झपाटलेली आणि निर्मनुष्य घरं

झपाटलेली आणि निर्मनुष्य घरं

अमेरिकेतली ओस आणि झपाटलेली घरं

घर विकणं ही एक कला आहे, ते एक कसब आहे.  

पहिल्या दुसऱ्या मजल्यावरचा फ्लॅट असतो. रस्त्यावरचा गजबजाट, कार आणि ट्रकचे आवाज त्रास देतात. 

एजंट सांगतो ‘अहो तुम्ही पटकन जिने उतरून जाऊ शकता. विसाव्या मजल्यावरच्या माणसाला समजा काही प्रॉब्लेम आले तर तो काय करेल? तुम्ही पटकन उतरून जाऊ शकता. मनात आलं की पटकन घराबाहेर पडू शकता….तुम्ही भाग्यवान आहात, तुमचे पाय जमिनीवर असतील. या फ्लॅटला फार मागणी आहे. बँकेकडून कर्ज मिळालं नाही म्हणून बहुतेक गिऱ्हाईकं हा फ्लॅट घेऊ शकली नाहीत…’

घराजवळून विमानं जातात. घरामागं रेलवेलाईन असते. घराच्या समोर शाळा असते, तिथं मुलांचा गोंगाट असतो. एजंट कधी कमी किमत, तर कधी आसपासच्या सोयी इत्यादी सांगून इच्छुकाला राजी करतो.

हे झालं सर्व साधारण घराचं.

घरात भुताटकी असेल तर? 

मॅनहॅटनमधे एक जुना विभाग आहे. एकेकाळी या विभागात स्मशानं होती. अजूनही खणलं तर जमिनीत प्रेताचे अवशेष सापडतात. इथल्या घरात जायला माणसं सहसा तयार होत नाहीत. नास्तिक, अगदीच अडलेले या घरांकडं वळतात.

एजंटला घराबाबत सगळं माहित असतं. इच्छुकापासून तो ती माहिती लपवून ठेवत नाही. आधीच सांगतो ‘भुताटकी आहे, पण पहायला काय हरकत आहे. तुमची ना नसेल तर भुताचा बंदोबस्त करता येईल.’

इच्छुक तयार होतो.

घर पाहून झाल्यावर एजंट व्यावसायिक मांत्रिकाला बोलावतो. अमेरिकेत हा मांत्रीक म्हणजे बहुतेक वेळा प्रीस्ट असतो. तो येताना बरोबर काही वनस्पती घेऊन येतो. घरात वनस्पती जाळून धुपारा करतो. त्याच्याकडं पवित्र पाणी असतं. प्रीस्ट ते घराच चारही दिशांना शिंपडतो. प्रार्थना म्हणतो. 

अनेक वेळा खपून जातं. त्या घरात माणूस सुखानं रहातो. कधी कधी भूत जात नाही. गृहस्थ एजंटाकडं तक्रार करतो.एजंट त्याला दुसरं घर देतो. भुताटकीवाल्या घराचं काय होतं? पुन्हा नवा माणूस येतो. इथलं भूत पळवलं होतं असं एजंट सांगतो. इच्छुक घर घेतो. त्याला त्रास झाला नाही तर प्रश्नच नाही. समजा त्रास झाला तर पुन्हा प्रीस्ट हजर.

एक तरूण मुलगी. एजंटनं दार उघडलं, दोघांनी प्रवेश केला. मुलगी घरात दोन पावलं चालली, मागं फिरली.

‘मला भुतांची सवय आहे. भुतं चांगली असतात, माझी त्यांच्याशी दोस्ती होते. पण इथं कुठली तरी दुष्ट शक्ती वास करतेय.’ तरूणी म्हणाली.

‘नो प्रॉब्लेम. आपण वॉल पेपर किंवा रंग बदलतात तसं घरातलं इंटेरियर बदलू. दुष्ट शक्ती निघून जाईल.’ एजंट.

एक माणूस एजंटानं आणला.   अमूक कुंडी खिडकीत ठेवा, तमूक मातीचं भांडं दरवाजाच्या  उजव्या हाताला ठेवा, तमूक फ्रेम बेसिनवर लावा, झोपतांना खिडकीकडं पाठ करून झोपा इत्यादी   उपाय वास्तूशास्त्रज्ञानं सुचवले. 

तरूणी रहायला आली.

   न्यू जर्सीमधला एक फ्लॅट. अगदी व्यवस्थित. चांगल्या वस्तीतला. विकला. एक जोडपं तिथं रहायला गेलं. काही आठवड्यानंतर ते जोडपं एजंटाकडं परत आलं.

‘आम्हाला इथं रहायचं नाहीये. दुसरा फ्लॅट द्या’ 

‘कां. काय झालं?’

‘अपरात्री घरात एक कुत्रं भुंकतं. त्याचा आवाज करूण असतो.’

एजंटनं समजावायचा प्रयत्न केला. एजंटला वाटलं जोडप्याला  गंड असेल, एकादी समस्या असेल, मनोविकार असेल. काही दिवस वाट पहा असं म्हणून एजंट गेला.

जोडप्याला कुत्र्याच्या करूण भुंकण्याचा आवाज येतच राहिला. जोडप्यानं एजंटाकडं तक्रार केली.

एजंटनं चौकशी केली.

त्या फ्लॅटमधे आधी एक वयस्क स्त्री रहात होती. काही दिवसांपूर्वी ती वारली; तिचा एक भूभू होतो, तोही वारला होता.

एजंटाला हे माहित नव्हतं. आसपास चौकशी केल्यानंतर त्याला हे समजलं. मृत स्त्री, तिचा मृत कुत्रा हे सारं आसपासच्या लोकाना माहीत होतं पण कुत्रं ओरडण्याचा अनुभव आसपासच्या लोकाना आला नव्हता. 

एजंटाला भुतं घालवण्याचा अनुभव होता पण कुत्र्याचं काय करायचं ते एजंटाला माहित नव्हतं. व्हेटर्नरी डॉक्टर असतो हे त्याला माहित होतं पण व्हेटर्नरी मांत्रीक त्याला माहीत नव्हता.

जोडपं घर सोडून गेलं. 

एका घराची गोष्ट.  घर नॉर्मल होतं. नॉर्मल पद्धतीनं एका जोडप्यानं घर विकत घेतलं.

एके दिवशी गृहस्थाचा एजंटाला फोन. त्याला घर सोडायचं होतं, नवं घर हवं होतं.

कां?

गृहस्थ म्हणाला की त्या घरात एक आत्मा भटकत असतो. तो आत्मा फोनवर कोणाशी तरी बोलायचा प्रयत्न करतो. फोन लावतो. घंटी वाजून पलिकडचा माणूस बोलू लागला की तो आत्मा फोन खाली ठेवतो.

एजंट चक्रावला. गृहस्थ त्या आत्म्याचं ग्राफीक वर्णन करत होता.

एजंट व्यावसायिक होता. त्यानं गृहस्थावर अविश्वास दाखवला नाही की त्याची टिंगल केली नाही. त्यानं एक मानसशास्त्र जाणणार माणूस आणला. 

 एक्सपर्ट घरात आला. गृहस्थांशी बराच काळ बोलला, गप्पा केल्या, त्यांचं म्हणणं आणि अनुभव त्यानं समजून घेतला.त्यानं धुपारा केला नाही. 

एक्सपर्ट थेट आत्म्याशीच बोलला. त्यानं आत्म्याला समजावलं. ‘हे बघ तू मेलायस. तू जिवंत नाहीयेस. तुला भास होतोय की तू जिवंत आहेस आणि जिवंत असल्यासारखा तू वागतोयस. असं करू नकोस. तुझ्यात काहीही प्रॉब्लेम नाहीये. तू एकदम नॉर्मल मेलेला माणूस आहे. ते समजून घे आणि तसं वाग.’

हे त्या गृहस्थाच्या उपस्थितीतच चाललं होतं. त्यानंतर घरमालकाला फोन केल्याचा आवाज ऐकायला आला नाही. आत्मा बहुदा शांत झाला असावा.  

आत्मा, भूत, पिशाच्च इत्यादी प्रॉब्लेम येत नाहीत अशी ठिकाणं म्हणजे जुनी चर्चेस.

अलीकडं मोडकळीला आलेली चर्चेस बाजारात आलीयत.

गावातल्या भाविक लोकांच्या संख्येवर चर्च चालत असतं. भाविक लोक प्रार्थनेला येतात, प्रीस्टकडं सल्ला मागायला येतात, पापांची कबूली द्यायला प्रीस्टकडं जातात. भाविकांची संख्या जास्त असली की स्वाभाविकपणे त्यांच्याकडून मिळणारी वर्गणीही मोठी असते, त्यावर  ते चर्च ठीकठाक चालू रहातं. लोकांकडून मिळणाऱ्या दानातून प्रीस्टांचं वेतन, चर्चच्या कर्मचाऱ्यांचं  वेतन, चर्च ठीकठाक ठेवण्याचा खर्च निघतो.

अलीकडं अमेरिकेत लहान गावापासून ते मध्यम आकाराच्या शहरापर्यंत चर्चेस ओस पडतायत. नास्तिक, अज्ञेयवादी यांची संख्या वाढतेय. माणसं काहीशी धार्मिक असतात, काहीशी आस्तिक असतात पण चर्चमधे जात नाहीत, त्यांना चर्चची गरज वाटत नाही. चर्चमधे जाणाऱ्यांची संख्या रोडावते, प्रीस्ट सोडून जातात, चर्चची वास्तू निर्मनुष्य होते, अडगळ होते.

छोट्या गावात रोजगार नसतो. माणसं रोजगारासाठी गाव सोडून जातात, गावात पुन्हा परतत नाहीत. गावातलं घर  टिकवून ठेवतात पण वर्षातून एकाद दोन वेळा गावात येतात. त्यामुळं चर्चमधे जाणाऱ्यांची संख्या रोडावते.

अशा वास्तूना आता मागणी येऊ लागलीय. अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातून माणसं पडीक चर्चच्या शोधात येतात. पडीकतेमुळं एक एकांत तयार झालेला असतो, लोकाना तो आकर्षून घेतो. 

लोक चर्च विकत घेतात. आपल्या सोयीसाठी इमारतीत सुधारणा करतात. इंग्रजीत एका चांगला शब्द आहे. रीपर्पजिंग.  चर्चची इमारत भव्य असते. लोक प्रार्थना हॉलमधे मजले, लॉफ्ट, मेझनीन करतात, तिथं  झोपायची खोली करतात. चर्चमधे बेंच असतात, प्यू असतं. लोक त्यांचा वापर करून डायनिंग टेबल आणि खुर्च्या करतात. वास्तूला जोडून प्रीस्टांच्या खोल्या असतात. एक खोली ऑफिस होते, एक खोली बेडरूम होते. वगैरे. चर्चला मोठं कंपाऊंड असतं. तिथं लोक पार्किंगची सोय करतात.

अमेरिकेत तरूण माणसं संघटित धर्मापासून दूर जात आहेत. चर्च, सिनॅगॉग, मशिदी इत्यादी ठिकाणी जाणाऱ्यांचं प्रमाण ७० टक्क्यावरून ४७ टक्क्यावर आलंय. दर चर्चमागे एकेकाळी हज्जारो भक्त असत, आता सरासरी उपस्थिती ६५ वर आलीय.

चला. लोकांना अधिक घरं मिळू लागली. घरांची समस्या कमी तीव्र होतेय आणि पडीक इमारती उपयोगात आणल्या जातायत.

बरं आहे की.

Comments are closed.