चीनचा साम्राज्यवाद?

चीनचा साम्राज्यवाद?

What Is China? Territory, Ethnicity, Culture and History

Zhaoguang.

Harvard.

।।

  चीन साऱ्या जगाची बाजारपेठ काबीज करायला निघालाय. पाकिस्तान, अफगाणिस्तान, लंका, म्यानमार इत्यादी आपल्या शेजारच्या देशात चीननं खूप गुंतवणूक केली आहे. आफ्रिका आणि द. अमेरिकेतही अनेक देशात चीननं उद्योग आणि इन्फ्रा स्ट्रक्चरमधे गुंतवणूक केलीय. चीन जगभरच्या देशात माल विकतंय आणि जगभरच्या देशांतून बराच कच्चा मालही विकत घेतंय. आर्थिक बाबतीत चीननं आता अमेरिकेशी स्पर्धा सुरु केलीय, अमेरिका चीन यांच्यात आता आर्थिक लढाईच सुरु झालीय.

चीनची ही खटपट म्हणजे साम्राज्यवाद आहे काय? आधुनिक युगात पश्चिमी समाजरचनेनं (सिविलायझेशननं)  जगावर राज्य केलं, आता चिनी सिविलायझेशन  जगावर राज्य करणार काय असा विषय चर्चिला जातोय. १९९०च्या दशकात हंटिंग्टन यानी भाकित केलं होतं की इस्लाम आणि चिनी समाजरचना (सिविलायझेशन) एकत्र होऊन पश्चिमी समाजरचनेविरोधात युद्ध पुकारतील, त्याची आठवण कोणाकोणाला होतेय.

खुद्द चीनमधे चीनीत्वाची चर्चा उफाळून आलीय. चिनी संस्कृती म्हणजे काय, संस्कृतीच्या हिशोबात चीन इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे की नाही याची चर्चा चीनमधल्या विश्वशाळातले इतिहासाचे अभ्यासक करतायत. चीनची प्रतिमा एक आक्रमक देश, आक्रमक संस्कृती अशा रीतीनं रंगवली जातेय.

 चीनचं वर्णन कसं करायचं? या प्रश्नाचं उत्तर प्रा. गे चाओग्वांग (Zhaoguang) यांनी प्रस्तुत पुस्तकात दिली आहेत. लेखक शांघायमधील फुदान विश्वशाळेत इतिहासाचे प्राध्यापक आहेत.

इसवीपूर्व दोन हजार ते विसाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत  सुमारे चार हजार वर्षाच्या काळात चीनमधे सुमारे १३ घराण्यांनी राज्य केलं. प्रत्येक घराणं आपल्या राज्याचा विस्तार करत असे, कधी त्यात नव्या प्रदेशाची भर पडत असे तर कधी त्यातून एकादा प्रदेश वजा होत असे. किंग साम्राज्यात तयार झालेला चीन स्थिर झाला आणि तो आजचा चीन आहे. चाओग्वांग यांच्या मते उत्तरेला पीत नदी आणि दक्षिणेला यांगत्से नदी या दोहोंच्या मधला प्रदेश हा चीनचा गाभा आहे आणि तो इसवी पूर्व तिसऱ्या ते इसवी सहाव्या शतकात हॅन घराण्याच्या राज्यात आकाराला आला. सामान्यतः त्या गाभ्यात तयार झालेली संस्कृती, समाजरचना ही चिनी समाजरचना मानता येईल.

इसवी पहिल्या शतकाच्या आसपास बुद्ध भिक्षू चीनमधे पोचले. तो पर्यंत म्हणजे सुमारे दीडेक हजार वर्षं चीनमधे कन्फ्युयसचं तत्वज्ञान समाजानं स्वीकारलं होतं. ते तत्वज्ञान म्हणजे धर्म नाही, तो एक तत्वविचार होता, जीवन कसं जगायचं ते सांगणारा विचार होता. त्या वेळी चीन हे जगाचं केंद्र मानलं जात असे, सभोवतालचा प्रदेश म्हणजे जंगली, असंस्कृत समाज असं मानलं जात असे. बुद्धांनी मेरू पर्वत केंद्रस्थानी असलेली जगाची कल्पना चीनमधे आणली. चिनी लोकांना तो धक्का होता. आपल्या पलीकडं जग आहे हे चीनला प्रथम कळलं. बुद्धानं एक वेगळाच विचार चिनी समाजासमोर ठेवला. चीननं तो विचार त्यात बदल करून स्वीकारला.

१५८४ मधे एक इटालियन  जेझ्विट प्रचारक चीनमधे पोचला. त्याच्याकडला जगाचा नकाशा युरोपकेंद्री होता. ईश्वरानं पृथ्वी (म्हणजे युरोप) खास माणसासाठी निर्माण केला, त्यात युरोपचा प्रदेश सोडला तर आसपासचे प्रदेश जंगली आहेत (बार्बेरियन, पेगन) अशी जगाबद्दलची कल्पना त्या नकाशात होती.

आली भानगड. म्हणजे जगात आणखीही काही प्रदेश आहेत हे चीनला कळलं. चीननं ते स्वीकारलं. 

 चीननं ठरवलं ऐहिकता कन्फ्युशियसचा विचारानं चालवायची, मन आणि हृदय बुद्धाच्या विचारानं चालवायचं आणि शरीर ताओच्या विचारानुसार घडवायचं असं तीन विचारांचं मिश्रण चीननं तयार केलं.

आपण एकमेव इथून सुरवात करून आपण विशाल जगाचा एक भाग ही कल्पना चीननं स्वीकारली आणि जगातले नाना तत्वविचार एकत्र करून एक संकरीत विचार आणि जगाबद्दलची दृष्टी चीननं स्वीकारली.

चाओग्वांग म्हणतात की मांचुरियन, मंगोल, तिबेटी इत्यादी संस्कृती आणि भाषाही चीननं स्वीकारल्या. चिनी भाषेची लिपी चिनी पण त्यातले विचार आणि संस्कृती मात्र नाना प्रकारच्या अशा रीतीनं चीनची संस्कृती तयार झाली.

युरोपीय देशांनी, पश्चिमी समाजरचनेनं, जगभरात आक्रमणं केली, तिथले समाज ताब्यात घेतले, तिथं वसाहती केल्या. दीर्घकाळ त्या वसाहतीत राहून तिथं आपली समाजरचना रोवण्याचा प्रयत्न केला. यथावकाश बदलत्या काळात नेशन स्टेट तयार झाली, युरोपीय साम्राज्य कोसळली. जे ख्रिस्ती युरोपीय लोकांनी केलं तेच इस्लामी राज्यांनी केलं. काही इस्लामी राजांनी त्यांचा इस्लाम जिंकून घेतलेल्या लोकांवर लादला. ऑटोमन राजे मुसलमान असले तरी त्यांच्या राज्यात मात्र इस्लामेतर संस्कृती शिल्लक होत्या.

चीन आणि भारत या दोनच ठिकाणच्या राजांनी इतर प्रदेश जिंकणं, तिथं आपली संस्कृती नेणं असे प्रकार केले नाहीत. चीन आणि भारत हे प्रदेश लहान मोठे  होत होत स्थिर झाले आणि दोन्ही ठिकाणच्या राजांनी जगाबद्दलची कल्पना आणि इतर संस्कृती यांना सामावून घेतलं.

चाओग्वांग यांनी प्रस्तुत छोट्याशा पुस्तकात चीनचा इतिहास वाचनीय रीतीनं मांडला आहे. चीनमधले आणि जगातले इतिहासकार काय म्हणतात त्याचा अकॅडमिक विचारही लेखकानं विचारात घेतला असला तरी पुस्तकाला अकॅडमिक कंटाळवाणं रूप आलेलं नाही.

चाओग्वांग यांच्या मांडणीचा एक अर्थ असा निघतो की चिनी माणसं आक्रमक नाहीत, युद्धखोर नाहीत.

विद्यमान परिस्थितीतलं चिनी राज्यकर्त्यांचं वागणं कसं आहे पहा. दक्षिण चिनी समुद्रावर आपला हक्क  आहे असं चीन म्हणतंय आणि आंतरराष्ट्रीय करार आपल्याला मान्य नाहीत असं म्हणतय. भारताचा बराचसा भूभाग आपलाच आहे असं ते त्यांच्याजवळ असलेल्या कागदपत्रांच्या आधारे म्हणतात, भारत किंवा इतर देशांचे कागदपत्र काय म्हणतात याला ते किमत देत नाहीत. तिबेटी संस्कृती, धर्म, भाषा,वहिवाटी इत्यादी गोष्टी वेगळ्या आहेत, तो एक स्वतंत्र देशच आहे हे चीनला मान्य नाही. तिबेटबाबतचे ऐतिहासिक कागदपत्रं नाकारून चीन तिबेट गिळत आहे. येवढंच नव्हे तर तिबेटी संस्कृतीही ससेहोलपट केली जातेय. उईगूर लोकांचा धर्म, संस्कृती आणि भाषा चिनी नाहीत, ते सर्व घटक वेगेळे आहेत. चीन त्यांना चिरडून हॅन संस्कृती स्वीकारायला लावत आहे, न स्वीकारला तर तुरुंगवास आणि छळवाद स्वीकारायला लावत आहे. तीच गोष्ट हाँगकाँगबाबत. हाँगकाँगमधली जनता पाच सात पिढ्या स्वतंत्रपणे वाढली आहे, ती समाजरचना वेगळी आहे. तिचा ढांचा पश्चिमी लोकशाहीचा ढाँचा आहे आणि तिथं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.  आताची व्यवस्था कम्युनिष्ट आहे, समाजरचनेच्या हिशोबात लोकशाही समाजरचना नाही. त्यामुळं विसाव्या शतकातला चीन हा आधीच्या शतकातला नाही.

आता आक्रमण करून एकादा देश ताब्यात घेण्याचे दिवस गेले. पैसे गुंतवून देश अंकित करणं ही पद्धत जुन्या साम्राज्यवादापेक्षा वेगळी आहे.अमेरिकेनं त्या रीतीनं साम्राज्यवाद पसरवण्याचा प्रयत्न केला होता, तीच पद्धत चिनी राज्यकर्ते आता वापरताना दिसतात. तिबेट आणि तैवान हे प्रदेश म्हणूनही चीनच्या मुख्य भूमीपासून तुटलेले आहेत, तरीही त्यांना सामील करण्याचा चीनचा प्रयत्न जुन्या  साम्राज्यशाहीचीच एक पुसट आवृत्ती आहे.

Comments are closed.