ट्रंप यांच्यावरचा ताजा चरित्रपट

ट्रंप यांच्यावरचा ताजा चरित्रपट

  त्यांची आपली पत्नी इव्हाना हिच्यावर डोनल्ड ट्रंप बलात्कार करताना दिसतात. 

डोनल्ड ट्रंप त्यांची पाटलोण खाली करून उभे असतात आणि एक स्त्री त्यांना ‘ब्लो जॉब’ देत असते.

डोनल्ड ट्रंप स्त्रीशी संभोग करताना दिसतात.

हे सारं डीप फेक किंवा फेक क्लिप नाहीये. ही क्लिप कोणा माणसानं एआयचा वापर करून तयार केलेली नाहीये.

ही दृश्यं अली अब्बासी यांनी केलेल्या ‘दी ॲप्रेंटिस’ या चित्रपटातली आहेत. ट्रंप आणि हॅरिस यांच्यात निवडणूक स्पर्धा चालली असताना, हॅरिस आणि ट्रंप यांच्यातली एक वादचर्चा संपली असताना हा चित्रपट अमेरिकेत आणि ब्रीटनमधे प्रदर्शित झाला.

ट्रंप यांच्या वकीलानं या चित्रपटाला नोटीस पाठवली होती.’ चित्रपट दाखवलात तर बदनामीचा खटला भरू, प्रदर्शनावर बंदी घालू.’ निर्मात्यानं उत्तर दिलं. ‘हा चित्रपट विचारपूर्वक, पुराव्यांचा अभ्यास करून तयार केलेला आहे. प्रेक्षकांवरच त्या चित्रपटाचं भवितव्य सोडूया.’ ट्रंप यांना चित्रपट दाखवण्यात आला. ट्रंप यांनी प्रतिक्रिया दिली ‘चित्रपट घाणेरडा आहे, खोटारडा आहेत, त्यात तथ्थ्य नाही, तो मला बदनाम करण्यासाठीच केलेला आहे.’ पण नंतर त्यांनी पुढं काहीही हालचाल केली नाही. चित्रपट चालला पंधरा अठरा लाख डॉलरचा धंदा चित्रपटानं केला.

‘दी ॲप्रेंटिस’ हा चरित्रपट आहे. त्यात ट्रंप, त्यांची पत्नी, त्यांचा वकील आणि मेंटर रॉय कोहन, ट्रंप यांचे वडील ही सगळी पात्रं नावासकट आहे, त्यांच्या ओळखी चित्रपटानं जराही पुसलेल्या नाहीत.

ट्रंप यांनी गेब्रियल शेरमन यांना आपलं चरित्र लिहिण्याची कामगिरी सोपवली होती. शेरमन ट्रंपांशी कित्येक तास बोलले. पण चरित्र लिहून झालं नाही. शेरमननी ट्रंप यांच्या २०१६ च्या अध्यक्षीय मोहिमेचा  पत्रकार म्हणून अभ्यास केला, त्यावर लिहिलं. शेरमननी त्यांच्या हाती असलेल्या साधनांचा वापर करून चरित्रपटाची पटकथा लिहिली.

ट्रंप यांचा उदय चित्रपटात आहे. रियल एस्टेट उद्योगी या रुपात ते कसे नावारूपाला आले ते चित्रपटात सांगितलंय. न्यायाधीश, सरकारी वकील यांचं ब्लॅक मेलिंग करून, त्यांना पैसे चारून निर्णय आपल्या बाजून कसे करून घ्यायचे याचं प्रशिक्षण रॉय कोहेन या वकिलानं ट्रंपना दिलं. कोहेननं पटवलं की सत्य नावाची गोष्ट नसते, ती माणसानं केलेली कल्पना आहे. तुम्ही जे सिद्ध करता तेच सत्य असतं.

हल्ला करा, समोरच्याच्या मनात भीती निर्माण करा, सर्व आरोप नकारा, काहीही कबूल करू नका, खटले भरत रहा, खटले आपल्या बाजूनं होतील असं करत रहा. बस. यश मिळेल. असं कोहेननं शिकवलं.

तेच ट्रंप करत गेल्याचं चित्रपटात दिसतं.

न्यू यॉर्कमधली जमीन विकत घेतली, जमिनीचा विकास केला, तिथं एक मोठ्ठं हॉटेल बांधलं. सर्व व्यवहार बेकायदेशीर. शहर पालिका,विकास बोर्ड या ठिकाणच्या लोकाना लाच दिली, कोर्टाची दिशाभूल केली, सरकारी वकीलाचं  ब्लॅक मेलिंग केलं. ट्रंप टॉवर उभा राहिला.

हे सारं ट्रंप यांच्या राजकीय उदयाच्या आधीचं आहे.

दबाव, दादागिरी आणि पैसे हाच ट्रंप यांच्या यशाचा मुख्य आधार आहे हे चित्रपटभर आपल्याला दिसतं.

चित्रपटात   लपवाछपवी नाही. डॉक्युमेंटरीसारखी मांडणी आहे, पण निवेदक  वापरलेला नाही. कथानक आपलं आपणच सरकत जातं.

अब्बासी हा डेन्मार्कमधे चित्रपट कला शिकलेला दिक्दर्शक आहे. कोणतेही चमत्कार, अँगलची करामत, स्पेशल इफेक्ट इत्यादी न वापरता सरळ धोपट चित्रपट मांडलेला आहे. ट्रंप आणि कोहेन यांच्या दृष्टीतून आपल्याला चित्रपट दिसतो.

सेट प्रभावी आहेत. ट्रंप टॉवर, वकीलांची घरं आणि ऑफिसं, बार, क्लब या ठिकाणी कथानक घडतं. त्या जागा तपशीलासह आणि भव्यतेसह दिसतात.

ट्रंप, कोहेन किंवा इतर मंडळी आपल्याला चित्रपटात दिसतात तेव्हां अनेक वेळा त्यांच्या हातात दारूचा ग्लास दिसतो. ट्रंप ज्या वर्तुळात वावरतात त्याचं हलकेच दर्शन घडतं. भरपूर सेक्स दिसतो. दारू आणि सेक्स या गोष्टींचं अमेरिकन जीवनातलं स्थान चित्रपटात दिसतं. जे दाखवलंय ते वास्तव आहे पण ते पहाताना काही वेळा हसू येतं. दारूबद्दल प्रेम वाटत नाही आणि सेक्समुळं चाळवायला होत नाही. 

ट्रंप यांची ऊर्जा, धडपड, चित्रपटात दिसते. इतकी ऊर्जा त्यांच्याकडं कुठून येते या प्रश्नाचं उत्तरही चित्रपटात आहे. उन्माद निर्माण करणाऱ्या गोळ्या ट्रंप घेताना दिसतात.

दिक्दर्शक अब्बासी मूळचा इराणी आहे. त्याचं चित्रपट कलेचं शिक्षण स्वीडनमधे झालंय, तो रहातोही कोपनहेगनमधे. अब्बासी हे इराणी आणि युरोपीय प्रभावाचं मिश्रण आहे. त्यामुळं तो अमेरिका आणि ट्रंप यांच्याकडं एका अंतरावरून पाहू शकतो. तो अमेरिकेच्या प्रेमातला माणूस नाही. अमेरिका आणि ट्रंप हे त्याच्यासाठी चित्रपटाचे विषय आहेत.

चित्रपट ट्रंप यांची बदनामी करत नाही. ट्रंप यांचं काम केलेला सबॅस्टियन स्टॅन हा एक देखणा नट आहे. त्यानं ट्रंप यांना समजून घेऊन अभिनय केलाय.आपण एक अध्यक्ष, एक बदनाम माणूस चितारतोय असं मनाशी धरून त्यानं काम केलेलं दिसत नाहीये.

चित्रपटाला कोणतीही तीव्र प्रतिक्रिया आलेली दिसत नाही. ट्रंपवादी लोकंही थंड आहेत. 

हा चित्रपट अमेरिकन तरूणांनी पाहिला तर त्यांना काय वाटेल? चित्रपटात दिसतो तो ट्रंप अमेरिकन वळण, अमेरिकन संस्कृती दाखवतो. पैसा पैसा करणं, पैशासाठी हपापलं असणं, त्यासाठी काय वाट्टेल ते करणं यात फार गुन्हा आहे असं अमेरिकन माणसाला वाटत नाही. त्या अगदी सामान्य गोष्टी वाटतात. पैसा चारणं, लाच देणं, दादागिरी करणं हे तर सर्वच लोक करतात, त्यात काय मोठंसं असं अमेरिकन माणूस अगदी सहजपणे म्हणतो. भारतीय, युरोपीय, इराणी माणूस तसं म्हणत नाही.

शक्यता आहे की अमेरिकन तरूणाला हा चित्रपट पसंत पडला असेल. भले ट्रंप हा त्यात रोल मॉडेल म्हणून दिसत नसेल पण त्याच्याबद्दल घृणा यावी असाही तो चित्रपटात दिसत नाही.

एक वेगळाच चरित्रपट आहे. ना बदनामी ना भलामण. 

।।

Comments are closed.