जफर पनाही या इराणी दिक्दर्शकानं तुरुंगात राहून केलेला चित्रपट

जफर पनाही या इराणी दिक्दर्शकानं तुरुंगात राहून केलेला चित्रपट

इराणचे दिक्दर्शक जफर पनाही यांचा नो बेअर्स हा चित्रपट नुकताच न्यू यॉर्क चित्रपट महोत्सवात दिसला, गाजला. चित्रपटाचं कौतुक झालं.

चित्रपटाची गोष्ट, चित्रपटाची रचना आणि चित्रपट प्रदर्शित होणं या तीनही गोष्टी नाट्यमय आणि थरारक आहेत.

चित्रपटात दोन इराणी जोडपी आहेत. एक जोडपं आहे इराणच्या हद्दीपासून काही अंतरावर तुर्कीमधे. जोडप्यातल्या तरूणानं आपल्या प्रेयसीसाठी  एक बनावट पासपोर्ट आणि व्हिसा मिळवलाय. तो प्रेयसीला सांगतोय की तिनं पॅरिसला जावं, यथावकाश त्याला व्हिसा मिळेल तेव्हां तो पॅरिसला जाईल. तिला ते मंजूर नाहीये. ती जायला तयार नाहीये, एकदमच जायला हवं असं तिला वाटतंय.त्या दोघांमधे बोलणी चालत असतात. 

या जोडप्याशी काहीही संबंध नसलेलं दुसरं जोडपं इराणमधे आहे. त्यातल्या मुलीचं लग्न एका म्हाताऱ्याशी लावून दिलं जातंय, तिला अर्थातच ते मंजूर नाहीये.कारण तिचं एका तरुणाशी प्रेम आहे, त्याच्याशी तिला लग्न करायचंय.

चित्रपट आलटून पालटून तुर्कीत आणि इराणात फिरतो.

दोन गोष्टी एकत्र कां येतात?

तिथंच गोची आहे.

चित्रपट दिक्दर्शक पनाही इराणमधे, तेहरानमधे, आहेत. घरतुरुंगात. त्यांना घराबाहेर जायला परवानगी नाहीये. त्यांनी एका सिनेछायाकाराला कॅमेरा घेऊन तुर्कीत, इराणी गावात पाठवलंय. पनाही त्या सिनेछायाकाराला इथे जा, तिथं जा, यांच्याशी बोल, त्यांच्याशी बोल असं सांगतात. दुरून. थोडक्यात असं की ते सिनेछायाकाराला पाकटवत आहेत.

 तुर्कीत घटना चित्रीत होत  असताना मधेच भाकड काळ असतो. पनाही छायाकाराला सांगतात की त्यान फावल्या वेळात इराणमधल्या गावात जावं, तिथं चाललेल्या घटना चित्रीत कराव्यात. तिथं एका तरुणीचं लग्न होऊ घातलेलं असतं.

छायाचित्रकार आणि पनाही दोघं मिळून चित्रपट घडवत असतात. त्यात मधेच भानगडी उपटतात. गावात बातमी फुटते की तरुणीचं दुसऱ्या तरुणावर प्रेम आहे. छायाकाराकडं त्या तरूण जोडप्याचं प्रणयाराधन करत असताना काढलेलं चित्र असतं अशी बातमी पसरते. गावकरी ते चित्र मागतात.झालं. गावात तणाव. त्यात या छायाकारावर तोहमत येते. 

तुर्की, इराण असा छायाकार फिरतो. मधेच त्याला रेंज मिळत नाही. त्यामुळं पनाही आणि छायाचित्रकार यांच्यातल्या संवादात व्यत्यय येतो. ती अडचण दोघं दूर करतात, तेही आपल्याला दिसतं.

चित्रपटाला पटकथा आहे काय? असली तरी नसल्यासारखी वाटते. कारण चित्रीकरणात अडचणी येत असतात, नव्यानंच काही  तरी घडत असतं आणि ते चित्रपटात येत असतं.म्हणजे पटकथा आहेही आणि नाहीही. घोळ.

चित्रपटातले प्रियकर प्रेयसी खरे की खोटे? ते नटनट्या आहेत की खरोखरची वास्तवातली माणसं आहेत? धडपणानं कळत नाही.

गंमत म्हणजे एकीकडं कथा सरकत असते आणि समांतर पातळीवर आपल्याला कॅमेरा दिसतो, छायाकार दिसतो, छायाकार आणि दिक्दर्शक पनाही दिसतात, पनाही त्यांचा तेहरानमधल्या घरात असतात, छायाकार इराण आणि तुर्कीत असतो. म्हणजे आपण कथा पहात असतो आणि ती कथा कोणीतरी कृत्रीम रीतीनं रचून चित्रीत केलीय हेही पहात असतो.

अजबच प्रकार. यासाठीच तर पनाही प्रसिद्ध आहेत.

पनाही लोकेशनवर जाऊन चित्रीकरण कां करत नाहीत?

कारण पनाही स्वतःच्या घरात तुरुंगवासात असतात. इराणच्या सरकारचा पनाहींवर खुन्नस आहे. इराणमधलं सामाजिक वास्तव पनाही दाखवतात, इराणच्या स्त्रियांना कोणत्या दिव्यातून जावं लागतं ते पनाही दाखवतात, या बद्दल इराणी सरकारचा पनाहीवर राग आहे. सरकारनं त्यांना घरातच तयार केलेल्या तुरुंगात ठेवलंय. त्याना घराबाहेर जाता येत नाही. त्याना २०३० सालापर्यंत चित्रपट करण्यावरही बंदी आहे.

पनाहींनी आयडिया काढली. छायाचित्रकाराला कॅमेरा घेऊन तुर्कीत आणि इराणच्या हद्दीतल्या गावाला पाठवलं. छायाकाराला पनाही फोनवरून सूचना करतात, त्यानुसार त्यानं चित्रीकरण केलं. ते चित्रीकरण त्यानं इंटरनेटवरून पनाहीना तेहरानमधे पाठवलं. ते चित्रीकरण पाहून पुढल्या चित्रीकरणाच्या सूचना पनाहीनी दिल्या. असं करत करत चित्रीकरण झालं आणि नंतर पनाहीनी घरातच संकलन करून चित्रपट तयार केला. नंतर हा चित्रपट फ्लॅश ड्राईववर टाकून जर्मनी आणि अमेरिकेत स्मगल केला.

तुर्कीमधे गेलेल्या इराणी तरुणीला देश सोडायचाय कारण तिला इराणमधे रहाणं अशक्य आहे. कायम चादर पांघरून रहायचं. एकट्यानं घराबाहेर हिंडायचं नाही. सिगरेट ओढायची नाही. कोणाही परपुरुषाबरोबर दिसली की तुरुंगात रवाना. घरचे सांगतील त्याच्याशीच लग्न आणि त्याच्याबरोबरच रहायचं. प्रेम वगैरेला परवानगी नाही. इत्यादी इत्यादी. गोष्टीतल्या दुसऱ्या तरुणीचीही तीच पंचाईत. प्रियकराशी लग्न करता येत नाही. प्रियकराला भेटली तरी पोलीस पकडणार आणि तुरुंगात घालणार.

स्त्रीची ही घुसमट नाटक, सिनेमात दाखवणार कशी? 

चित्रपट करायचा म्हटला तर स्टुडियो हवा, नटनट्या हव्यात, लोकेशनवर चित्रीकरण करायला हवं. इराणमधे ते शक्यच नाही. पटकथा सरकारला दाखवावी लागते. स्टुडियोत काही करायला घेतलंत तरी तिथं पोलीस असतात. कडक पहारा.

पनाहीनी एक स्वतंत्र शैलीच तयार केली. स्त्रियांवरचे अत्याचार वगैरे चित्रीकरण शक्य नसतं; पनाहींच्या चित्रपटात त्या घटना लोकांच्या बोलण्यात येतात, संवादात येतात. पनाही सगळं चित्रीकरण रस्त्यांवर, उघड्यावर करतात. लोकेशनवर चित्रीकरण करायचं म्हटल्यावर गर्दीवर नियंत्रण ठेवावं लागतं. फ्रेममधे फक्त पटकथेत असणारीच माणसं दिसायला हवीत,  बाकीच्या माणसांना दूर ठेवणं हे फार कष्टाचं आणि खर्चाचं काम असतं. इराणमधे ते शक्यच नाही कारण पोलिस हजर असतात.मुख्य म्हणजे चित्रीकरणालाच पोलिसांची परवानगी नसते. त्यामुळं बहुतेक चित्रीकरण चोरून करावं लागतं.

पनाही रस्त्यावर चित्रीकरण करतात. गाड्या मधे मधे येतात, माणसं बिनधास्त मधे येत असतात. पनाही त्यांना अडवत नाहीत. त्यांच्या चित्रपटात अनेक वेळा एकादी बस येते आणि ती कॅमेरा झाकून टाकते. पनाही तो भाग कापून टाकत नाहीत. रस्त्यावरचं वास्तव जसं दिसतं तसं, जसं ऐकू येतं तसं चित्रपटात येतं. गोंगाट, आसपासच्या टिव्हीवरचे आवाज, लोकांची भांडणं, दुकान असेल तर दुकानातल्या इतर लोकांचे संवाद. सारं सारं येतं. पनाही पार्श्वसंगीत  वापरत नाहीत. बाजारात, रस्त्यावर एकादा भिकारी किवा कोणी तरी गाणं म्हणत जातो तेवढंच गाणं चित्रपटात दिसतं.

छायाचित्रकार, त्याला मदत करणारा सहाय्यक, दिक्दर्शक पनाही आणि त्याना मदत करणारा सहाय्यक, बस येवढीच टीम.

चणेफुटाण्यावर जेवढा खर्च होईल तेवढ्यावर पनाहींचा चित्रपट तयार होतो.

त्याला पनाहीचा इलाजही नाही. हे इराण आहे आणि तिथली स्थिती अशी आहे. 

संवा. माणसं गोष्ट सांगतात, यातून पनाही चित्र उभं करतात.

प्रत्यक्ष हिंसा न दाखवता हिंसेचे उल्लेख माणसं करतात यामुळंच कदाचित हिंसा अधिक प्रत्ययकारी होत असावी. ना मुल्लांवर टीका, ना सरकारवर टीका, ना क्रांतीची हाक, ना आक्रोश. दिक्दर्शक काहीही बोलत नाही. तरीही आपल्याला सारं कळत रहातं.

१९९५ साली या पनाहीनी   व्हाईट बलून हा चित्रपट करून आपल्या फीचर फिल्म कारकीर्दीला सुरवात केली.  टॅक्सी (२०१५) आणि थ्री फेसेस (२०१८) हे त्याचे चित्रपट गाजले. गेल्याच वर्षी त्यांनी धिस ईज नो फिल्म अशा शीर्षकाची फिल्म केली होती. त्या चित्रपटाची गंमत अशी – आपल्या डोक्यात एक चित्रपटाचं कथानक आहे, प्राप्त परिस्थितीत चित्रपट करणं शक्य नाहीये तरीही आपण तो चित्रपट कसा करणार आहोत ते एका मित्राला सांगतात आणि घरातल्या घरात एकपात्री अभिनय करत ते गोष्ट सांगतात. गोष्ट सांगत असताना त्यांनी पाळलेली घोरपड त्यांच्या अंगावर रेंगाळत असते तेही आपण पहातो. इराणमधली घुसमट आपल्याला पछाडते.

 चित्रपट निर्मितीमधे गुंतलेलं अत्याधुनिक आणि कायच्याकाय प्रभावी तंत्रज्ञान, तंत्र, यंत्रं, उपकरणं पनाही वापरत नाहीत. त्यामुळं चित्रपट अगदीच कच्चा रहातो. पण प्राप्त परिस्थितितून वाट काढताना त्यांनी काढलेली कल्पक वाट त्यांना चांगल्या दिक्दर्शकांच्या रांगेत नेऊन बसवते. चित्रपट ग्रेट नसले तरी प्रेक्षकाला खिळवून ठेवतात.

।।

Comments are closed.