डळमळीत लोकशाही- तांझानिया

डळमळीत लोकशाही- तांझानिया

तांझानियातली डळमळीत लोकशाही

तांझानियाच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. उद्याच्या डिसेंबरमधे स्थानिक संस्थांच्या निवडणुका होतील आणि पुढल्या वर्षी ऑक्टोबरमधे लोकसभेच्या निवडणुका होतील.

तांझानियाच्या दारे सलाम या राजधानीच्या गावातली नुकतीच घडलेला घटना. तांझानियाच्या चाडेमा या विरोधी पक्षाचे सेक्रेटरी अली महंमद किबाव घरी परतत असताना बसमधून त्यांना काही लोकांनी उतरवलं. त्यांचे हात बांधले. घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी त्याचं प्रेत सापडलं. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या, त्याच्या चेहऱ्यावर ॲसिडच्या खुणा होत्या.

गेले काही दिवस विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अपहरणाच्या घटना घडत आहेत.

तांझानियाला हडेलहप्पी आणि बुलडोझरशाहीचा नजीकचा इतिहास आहे. 

तांझानियाच्या प्रेसिडेंट सामिया हसन यांनी वरील घटनांचा निषेध केला, चौकशीचे आदेश दिले. अध्यक्ष असल्यानं घडलेल्या घटनांची जबाबदारी त्यांना टाळता येत नाही.

२०१५ ते २०२१ जॉन मॅगुफुली तांझानियाचे अध्यक्ष होते. त्यांना लोक बुलडोझर म्हणत असत यावरून त्यांचं राजकीय चरित्र लक्षात यायला हरकत नाही. २०२१ साली सामिया उपाध्यक्ष होत्या आणि जॉन मॅगुफुली यांचा मृत्यू झाल्यावर त्या आपोआप अध्यक्ष झाल्या.

जॉन मॅगुफुली यांची कारकीर्द कशी होती पहा. 

मॅगुफुली यांनी २०१५ आणि २०२० अशा दोन निवडणुका लढवल्या. दोन्ही निवडणुका म्हणजे लोकशाहीची थट्टा होती.

विरोधी पक्षांवर बंदी होती. विरोधी पक्षाचे नेते, कार्यकर्ते तुरुंगात होते. शेकडो कार्यकर्त्यांचं अपहरण झालं होतं, खून झाले होते. निवडणुसाठी उमेदवार उभा राहिला रे राहिला की सत्ताधारी पक्षाचे लोक त्याला उमेदवारी मागं घ्यायला सांगत, सत्ताधारी पक्षात प्रवेश करून सत्ताधारी पक्षातर्फे निवडणुक लढायला सांगत. त्यानं ऐकलं नाही तर तो उमेदवार फडतूस आरोपाखाली तुरुंगात जात असे, निवडणुक लढायला अपात्र ठरत असे. अनेक उमेदवारांचं अपहरण झालं, खून झाले.

सत्ताधारी सोडता इतर कोणालाही सभा घ्यायला परवानगी नव्हती. सभा घेतली तर ती उधळून लावली जात असे, जमलेल्यांना अटक केली जात असे.

येवढं करूनही जे मूठभर लोक मैदानात उतरले त्यांना मतं पडणार नाहीत याची व्यवस्था झाली होती. मॅगुफुली यांच्या नावावर शिक्का मारलेल्या मतपत्रिका पेटीत कोंबल्या गेल्या, इतर मतपत्रिकांना पेटीत जागाच नव्हती.

गंमत म्हणजे अनेक बोगस मतदान केंद्रही उभारण्यात आली होती. बावळट लोकांनी तिथं जाऊन मतं टाकली. मतदान संपल्यावर केंद्र आणि पेट्या सारंच गायब.

८५ टक्के मतं मिळवून जॉन अध्यक्ष झाले. लोकसभेत फक्त सात जागा इतरांना मिळाल्या. हे इतरही आपण लोकशाही चालवतो हे दाखवण्यासाठी निवडून आणलेले सत्ताधारी पक्षाचे हस्तक होते.

आधुनिक हुकूमशाहीच्या सर्व आयडिया जॉन मॅगुफुली यांनी वापरल्या होत्या. देशीवाद आणि गरीबी दूर करणं या त्यांच्या घोषणा होत्या. तांझानियातली गरीबी अमेरिकन-पश्चिमी संस्कृतीमुळं आली असल्यानं त्या संस्कृतीशी दीर्घ लढा द्यायचा आहे असं मॅगुफुली सांगत. त्यांची भाषा भडक असे. आपण धडाक्यानं कामं करतो हे दाखवण्यासाठी ते जाहीरपणे सरकारी अधिकाऱ्यांची निंदा करत, त्याना शिव्या घालत, तडकाफडकी जाहीर सभेमधेच ते अधिकाऱ्याना निलंबीत करत असत. लोकांना वाटे की ते तडफदार आहेत. विरोधी पक्षाचे लोक, त्याना विरोध करणारे लोक देशद्रोही असल्यानं त्यांची विल्हेवाट लावणं योग्यच आहे असं ते जाहीपणानं म्हणत.

कोविड आला. मेगॅफुली म्हणाले की कोविड हे भूत आहे, ते देवानं निर्माण केलेल्या माणसाच्या शरीरात टिकूच शकत नाही, देवच कोविडचा नाश करणार आहे. कोविडच्या काळात तांझानियात लोक सर्रास एकमेकाला कोविड देत कामं करत फिरत होते. चर्चमधे जाऊन प्रार्थना करा असं मेगॅफुली सांगत. कोविड हे पश्चिमी देशांनी निर्माण केलेलं एक षडयंत्र आहे असं ते म्हणत. त्यांचा मास्क वापरायला विरोध होता. 

मेगॅफुली सायकलवरून फिरत.

एकत्रित परिणाम असा की ते निवडून येत.

ही कार्यशैली शिकवणारं पाठ्यपुस्तक जगात कुठं तरी नक्की असणार. कारण जगात अगदी तंतोतंत या रीतीनं काम करणारे फार राज्यकर्ते दिसतात. पुतीन आहेत, किम जाँग ऊन आहेत, ट्रंप आहेत…. 

ही मेगॅफुली यांची एक बाजू झाली.

दुसरी बाजू म्हणजे त्यांचा विकासाचा ध्यास. मेगॅफुली इंजिनियर होते. काही काळ ते बांधकाम मंत्री होते. अध्यक्ष झाल्यावर त्यांनी इन्फ्रा स्ट्रक्चरची काम काढली. रस्ते बांधायला घेतले. अनेक वर्षांपासून रखडलेलं एक धरण बांधायला घेतलं. तांझानियाला शेजारच्या देशांशी जोडणाऱ्या रेलवे लायनी त्यांनी हाती घेतल्या. ब्रॉड गेज रेलवेची तयारी सुरु केली. 

कामं गतीनं व्हायला पाहिजेत असं त्यांना वाटे. कोणी कामाबद्दल चौकशी करणं, आक्षेप घेणं, पर्याय सुचवणं इत्यादी गोष्टी कामाच्या आड येतात असं त्याना वाटे. कोणतंही वेगळं मत त्यांना सहन होत नसे. आपल्या बाजूचा किंवा विरोधक अशी टोकाची भूमिका ते घेत. सरकारी कामावर टीका करणं हा त्यांनी कायद्यानं गुन्हा ठरवला, पत्रकार व विरोधकाना तुरुंगात घातलं. ऑडिटर ही संस्थाही त्यांनी बंद करून टाकली. 

एक तरफी निर्णय करायचे, एकतरफी अमलात आणायचे.आपल्याला सारं समजतं असं त्यांना वाटत असे.

कामं वेगानं करण्याच्या नादात दर्जा घसरला तर? मोठे प्रकल्प पूर्ण व्हायला वेळ लागतो, त्यात पैसे अडकतात, याचा अर्थव्यवस्थेवर परिणामही होत असतो. असे अनेक वाजवी प्रश्न असतात, ते विचारले गेले पाहिजेत, हे त्यांना मंजूर नव्हतं.   हडेलहप्पी म्हणजेच गव्हर्नन्स अशी मेगॅफुली यांची व्याख्या होती.

तांझानियाला भ्रष्टाचाराचा इतिहास आहे. तांझानियात ४४ टक्के माणसं गरीब आहेत. आर्थिक प्रश्न बिकट तर आहेतच. लोकशाहीमधे कामांची गती काहीशी संथ असते. पण लोकशाहीमधे चुका सुधारायला वाव मिळतो. हुकूमशहा उद्योग करून बसतो, त्याचे परिणाम पुढल्या पिढ्या भोगत बसतात.

सवंग घोषणा, तडकाफडकी निर्णय घेणं या गोष्टी लोकप्रियता जरूर देऊ शकतात, पण त्यांचा दूरगामी परिणाम होत असतो हे लक्षात घ्यावं लागतं.

 वेगानं श्रीमंती आणि लोकशाही यांचा सांधा जुळणं कठीण असतं याचा अनुभव आता तांझानियाला घ्यायचा आहे.

 सामिया लोकांशी जुळवून घेण्याच्या मूडमधे दिसतात. निवडणुका मोकळेपणानं होतील असं त्या म्हणत आहेत. जाहीर सभांना त्यांनी मान्यता दिलीय. वर्तमानपत्रांवरची बंधनं शिथील केलीत. कमला हॅरिस यांना त्यांनी तांझानियात नेलं. त्या स्वतः अमेरिकेला जाऊन कमला हॅरिस यांना भेटल्या. पश्चिमेबरोबर चांगले संबंध ठेवले पाहिजेत असं त्यांना वाटतंय.

थोडक्यात सांगायचं तर मेगॅफुली यांच्या शैलीला रजा द्यायचा त्यांचा विचार दिसतोय. तरीही अजून विरोधकांचा काटा निघतोय ही गोष्ट बुचकळ्यात पाडणारी आहे.

।।

Comments are closed.