दारू. डेंजर. पिणं कमी होईल?
इथून पुढं कधीही दारूच्या बाटलीवर कवटी हाडाचं चिन्हं दिसू शकेल. ज्या कुठल्या बाटलीत अल्कोहोलवालं पेय असेल अशा प्रत्येक बाटलीवर. त्या चिन्हाखाली लिहिलेलं असेल ‘दारू आरोग्याला हानीकारक ठरू शकते. दारूमुळं सतरा प्रकारचे कॅन्सर संभवतात. दारु पिण्यापूर्वी विचार करावा.’
वरील सूचना सर्जन जनरलनं अमेरिकन काँग्रेससमोर ठेवली आहे; अमेरिकन काँग्रेसनं कायदा करावा असा त्या सूचनेमागचा उद्देश आहे.
सर्जन जनरल हे अमेरिकेच्या आरोग्याची काळजी घेणारं एक पद आहे. हज्जारो संशोधकांनी केलेल्या ताज्या आरोग्य विषयक संशोधनाच्या आधारे सर्जन जनरल वेळोवेळी अमेरिकन माणसाला सल्ला देत असतो. अमेरिकेत आरोग्य व्यवस्था, औषधं व्यवस्था इत्यादीबाबत कायदे करताना आणि आदेश देताना सर्जन जनरलचा सल्ला घेतला जातो.
सर्जन जनरलचा सल्ला गेल्या १० वर्षात जगभर झालेल्या संशोधनपर अभ्यासांवर आधारलेला आहे. १९५ देशात २ कोटी लोकांचा अभ्यास हा वरील निष्कर्षाचा आधार आहे.
भविष्यात कधी तरी कॅन्सरनं गाठणं हा भाग बाजूला राहू द्या. दारूचे दुष्परिणाम ही एक मोठी समस्या अमेरिकेसमोर आहे. गेल्या वर्षी अमेरिकेत १.५ कोटी लोक मद्यातिरेकानं हैराण होते, त्यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती. पैकी फक्त १० टक्के लोकांनाच उपचार देण्याची सोय अमेरिकेत आहे. दर महिन्याला ६.५ कोटी लोक दारू ढोसतात, बिंज दारूकाम करतात. दर वर्षी ४७०० किशोरवयीन मुलं दारू पिण्यामुळं मरतात.
❖
दारू हे प्रकरण अवघड आहे. दारू सगळ्या जगभर पितात. दारू कित्येक हजार वर्षं पितात. दारू संस्कृतीत आहे, धर्मात आहे. ख्रिस्तानं पाण्याची वाईन केली. हिंदू देव देवता बिनधास दारू पिताना दिसतात. इस्लाममधे मात्र दारू वर्ज्य आहे. पण इस्लामी माणसं शिकवण धाब्यावर बसवून दारू पितातच.
जगभर दारू पिणं चांगलं नाही असंही सांगितलं जातं आणि दारू प्यायला हरकत नाही असंही सांगितलं जातं. जगभर दारू पिणं प्रतिष्ठेचं आणि फॅशनचं लक्षण मानलं जातं आणि जगभर दारू पिणारा तळीराम होतो असंही सांगितलं जातं. काही डॉक्टर दारू योग्य प्रमाणात आरोग्याला चांगली असते असं सांगतात तर दारू हानीकारक आहे असं काही डॉक्टरच ठासून सांगतात.
दारु उत्पादक नाना पद्धतीनं दारूचा प्रचार करतात. थंडीचा मोसम आला की वाईन आणि व्हिस्कीच्या जाहिराती सुरु होतात.पेपरात लेख छापून येतात की व्हिस्की ही वाईनपेक्षा जास्त चांगली. नंतर वाईन ही व्हिस्कीपेक्षा तब्येतीला कशी उपकारक असते असं सांगणारे लेख छापून येतात. दारूमुळं झोप चांगली लागते, दारूमुळं पचन सुधारतं वगैरे गोष्टी लेखांतून मांडल्या जातात. उन्हाळा आला की बियरच्या जाहिराती सुरु होतात. दोन बाटल्या घेतल्या तर एक बाटली मोफत अशा स्कीम जाहीर होतात.
दारूवाल्यांचं जाहिरात आवर्तन संपलं की दारुविरोधकांचे लेख सुरु होतात. दारूचे दुष्परिणाम त्यात सांगितले जातात. दारूड्यांचा कसा त्रास होतो, दारूमुळं लीव्हर खराब होते वगैरे. जगातला कोणताही प्राणी दारू पीत नाही असं सांगून प्राण्यांसारखं वागा असंही सांगणारे लेख प्रसिद्ध होतात.
दारू प्या असं म्हणणारी चळवळ कोणी चालवत नाही. प्रत्येकानं इतकी इतकी दारू प्यालीच पाहिजे असा कायदा आजवर कोणा राजानं किंवा सरकारनं केल्याचं ऐकिवात नाही. पण दारुबंदी, नशाबंदीचे कायदे मात्र अनेक देशात वेळोवेळी झाले आहेत.
गंमत अशी की दारुबंदी केली की दारूचा खप वाढतो. गुजरातमधे दारूबंदी आहे. तिथं दारुची जबरदस्त विक्री होते. महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात दारुबंदी आहे. तिथं लोक दणकून दारू पितात. दोन्ही ठिकाणी दारुची दुकानं नाहीत पण तल्लफ आलेल्या माणसाला म्हणेल ती दारू म्हणेल तेव्हां मिळते. पोलिस लोक दारुबंदी अमलात आणू शकत नाहीत असा सार्वत्रिक अनुभव आहे.
महाराष्ट्रात सरकारनं गांधीजींची आठवण काढत वर्ध्यात दारूबंदी ठेवलीय, पण बाकीच्या महाराष्ट्रात दारू खुल्ली आहे. सरकार परदेशी दारूवरचा कर कमी करतं, देशी दारूवर कर वाढवतं. महाराष्ट्रातला माणूस दारू महाग झाली तरीही पिणं सोडत नाही; महाराष्ट्र सरकारकडं भरपूर पैसे गोळा व्हावेत; त्या पैशातून सरकारनं गरीबांचं भलं करावं अशा उदात्त हेतूनच तो दारू पीत असतो. दारुविक्रीतून होणारं उत्पन्न महाराष्ट्रात एक महत्वाचा घटक आहे.
गोवा सरकार तर भारत आणि जगभरच्या लोकांना आग्रह करकरून दारू प्यायला बोलावतं. गोवा लोकांचं किती कल्याण करत असेल याची कल्पना करा.
भारतात दारुला प्रतिष्ठा नाही पण ऊच्च वर्गात मात्र दारू ही त्यांच्या श्रेष्ठत्वाची कसोटी मानली जाते. हजार दोन हजार रुपयाचा एकेक थेंब थेंब पिताना किवा सांडताना तो माणूस दारूचा उल्लेख गौरवानं करत असतो.
दारुबंदी करून भागत नाही.
सर्जन जनरलनं दारूच्या बाटलीवर ताकीद लिहून काही परिणाम होईल काय?
❖
युके, अमेरिका, रशिया हे दारू पिणारे देश. तिथं वर्षाला दर माणसी १० लीटरपेक्षा जास्त अल्कोहोल प्राशन केला जातो. एक माप, एक पेग होतो ६० मिलीचा. त्यात सुमारे २० मिली अल्कोहोल असतो. १० लीटर अल्कोहोल म्हणजे म्हणजे वर्षभरात ५०० मापं दारू पितात. भारतात त्याच्या निम्मे म्हणजे सुमारे ५ लीटर अल्कोहोल पितात. सर्वात कमी अल्कोहोल घेणारे देश म्हणजे बांगला देश आणि अफगाणिस्तान. अफगाणिस्तानात अख्या वर्षात सरासरी माणूस फक्त २०० मिली दारू पितो तर बांगला देशात फक्त १०० मिली.
बांगला देश, भुतान, अफगाणिस्तानात सर्जन जनरलच्या ताकिदीची आवश्यकताच नाही. बाकीच्या देशात?
गेल्या वर्षी जगभरात २१०० अब्ज डॉलरची दारू विक्री झाली. दारू उत्पादन आणि विक्री ही एक प्रचंड उलाढाल आहे, किती तरी लोकांचं ते उत्पन्नाचं साधन आहे. लोक दारू कमी प्यायला लागले तर त्या उद्योगाचं काय होईल?
❖
तंबाखू-सिगरेटच्या दुष्परिणाम माध्यमांतून लोकांसमोर ठेवण्यात आले. सिगरेटच्या पाकिटावर सिगरेटच्या भयानक परिणामांची ताकीद छापली गेली. जगभर सिगरेट पिणाऱ्यांची संख्या खूप कमी झालेली दिसतेय.
इग्लंडचं उदाहरण. गेली काही वर्षं युकेच्या सरकारनं प्रमाणाबाहेर दारू पिण्याचे दुष्परिणाम या विषयावर प्रचार मोहीम चालवली. माध्यमांतून दिली जाणारी माहिती आक्रमक स्वरुपाची नव्हती, मवाळ पद्धतीनं लेखांनी वाचकांसमोर दारूच्या संभाव्य दुष्परिणामांची माहिती दिली. सरकारनं मद्यामधे असलेल्या अल्कोहोलच्या प्रमाणानुसार मद्यावर कर वाढवले. ब्रिटीश माणूस पैशाचा हिशोब करतो.कर वाढवल्यावर काही लोकांनी कुरकूर केली, मोर्चे निघाले नाहीत, लोकांनी कमी दारू प्याली.
युकेमधे आता दारू सेवनाचं प्रमाण कमी होत चाललंय. अनेक पहाण्या सांगतात की तरूणांमधे दारू न पिणाऱ्यांची संख्या वाढत चाललीय. अलीकडं युकेमधे पब आणि नाईट क्लब कमी होत चालले आहेत. पब आणि नाईट क्लब या गोष्टी ब्रिटीश संस्कृतीचा भाग आहेत, त्यांची संख्या कमी होणं ही एक दुःखाची गोष्ट आहे असं तिथले लोक म्हणत आहेत. या संख्या कमी होण्यात तरूण पिढी अल्कोहोलपासून दूर जातेय हाही घटक आहे असं काही पाहण्या सांगतात. हा युके सरकारनं सावधपणे चालवलेल्या मोहिमेचा परिणाम असणं शक्य आहे.
एकादी गोष्ट करू नकोस असं सांगितलं की ती करायलाच हवी असं माणसाला वाटतं. हे मानवी स्वभावाचं एक वैशिष्ट्य आहे. दारुविरोधी तीव्र प्रचार केला की माणसं म्हणतात ‘तर दारू प्यायलाच हवी’. दारूविरोधी प्रचाराचा वीट आल्यानं जरा विरंगुळा म्हणून माणसं पीत असावीत.कायदा मोडण्यासाठीच केला जातो अशी एक समजूत समाजात असते. त्यामुळंही दारुबंदीचा कायदा केला की त्याचे उलटे परिणाम होतात.
एकादी गोष्ट केली पाहिजे असं माणसाला कळकळीनं कधी आणि कसं वाटेल ते सांगता येत नसतं. मुंबईत मागं एकदा लोकल ट्रेनला भीषण आग लागली, माणसं मेली. डब्यात कोणी तरी सिगरेट ओढल्यामुळं ही आग लागली असं निष्पन्न झालं.
दुसऱ्या दिवसापासून मुंबईकरांनी ठरवलं की ट्रेनमधे सिगरेट ओढायची नाही. रेलवेनं कायदा करायची वाट लोकांनी पाहिली नाही. एके दिवशी टाईम्समधे लक्ष्मण यांचं व्यंगचित्र होतं. त्यात रेलवे फलाटावर सिगरेटच्या थोटकांचा ढीग दिसला. लोक फलाटावर सिगरेट ओढत, गाडी आल्यावर सिगरेट फलाटावर विझवत आणि गाडीत प्रवेश करत. अलिकडं सार्वजनिक ठिकाणी लोक धुम्रपान करत नाहीत.
‘दारू चांगली की वाईट याची चर्चा गेली चुलीत. करणाऱ्यांनी ती करत रहावी. मला वाटू लागलंय की दारू न पिलेली बरं. तळीराम नको आणि एकदम महात्मा गांधीही नको. निदान कमी तरी करूया’ असं माणसाला वाटेल?
सर्जन जनरलच्या दारूजाणीव मोहिमेचा परिणाम होऊ शकेल?
दारूच्या अतिरेकाला वैतागलेली माणसं सर्जन जनरलच्या प्रयत्नामुळं आपलं आपणच कमी दारू पितील?
❖
क्रांती धोकादायक असते. क्रांतीची प्रतिक्रिया उमटते, प्रतीक्रांती होते.
हळूहळू झालेले बदल टिकतात.
❖