकारच्या पुरुष आणि स्त्री वेश्या. त्यांचे कपडे. त्यांची घरं. त्यांची भांडीकुंडी. तारेवर लटकणारे कपडे, शय्येवर पसरलेले कपडे, जमिनीवर पसरलेले कपडे, नाना प्रकारची पायताणं. ते माणूस आणि सभोलतालचं विश्व, रंगांचा दंगा.
चित्रपटात गोल्डिननं केलेल्या चळवळीची दृश्यं दिसतात. कार्यकर्ते पत्रकं आणि ऑक्सीकाँटिनच्या डब्या घेऊन गपचुप गोळा होतात. इतर पर्यटक आणि कलासक्तांच्या गर्दीत.अचानक घोषणा सुरू होतात. पत्रकं पावसासारखी कोसळतात. औषधांच्या डब्या भिरकावल्या जातात, इमारतीतल्या तळ्यात आणि कारंजात पडतात. मग हातात फलक घेऊन निदर्शक जमिनीवर झोपतात. ‘सॅकलर खोटं बोलतो, माणसं मरतात’ अशा घोषणांनी परिसरत दुमदुमतो. पोलिस येतात. कधी नुसतं हाकलून देतात, कधी अटक करतात.
जमा झालेली मंडळी गोंधळतात. त्यांना काय झालंय ते प्रथम कळत नाही. हळूहळू सारं उलगडू लागतं.मग ती माणसंही या निदर्शनांत सहभागी होतात.
पेपरात प्रसिद्धी मिळू लागली.
नाईलाजानं अमेरिका, इग्लंड, फ्रान्स इत्यादी ठिकाणच्या म्युझियमनी आणि गॅलऱ्यांनी सेकलरचं नाव पुसून टाकलं, काढून टाकलं.
सॅकलरवर झालेला खटला आपल्याला पडद्यावर दिसतो. खटला इंटरनेटवर चालला, इमारतीत नाही. आरोपी एका ठिकाणी, गोल्डिनचे वकील दुसऱ्या ठिकाणी, न्यायाधीश तिसऱ्या ठिकाणी, गोल्डिंग चवथ्या ठिकाणी.
न्यायाधीश विचारतात-अहो आरोपी तुम्ही हे ऐकताय ना?
आरोपी उत्तर देतात-हो ऐकतोय.
कोर्ट निकाल देतं. सॅकलरला दंड ठोठावतं.
सॅकलरकडं करोडो डॉलर घेणाऱ्या वकिलांची फौज.
कायद्यातल्या पळवाटा सॅकलरला बरोब्बर सापडतात.
खटल्याचा सुगावा लागल्यावर सॅकलरनं आपली कंपनी दिवाळ्यात गेल्याचं जाहीर केलं. कारण कंपनीतले पैसे त्यानं आधीच इतर ठिकाणी हलवून ठेवले होते. परिणामी दंड होतो तो अगदीच फालतू.
सॅकलर मजेत. लाखो माणसं औषधाच्या दुष्परिणामानं मेली त्यांना सॅकलरनं पैसे दिले नाहीत.
खटल्याचा निकाल लागतो तेव्हां गोल्डिन दिसते. तिला समाधान येवढंच की सॅकलरचं नाव म्युझियम-आर्ट गॅलऱ्यांतून काढलं गेलं.
पहा काय घडलं. सेकलर अब्जावधी डॉलर मिळवून मोकळे झाले, लाखो माणसं मारून मोकळे झाले. त्यांना चणेदाणे वाटावेत इतकाच दंड झाला. त्यांचा एकही माणूस तुरुंगात गेला नाही. झालं ते येवढंच की त्यांची बदनामी झाली. पण त्यांना कुठं बदनामीची फिकीर होती. ही माणसं इतकी स्वतःत आणि स्वतः सारख्या लोकांच्या कोंडाळ्यात वावरतात की बदनामीचा सूर त्यांच्यापर्यंत कधी जात नाही, फेकलेलं अंडं किंवा भिरकावलेला जोडा कधीच त्यांच्यापर्यंत पोचत नाही.
माहितीपटात वास्तव दाखवलेलं असतं, दिक्दर्शकानं कल्पिलेल्या गोष्टी नसतात. त्यामुळं फीचर फिल्मच्या तुलनेत माहितीपट अधिक प्रभावी असतात. माहितीपटात खरीखुरी माणसं आहेत. परंतू दिक्दर्शक पेट्रसनी हाताशी असलेल्या सर्व गोष्टींची रचना एक पटकथा तयार करून फीचर फिल्मसारखी केलीय. प्रत्येक दृश्य किती छोटं आणि किती लांब असावा याचा हिशोब मांडून त्यांनी संकलन केलंय. विषयालाच बरीच लांबीरुदी आहे. पटसुद्धा तीसेक वर्षाचा आहे. गोल्डिंगचं आयुष्य, परिघाबाहेरची अमेरिकन माणसं, नार्कोटिक औषध असे अनेक विषय गुंतलेले असल्यानं माहितीपट लांबणं स्वाभाविक आहे. तरीही सुमारे पावणेदोन तास कुठं कंटाळा येणार नाही अशा गतीनं दृश्यं सरकतात. फिक्शनमधे, फीचर फिल्ममधे कॅमेरा महत्वाचा असतो. कॅमेरा ट्रॉलीवरून आणि क्रेनवरून सरकतो, गिरक्या घेतो. ते सारं कृत्रीम असतं. अलिकडं कॅमेऱ्याची ती करामत माहितीपटातही करतात, माहितीपट त्या हिशोबात फीचर फिल्म होतो. दिक्दर्शिकेनं फिक्शन आणि माहितीपट दोहोंचं न्याय्य मिश्रण या चित्रपटात सांभाळलं आहे.
खुद्द गोल्डिनच निवेदन करते. घटना, फोटोतली माणसं यांचे तपशील पडद्यावर शब्दांत मांडले जातात. हे फिक्शन नाहीये हे चित्रपट सतत दाखवत असतो, प्रेक्षकाला सतत एका अंतरावर ठेवून.
हा माहितीपट यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. गेल्या वर्षी या माहितीपटाला विशेष चित्रपट या सदरातलं ऑस्कर मिळालं होतं.
।।