झटपट व्हिस्की

झटपट व्हिस्की

झटपट व्हिस्की

आता झटपट व्हिस्क्या बाजारात येत आहेत.

काही तासात व्हिस्की तयार होईल आणि बाटलीबंद होऊन ग्लासांपर्यंत पोचेल.

साधारण व्हिस्की तयार व्हायला तीन वर्षं लागतात. जातीवंत व्हिस्की पंधरा ते सत्तर वर्षात तयार होते. ओक वृक्षाच्या लाकडापासून तयार केलेल्या पिंपात व्हिस्की साठवली जाते. लाकूड आणि व्हिस्की यांच्यात वेगवेगळ्या तापमानात रासायनीक घटकांची देवाण घेवाण होते. व्हिस्की लाकडात जाते, लाकूड व्हिस्कीत जातं. फार सावकाशीनं ही प्रक्रिया पार पडते.अनेक उन्हाळे आणि हिवाळे ही व्हिस्की पहाते. व्हिस्की फर्मेंट करण्यासाठी जे पाणी वापरलं जातं त्या पाण्यालाही एक चव असते. 

म्हणूनच  व्हिस्कीला एक खुमारी येते. म्हणूनच दर्दी पिणारे १०० वर्षं जुन्या व्हिस्कीला लाखलाख रुपये  मोजायला तयार होतात.

व्हिस्की तयार होण्यासाठी लागणारा वेळ आता तंत्रज्ञांनी काही तासांवर आणलाय. व्हिस्कीचे सर्व गुणधर्म या झटपट व्हिस्कीत असतील असं तंत्रज्ञ म्हणतायत.

ते कसं काय?

व्हिस्कीची मजा असते ती लाकडाबरोबर झालेल्या घटकांच्या देवाणघेवाणीमुळं, तापमानात पडलेल्या फरकांमुळं. तंत्रज्ञ आता व्हिस्की एका मोठ्या भांड्यात साठवतात,त्यात ओक वृक्षाच्या लाकडाचे तुकडे टाकतात आणि नंतर विशिष्ट तापमानापर्यंत द्राव गरम करतात. त्या तपमानात जी रासायनिक प्रक्रिया पन्नास वगैरे वर्षात होते  ती केवळ काही तासात पार पडते. 

काही उत्पादक तापमानाबरोबर प्रकाशाचा वापर करतात.

वैज्ञानिक आता त्याही पुढची उडी मारण्याच्या बेतात आहेत. यीस्ट, अल्कोहोल, लाकूड, पाणी इत्यादी घटकांचं विश्लेषण करून त्यात कुठले कुठले मॉलिक्यूल, मूळ घटक आहेत ते वैज्ञानिक आता शोधत आहेत. ते सारे घटक प्रयोगशाळेत घडवून, सिंथेसाईझ करून, त्यांना एकत्र आणून, त्यांच्यात प्रक्रिया घडवून,  त्यातून व्हिस्की करण्याच्या बेतात हे वैज्ञानिक-तंत्रज्ञ आहेत. 

ही असेल डिजिटाईज्ड व्हिस्की.

जगात जगात दरवर्षी सुमारे २ अब्ज लीटर व्हिस्कीचा ६० अब्ज डॉलरचा व्यवहार होतो.त्यातली सुमारे २४ टक्के स्कॉच असते. स्कॉटलंड, आयर्लंड, अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका इत्यादी २५ देशात व्हिस्की तयार होते. भारतातही आता  परदेशी लोकांना आवडेलशी व्हिस्की तयार होते.

या व्हिस्कीच्या बाजारात आता झटपट व्हिस्की दाखल होेतेय.

।।

नव्या व्हिस्कीचा फायदा असा की तिला अनेकानेक चवी आणि गंध असतील. 

कोणासाठी हा उद्योग उत्पादक करताहेत?

खेळाडू, गायक, अभिनेते इत्यादींच्या नावांच्या ब्रँडच्या वस्तू तयार केल्या तर बाजारात त्या खपतात. सचीन तेंडुलकर व्हिस्की, लता मंगेशकर व्हिस्की, शहारुख खान व्हिस्की अशा व्हिस्क्या त्यांचे फॅन विकत घेत असतात. त्या खपवण्यासाठी तेंडुलकर, शहारुख खान इत्यादी माणसं खूप जाहिरात आणि इव्हेंटही करतात, त्यामुळं खप वाढतो. तेव्हां असे नाना ब्रँड तयार करण्यासाठी या झटपट व्हिस्क्या.

तंत्रज्ञ दररोज उठून नवनवी खुमारी आणू शकतात हे झटपट व्हिस्कीचं वैशिष्ट्यं.

अर्थात जुन्या स्कॉच, सिंगल माल्ट इत्यादी पिणारे दर्दी या चवचाल व्हिस्क्यांच्या नादी लागणार नाहीत. 

पण शेवटी पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना हे असतंच.

कोणी स्कॉच घ्या कोणी झटपट घ्या, हा ज्याचा त्याचा प्रश्ण असेल.

दोन तृणधान्यांचा संकर होऊन गहू हे धान्य तयार झालं. त्याला शेकडो वर्षं लागली. आता तंत्रज्ञ नवी वाणं काही दिवसांत तयार करतात. अशा वाणांपासून तयार झालेले टोमॅटो, कलिंगंड इत्यादी बाजारात केव्हांच दाखल झालीत.

 बकरा,कोंबडी यांच्या मांसाची पेशी प्रयोग शाळेत वेगळी काढतात आणि त्या पेशीचं सेल कल्चर करून अनेक पेशी तयार करतात. झालं मांस तयार. एकदा या पेशी सापडल्या की नंतर पुन्हा कोंबड्या आणि बकरे पाळणं वाढवणं हा व्याप नाही. एक किलो मांस हवं असेल तर त्यांना अनेक किलो वनस्पती खायला घालाव्या लागतात. त्या वाचतील. शिवाय तयार होणारं मांस मांसाहारी नसेल, शाकाहारी असेल. त्यामुळं जैन वगैरे लोकांनाही ते खायला हरकत नसेल. 

असं मांस आता बाजारात आलंय, लोक ते खातायत.खाणाऱ्यांना ते थेट बकरा, कोंबडीच्या मांसासारखंच लागतंय.

 तशी ही प्रयोगशाळेत तयार झालेली व्हिस्की.

 एका वेगळ्या क्षेत्रातलं उदाहरण.

संगीत. 

सात किंवा अधिक सुर आणि  अनेक ताल यांची गुंफण करून बंदीश, गाणं तयार केलं जातं, वाजवलं जातं, गायलं जातं.  ते गाणं म्हणजे एकादी लकेर असेल, चित्रट गीत असेल किंवा मैफलीतला खयाल असेल. ही रचना गायकाच्या गळ्यातून बाहेर पडते किंवा वाद्यमेळातून तयार होते. यात गळा, कलाकारांचे हात आणि त्याची प्रतिभा  हे घटक गुंतलेले असतात.

आता इंजिनियर गायक आणि वादक यांना  वगळून सूर-तालाच्या रचना यंत्रावर करतात. संगीत निर्मितीच्या या रीतीला साऊंड इंजिनियरिंग असं म्हणतात. 

सूर आणि तालाचा मुळ घटक ध्वनी, ध्वनी लहर, कंपन. कंपन घशातल्या स्नायूंचं असेल, तारेचं असेल, लाकडाचं असेल, चामड्याचं असेल.तंत्रज्ञांनी कंपन या मूळ घटकालाच हात घातला. कंपनं आणि त्याचे विविध प्रकार यंत्रात तयार केले. आणि ते जुळवून संगीत रचना तयार केल्या. आज घडीला गळ्यातला आवाज सोडता बाकीचे सारे ध्वनी यंत्रावर तयार होतात. अजून गळा तयार करणं जमलेलं नाही.

या घटनेला समांतर घटना म्हणजे सिनेमातलं चित्रणाचं तंत्रं. नट आणि नट्या अभिनय करतात आणि तो कॅमेऱ्यात टिपला जातो. आता माणसाचा चेहरा आणि शरीर पूर्णपणे डिजिटाईज करत आहेत. तुम्हाला हवा तसा चेहरा, त्याच्यावरचे हवे तसे हावभाव, त्वचेचा रंग आणि पोत सारं काही अगदी निसर्गाबरहुकूम करण्याकडं तंत्रज्ञ निघाले आहेत.

कल्पना अशी की इथून पुढं नट नट्या नकोतच, आभासी जगातल्या नटनट्या काम भागवतील. एक तर खूप व्हारायटी मिळेल आणि नटनट्यांची भरमसाठ मानधनं टळतील.

माणूस वैज्ञानिक प्रयोग करून  निसर्गाचा अभ्यास करतो आणि त्यात आढळलेल्या रचना तंत्रज्ञ प्रयोगशाळेत तयार करतात. निसर्गाचे नियम वापरून प्रती निसर्ग केला जातोय आणि त्याही पुढं जाऊन निसर्गात नसलेला निसर्ग माणूस तयार करतोय.

माणूस देव होण्याचा प्रयत्न करतोय असं या खटपटीचं वर्णन केलं जातं.

माणसाच्या या खटपटीला यश आल्यानंतरचं जग कसं असेल याची कल्पनाही करता येत नाहीये.

भस्मासूर शेवटी स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवून स्वतःचं भस्म करतो अशी एक प्राक्कथा आहे. तसं घडेल अशी भीती मनात डोकावते.

।।

Comments are closed.