ट्रंप गमन. राष्ट्रपती बारमधे. त्रिभंग. १८० वर्षं जुनं पुस्तक दुकान.

ट्रंप गमन. राष्ट्रपती बारमधे. त्रिभंग. १८० वर्षं जुनं पुस्तक दुकान.

फेरफटका ४

।।

डोनल्ड ट्रंप चोरट्यासारखे व्हाईट हाऊस सोडून गेले. जाण्यापूर्वी त्यानी निवडून आलेले जो बायडन यांची भेट घेतली नाही, त्यांना शुभचिंतन केलं नाही.

व्हाईट हाऊस सोडायच्या आधी सामानाची बांधाबांध करत असताना ते गुन्हेगारांसाठी माफीपत्रं तयार करत होते. एकूण सुमारे १७५ लोकांना त्यांनी माफी दिली. बहुतेक सर्वांनी फ्रॉड, सार्वजनिक पैशाचा गैरवापर, कर चुकवणं,सत्तेचा गैरवापर करणं अशा स्वरूपाचे फौजदारी गुन्हे केले होते.

एक उदाहरण लक्षात ठेवण्यासारखं आहे. स्टीव बॅनन या ट्रंप यांच्या सहकाऱ्यावर मेक्सको भिंत बांधणं या व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या कामासाठी लोकांकडून गोळा केलेले पैसे बॅनन यांनी व्यक्तिगत उपयोगासाठी वापरले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून खटला अजून सुरु व्हायचा आहे.

  अजून खटलाही दाखल झाला नसतांना भविष्यात होणाऱ्या शिक्षेतून ट्रंप यांनी बॅनन यांना माफी दिलीय.

 विमानतळावर ट्रंपनी भाषण केलं.चार वर्षांची खोटं बोलण्याची परंपरा शेवटल्या क्षणीही त्यांनी सुरु ठेवली.आपण जगाचं आणि अमेरिकेचं कसं भलं केलं याबद्दल खोटे दावे त्यांनी केले आणि फ्रोरिडाकडं ते रवाना झाले.

फ्लोरिडा हे त्यांचं नवं घर आहे. जुनं घर कित्येक वर्षं न्यू यॉर्कमधे होतं. तिथं त्यांनी अनेक गुन्हे केलेत, तिथली कोर्टं त्यांची वाट पहात आहेत. त्यातून सुटका करण्यासाठी त्यांना आपलं अधिकृत रहाण्याचं ठिकाणही फ्लोरिडात बदलून घेतलं.

भ्रष्ट आणि राष्ट्रविरोधी उद्योगांबद्दल त्यांची इंपीचमेंट होणार आहे. दुसऱ्यांदा.

ट्रंप यांनी किती लफडी केलीत, किती कायदे मोडलेत, किती लोकांना टोप्या घातल्यात आणि किती पैसे बुडवलेत याची तर गणतीच नाही. ते सर्व आता बाहेर येईल.

राष्ट्रपतीपदाच्या काळात ते गोल्फ खेळायला जात तेव्हां त्यांची व्यवस्था आणि सुरक्षा यावर लक्षावधी डॉलर खर्च होत.

ट्रंप यांना भेटायला जगभरातले मंत्री, उद्योगी, सरकारी अधिकारी जात असत. शिवाय अमेरिकन अधिकारीही कामासाठी त्यांना भेटत असत. त्यासाठी ते ट्रंप यांच्या मालकीच्या हॉटेलात उतरत. पैसे ट्रंप यांना मिळत.

ट्रंप एकदा आयर्लंडला गेले होते. सरकारी भेट. पण ते तिथंही त्यांच्याच मालकीच्या रिसॉर्टमधे उतरले. तिथला सगळा खर्च अमेरिकन सरकारनं केला, म्हणजे सगळे पैसे त्या रिसॉर्टला, ट्रंप यांच्या हॉटेलला मिळाले.

 आणि निवडणूक हरल्यावर त्यांनी आपल्या हज्जारो भक्तांना अमेरिकन संसदेवर शस्त्रं घेऊन हिंसक हल्ला करायला पाठवलं. 

या माणसाला अमेरिकन जनतेनं निवडून दिलं होतं. साडेसात कोटी मतदार त्यांचे भक्त होते.

जगभरचे लोक बुचकळ्यात पडले आहेत. अशी कशी ही लोकशाही? आम्ही ज्यांना पुढारलेले आणि आधुनिक म्हणतो ते अमेरिकन असे कसे? असा प्रश्न जगभरातले लोक विचारत आहेत.

जे घडलं ते घडलं. 

पुढं यातलं काय टाळता येईल असा विचार अमेरिकन लोकांना करायचाय.

ट्रंप हे अद्वितीय व्यक्तिमत्व आहे, अद्वितीय घटना आहे. पण त्यांना निवडुन देणारे भक्त ही काही अद्वितीय घटना दिसत नाही. जगात किती तरी ठिकाणी भक्तीसंप्रदाय सक्रीय दिसतोय. त्याचं काय करायचं असाही विचार जगाला करावा लागणार आहे.

।।

राष्ट्रपती बारमधे.

।।

आता दोन वेगळ्या राष्ट्रपतीना भेटूया.

झेकोस्लोवाकियाचे राष्ट्रपती वास्लाव हावेल यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती बिल क्लिंटन यांना देशभेटीचं अधिकृत आमंत्रण दिलं.

झेकोस्लोवाकियाच्या राष्ट्रपतीचं कार्यालय कॅसल मधे असतं, म्हणजे एका प्राचीन किल्ल्यात असतं. 

दोघांचा स्वभाव अनौपचारीक. 

हावेल म्हणाले, चला, शहरात फेरफटका करूया.

चालत चालत १४व्या शतकात बांधलेल्या एका पुलापर्यंत पोचले. हावेल त्यांना काय काय सांगत होते.

सभोवताली हज्जारो माणसांची गर्दी. झेक जनतेनं हावेलना असं रस्त्यातून फिरताना नेहमीच पाहिलं होतं, अमेरिकन राष्ट्रपती रस्त्यावर पायी फिरतोय याची त्यांना गंमत वाटली. माणसं   दोन्ही राष्ट्रपतींना खेटत होती. सेक्रेट सर्विसवाल्यांची तारांबळ उडाली. 

नंतर दोघं प्रागमधल्या एका प्रसिद्ध बारमधे पोचले. हा बार राष्ट्रपती हावेल यांच्या दीर्घ परिचयाचा. राष्ट्रपती होण्याआधी कार्यकर्ता, नाटककार, एक नागरीक म्हणून ते या बारमधे दररोज जात. आपण कुठं वाढलो ते हावेलना दाखवायचं होतं.

दोघांनी बारमधे जगप्रसिद्ध झेक पिल्सनर बियर घेतली. दोन बियर झाल्यावर क्लिंटन म्हणाले ” दोन ही हे माझं लिमिट आहे.” 

बारमधला ऑर्केस्ट्रा गाणी वाजवत होता.

हावेलनी क्लिंटनना एक सेक्साफोन भेट दिला. झालं. क्लिंटननी सेक्साफोन घेतला आणि त्यावर दोन लोकप्रिय गाणी वाजवली. जमलेल्या लोकांना धमाल आली.

दोन प्रेसिडेंट. बारमधे बियर घेतात. गातात. वाजवतात. नाचतात.

काय मजा आहे नै.

।।

त्रिभंग

रेणुका शहाणे दिग्दर्शित त्रिभंग थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.

भविष्यात नेटफ्लिक्स इत्यादी ओटीटी पडद्यावर सिनेमे पहाणाऱ्यांची संख्या सिनेमाघरात पहाणाऱ्यांपेक्षा जास्त असणार आहे.

एकेकाळी सिनेमाघरातल्या सिनेमांवर फार खर्च होत असे, त्या मानानं ओटीटीवरचे सिनेमे स्वस्तात काढत. कथानक, घटनास्थळं अशा रीतीनं बेतलेलं असं की स्टुडियोत काम भागत असे.

पण आता ओटीटीवर बरे पैसे मिळतात हे लक्षात आल्यावर भरपूर पैसे खर्च करून सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होऊ लागलेत. टू पोप्स हा मोठ्या बजेटचा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला. क्राऊन ही वेबमालिका म्हणजे एक महाचित्रपट आहे आणि तो ओटीटीवर प्रदर्शित झालाय, पाहिला जातोय.

ओटीटी सिनेमाचा एक विशेष म्हणजे तिथं जगभरातले प्रेक्षक असल्यानं विषयाचं स्वातंत्र्य असतं. भारतातल्या लोकांना भले राग येईल पण जगातल्या इतर लोकांना तो पहावासा वाटला तर कां दाखवू नये असा सवाल ओटीटीवाले करतात. एकाद्या सिनेमामुळं एकाद्या पक्षाचे भक्त दुखावत असतील तर फार कटकट झाली तर तो सिनेमा भारत वगळून इतर ठिकाणी दाखवता येतो. तंत्रज्ञानाची गंमत अशी की ठरवलं तर माणसं तो कुठंही पाहू शकतात. सिनेमाघरावर मोर्चा नेऊन नासधूस करता येते, नेटफ्लिक्सची नासधूस कुठं कुठं करायची?

त्रिभंग पहाण्यासारखा आहे. छोट्या मुलांचं यौन शोषण, स्त्रीचं समाजातलं स्थान हे गंभीर विषय दिद्गर्शक रेणुका शहाणे यांनी काही एका कौशल्यानं हाताळले आहेत. पटकथा कच्ची आहे, भूमिका अधिक बरेपणानं हाताळता आल्या असत्या. चित्रपटाला एक संथशी गती आहे.काहीसा अडखळत पण चित्रपट चांगला पुढं सरकतो.

हळूहळू भिंतीत शिरणाऱ्या स्क्रूच्या गतीनं फिल्म सरकते. फिल्म पहाण्यासारखी तर आहेच.

भारतातला एक अत्यंत दाहक पण सतत दडपून ठेवलेला विषय म्हणजे लहान मुलांचं यौनशोषण. सर्रास घरोघरी मुलांशी लैंगिक चाळे घरातलीच माणसं करतात. यातून होणारा त्रास मनात बाळगत माणसं मोठी होतात. फार गुंत्याची समस्या आहे. 

चित्रपटात या समस्येला स्पर्श केला आहे. या विषयावर पूर्णवेळ फिल्म करणं फारच कठीण आहे, त्यासाठी खूप क्षमता हवी, कौशल्य हवं. अशा विषयावरच्या गंभीर फिल्म प्रेक्षकांनाही पेलवत नाहीत.तीन चार वर्षंपूर्वी चर्चमधल्या पुरोहितांनी केलेले यौनशोषणाचे गुन्हे आणि चर्च कसं गुन्हे लपवून ठेवतं या विषयावर क्लब नावाची फिल्म झाली होती. फिल्म पहाणं नकोसं होतं इतकी प्रभावी होती ती फिल्म.

  या समस्येकडं लोकांचं लक्ष वेधलंय ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. 

माध्यमातलं हे एक चांगलं वळण आहे.

।।

पुस्तकं

आपल्या आजोबांनी स्थापलेलं १८० वर्ष जुनं पुस्तकांचं दुकान चालवणाऱ्या हेल्गा वेह या बाईचं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निधन झालं. त्या ९८ वर्षांच्या होत्या. बुकलँड (Buchhandlung) या तळमजल्यावरच्या दुकानात त्या दिवसभर बसत आणि संध्याकाळी वरच्या मजल्यावरच्या घरी परतत. चार जानेवारीला त्या दुकान बंद करून घरी परतल्या पण दुसऱ्या दिवशी दुकान उघडायला खाली आल्या नाहीत. रात्री कधी तरी त्यांचं निधन झालं होतं.

बर्लीनपासून ११० मैलावरच्या साल्झवेडेल या गावात १८४० साली स्थापन झालेलं हे दुकान हेल्गानं आपला आजोबा हेन्रिक वेह याच्याकडून १९६५ साली चालवायला घेतलं.

हेल्गाचे वडील, आजोबा, सगळीच मंडळी बंडखोर आणि स्वतंत्र विचाराची. हिटलरच्या काळात या दुकानात ज्यूनी लिहिलेली पुस्तकं चोरून विकली जात. त्यानंतर कधी काळी  जर्मनीच्या या भागावर कम्युनिष्टांचं राज्य होतं. तेव्हां धार्मिक, लोकशाही विचार इत्यादी सांगणारी पुस्तकं विकायला कम्युनिष्ट सरकारची बंदी होती. या दुकानात ते साहित्य विकलं जात असे.

कोणती पुस्तकं विकायची हे आपण ठरवणार असं वेह कुटुंबाचं म्हणणं होतं. ही मंडळी स्वतःच पुस्तकं निवडायची.   दुकानदारानं वाढवलेली वाचनाची सवय व चव यावर माणसं पोसली गेली. आपल्या मस्तीत दुकानं चालवणारे म्हणजे स्वतंत्र  ३५०० दुकानदार आजही जर्मनीत शिल्लक आहेत.

 आता  मोठ्या संख्येनं पुस्तकं काढणं, ती डिसकाऊंट देऊन विकणं असा उद्योग सुरु झाला. खप, मार्केटिंग हाच या पुस्तकांचा फंडा असतो, दर्जा ही गोष्ट दुय्यम असते. पण हेल्गा वेह यांच्यासारखे दुकानदार आजही दर्जेदार पुस्तकं शोधून आपल्या दुकानात ठेवतात, भले त्यांचा वाचक वर्ग कितीही लहान असो.

जर्मनीत एक गोष्ट आहे. काही पुस्तकांच्या किमती सरकारनं ठरवून दिलेल्या आहेत. ती पुस्तकं कमी किमतीत विकायची परवानगी नसते. दुसरं म्हणजे कोविड महामारी सुरु झाल्यावर जर्मन सरकारनं पुस्तकांची दुकानं अत्यावश्यक जीवनावश्यक ठरवली.

तर अशा या हेल्गा वेह बाई. अगदी शेवटपर्यंत हेल्गा स्वतःच्याच आवडीची पुस्तकं दुकानात ठेवत असे आणि एक वाचकमन तिनं तयार केलं होतं.

पाहुया त्यांचं दुकान आता त्यांच्या घराण्यातलं कोण चालवलंय. 

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *