घाशीराम शिंदे

घाशीराम शिंदे

रहस्यपटात शोभेल असं नाट्य महाराष्ट्रात घडलं.

१०५ आमदार असलेल्या भाजपनं ३० फुटीर सेना आमदारांचं सरकार करायला पाठिंबा दिला, सरकार तयार केलं. तांत्रीक दृष्ट्या फुटीर आमदारांचा गट सेनेचा आहे की नव्या कुठल्याशा पक्षाचा असेल की भाजपत दाखल झालेला असेल ते या क्षणी कळायला मार्ग नाही. घडलंय ते येवढंच की एकनाथ शिंदे या सेनेच्या आमदारानं सेनेचे आमदार गोळा केले आणि भाजपशी संगनमत करून सरकार स्थापन केलं.

३० माणसांच्या सरकारचा मुख्यमंत्री आणि १०५ माणसांच्या पक्षाचा उपमुख्यमंत्री असं सरकार स्थापन झालंय.

या ३० माणसांपैकी काही जणांवर पक्षांतर कायद्याच्या अंतर्गत कारवाई अपेक्षीत आहे. त्यांची आमदारकीच गेली तर या ३० लोकांच्या गटाचं काय होईल ते सांगता येत नाही. विधानसभेचे सभापती, राज्यपाल, कोर्ट अशी मारामारी होईल. त्यात सुप्रीम कोर्ट येईल, हाय कोर्ट येईल.काहीही होईल.

त्यामुळं सरकार स्थापन झालंय खरं पण ते किती काळ टिकेल वगैरे प्रश्न या क्षणी अनुत्तरीत आहेत. या क्षणी पक्की घडलेली गोष्ट अशी की विरोधी पक्षांचं सरकार कोसळलं आहे.

फुटीर आमदार सुरतेत गेले. तिथून आसामात गेले. तिथून पुन्हा गोव्यात गेले आणि नंतर मुंबईत परतले. प्रवास चार्टर्ड विमानानं. सुरत, गुवाहाटीत, स्टार हॉटेलात मुक्काम. विमान राखीव करणं, हॉटेलातली बिलं वगैरे गोष्टी कोण करत होते? कोण फोन करत होतं? कोण हजर राहून हा उद्योग करत होतं? सुरत आणि गुवाहाटीत भाजपची सरकारं. सरकारी पोलिस तिथं तैनात होते. ते कोणाच्या आदेशावरून तैनात झाले. बिलं कोणी भरली. या प्रश्नाला उत्तर देण्याची इच्छा, कुवत आणि इतिहास भारतीय पत्रकारीला नसल्यानं हे प्रश्न अनुत्तरीत रहातात. हे जर अमेरिका, इंग्लंड असतं तर मिनिटा मिनिटाचा तपशील प्रसिद्ध झाला असता.

भाजपनं पत्रक काढून हात झटकले. आपला याच्याशी संबंध नाही असं भाजपनं सांगितलं.

बरं हे आमदार महाराष्ट्रातले. प्रत्येक आमदाराला महाराष्ट्रात सुरक्षा असते, त्यांच्या भोवती पोलिस असतात. आमदार हा उद्योग करत आहेत याची कल्पना महाराष्ट्राच्या पोलिस आणि इंटेलिजन्सला नव्हती? न्यू यॉर्क टाईम्स किंवा वॉशिंग्टन पोस्ट असतं तर मुंबईतल्या पोलिस विभागातली सर्व टेलेफोन संभाषणं त्यानी छापली असती.

भारतातल्या माध्यमांबद्दल न बोलणं बरं. हे खरं म्हणजे पत्रकार नसतातच. कौशल्य, व्यावसायिकता आणि नीतीमत्ता, कोणत्याही कसोटीवर हे लोक पत्रकार नसतात. ते सत्तेच्या बाजूनं असतात. काल काँग्रेसबरोबर होते. आज भाजपबरोबर आहेत. उद्या आणखी कोणाबरोबर तरी असतील.

 त्यातही गंमती. सुरवातीला कल्पना अशी होती की देवेंद्र फडणवीस सरकार करतील आणि त्यात एकनाथ शिंदे असतील. पण झालं भलतंच. अचानक शिंदे मुख्यमंत्री झाले. फडणवीस म्हणाले की ते सरकारात जाणार नाहीत. मग भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ट्विटरवरून म्हणाले की फडणवीस यानी उपमुख्यमंत्री व्हावं. त्यांचा ट्वीट आला आणि पाठोपाठ अमीत शहानीही फडणविसाना सुचवलं की त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं. पडक्या चेहऱ्यानं फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. एक मुख्यमंत्री आपल्याच एका कनिष्ठ मंत्र्याच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री होतो.

भाजप या राजकीय पक्षातले दोन मंत्री आणि एक मोठ्टा पदाधिकारी ट्विटरवरून एकमेकाशी बोलतात. ही कल्पना मात्र छान म्हणायला हवी.इथून पुढं बैठका वगैरे भरवण्याची आवश्यकताच नाही. ट्विटर, फेसबुकवरूनच त्यांनी निर्णय घ्यावेत आणि जाहीर करावेत. किती बरं पैसा वाचेल. शिवाय ते हज्जारो पोलिस आणि बुलेट प्रुफ गाड्या आणि विमानं. किती तरी पैसा वाचेल, तेवढ्या पैशात किती तरी गोष्टी होतील. 

असो.

यात काय घडतंय पहा.

भाजप हा एकेकाळी केडर पक्ष मानला जात असे. म्हणजे संघाच्या शिस्तीत वाढलेले कार्यकर्ते हा पक्ष चालवत असत. भाजपवाले, म्हणजे पूर्वीचे जनसंघवाले, इतर पक्षांना हसत असत. काँग्रेस इत्यादी पक्ष बाजारबुणग्यांचा पक्ष आहे असं म्हणत असत. आणि आता महाराष्ट्रातच पहा. खुद्द भाजपच्या विधीमंडळ पक्षात बहुसंख्य माणसं इतर पक्षातून आलेली आहेत, काँग्रेस आणि शिवसेनेतून आली आहेत.

विखे पाटील, पद्मसिंग पाटील, पाचपुते, गाबीत, कृपाशंकर सिंह, नारायण राणे आणि त्यांचे दोन पुत्र, नाईक. या सर्व मंडळींची चरित्र न्याहाळून पहा. प्रत्येक जण भ्रष्टाचारात लडबडलेला आहे. गंमत म्हणजे या मंडळींवर भाजपवाले सतत आरोप करत असत.

ही मंडळी भाजप, संघ यांच्या शिस्तीतून वगैरे वाढलेली नाहीत. खरं म्हणजे त्यांच्या राजकीय जीवनात ही माणसं भाजप विरोधीच होती. यांचा हिंदुत्वाशी संबंध नाही. म्हणजे ते जन्मानं हिंदू आहेत पण राजकीय हिंदुत्वाशी त्यांचा संबंध नाही. गोळवलकर  कोण होते, आणि हेडगेवार कोण होते असा प्रश्न विचारला तर त्यातले काही लोकं डोकं खाजवतील, काही लोकं त्यांची मिठाईची दुकानं होती बहुदा असंही सांगतील.

प्रत्येकाचे हात दगडाखाली अडकले असल्यानं, ईडीचा दणका बसल्यानं किंवा आपली आर्थिक साम्राज्यं कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी ही मंडळी भाजपत सामिल झालेली आहेत. यात आता शिंदे आणि त्यांच्या तीस पस्तीस माणसांची भर पडेल.ही माणसं एकादे वेळेस भाजपत नसतील पण त्यांच्या सरकारात भाजप सामिल झाला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे.

ही सर्व आयात माणसं भाजपाच्या निर्णय प्रक्रियेत  नसतात. भाजपचे निर्णय भागवत, मोदी, शहा अशांचं एक कोंडाळं घेत असतं. या कोंडाळ्यात कोणीही माणूस सामान्य नसतो, सर्व चाणक्य असतात. निर्णय होतात तेव्हां आयातांना कोणी हिंग लावून विचारत नाहीत. या आयात मंडळींना ” पाणी घाला, लोंबतय काय म्हणून विचारू नका” अशी समज दिलेली असते. तुमचे अपराध पोटात घातलेत ना? तुमची पैशापाण्याची सोय करून दिलीय ना? तुमची खाजगी साम्राज्य जशी होती तशी चालवायची परवानगी दिलीय ना? बस. विधानसभेत हात वर करा. बस.

  इलाज नसल्यानं हे सर्व मान्य करून ते दावणीत सुखात असतात.

आता राष्ट्रपतीपदाची निवडणुक आहे. राष्ट्रपतीपद हे एक मानाचं पद आहे. अगदी मानाचं. त्यांना काम नसतं पण तरीही त्यांच्याकडं आदरानं पाहिलं जावं अशी अपेक्षा असते. तिथं आजचा भाजप कोणाला निवडतं? कोविंद, आता मुरमू. कणकेचे गोळे. कसाही आकार दिला, कसंही धोपटलं थोपटल तरी कणकेचा गोळा हूं का चूं करत नसतो.  

माणसं गोळा करण्यासाठी अर्थातच पैसा, पदं यांचा वापर होतो आणि दबावासाठी ईडी आणि फायलींचा. हे असतं मालधार लोकांसाठी. चिल्लर माणसं कमी किमतीवर मिळतात. उदा. रामदास आठवले वगैरे. या माणसांची बाजारातली किमत अगदीच छोटी असते. चिल्लर उधळली की ही माणसं बांधिल रहातात. श्रीमंतांच्या लग्नाच्या मिरवणुकीत नाणी उधळायची पद्धत असते. ती गोळा करणारी मुलं माणसं मिरवणुकीच्या आसपास असतात, त्यांचा आणि नवरा नवरीशी काहीही संबंध नसतो.

तर असा हा पक्ष. एके काळचा केडर पक्ष, पार्टी विथ डिफरन्स.

जनता पार्टीत जाईपर्यंत जनसंघ ठीक असावा. जनता पार्टी आणि सरकार स्थापन झाल्यानंतर जनता पार्टीतल्या ताज्या दमाच्या नेत्यानी एक नवं वळण घेतलं. काँग्रेसला हरवायचं असेल तर काँग्रेसच्याच वाटेनं गेलं पाहिजे, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी माणसं जवळ केली पाहिजेत अशी रणनीती नव्या दमाच्या नेत्यांनी आखली. दोन प्रातिनिधीक नावं घेता येतील. लालू यादव आणि प्रमोद महाजन. परिणाम असा की दोघंही आपापल्या पक्षात गेले आणि त्यांनी आपापल्या पक्षांचं चरित्रच पालटलं.

प्रमोद महाजन यानी भाजपला सवयी लावल्या आणि मोदीशहांनी त्या सवयींचा परमोच्च बिंदू साधला.

परिणाम महाराष्ट्रातलं ताजं सरकार. महाराष्ट्रात विरोधी सरकार असता कामा नये आणि काहीही करून भाजपचं सरकार पुन्हा आलं पाहिजे या एकाच उद्देशानं केलेली खटपट. ती खटपट यशस्वी झालीय.

पक्ष, निवडणुक हे तंत्र भाजपला इतकं छान जमलंय याचे पुरावे देशभर असलेली भाजपची सरकारं हे आहेत. आता एक नवा पुरावा, महाराष्ट्र.

तर असं हे आहे.

।।

Comments are closed.